News Flash

चर्चा : या नग्नतेचं काय करायचं?

अभिनेत्री कल्की कोचलीनने टाकलेल्या नग्न फोटोचं कसलं कौतुक करायचं?

ज्या समाजात सुंदर, तुकतुकीत, तजेलदार काळा रंग असलेली स्री जाहीरपणे सोडाच स्वत:शीदेखील ‘आय लव्ह माय बॉडी’ असं म्हणू शकत नसेल त्या समाजात ‘लव्ह युवर नेकेडनेस’ म्हणत अभिनेत्री कल्की कोचलीनने टाकलेल्या नग्न फोटोचं कसलं कौतुक करायचं?

एकीकडे खासगीपणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला असतानाची बोलकी घटना आहे ही. बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलीनच्या बाबतीतली. तिने गेल्याच आठवडय़ात इन्स्टाग्रामच्या तिच्या अकाऊंटवर तिचा एक पाठमोरा नग्न फोटो टाकला होता. फोटोला कॅप्शन होती, ‘लव्ह युवर नेकेडनेस’. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमधला, अर्थातच सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सांभाळून काढलेला, अश्लीलतेकडे जराही न झुकलेला, मानवी त्यातही स्त्रीशरीराचं सौंदर्य अधोरेखित करणारा, खरं तर कलाकृती म्हणून उत्तम म्हणता येईल असाच फोटो होता तो. कल्कीनेच सोशल मीडियावर टाकलेला असल्यामुळे आजकालच्या प्रथेनुसार तिचं भरपूर ट्रोलिंग झालं. कुणी फोटोचं, फोटोग्राफर रिवा बब्बरचं, कुणी कल्कीच्या सुंदर शरीराचं, कुणी तिच्या धाडसाचं कौतुक केलं. कुणीकुणी तिला भरपूर शिव्या घातल्या. थोडक्यात ज्यांना आवडायचा त्यांना फोटो आवडला, नाही त्यांना नाही आवडला. विषय खतम.

ट्रोलिंग करणाऱ्यांव्यतिरिक्त अनेकांना असा प्रश्न पडला होता की का म्हणून कल्कीने असा फोटो टाकावा आणि म्हणावं की ‘लव्ह युवर नेकेडनेस’? स्वत:च्या शरीरावर कुणीही प्रेमच करत असतं. मग त्या प्रेमाचं हे असं कलात्मक असलं तरी प्रदर्शन का? हे सगळं कशासाठी?

अर्थात कल्कीच नाही, काही दिवसांपूर्वी ईशा गुप्ता या अभिनेत्रीनेही तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचंही भरपूर ट्रोलिंग झालं होतं. त्याही आधी मराठी सिनेसृष्टीतल्या स्पृहा जोशीनेही अनावृत पाठीचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते. त्या वेळीही तिचं भरपूर ट्रोलिंग झालं होतं. ‘माय चॉइस’ या वर्ष-दोन वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणने केलेल्या व्हिडीओमध्येही थेट असं काही केलं नसलं तरी असं काही करायचं की नाही हा आपला चॉइस असल्याचा मुद्दा ठासून मांडला गेला होता. खरं तर एखाद्या अभिनेत्रीनं आपलं शरीर जास्तीतजास्त उघडं दाखवत त्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करायचे, त्याची चर्चा होऊ  द्यायची, आपल्यावर टीका होऊ  द्यायची आणि मग बघा आपला समाज कसा असहिष्णू आहे, स्त्रियांच्या वाटचालीत अडथळे आणणारा आहे, अशी भूमिका घ्यायची असं अलीकडे बऱ्यापैकी नियमित व्हायला लागलं आहे.

