26 May 2020

News Flash

ट्रेण्ड :यंदाच्या सणासुदीत ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ

ऑफलाइनच्या खरेदीची जागा आता ऑनलाइन शॉपिंगने घेतली आहे.

अर्जुन नलवडे response.lokprabha@expressindia.com

दसरा दिवाळी हे आपल्याकडचे मोठे सण. या सणांच्या निमित्ताने मोठी खरेदी केली जाते. पण त्यासाठी दुकानांमध्ये जाण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाइन खरेदी करण्याचा ट्रेण्ड वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.  

नवरात्री आणि दिवाळी सण आले की, प्रत्येक घरात आंनदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. या सणांच्या पाश्र्वभूमीवर घराच्या सजावटीपासून स्वतच्या सजण्या-धजण्यापर्यंत प्रत्येक जण व्यग्र असतो. अशा वेळी खरेदीही हात सेल सोडून केली जाते. याच संधीचा फायदा घेत बाजारात भरपूर सवलती जाहीर केल्या जातात. कोणी एका वस्तूवर दोन वस्तू फ्री देतं, तर कोणी दोनावर तीन फ्री देतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवरात्री सेल आणि दिवाळी सेल म्हणत मोठी जाहिरातही केली जाते. मात्र, आता पूर्वीच्या तुलनेत प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याचं लोकांचं प्रमाण कमी-कमी होताना दिसत आहे. ऑफलाइनच्या खरेदीची जागा आता ऑनलाइन शॉपिंगने घेतली आहे.

हातातील स्मार्टफोन, हायस्पिड इंटरनेट, ऑनलाइन शॉपिंगची विविध अ‍ॅप्स, सणासुदीला दिल्या जाणाऱ्या भरघोस सवलती आणि एका क्लिकवर घरपोच मिळणारी वस्तू, या सर्व सुविधांमुळे लोक ऑनलाइन शॉपिंगला जास्त पसंती देत आहेत. गुगलवर कोणत्याही गोष्टी सर्च करा, त्वरित फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर किंवा विविध अ‍ॅप्सवर आपल्याला संबंधित गोष्टींच्या सर्व जाहिराती दिसायला लागतात. वेगवेगळ्या ऑफर्स मेसेजस, ई-मेलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचविल्या जातात. परिणामी, यातून अप्रत्यक्षपणे ग्राहकांची मानसिकता ऑनलाइन शॉपिंगकडे वाढू लागली आहे. त्यामध्ये डिझायनर ड्रेस, घडय़ाळ, पफ्र्युम, चपला, बूट, पुस्तके, फूड आयटेम्स, ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मोबाइल, लॅपटॉप, स्मार्टफोन, फ्रिज, वॉशिंग मशीन, अशा भरपूर वस्तूंची ऑनलाइन खरेदी मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे.

खरे तर ऑनलाइन शॉपिंगची आजच्या तरुणाईला सवय झाली आहे. एका स्क्रीनवर भरपूर वैविध्य, घरात बसून खरेदी करता येणे शक्य, जास्तीत जास्त डिस्काऊंट, पसंत न पडलेली वस्तू परत करण्याचा पर्याय, पैसे परत मिळाण्याची शाश्वती, वस्तूंच्या किमतीवरून श्रीमंत-गरीब असा भेदभाव नाही, अशा अनेक पर्यायांमुळे ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड जोर धरू लागला आहे. ‘अ‍ॅसोचॅम इंडिया’ संघटनेच्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशात १२० कोटींपेक्षा जास्त लोकांची ऑनलाइन शॉपिंगला पंसती आहे. त्यातील सुमारे ८९ टक्के लोक सर्वात जास्त ऑनलाइन शॉपिंग करतात. ५४ टक्के लोकांचा कपडे खरेदीसाठी तर ४३ टक्के लोकांचा सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी आणि ३३ टक्के लोकांचा कल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे आहे.

