News Flash

भ्रमंती : रानातील एक दिवस

रोजच्या धकाधकीचा कंटाळा आला की मन वेगळीच मागणी करायला लागतं.

रोजच्या धकाधकीचा कंटाळा आला की मन वेगळीच मागणी करायला लागतं. त्याला तजेलदार श्वास हवा असतो. डोळ्यांना हिरवाईची मिठी हवी असते. कानांना पक्ष्यांची किलबिल साद घालायला लागते.

बरेच दिवस सलग शहरात काढले की मला शहराचा मनस्वी कंटाळा येतो. इथल्या गोंगाटाच्या, प्रदूषणाच्या, धकाधकीच्या जगात राहून जीव अगदी आंबून जातो आणि मी गावी, रानात जाण्याचे ठरवतो. त्या आठवडय़ात मग बुधवापर्यंत कसे तरी दिवस ढकलतो; पण नंतर शनिवार-रविवारच्या सुट्टीकडे डोळे लागून राहतात.

शुक्रवारी संध्याकाळी मी आनंदातच घरी येतो. उद्या सकाळी लवकर- पहाटेच – रानाकडे निघायचे म्हणून भराभर तयारी करतो. एका सॅकमध्ये पाणी, जेवणा-खाण्याचे थोडे कोरडे पदार्थ, एक छोटीशी चादर, छत्री, टोपी, वही, एखादे पुस्तक व इतर काही उपयोगाच्या गोष्टी इतकेच. आणि अर्थातच फोन- पण संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्याचा उपयोग कॅमेरा म्हणूनच होतो.

सकाळी झुंजुमुंजु होताच सामान गाडीत ठेवून गावाकडे निघतो. हवेत अजून चांगलाच गारवा असतो; त्यामुळे कोवळे ऊन हवेहवेसे वाटत असते. हिरवीगार शेते वाऱ्यावर डुलत असतात. झाडे सकाळच्या दवाने भिजून, सुस्नात उभी असतात. जीवसृष्टीत मात्र सकाळची गडबड, लगबग असते. झाडांच्या फांद्यांवर, शेंडय़ांवर चिमण्या, कावळे, बुलबुल, पोपट, मना किलबिल करत असतात. कुठे एखाद्या पळसावर किंवा देवचाफ्यावर खारींची टिवटिव चालू असते. मुले आवरून शाळेत निघालेली असतात. बाया-बापडय़ा नदीवर किंवा ओढय़ावर कपडे धुवायला, पाणी आणायला चाललेल्या असतात. गडीमाणसे शेतावर राखणीला चाललेली असतात. वाहतूक तुरळक होत जाते. मी गाडीचा कासरा सल सोडतो.

गाव डोंगरदऱ्यांत असल्याने वाटेत डोंगर, घाट ओलांडत जावे लागते. एक मुख्य घाट चढून गेल्यावर माथ्याशी, िखडीत मी थांबतो. गाडी कडेला लावून सामानातून थर्मास काढतो. समोर पसरलेल्या दरीकडे, जंगलाकडे, खाली दिसणाऱ्या गाव-वाडय़ांकडे बघत चहाचा आस्वाद घेतो. चहा हे नुसते निमित्त. ती जागा हे खरे आकर्षण.

चहा घेऊन मी पुढे निघतो. आता गावी पोहोचण्यासाठी अधीर होऊन जातो. घाट उतरल्यावर थोडा वेळ सरळ रस्ता लागतो. मग पुन्हा घाट. अशा रीतीने ८-१० गावे, एक तालुक्याचे गाव, १०-१५ वाडय़ा-वस्त्या आणि चार-पाच डोंगर एवढे पार केल्यावर गाव जवळ येऊ लागते तसतसा रस्ता अदृश्य होऊ लागतो. शेवटी शेवटी रस्ता म्हणजे मऊसर लाल माती आणि त्यात मधूनमधून लागणारे दगड एवढेच शिल्लक उरते. अखेर एक चढाचा रस्ता आणि त्या चढावरच असलेले वळण ओलांडून पुढे आलो की झाडीतून वर डोकं काढणारं देऊळ, शाळेचं कौलारू छप्पर आणि इतर काही घरं दिसतात आणि गावाचं पहिलं दर्शन होतं.