व्यापक अर्थाने बघितलं तर कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिगत मत आहे.  शिवाय टीव्हीसारख्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या सिनेमांमधून हिंसा आणि शरीरप्रदर्शनाचा इतका मारा होत असतो, प्रत्येकाच्या हातात मोबाइल आणि फोरजीचा रतीब यामुळेही आपण समाज म्हणून नग्नता, शरीरप्रदर्शन याचा बाऊ  वाटावा याच्याही पुढे गेलेलो आहोत. पण तरीही आज तसं होताना दिसत नाही. आपलं शरीर दाखवणं हा कल्कीचा स्वत:चा निर्णय असू शकतो आणि तो घ्यायला ती मुखत्यार आहे. फक्त प्रश्न असा असू शकतो की कशासाठी शरीर दाखवायचं? चित्रपटांमधलं शरीरप्रदर्शन कथानकाची गरज म्हणून येतं तेव्हा त्याला कुणी विरोध केला तर तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरचा घाला ठरू शकतो. पण एरवी कशातच काही नसताना असा फोटो सोशल मीडियावरून शेअर करण्यामागे मार्केटिंगशिवाय दुसरं काय असू शकतं? मुळात कल्कीसारख्या अभिनेत्रीला ते करावंसं का वाटावं?

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजात असं दिसतं की सर्व प्रकारच्या संधी एके काळी नाकारल्या गेलेल्या, कुटुंबसत्ता, धर्मसत्ता यांच्या वर्चस्वाखाली जगणाऱ्या स्त्रीला तिला काही ठिकाणी काही प्रमाणात का होईना मोकळेपणा मिळाला आहे. जी माजघरातून दिवाणखान्यात येऊ न घरातल्या पुरुषांसमोर बोलूही शकत नसायची ती आज तिला हवे ते करू शकते, बिनधास्तपणे वावरू शकते हे तिच्या आत्मविश्वासाचं निदर्शक आहे. तिनं काय खायचं, प्यायचं, कधी लग्न करायचं, किती मुलं होऊ  द्यायची, कोणते कपडे घालायचे हे सगळं एकेकाळी ती सोडून इतर सगळे लोक ठरवायचे. त्यांना आज ती ठणकावून सांगते की या माझ्या शरीराचं काय करायचं ते मी ठरवेन. हे सगळं करायला जबरदस्त आत्मविश्वास लागतो. कारण हे केल्यानंतर चित्रविचित्र कॉमेंट्स येणार असतात, तुमच्या त्या फोटोचे जिथेतिथे दाखले दिले जाणार असतात. ते सगळं अंगावर घेण्याची तुमची तयारी असावी लागते. ती आपली आहे हे कल्कीनंच नाही तर स्वत:च्या सुंदर शरीराचा अभिमान असणाऱ्या अभिनेत्रींनी दाखवून दिलं आहे. या आत्मविश्वासाबरोबरच माझ्या शरीरावर माझा अधिकार हे स्त्रीवादी भानही त्या कळत नकळतपणे पुढे नेत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने स्वत:चं सुंदर शरीर दाखवणाऱ्या अभिनेत्री किंवा कुणावरही टीका करण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा त्यांचा प्रश्न म्हणून खरं तर ते सोडून देणं उत्तम. पण इथे प्रश्न फक्त तेवढय़ापुरताच नाही. त्यापाठोपाठ येणारे वेगवेगळे मुद्देही लक्षात घ्यायला हवेत.

