दागिन्यांचा विषय निघाला की चर्चेचा मोर्चा सहजच इतर देशांकडे वळतो. दरवर्षी कपडे, अ‍ॅक्सेसरीज यांच्यासोबत दागिन्यांचे ट्रेण्डसुद्धा जगभरात बदलत असतात. यंदाच्या जगभरातील दागिन्यांच्या ट्रेण्डवर एक नजर..

दागिने किंवा ज्वेलरी यांचं स्थान स्त्रियांच्या पेहरावात अढळ आहे. ज्या देशात अंगावर एकही दागिना नसलेल्या स्त्रीला ‘लंकेची पार्वती’ अशी एक व्याख्याही राखीव असते, तिथे हा असा प्रश्न विचारण्याचा खरं तर प्रश्नच येत नाही. त्यात आपल्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची संस्कृती आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्रियांना दागिन्यांबद्दल तितकंच प्रेम आहे. उगाचच नाही हिऱ्याला स्त्रियांचा ‘बेस्ट फ्रेण्ड’ म्हणत. या दागिन्यांचा प्रवाससुद्धा तितकाच गमतीशीर आहे.

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

आज पेहरावाचा किंवा लुकचा महत्त्वाचा भाग असलेल्या दागिन्यांच्या वापराची सुरुवात खरं तर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी झाली होती. अगदी आदिमानवाच्या काळात एखाद्या कळपातील सदस्यांची ओळख पटविण्यासाठी एका पद्धतीचं पेण्डण्ट घालायच्या पद्धतीचे पुरावे आढळतात. त्यानंतर शिकार, युद्धातील शौर्याचं प्रतीक किंवा समूहातील महत्त्वाचं स्थान पटविण्यासाठी नेकपीस, अंगठी, कानातले डूल, कडं किंवा पेण्डण्ट वापरलं जाऊ लागलं. यामध्ये प्राण्यांची हाडं, टेरेकोटा, लोखंड किंवा तत्सम धातू, मणी, हस्तिदंत, शंख, लाकूड यांचा वापर होऊ  लागला. काळानुसार वेगवेगळ्या धातूंचा शोध लागल्यावर सोने, चांदी, पितळ, तसेच हिरे, पाचू, माणिक, रुबी यांचा वापर दागिन्यांमध्ये होऊ  लागला. कित्येकदा चलन किंवा भेटवस्तूच्या स्वरूपात कळपांमध्ये दागिन्यांचा वापर होऊ  लागला. दागिन्यांमध्ये वापरलेलं दुर्मीळ साहित्य आणि त्याची घडणावळ यावर दागिन्यांची किंमत ठरू लागली. असे दागिने खरेदी करण्याची ऐपत यावरून व्यक्तीची सामाजिक पत निश्चित होऊ  लागली. इजिप्त, ग्रीक, रोम संस्कृतीमध्ये अशा कित्येक दागिन्यांचा उल्लेख आढळतो. त्यातूनच दागिन्यांचं महत्त्व वाढू लागलं.

हल्ली आपण दागिने पेहरावाचा भाग म्हणून वापरतो. पण त्यापलीकडेसुद्धा दागिन्यांचा वापर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी होत असे. इजिप्तमध्ये राजे आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची ओळख पटण्यासाठी तिच्या ममीच्या गळ्यात ‘कार्तुश’ हे आयताकृती पेण्डण्ट घातलं जायचं. सेल्टिक जमातीमध्ये गळ्यातील ‘टोर्क’ नेकपीस हा समाजातील पद आणि जादुई शक्तींपासून बचावासाठी घातला जातो. ग्रीकमध्ये ‘कोम्बोई’ शांतता आणि ध्यानसाधनेसाठी वापरलं जायचं. चीनमध्ये जेड शुभशकून म्हणून वापरलं जायचं. त्यामुळे त्यांच्यात जेडला सोन्यापेक्षाही महत्त्व होतं. परदेशात कशाला, अगदी आपल्याकडेही लडाखमध्ये टक्र्वाइशला खूप महत्त्व आहे. मंगळसूत्र, हिरव्या बांगडय़ा, चुडा, मांगटिका ही वैवाहिकतेची ओळख म्हणून घालतात. जगभरात लग्नाची खूण म्हणून अंगठी घातली जाते. प्रत्येक धर्माचे बोधचिन्हसुद्धा दागिन्याच्या स्वरूपात घातले जाते. राशीनुसार खडय़ाच्या अंगठय़ा घालायची पद्धत आपल्याकडे आहे. थोडक्यात केवळ सौंदर्याचा भाग या पलीकडे दागिन्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात केला जायचा. त्यातील कित्येक पद्धती आजही कायम आहेत.

दागिने फॅशन संस्कृतीचा भाग होण्याची सुरुवात युरोपात सतराव्या शतकात रेनेसाँ काळात  झाली. नेपोलियन फ्रान्सचा सम्राट झाल्यावर दागिन्यांना सुगीचे दिवस येऊ  लागले. नेपोलियनच्या राण्यांकडे दागिन्यांचे कैक सेट होते. त्याच काळात कपडय़ांना अनुसरून दागिने घालायची पद्धत सुरू झाली. मुकुट, मोठे कानातले डूल असे कित्येक दागिन्यांचे प्रकार या काळात आले. या काळात जगभरात व्यापाराचे जाळे विस्तारले होते. त्यामुळे साहजिकच जगभरातील संस्कृतींमधील दागिन्यांचा प्रभाव या डिझाइन्सवर पडत होता.