मी शाळेपाशी गाडी थांबवतो. शाळेतील मुले, सर यांची चौकशी करतो. शाळेत काही काम असलं तर ते करून टाकतो. शाळेतल्या शिक्षकांशी बोलतो. गावातले कोणी ओळखीचे भेटले तर त्यांच्याशी थोडय़ा गप्पा होतात, घरच्या मंडळींच्या ख्यालीखुशालीची उभय बाजूंनी चौकशी होते. एवढे झाले की मी रानाकडे निघतो.

गावाची वस्ती छोटी. शंभरेक उंबऱ्यांची. वस्ती संपली की शेते सुरू होतात. रस्त्याच्या दुतर्फा पिके डोलत असतात. पिकू लागलेल्या भाताचा सुगंध हवेत दरवळत असतो. एखाद्या साधूच्या कपाळावर ओढलेल्या भस्माच्या आडव्या पट्टय़ांसारखे डोंगरउतारावर काही नाचणीच्या शेतांचे पट्टे दिसतात. कुठे कारळ्याची (गावातले लोक त्याला काळे तीळ म्हणतात) शेते पिवळ्याधमक फुलांनी गच्च भरून गेलेली असतात. सुंदर निळे आकाश. हिरवेगार डोंगर आणि शेते. लालमातीचा रस्ता. आणि पिवळ्या फुलांचा गालिचा. तो देखावा अवर्णनीय असतो! रस्त्याच्या दोन्ही बाजूंस थोडय़ा अंतरावर, सुमारे अध्र्या मलावर डोंगर. एका बाजूला रस्त्याच्या आणि डोंगराच्या मधून वाहणारी नदी. नदीच्या पलीकडे गर्द रान. त्यात ठिपके टाकावेत तशा दोन-चार विखुरलेल्या वाडय़ा. त्यांच्या आजूबाजूला, नदीकाठाच्या जवळ काही भातशेते. डोंगरउतारावर झाडी, ओढे, नाले आणि डोंगरांच्या वरच्या बाजूस घनदाट जंगल यांचे साम्राज्य. दोन-तीन मिनिटांत मी माझ्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचतो. गाडी कडेला लावतो. आता इथून पुढे सगळी पायी भटकंती.