माणसासहित सगळेच प्राणी ही निसर्गाची अत्युत्तम निर्मिती आहे. अगदी लहानशा कीटकापासून ते महाकाय अशा हत्तीपर्यंत नर आणि मादी अशा प्रत्येक शरीराचं इंजिनीअरिंग आणि त्याचबरोबर शारीरसौंदर्य हे निर्विवाद आहे. माणूसही त्याला आपवाद नाही. पण उत्क्रोंतीच्या प्रक्रियेत माणूस कपडे घालायला शिकला. शरीर योग्य पद्धतीने झाकणं हा सामाजिक संकेत तयार होत गेला. आणि नग्नता ही तो संकेत पायदळी तुडवणारी गोष्ट ठरली. एखादी गोष्ट झाकली गेली की तिच्याबद्दलचं कुतूहल जास्त वाढतं. त्यात इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस हा असा प्राणी आहे ज्याला इतरांच्या लैंगिकतेबद्दल, नग्नतेबद्दल आत्यंतिक कुतूहल आहे. त्यामुळे सगळे सामाजिक संकेत पाळत मानवी शरीरसौंदर्य दाखवणं हे चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, वस्त्रोद्योगातील कलाकार मंडळी यांच्यासाठी नेहमीच आव्हानाचं ठरत आलेलं आहे. त्यातही कमनीय, घाटदार, लयबद्ध असं स्त्रीशरीर कलासक्त पद्धतीने दाखवणं आणखी आव्हानाचं आहे. त्यातून त्या कलाकाराची कलाजाणीव अधिकाधिक समृद्धच होत जात असते. त्याच्या जाणिवेचा एक पुढचा टप्पा तो पार करत असतो. या पाश्र्वभूमीवर कल्कीचा नग्न फोटो बघितला की मग त्यामागचं कलात्मक भान जाणवायला लागतं. नग्नता ही मुळात त्या शरीरात नसतेच. ती तुमच्याआमच्या मनात असते. एखादं मांजर किंवा कुत्रा किंवा कावळा नग्न आहे, असं आपल्या पटकन लक्षात येतं, नाही येत, कारण त्यांनी कपडे न घालणं हे आपण गृहीत धरलेलं असतं. पण मानवी शरीरावर कपडे असणं, विशिष्ट अवयव झाकलेले असणं हेच आपण नैसर्गिक मानायला लागलेलो आहोत. खरं तर घराबाहेर असलेल्या कुणाही माणसाला कधी एकदा घरी जाऊन कपडे उतरवून कमीतकमी कपडय़ात मोकळंढाकळं वावरतो असं झालेलं असतं. असं होतं, कारण तेच नैसर्गिक आहे. आपल्या नेणिवेत कुठेतरी तेच असतं. २०१६ च्या दीपावलीच्या दिवाळी अंकात मिलिंद बोकील यांची एक कथा आहे. एका विशिष्ट रिसॉर्टमध्ये लोकांनी येऊन नग्न वावरण्याची मुभा असते. तिथं गेलेलं जोडपं, त्यातली स्त्री, तिथे काही काळ नग्न वावरताना तिच्या मनावरची उलगडत गेलेली पुटं, तिला स्वत:ला नव्याने होत गेलेली स्वत:ची ओळख अशी सगळी सुंदर मांडणी त्या कथेत आहे. त्यामुळे नग्नता ही आपल्या मनात असते हे तर उघड सत्य आहे. त्यातच आपल्या समाजात तर ते स्त्रीच्या बाबतीत जास्तच काटेकोर आहे. त्यामुळे तिच्या बाह्य़ांची लांबी कमी झाली, बिनबाह्य़ांचे कपडे असले किंवा तिच्या पॅण्ट्सची उंची कमी होऊ न तिनं शॉर्ट्स घातल्या की ते खटकायला लागतं. खरं तर प्रमाणबद्ध शरीर नसलेले, पोटबिट सुटलेले पुरुष उघडेबंब फिरतात ते तितकंच डोळ्यांना खटकणारं असतं. त्यामुळे मग माझं शरीर सुंदर आहे आणि मी ते दाखवलं तर काय बिघडलं ही या स्त्रियांची भूमिका उमजायला लागते. गाण्याच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला आपल्या गाण्याचं, चांगल्या गळ्याचं मार्केटिंग करायचं असतं, चांगली चित्रं काढणाऱ्याला त्याच्या या कलेचं मार्केटिंग करायचं असतं, तसंच शो बिझमध्ये असणाऱ्या व्यक्तीचं भांडवल म्हणजे तिचं शरीर. तिला त्याचं या ना त्या माध्यमातून मार्केटिंग करावंसं वाटणं हे ओघानेच आलं. या ना त्या मार्गाने म्हणजे कल्कीसारखी व्यक्ती कलात्मक पद्धतीने ते पेश करते तर कुणी एखादी ते बटबटीतपणे मांडेल. पण हेतू एकच असतो, आपल्याजवळ असलेल्या आपल्या सामर्थ्यांचं प्रदर्शन करणं.