ऑनलाइन शॉपिंग करण्यापाठीमागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इंटरनेट साक्षरता. जास्तीत जास्त फीचर्स असणारे स्मार्टफोन्स आणि विविध कंपन्यांनी उपलब्घ करून दिलेले इंटरनेट प्लान, यामुळे खरे तर ऑनलाइन शापिंग करणे सहजसोपे झाले आहे. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या जानेवारी २०१९च्या अहवालानुसार आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेपैकी १२० कोटी जनता मोबाइल वापरते. यामध्ये रिलायन्स जिओ, बीएसएनएल आणि एअरटेल या कंपन्यांनी सर्वात जास्त वाटा उचलला आहे. ‘ट्राय’ असे सांगते की, डिसेंबर २०१८ मध्ये मोबाइल धारकांची संख्या ११९.७९ कोटी होती, तर जानेवारी २०१९ मध्ये १२०.३८ कोटींवर पोहोचली. म्हणजे दर महिन्याला आपल्या देशात ५९ लाख मोबाइलधारकांची वाढ होत आहे. यामध्ये रिलायन्स जिओ, बीएसएनएल, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आदी कंपन्या आघाडीवर आहे. एकंदरीत स्वस्तात उपलब्ध झालेला मोबाइल आणि इंटरनेटचा अनलिमिटेड डेटा, यामुळे लोक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू सर्च करू लागले. याचवेळी ऑनलाइन शॉपिंगच्या कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींचा आणि सेलचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होऊ लागला. त्यातून ऑनलाइन शापिंगची उलाढाल मोठी होऊ लागली.

मोबाइलधारकांच्या संख्येचा विचार करता भारत हा देश ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ई-बे, शॉपक्लूज, नॅपटॉल, होमशॉप-१८, शॉपरस्टॉप, पेटीएम मॉल, टाटा क्लिक, मंत्रा, जाबाँग, मॅक्स फॅशन, एजिओ, स्टॉक बाय लव्ह, लिमरोड, एबोफ, क्लब फॅक्टरी, अशी एकसो एक अ‍ॅप्स आपल्या हातात असणाऱ्या मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यातलं कोणतंही अ‍ॅप डाऊनलोड केलं की, पहिल्यांदाच आकर्षक ऑफर ग्राहकांना दिली जाते. त्यात अगदी साध्या दुकानांपासून ब्रॅण्डेड दुकानांपर्यंत सर्वाचा समावेश आहे. साहजिकच ग्राहक सहजपणे या ऑनलाइन शॉपिंगकडे ओढला जातो. घरातील साध्या सुईपासून फ्रिज-वॉशिंग मशीनपर्यंत सर्व काही सहज आणि त्वरित उपलब्ध आहे. आपल्याकडे ग्राहकवर्ग आकर्षित करण्यासाठी प्रचंड चढाओढ ऑनलाइन शॉपिंगच्या कंपन्यांमध्ये दिसून येत आहे. त्यासाठी ते टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रांमधून जाहिराती मोठय़ा प्रमाणात करत आहेत. ‘टॅम’च्या (टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट) रिपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन ऑनलाइन इंडिया प्रा. लि या कंपनीचा टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची जाहिरात करण्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे अनुक्रमे ३८ आणि ५३ टक्के गुंतवणूक केली आहे. तर, त्यापाठोपाठ फ्लिपकार्ट डॉट कॉम कंपनीने अनुक्रमे १९ आणि १३ टक्के गुंतवणूक केली आहे.

ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी उपलब्ध झालेला पेटीएम नावाच्या अ‍ॅपने आता पेटीएम मॉल नावाचा पर्याय लोकांसमोर उपलब्ध करून दिला आणि मोठय़ा प्रमाणात खरेदी होऊ लागली. गणपती, दुर्गादेवी आणि दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर पेटीएमवर ‘महा कॅशबॅक कार्निव्हल’चा सेल सुरू करण्यात आला होता. त्यावर तरुण, महिला, वृद्धांकडून मोठय़ा प्रमाणात खेरदी करण्यात आली. पेटीएम मॉलच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गणपती आणि दुर्गादेवी सणांमध्ये मोबाइल, लॅपटॉप, ब्लुटूथ हॅण्डसेट आणि स्पीकर्स आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर गृहिणींकडून घराच्या सजावटींच्या वस्तू मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. त्यामध्ये वॉल स्टिकर्स, स्विचस्टिकर्स, सेट टॉप बॉक्स स्टॅण्ड, एईडी लाइट्स, स्मोकलेस कॅण्डल्स, विविध अलार्म क्लॉक, वूड होम टेम्पल, वॉलपेपर, इमोजी स्माईली स्प्रिंग डॉल आदी वस्तूंचा समावेश होता. तसेच गणपती आणि नवरात्रीच्या दरम्यान महिला वर्गाकडून दिवा, पूजा थाळी, कलश, रुद्राक्ष, लक्ष्मी यंत्र, टेराकोटा दिवा, फुलवाती, सुगंधी अगरबत्ती, कापूर डबी, गणेश, लक्ष्मी, साईबाबा, दुर्गा यांच्या मूर्तीची विक्री मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांकडून मिक्सर, वॉशिंग मशीन, फ्रिज, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, रोटी मेकर, ज्यूस मिक्सर, वॉटर प्युरिफाय, वॉटर हीटर, व्हॅक्युम क्लीनर, राइस कुकर, ओवन, इलेक्ट्रिक केटल, इण्डक्शन, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली असे दिसून आले आहे.

पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे सांगतात की, पेटीएम मॉलचा ‘महा कॅशबॅक कार्निव्हल’ सुरू झाला अन् पहिल्याच दोन दिवसांत ग्राहकांनी प्रचंड खरेदी केली. आमच्या कंपनीकडून या सेलमध्ये २१०० करोड रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते. त्याकरिता पेटीएम मॉलमध्ये १००हून अधिक ब्रॅण्ड्स आणि किरकोळ विक्रेत्यांना सामावून घेण्यात आले होते. त्यांच्या प्रत्येक वस्तूंवर सर्वात जास्त सवलती आणि कॅशबॅक ऑफर्स देण्यात आल्या होत्या. या वेळी बिझनेसमध्ये ३५ टक्के वाटा मोठय़ा शहरांचा आहे आणि ६५ टक्के वाटा शहर-निमशहरांनी उचललेला आहे.’

दोन-तीन वर्षांपूर्वी ऑनलाइन शॉपिंगमध्ये शहरातील आणि तीही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. मात्र, प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल आणि इंटरनेटचा डेटा, समाजातील जवळपास सर्वच लोकांना ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे. त्यामुळे खेडय़ापाडय़ातील वर्गही ऑनलाइन शॉपिंग करण्यामध्ये अपवाद ठरत नाही, हे विविध ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात येत आहे. जसा टू-जी, थ्री-जी, फोर-जींचा प्रवास आपला झाला तसा आपला इंटरनेट साक्षरतेचा आलेख उंचावला. त्यामुळे समाजाच्या सगळ्या स्तरातून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण, खिशाला परवडतील अशा किमतीत वस्तू त्यांना घरपोच मिळताहेत.

अ‍ॅमेझॉनची झेप

ऑनलाइन शॉपिंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘अमेझॉन डॉट कॉम’ने ऑनलाइन विक्रीमध्ये सर्वात मोठा आकडा गाठला आहे. यंदा सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर अमेझॉनने ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल’ नावाचा सेल पाच दिवसांसाठी सुरू केला होता. या पाच दिवसांमध्ये भारतातील जवळजवळ ५०० हून अधिक शहरांमधील ६५ हजार विक्रेत्यांनी ग्राहकांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या. १५ हजारांपेक्षा जास्त पिनकोड्स अमेझॉनच्या प्राईम मेंबरशिपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे प्राइम मेंबरशिपमध्ये सरासरी ९४ टक्के पिनकोड्स अमेझॉनला मिळाले आहेत. त्यातील ९९.४ टक्के पिनकोड्सवरून आलेल्या ऑर्डर्स ग्राहकांपर्यंत पोहोच करण्यात आल्या आहेत. या सेलदरम्यान सुमारे ८८ टक्के ग्राहक हे छोटय़ा-छोटय़ा शहरांमधून जोडले गेले आहेत. अमेझानचे वरिष्ट उपाध्यक्ष अमित अगरवाल म्हणतात की, अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’च्या सेल दरम्यान अनपेक्षितरीत्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात वस्तूंची विक्री झाली आहे. प्राइम मेंबरशिपमध्ये १५ हजार पिनकोड्स नव्याने दाखल झाले आहेत. ६५ हजारांपेक्षा जास्त विक्रेत्यांनी ५०० हून जास्त शहरांतील आर्डर्स स्वीकारल्या आहेत. इथल्या छोटय़ा विक्रेत्यांनीदेखील नवतंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे अमेझॉनला जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत सेवा देता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 1:11 am

Web Title: online shopping craze on festival in this year zws 70
Next Stories
1 संशोधन : दीड लाख वर्षांपूर्वीची हत्यारनिर्मिती
2 लहान मुलांचा आहार
3 सण दिवाळी-दसऱ्याचा आनंद मोबाइल खरेदीचा
Just Now!
X