सॅक पाठीवर लावून मी निघतो. वाट लालमातीची. शेतांच्या मधून जाणारी. बांधांवर कडेने करवंदाची जाळी तर कधी जांभळाची, ऐनाची झाडे. कारळ्याच्या पिवळ्या शेतातून चालत चालत मी पुढे येतो. आता शेते संपतात आणि नदीकाठ जवळ येतो. आता वाटेच्या दोन्ही बाजूंना गवत, करवंदाच्या जाळ्या, कुठे मध्येच जांभूळ, ऐन अशी झाडे.  चालत चालत नदीपाशी येतो. नदी छोटी असली तरी पाण्याला वेग चांगलाच असतो. ऐन पावसाळ्यात पात्र सुमारे शंभर-सव्वाशे फूट रुंद आणि दुथडी भरून वाहत असतं. तेव्हा गावातले लोकही पाण्यातून न जाता वरच्या अंगाच्या बंधाऱ्यावरून नदी ओलांडतात. पावसाळा नुकताच संपत आल्याने नदीला अजून चांगले पाणी असते. मी बूट-मोजे काढून सॅकच्या एका बंदाला ते बांधून टाकतो. पँट गुडघ्याच्या वपर्यंत दुमडून घेतो. जवळच पडलेली एखादी बांबूची काठी हातात घेतो आणि नदीपात्रात उतरतो. नदीच्या काठांनी करवंदाच्या जाळ्या, गावरान जांभूळ काही बांबूची बेटे यांची गर्दी असते. मी नदी ओलांडतो त्या उताराच्या जागी पात्र उथळ आणि पसरट आहे. तिथून जवळच गावातल्या बाया-बापडय़ा धुणी धूत असतात. तर तिथून वरच्या अंगाला चांगला डोह आहे. डोहाच्याच लगेच पुढे, डोंगरावरून येणारा मोठा ओढा नदीला मिळतो. तिथे खंडे, बगळे आणि इतर पक्षी मासे धरण्यासाठी वरचेवर सूर मारत असतात. मासा मिळाला की गटकन गिळतात. निळेशार पाणी, काठाला लाल-भडक माती. त्यावर हिरवीगार झाडी, मागे दाट जंगल अंगावर पेलणारे गडद हिरवे-निळसर डोंगर व त्याहीमागे पुन्हा निळेशार आकाश! एखादे सुंदर चित्र वाटावे असे हे दृश्य! पण चित्र निर्जीव, अबोल असते; या दैवी चित्राला मात्र त्या सुंदर दृश्याइतकीच सुंदर आवाजाची साथ लाभलेली! आणि आवाज तरी किती प्रकारचे! नदीच्या पाण्याची अतिशय मंजूळ अशी नाजूक खळखळ. मधूनच कपडे धुणाऱ्या बायकांनी कपडे दगडावर आपटल्याचा आवाज. काठावरच्या जाळीत घुमणाऱ्या कवडय़ांचा रव. तर कुठे बुलबुलांची लाडिक कुलकुल. झाडाच्या शेंडय़ावर एकटाच बसून ओरडणाऱ्या कावळ्याची कावकाव. तर दूर, झाडांत बसलेल्या भारद्वाजाचा मधूनच येणारा घनगंभीर साद! मी दोन-तीन वेळा दीर्घ श्वास घेऊन ती ताजी हवा, तो ओला सुगंध छातीत भरून घेतो. आणि पुढे चालू लागतो. बूट भिजू नये म्हणून मी ते काढतो खरे; पण पाण्यातून अनवाणी चालताना, शहरी गुळगुळीत फरशीला सरावलेल्या पायांना पात्रातले छोटे दगड-गोटे विलक्षण बोचतात. शिवाय पाण्यात असल्याने ते शेवाळलेलेही असतात. त्यामुळे मधूनच पाय घसरतो. अशा वेळी बांबूच्या काठीचा आधार उपयोगी पडतो. नदीच्या पाण्याचा पहिला स्पर्श थंडगार, ताजंतवानं करणारा असतो. पाण्यातून चालताना मासे इतस्तत: पळत असतात; पण काही क्षण न हलता उभा राहिलो तर काही चौकस जीव जवळ येऊन पायाची तपासणी करून जातात. मध्येच खेकडे त्यांच्या विशिष्ट तिरक्या चालीने चालताना दिसतात. पाण्याची खळखळ कानाला गोड वाटते! साधारण मध्यावर येताच मी वाकून ते वाहते स्फटिकस्वच्छ पाणी ओंजळीत घेतो आणि चेहऱ्याला लावतो. त्या स्पर्शानेच गाडी चालवण्याने आलेला उरलासुरला शीण कुठल्या कुठे पळून जातो. दगड-धोंडय़ांतून सावरत, रमत-गमत मी नदी ओलांडून पलीकडचा काठ गाठतो. गावाचा काठ सोडून रानाच्या काठाला लागतो.

नदीकाठचा पन्नासएक फुटांचा पट्टा पार केल्यावर डोंगराची चढण सुरू होते. एक छोटी पण खडी चढण चढून मी डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर येतो. नदीकाठी झाडी आहे तशी इथे नसते. हा टप्पा म्हणजे एक विस्तीर्ण माळरान. उन्हाळ्यात थोडेसे दगड-धोंडे आणि वाळलेले उदास करडे गवत याशिवाय इथे काही नसते. पण आत्ता? आत्ता हा सगळा टापू एखाद्या शोभिवंत हिरव्यागार गालिचासारखा झगमगत असतो! त्या गवताच्या ताज्या हिरव्या रंगावर नजर ठरत नाही! आणि या हिरव्या रंगावर निळ्या-जांभळ्या, पिवळ्या नाजूक रानफुलांची नक्षी! दगड-धोंडे असतात ते पावसात सचल भिजून, खळाळणाऱ्या झऱ्याचे पाणी अंगावर घेत कुठे त्यांच्या काठावर, तर कुठे त्यांच्या पात्रात पडलेले असतात. रात्रीच्या पावसाने जणू हा हिरवा गालिचा स्वच्छ धुतल्यासारखा चकाकत असतो.