ते करायलाही हरकत नाही. पण ते करताना एक गोष्ट नजरेआड केली जात असते की तुम्ही ज्याच्याकडे कलेचं माध्यम म्हणून बघत असता त्या माध्यमाकडे बाजारू व्यवस्था भांडवल म्हणूनच बघत असते. तुमच्या दृष्टीने तो कलेचा एक टप्पा असतो तर या बाजारव्यवस्थेच्या दृष्टीने ती सहजपणे बाजारात उपलब्ध झालेली गोष्ट असते. एक गोष्ट सहज, विनासायास उपलब्ध झाली की त्याच्या पुढचा टप्पा या व्यवस्थेला अपेक्षित असतो. आपल्यालाही दोन खोल्यांचं घर असलं की तीन खोल्यांचं हवं असतं, तीन खोल्यांचं असलं की चार खोल्यांचं हवं असतं तसंच आहे हे. बाजारव्यवस्थेची ही पुढची मागणी कदाचित कल्कीला पुरी करावी लागणार नाही. पण त्या पुढची कुणीतरी त्या मागणीला बळी पडणार असते. ती कदाचित गरजूही असू शकते. म्हणजे कळत नकळत कल्की स्त्रीदेहाच्या व्यापारीकरणाला हातभारच लावत असते.

हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना कल्कीने असं म्हटलं आहे की हा फोटो रिवा बब्बर या स्त्री फोटोग्राफरने काढला आहे. म्हणून मी तो काढू शकले आणि तो शेअर करताना मला काही वाटत नाहीये. ही भूमिका तर टोकाची अतार्किक आहे. फोटो काढला गेला असेल तेव्हा तिथे जी काही चार-पाच माणसं असतील त्यात फोटो काढणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष यामुळे कल्कीला फरक पडणार आहे, पण नंतर हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जाणार तेव्हा लाखो पुरुष तो बघणार, यामुळे तिला फरक पडणार नाही, हे कसलं गणित आहे? तुम्हाला नग्नतेची भीती किंवा बाऊ  नसेल तर तो कुणाच्याही समोर नसावा. समोर स्त्री आहे की पुरुष यामुळे का फरक पडावा?

