सगळ्यांच्या दृष्टीने सारं काही संपल्यात जमा होतं, पण केशवला मात्र अजूनही रमा येईल अशी आशा वाटत होती.

त्याच्या मनातल्या मनात आशेचे पंख फुटू लागले. ‘‘कुणी काहीही म्हटलं तरी नदीला शेवटी सागरालाच येऊन मिळावं लागतं, नाही तरी तिला तरी दुसरा ठावठिकाणा कुठला?’’ आतल्याच्या आत त्याचं मन सुखावत गेलं.

ती येणार.. नक्की येणार.. तिला माझ्याशिवाय पर्याय नाही.. तिला यावंच लागेल.

दुसऱ्याच क्षणी त्याला एकदम अपराधी वाटायला लागलं.

‘‘आपण नेहमीसारखेच स्वत:ला मोठेपणा घेतोय. तिला आपल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणून तिला असहाय्य ठरवतोय आणि स्वत:ला कर्तृत्ववान. खरं तर उलटंच आहे. ती सागराइतकी उदार मनाची आणि आपण..?’’

त्याचं मन भूगोलाचा तास, साने गुरुजींचा प्रश्न, रमाने एकटीने दिलेले उत्तर आणि त्यावर आपण तिच्याशी केलेलं भांडण, धरलेला अबोला.. सारं काही आठवतं. आपण नेहमीच कसे कोत्या मनाचे राहिलो या विचारानं त्याला गलबलून आलं.

केशवचे डोके जड झाले. रामची ट्रेन चुकली असेल का? की नाना म्हणतात तसे ती मला सोडून जाईल? गेलीच असेल का?

‘‘नाना, नाना.. कुठे गेले? आत्ताच तर इथे होते.’’ पण केशवच्या हाकेला धावून आला वॉर्डबॉय आणि सिस्टर. ‘‘तुम्ही कोण? नाना, रमा कुठे आहेत?’’ काही उत्तर मिळायच्या आत पुन्हा शिरेत सुई टोचल्याची कळ आणि मग मनात, शरीरात स्तब्धता, शांतता अगदी, रमाला अभ्यासाच्या वेळी हवी असायची तशीच!

‘‘कोण कुठली रमा! एक दिवस बाबांना देवळाच्या पायरीवर सापडली. त्या अनाथ रमालाच बहीण म्हणून बाबांनी आपल्यासमोर उभी केली. तेव्हाही तिला मी बहीण कधी मानलंच नाही. नंतर ती आपली मैत्रीण बनत गेली. एवढंच. एवढंच..??? ती सरळ नाकाची, नम्र, सुस्वभावी, अगदी माझ्या स्वभावाच्या विरुद्धच.. ती नकळत आवडू लागली.

तिला मनसोक्त चोरून पाहताना नानांनी किती वेळा हटकलं, पण तिनं कधीच विरोध केला नाही. अडवले नाही. तिला हे सगळं आवडायला लागलं होतं. तसं तिनं बोलूनही दाखवलं एकदा. मग तर काय मी तिचा मनसोक्त उपभोगच घ्यायला सुरुवात केली.

ती सगळं करू द्यायची. हवं तेव्हा.. हवं तिथं.. हवं तसं, ती आकंठ प्रेमात बुडली होती. तिनं किती वेळा सांगितलं की, तिला आपल्याबरोबर आयुष्यभर असेच राहायचे आहे. पण माझे खरे प्रेम होते की वयसुलभ आकर्षण? की अनाथ म्हणून हक्काची वाटत होती? कारण नानांना, इतरांना तिचं कौतुक म्हणून किती राग यायचा आपल्याला!’’

‘‘ओ आजोबा, उठा गोळ्यांची वेळ झाली.’’ केशवने जड झालेले डोळे अर्धवट उघडले.

कसला तरी कडवा घोट घशाच्या खाली उतरला. पुन्हा तेच जडत्व, तीच शांतता.. रमाने गौप्यस्फोट केल्यावर होती तशीच.

‘‘मला दिवस गेलेत.’’

‘‘कुणापासून?’’ आपला बेशरम प्रश्न आणि उत्तरादाखल रमाने गालावर उठवलेली पाच बोटे. खऱ्या झिणझिण्या आल्या त्या तिच्यामागची आकृती पाहून ‘‘नाना..नाना..’’ आपण हाक मारेपर्यंत नानांचा देह कोसळला. त्यांनी दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिलाच नाही. पिंडाला कावळा शिवेना म्हणून लोकांच्या सांगण्यावरून आपण म्हटलेही की,  ‘‘रमाचा बहीण म्हणून सांभाळ करेन.’’ मग तर कावळा अजूनच लांब उडून गेला.’’

‘‘म्हणजे?.. म्हणजे?’’ केशवचा बिछाना पूर्ण ओला झाला होता. केशवला हातापायाच्या सुरकुत्या जाणवल्या. ‘‘म्हणजे रमाला जाऊन चार दिवस, चार महिने की चाळीस वर्षे लोटली? काहीच संदर्भ लागेना. आणि आपली बायका-पोरे? ती तर कधीच निघून गेली. किती दिवस आपण देवळाच्या पायरीवरच तर पडून होतो.. अनाथासारखे..’’

‘‘काका बिछाना पुन्हा ओला केलात. उठा चेकअप करायचंय.’’

आवाज का ओळखीचा वाटतोय? केशवने महत्प्रयासाने किलकिल्या डोळ्यांनी पाहिले.. तोच चेहरा, तोच बांधा आणि तोच तडफदारपणा.!

‘‘तू कोण मुली?’’

‘‘मानिनी रमा. म्हणजे आईचे नाव रमा.’’

‘‘आणि बाबा?’’

‘‘ते नाहीत, म्हणजे कधीच नव्हते.’’

‘‘आई काय करते?’’

‘‘ती अनाथ परित्यक्त्या, विधवा आणि फसवल्या गेलेल्या महिलांसाठी आश्रम चालवते ‘पर्याय’ नावाचा.’’ एकच उबळ आली. गात्रे शिथिल झाली, केशव स्वत:शी पुटपुटला, ‘‘रमा तू पूर्ण झालीस. मलाच तुझ्याशिवाय पर्याय नव्हता.. नाही.. मी अनाथ राहिलो.’’

‘‘अरे वॉर्डबॉय, सगळं संपलंय, यांच्या नातेवाईकांना कळवा.’’

‘‘मॅडम हे तर पायरीवर सापडलेत देवळाच्या.’’

‘‘ठीक आहे. ‘पर्याय’मध्येच न्या अंत्यसंस्काराला!’’
कल्पना लाळे-येळगावकर – response.lokprabha@expressindia.com