थोडा वेळ त्या गालिचावर भटकून मी पुढची चढण चढू लागतो. ही चढण पहिल्या टप्प्याच्या चढणीइतकी खडी नसते. डोंगरउतारावर तिरकी गेलेली वाट थोडीशी वळून एका िखडीतून वर जाऊन डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यावर जाऊन पोहोचते. वाट जशी वर चढत जाते तशी बाजूने झाडी वाढत जाते. सुरुवातीला करवंदीच्या जाळ्या, निर्गुडी, इ. झुडपे व मग पेरू, बहावा, जांभूळ, पळस अशी झाडे वाटेच्या बाजूने दिसू लागतात. वाट चढून िखडीशी आले की झाडी दाट होते. िखड म्हणजे या दाट झाडीत असलेले मोठमोठे दगड, त्यांच्या भोवतालची झाडी आणि त्या दगडांमधून गेलेली निमुळती वाट! दगड चांगले मोठे. काही काही तर खांद्याशी येतील इतके उंच आणि कवेत येणार नाहीत इतके मोठे! पाऊस पडल्यामुळे वाटेचे रूपांतर एका छोटय़ा ओहोळात झालेले. मी िखडीत पोहोचून त्या सुंदर जागी थोडा थांबतो. िखडीतल्या ओळखीच्या उंबराची विचारपूस करतो. उन्हाळ्यात या उंबराच्या सावलीत या दगडावर बसून गार वारा अंगावर घेण्याचं सुख शब्दांत सांगता न येणारे! िखडीतून पुढे येऊन मी डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यावर येतो. इथे थोडीशी दाट झाडी सुरू होते! िखडीतून पुढे येताच बटेर (Bush Quail)चा एक थवा गवतातून फर्रकन बाहेर पडतो. माझी चाहूल लागताच ते घाबरून पांगतात. थोडा पुढे जाताच दूर डोंगरावर गरुडाची जोडी घिरटय़ा घालताना दिसते. त्याहीपलीकडे डोंगरापलीकडच्या दरीवरती गिधाडे घिरटय़ा घालताना दिसतात. बहुधा खाली दरीत एखादे जनावर मेले असावे.

या दुसऱ्या टप्प्यावर झाडी खालच्या टप्प्यांपेक्षा जास्त दिसू लागते. तसेच झाडांच्या इतर जातीही दृष्टीस पडतात. ऐन, किंजळ, हिरडा, अर्जुन, साग, पळस, अळू (पातळ भाजीचा नव्हे; हे एक मध्यम उंचीचे फळझाड आहे), जांभूळ, फणस, आंबा, इ. जातींची संमिश्र वृक्षराजी दिसू लागते. तर छोटय़ा झुडपांमध्ये चांदड, करवंद, कारव दृष्टीस पडतात. उजवीकडे डोंगर ओढय़ाच्या पात्रात उतरत जातो. त्या उतारावर कारवीचा जवळजवळ एकसंध पट्टा दिसून येतो. या वर्षी नेमका कारवीचा फुलोरा असल्याने तो संबंध उतार कारवीच्या मनोहारी निळ्या-जांभळ्या फुलांनी भरून गेलेला असतो. त्यातच मधेमधे गडद पिवळी रानफुले! हिरव्या पाश्र्वभूमीवरचा तो रंगोत्सव डोळ्याचे पारणे फेडतो! िखडीच्या जवळच एक छानसा ‘पॉइंट’ असतो. ऐन, किंजळ, जांभूळ अशी चार-पाच झाडे जवळजवळ उगवून त्यांच्या मधोमध सुमारे ८-१० लोकांचे कोंडाळे आरामात बसू शकेल अशी जागा तयार झालेली असते. जमीन बऱ्यापकी सपाट असते आणि मुख्य म्हणजे दगडाचा पृष्ठभाग असल्याने थोडासा उंचवटा असतो. पावसात याचा फायदा म्हणजे दगड असल्याने चिखल होत नाही. त्यामुळे निवांत बसता येते. आणि वरती झाडांच्या फांद्या आल्याने पावसापासूनही बऱ्यापकी बचाव होतो. मी इथे सॅक खाली ठेवतो. थोडेसे पाणी पितो. हवा आल्हाददायक असतेच, पण आता सॅकचे ओझेपण कमी झाल्यावर फारच हलकेहलके वाटते. मी भटकत पुढे निघतो. इथे झाडांमुळे इतर पक्षीही दिसू लागतात. ऐनाच्या एका झाडावर पिवळाधमक हळद्या (Oriole) दिसतो. पुढे किंजळच्या शेंडय़ावर नीलकंठ (Indian Roller) दिसतो. ओढय़ाकाठी खंडय़ाची मासेमारी चालू असतेच. मऊ ओल्या लाल मातीत खेकडय़ांचीही तिरकस ये-जा चालू असते. बुलबुल, मॅग्पाय यांचे मंजूळ आवाज येतच असतात. रानात मी मुक्तपणे भटकत असतो. निसर्गाचे देणे डोळे भरून बघत असतो.