दुसरीकडे सुंदर शरीर ही निसर्गदत्त देणगीच. ती प्रत्येकालाच लाभते असं नाही. ती लाभलेल्या आणि शो बिझमध्ये असलेल्या व्यक्तीला आपलं सुंदर शरीर सुंदर राखण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. खूप पैसाही खर्च करावा लागतो. शरीर हेच त्यांचं भांडवल असल्यामुळे ते लोक ती सगळी मेहनत घेतातही. पण मग तसं असणं म्हणजेच सुंदर असे मापदंडही समाजात नकळतपणे तयार होत जातात. आपणही त्या मापदंडात बसावं यासाठी स्वत:शीच जीवघेणी स्पर्धा सुरू होते. कल्की कोचलीन ज्या पद्धतीने नग्न फोटो सोशल मीडियावर टाकून ‘लव्ह युवर नेकेडनेस’ असं म्हणू शकते, तसं एखादी १०० किलो वजन असलेली स्त्री म्हणू शकेल का? ती कदाचित कल्कीसारखी आभिनयकलानिपुण नसेल कदाचित, पण ती उत्तम गाणारी असू शकते, कदाचित पाककलानिपुण असू शकते, कदाचित ती उत्तम शिक्षिका असू शकते. तिचं काम करण्यात ती कमालीची वाकबगार असू शकते आणि ते करताना ती कमालीची देखणी असू शकते. पण आपल्या जाडेपणाचा, आपलं शरीर त्या मापदंडात बसत नसल्याचा तिला न्यूनगंड असतो. वजन कमी करण्याचे योग्य मार्ग तिला माहीत नसतात, तुटपुंज्या उपायांनी वजन कमी होत नसतं. तिला कमालीच्या निराशेने घेरलेलं असतं. कल्कीसारखं सोशल मीडियावरून सोडाच, ती खासगीतही  ‘लव्ह युवर नेकेडनेस’ सोडाच ‘आय लव्ह माय बॉडी’ असं म्हणत नाही. म्हणू शकत नाही. जाडी जाडी म्हणून तिला घरीदारी इतकं चिडवलं, हिणवलं गेलेलं असतं की ती अप्रत्यक्षपणे तिच्या शरीराचा तिरस्कारच करायला लागलेली असते. स्त्रीनं कसं एखाद्या हिरॉइनसारखं सडपातळ असावं अशा अलिखित सामाजिक संकेतांना सर्वसामान्य स्त्रिया अशा पद्धतीने बळी पडत राहतात. शो बिझमधल्या स्त्रिया असं जे नग्न फोटो सेशन करून ते सोशल मीडियावर टाकतात, त्याला विरोध करायचा तो यासाठीच. सर्वसामान्य स्त्रिया ज्या या रूढ सौंदर्य संकल्पनांमध्ये बसत नाहीत, त्यांना त्या मोजमापांमध्ये बसवण्याचा अट्टहास यातून नकळत सुरू होतो आणि या सर्वसामान्य स्त्रियांची त्यात कुतरओढ होते. चाफ्याच्या झाडाला गुलाब यायला हवेत असले उपद्व्याप त्यातून सुरू होतात. दुसरं म्हणजे ज्या समाजात शॉर्ट्स सोडाच, स्लीव्हलेस घालून मुली मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, जातीबाहेरच्या पण आवडलेल्या मुलाशी मोकळेपणाने लग्न करू शकत नाहीत, लग्नांतर्गत होणाऱ्या बलात्कारांबद्दल बोलू शकत नाहीत, आपल्याला मूल हवंय की नकोय, किती मुलं होऊ  द्यावीत, गर्भजलचिकित्सा न करता जो असेल तो गर्भ वाढवावा असे निर्णय घेऊ  शकत नाहीत, थोडक्यात कल्कीसारखं स्वत:ला हवं ते असं समाजमाध्यमांच्या कट्टय़ावर सोडाच स्वत:च्या घरातही म्हणू शकत नाहीत, त्यांचं काय करायचं?

कल्कीसारख्या आयव्हरी टॉवरमध्ये राहणाऱ्या जेमतेम अर्धा टक्के स्त्रिया स्वत:चे नग्न फोटो सोशल मीडियावर टाकतात तेव्हा खरं तर उरलेल्या साडे ९९ टक्के  स्त्रिया ज्या समाजात वावरतात तो समाजच उघडा पडत जातो. या नग्नतेचं काय करायचं?

१०० किलो वजन असलेली, इथल्या बहुसंख्यांना आवडणाऱ्या गोऱ्याऐवजी सुंदर तुकतुकीत काळ्या रंगाची, कोड असलेली, मुलगी झाली म्हणून आईबापांनी उकिरडय़ावर फेकून दिलेली, सारख्या मुलीच होतात म्हणून नवऱ्यानं सोडून दिलेली, कुणीतरी कुठलातरी सूड उगवायचा म्हणून अ‍ॅसिड फेकून जिचा चेहरा विद्रूप केला आहे अशी मुलगी, स्त्री या समाजात सोशल मीडियावर ‘आय लव्ह माय बॉडी’ असं जाहीरपणे म्हणत असेल, म्हणू शकत असेल तर त्याचं खरं कौतुक आहे. ज्यांना खरोखरच निसर्गदत्त सुंदर शरीर लाभलं आहे, त्यासाठी ज्यांच्यावर नेहमीच कौतुकाचा माराच होत असतो, त्यांनी ‘लव्ह युवर नेकेडनेस’ किंवा ‘आय लव्ह माय बॉडी’ असं म्हणण्यात कसलं आलं आहे कौतुक?
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 1:03 am

Web Title: nudity kalki koechlin
Next Stories
1 पायाभूत सुविधा : विकास मोजणारे घटक (भाग १)
2 ‘विशेष’ मुलांचा नवोन्मेषी ‘आविष्कार’
3 लोकजागर : कुपोषण हटवणारे चार खांब
Just Now!
X