आता थोडे ऊन जाणवू लागते. बराच वेळ पायपीट करून थोडीशी भूकही लागलेली असते. मी परत सॅक ठेवलेल्या पॉइंटपाशी येतो. बरोबर आणलेल्यापकी एखादी वडी, चकली असे काही तरी तोंडात टाकतो. पाणी पितो. मग सॅकला टेकून सावलीत आरामात वाचत बसतो. आता दुपार होत आलेली असते; पण सावलीत ऊन जाणवतही नाही. शिवाय वाऱ्याच्या आल्हाददायक झुळका उकाडा कसा तो होऊ देत नाहीत. अशा नितांतसुंदर आसमंतात मी माझे एखादे आवडते पुस्तक वाचत बसतो. सुमारे अर्धा-पाऊण तास वाचन केल्यावर वाचतावाचताच मला एखादी पाच-सात मिनिटांची डुलकी लागते. जागा होतो तेव्हा भुकेची जाणीव झालेली असते.

साडेबारा-पाऊण वाजलेले असतात. आता भूक लागलेली असते. जेवणाची वेळही झालेली असते. त्यामुळे मी सॅकमधून जेवण बाहेर काढतो. जेवण म्हणजे फार काही नसते. ब्रेड, चटणी, सॉस, गाजर, काकडी, टोमॅटो अशा भाज्या. थोडीशी राजगिरा वडी वगरे. मी भाज्या सुरीने चिरून सँडविच बनवून पोटभर खातो. थोडीशी वडी खातो. पाणी पितो.

पोट तुडुंब भरल्यामुळे सुस्ती येऊन मी वामकुक्षीसाठी जरा आडवा होतो. डोक्यावरच्या झाडावर बुलबुलांची कुलकुल चालू असते; तर जवळच्याच उंबरात खारीची टिवटिव चालू असते. पलीकडच्या फणसात एक कवडा घुमत असतो. हे स्वर्गीय संगीत ऐकता ऐकता सावलीत गार वाऱ्यावर माझा कधी डोळा लागतो ते मला कळतही नाही.

थोडय़ाच वेळात जाग येते. घडय़ाळावरून असे दिसते की, सुमारे अर्धा तास मी झोपलो असेन. आता छान ताजेतवाने वाटत असते. थोडा वेळ परत निवांत वाचन करतो. मग थोडेसे लेखन. आता निम्मी दुपार होऊन गेलेली असते. गार वाराही वाहू लागलेला असतो. मला पावसाची लक्षणे दिसू लागतात. मी वाचन, लेखन आवरते घेतो. थोडा वेळ नुसताच सरडय़ासारखा बसून राहतो.

असाच थोडा वेळ जातो आणि मग डोंगरामागून ढग चाल करून येतात. एकाएकी अंधारून येते. पानांत टपटप थेंब वाजू लागतात आणि पाऊस येतो. मी थोडा वेळ तसाच पानांतून गाळून येणारा पाऊस अंगावर घेत बसून राहतो. मग छत्री हातात घेऊन पावसात भटकायला निघतो. अंधारून आले असले तरी पावसात जोर नसतो. हलकी सर अंगावर घ्यायला छान वाटते. पण थोडय़ाच वेळात त्याचा जोर वाढतो. आता थेंब मोठे आणि बोचरे होतात. मी छत्री उघडतो. आता सगळीकडे चिडीचूप झालेले असते. सगळे प्राणी-पक्षी आडोशाला शांतपणे बसलेले असतात. पावसाचा तेवढा एकच आवाज येत असतो. पण त्यातही किती बारीक छटा! पावसाचा मातीवर होणारा आवाज. झाडांच्या पानांवर होणारा आवाज. छोटय़ा झुडपांवर होणारा आवाज. मोठय़ा कातळावर होणारा आवाज. जवळच्या डबक्यामधल्या पाण्यावर होणारा आवाज. किती तऱ्हा!

मी स्वस्थपणे छत्री घेऊन झाडाखाली तो पाऊस उपभोगत उभा राहतो.. हाडापर्यंत भिजलो नसलो तरी सुरुवातीला छत्री न उघडता फिरल्यामुळे अंग थोडेसे भिजलेले असते. पाऊस अजून चालूच असतो. अशा वेळी चहाची आठवण न झाली तरच नवल. मी सॅकमधून थर्मास काढून चहा घेतो. सकाळी भरताना तो होता तसा अगदी उकळता नसला तरीही अजून तो चांगला, पिण्याइतका गरम असतो! त्या हवेत, त्या पावसात तो घरचा चहा अगदी अवर्णनीय लागतो! मधूनच एखादा पावसाचा थेंब पानांवरून ओघळत येऊन कपात पडून चहात जणू पावसाचा स्वाद मिसळत असतो.

दहा-पंधरा मिनिटांत पावसाचा जोर ओसरतो. मोठी सर थांबते. मग आणखी थोडा वेळ बारीक सरीचे िशतोडे उडवून पाऊस पुढे पसार होतो. आता उन्हे उतरणीला लागलेली असतात. सगळीकडे कोवळा पिवळा उजेड पसरतो. पावसाने स्वच्छ झालेले रान त्या उन्हात नुसते झगमगत असते! चहा झाला. आता पाऊसही थांबला. आता मी वर डोंगरावर जायला निघतो.

वरती रानाचा तिसरा, शेवटचा टप्पा. इथे गर्द झाडी चालू होते. इथून पुढे वरती हा डोंगर आणि त्याहीपलीकडच्या उंच डोंगरमाथ्यापर्यंत चांगले जंगल आहे. त्यापलीकडे खाली कोकण. सह्याद्रीच्या, घाटमाथ्यावरच्या कोणत्याही डोंगराच्या कडय़ावरून दिसणारे ठरावीक दृश्य. मी डोंगर चढू लागतो. दाट झाडीतून आता अगदी ‘वन्य’ प्राण्यांचीही चाहूल लागू लागते. रानकोंबडय़ाचा आवाज येऊ लागतो. मधूनच दाट जाळीतून त्याचे अस्पष्ट दर्शनही होऊ लागतं. जवळच्या झाडांवरून वानराचा हुपकार ऐकू येतो. आत खोलवर हरणाचाही आवाज येतो. एक मुंगसाची जोडी मधूनच आडवी जाते. वाटेवर पोहोचताच क्षणभर थबकून माझ्याकडे बघतात आणि पुन्हा पुढे वाटेच्या उजव्या बाजूच्या झाडीत लगबगीने शिरतात. थोडय़ा वेळानं एक घोरपड जीभ लपलपवीत भक्ष्याच्या शोधार्थ िहडताना दिसते. वाटेत एक झरा लागतो. झऱ्याकाठी दगड-धोंडे. मी थोडा पुढे सरकताच दगडांत एकदम जोरदार हालचाल होते. ससा झऱ्याकाठी दगडांत बसला होता. कदाचित झऱ्याकाठी जवळच त्याचे बीळ असेल. त्याच्या नसíगक प्रवृत्तीनुसार मी आल्याची चाहूल लागताच तो एकदम निश्चल झाला असावा. त्याच्या मातकट, राखाडी रंगामुळे तो दगडांमध्ये बेमालूमपणे मिसळून गेला होता. पण मी आणखी पुढे येऊन धोक्याच्या टप्प्याच्या आत येताच ससुल्या एकदम सुसाट पळतो. मी झऱ्यात वाकून ते स्फटिकासारखे स्वच्छ, थंडगार पाणी ओंजळीत घेऊन पितो. त्या पाण्याची चव केवळ अप्रतिम! आता डोंगरमाथा जवळ येतो. पाच-सात मिनिटांतच मी तिथे पोहोचतो. इथे परत छोटे पठार असून झाडी विरळ झालेली असते. त्यामुळे आजूबाजूचा टापू सहज दिसतो. मी मागे वळून बघतो. मी चढून आलो तो डोंगर मागे थेट नदीपर्यंत उतरत गेलेला दिसतो. नदीचे निळेशार पात्र वळणे घेत घेत शेजारच्या डोंगराच्या आड वळून दिसेनासे होते. नदीच्या पलीकडच्या- गावाकडच्या- काठावरच्या टेकडय़ा हिरव्यागार दिसतात. त्यामागचे डोंगर, त्यांच्या मागचे उंच डोंगर आणि त्यांच्याही मागच्या डोंगररांगा ह्यांत निळा रंग क्रमाने वाढत जाऊन सर्वात मागच्या डोंगर रांगा बेमालूमपणे आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेल्या. आणि एवढा निळा भाग सोडला तर बाकी सर्व प्रदेशावर एक हिरवागार हात फिरलेला. मी भान हरपून, वरून दिसणारं ते सजीव चित्र डोळे भरून बघत बसतो.

थोडय़ा वेळानं वेळेचे भान येऊन मी उठतो. डोंगर उतरू लागतो. खालच्या टप्प्यावर येतो. सॅकपाशी येतो. थोडेसे काहीतरी तोंडात टाकतो. िखडीपाशी येऊन बसतो. समोरच्या डोंगरामागे सूर्य मावळत असतो. आकाशाचे रंग बदलत असतात. दिवसा जागणारी दुनिया आपापल्या घरकुलांकडे परतत असते; तर राित्रचर दुनिया झोपेतून जागी होत असते. मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. पण सूर्य ‘मावळतो’ हाच आपला भ्रम असतो, नाही का? शिवाय ज्याने आपल्याला दिवसभर ऊर्जा दिली त्याला, केवळ तो आता अस्ताला चालला म्हणून, वंदन न करणे मला कृतघ्नता वाटते. मी कृतज्ञ भावाने सूर्याला नमस्कार करतो. तोंडून आपोआप गायत्रीमंत्र निघतो. डोक्यावरून कावळे, बगळे, पोपट, मना या पक्ष्यांचे थवे त्यांच्या निवाऱ्याकडे जाताना दिसतात. आता वाराही जोराने वाहू लागतो. सूर्याचा गोळा थोडा क्षितिजावरच्या ढगांनी झाकोळलेला असा डोंगराखाली जातो. पक्ष्यांची घरटय़ात चिडीचूप होण्यापूर्वीची शेवटची कुलकुल चालू असते. कोतवाल, खाटीक अशी पक्षी मंडळी मात्र अजून निवांत दिसतात. त्यांचा अजूनही पोट भरण्याचा उद्योग चालूच असतो. संधीप्रकाशात ते वातावरण थोडेसे गूढ वाटू लागते. रातवा, िपगळा या राित्रचर पक्षीमंडळींचे आवाज येऊ लागतात. तिथे अजून बराच वेळ असेच बसून राहावेसे वाटत असते; पण मला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असतो. त्यामुळे नाइलाजाने मी उठतो. सावकाश चालत सॅकपाशी परत येऊन ती पाठीला लावतो. रमतगमत डोंगर उतरून नदीपाशी येतो. नदी ओलांडताना त्या स्वच्छ पाण्यानं चेहरा धुतो. रानात दिवस काढून मन ताजेतवाने झालेले असतेच; पण त्या पाण्याच्या स्पर्शाने शरीरही ताजेतवाने होते. नदी ओलांडून मी परत ऐलतीराला येतो. गावातून संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी पेटवलेल्या चुलींच्या धुराच्या निळसर रेषा आकाशात वर जात असतात. मधूनच वाऱ्यावरून येणारा भाकरीचा नाहीतर भाजीचा वास, आता लागू लागलेल्या भुकेची जाणीव प्रकर्षांने करून देतो. दिवालागण होत असते. मी एकवार पलतीरावरच्या निवांत पसरलेल्या रानाकडे नजर टाकतो. आता इथून तर ते विलक्षण गूढ दिसते. डोंगरमाथा आता एका ढगात हरवलेला असतो. आयुष्यातला एक दिवस विलक्षण सुंदर निसर्ग आणि असीम शांततेने भरून आणि भारून टाकल्याबद्दल मी कृतज्ञ भावाने त्या रानालाही मनोमन नमस्कार करतो. पुन्हा इथे कधी येता येईल याचा विचार करतच मी गाडी चालू करतो. रानातला दिवस संपून शहराकडे परतीचा प्रवास चालू होतो.

पुण्यात आमच्या घरी काही वर्षांपूर्वी एक मांजरी येऊ लागली. तशी आमच्याकडे नेहमीच मांजरे असतात. पूर्वी घरची पाळलेली मांजरेच चार होती. आता ती नसली तरी अशी रोज खाण्यासाठी येणारी आणि उंबरठय़ाबाहेरच; पण परसातल्या खुर्चीवर किंवा झोपाळ्यावर- अगदी गाडीच्या टपावरदेखील- झोपणारी मांजरे कोणी ना कोणी येतच असतात. तर सांगायचा मुद्दा असा की याच प्रथेनुसार एक दिवस ही मांजरी अचानक येऊ लागली. पण इतर मांजरांपेक्षा तिचे वैशिष्टय़ म्हणजे ती अजिबात माणसाळलेली नव्हती. (पुढे पुष्कळच फरक पडला व ती आम्हाला इतकी सरावली की मी तिला उचलूनही घेत असे. इतकेच नव्हे तर दोन वेळा तिची पिल्ले आमच्या इथेच घेऊन आली. पण तो नंतरचा भाग) तर ही मांजरी म्हणजे अंगास तर ती हात लावू देत नसेच; पण घरीदेखील ती फक्त खाण्यापुरती येई. माणसाळलेली नसल्याने मी तिला गमतीने ‘रानमाऊ’ म्हणत असे. तिचे घरी येणे हे फक्त खाण्यापुरते- पोटापुरते- असे. खाऊन झाले की लगेच ती आमच्या घरापलीकडच्या मोकळ्या जागेवर गच्च झाडी उगवून रान माजले आहे तिकडे गडप व्हायची. जणू ते रान हेच तिचे खरे घर होते व माणसांचा सहवास, शहरी वातावरण ती केवळ पोटासाठी सहन करायची- तेही जेवढे कमीत कमी करता येईल तितके.

मला वाटते, आपल्या सगळ्यांच्या मनातही असेच एक ‘रानमाऊ’ असते. पोटापाण्यासाठी, मुलाबाळांसाठी ते नाइलाज म्हणून शहरात, वाहनांच्या गडबड-गोंधळात राहत असते. पण त्याची आदिम प्रेरणा ही रानटीच असते आणि झाडे, नद्या-नाले, डोंगर, समुद्र ह्यांच्या सान्निध्यात गेल्यावाचून त्याला चन पडत नाही. म्हणूनच ह्य धकाधकीच्या शहरी जीवनातून एक-दोन दिवसांची संधी मिळाली तरी लगेच ते रानाकडे, निसर्गाकडे धाव घेते. सडेफटिंग असले तर सिंहगड, रायगड, राजगड किंवा कुटुंबकबिल्याबरोबर महाबळेश्वर, माथेरान, कोकण, गोवा, पन्हाळा, आंबोली असे कुठे कुठे भटकून येते. हिरवाई-निळाईची, मोकळ्या हवेची, उंच गिरीशिखरांची, अथांग समुद्राची तहान भागवून येते.

सलग अनेक दिवस शहरात काढले की माझ्याही मनातील ‘रानमाऊ’ असेच बेचन होते. त्याला पुन्हा एकदा रानाची ओढ लागते. मग एके दिवशी मी सामानाची बांधाबांध करतो आणि पुन्हा एकदा रानाची वाट चालू लागतो…
मंदार उपाध्ये – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:06 am

Web Title: one day in forest
Next Stories
1 आवाहन : रेसिपी पाठवा 
2 प्रयोग : अंतर्मुख करणारं नाटक
3 वाचन फराळ : स्वागत दिवाळी अंकांचे
Just Now!
X