२१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानासोबत प्लास्टिक, लेदर, आर्टििफशिअल मोती, माणिक, खडे यांचा वापरही दागिन्यांमध्ये होऊ लागला. अगदी प्रिन्सेस डायनाचे नाजूक नेकपीस,  मॅरिलिन मन्रोचे मोठाले नेकपीस, एलिझाबेथ टेलरचे प्लॅटीनम नाजूक चेकलेस, ऑड्री हेपबर्नचा मोत्यांचा हार असे कित्येक दागिन्यांचे प्रकार हॉलीवूड अभिनेत्री, स्टाइल आयकॉन यांच्यामुळे प्रसिद्ध झाले. हल्ली प्रत्येक सिझननुसार जगभरातील ज्वेलरीचे ट्रेण्ड्स बदलत जातात. यंदाच्या जगभरातील दागिन्यांच्या ट्रेण्ड्सवर एक नजर टाकू या.

स्टेटमेंट इअररिंग्स

गेल्या काही वर्षांपासून नेकपीसला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. आता मात्र फोकस इअररिंग्सवर आहे. मोठाले, लांब कानातले डूल यंदा आवर्जून पाहायला मिळतील. प्लास्टिक, थ्रीडी तंत्रज्ञान यामुळे दागिन्यांचं वजन काही प्रमाणात कमी झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून ओव्हरसाइज कानातले यंदा न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या रनवेवर पाहायला मिळाले. अर्थात यांच्यासोबतच मोती, रंगीत खडे, सोने, हिरे यांचा वापरही इअररिंग्समध्ये आवर्जून करण्यात आला होता. इअररिंग्समधील यंदाचा महत्त्वाचा बदल म्हणजे दोन्ही कानांतील समान इअरिरग्सना फाटा देत एकाच कानात इअररिंग घालायची किंवा दोन्ही कानात वेगवेगळे इअररिंग्स घालायची पद्धत यंदा रुजू झाली आहे. आपल्याकडे मागच्या वर्षी इअरकफचा ट्रेण्ड आला होता. एका किंवा दोन्ही कानांमध्ये संपूर्ण कानाच्या आकाराचं, नजरेत भरणारं इअरकफ घातलं जायचं. पण तेव्हा दुसऱ्या कानामध्ये छोटा खडा घातला जायचा. पण यंदा मात्र इअरकफसोबत दुसरा कान मोकळा सोडला जातोय. तसचं इअरकफचा आकारही वाढला आहे. सध्या दैनंदिन वापरातचं नाही तर पार्टी, समारंभाला जातानासुद्धा वेगवेगळे दागिने घालण्याऐवजी एकच नजरेत भरणारा दागिना घालण्याकडे तरुणाई पसंती देत आहे. हे दागिन्यांचा आकार वाढण्याचं मुख्य कारण आहे.

याचबरोबर तुम्हाला दोन्ही कानांत डूल घालायचेच असतील तर दोन वेगवेगळे डूल घालायचा प्रयोगही यंदा केला गेलाय. तुमच्या ड्रेसमधील दोन मुख्य रंग निवडून (कॉन्ट्रास असतील तर उत्तम) त्या रंगाचे कानातले यात घातले जातात. यामध्ये दोन्ही कानांतल्यांचा आकार वेगळा असेल तरी चालू शकतं. पण सुरुवातीला प्रयोग करताना किमान एक घटक समान असू द्या. उदा. मूळ चौकोनी आकाराचे कानातले निवडून दोघांचे आकार छोटे-मोठे असू द्या. दोन्ही कानांतल्यांचा बेस रंग समान असू द्या. तसेच एक कुंदन आणि एक हिऱ्याचं डूल असं एकदम टोकाचे कानातले निवडून चालणार नाही. शक्यतो दोन्ही कानातले मोठे, केसांमध्ये न लपता पटकन नजरेत येणारे असू द्या.

तुम्हाला पारंपरिक इअररिंग्स पसंत असतील तर कानाच्या आकारापेक्षा मोठे आणि भौमितिक आकारांचे इअररिंग्स वापरता येतील.

 पारंपरिक मोटिफ्स आणि मोती

दागिन्यांमध्ये नक्षीकाम आणि मोटिफ्स कोणते वापरतो, याला अधिक महत्त्व आहे. पेझ्ली, फ्लोरल, मीनाकारी, भौमितिक, प्राणी-पक्ष्यांचे आकार असे कित्येक मोटिफ्स दागिन्यांमध्ये वापरले जातात. यंदा नवीन चिन्हे निवडण्याऐवजी पारंपरिक चिन्हांना डिझायनर्सनी पसंती दिली आहे. यामध्ये कित्येक धार्मिक चिन्हांचा, पुरातन वास्तूमधील चिन्हांचा प्रामुख्याने समावेश आहे. ख्रिश्चनांचा क्रॉस, इजिप्त, ग्रीक संस्कृतीतील चिन्हे, प्राण्यांचा आकार यांचा समावेश केला गेलाय. फ्लोरल आकारांवरसुद्धा ग्रीक, पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव आवर्जून पाहायला मिळतो.

यंदाच्या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने नजरेत येणारा घटक म्हणजे मोती. मोठाले, शक्यतो सफेद मोती यंदा कित्येक डिझायनर्सनी दागिन्यांमध्ये वापरले आहेत. हिरे आणि इतर धातूंच्या तुलनेत मोत्यांचे दागिने कपडय़ांच्या वेगवेगळ्या रंगांवर खुलून दिसतात. तसेच पारंपरिक, फॉर्मल, पार्टीवेअर सगळ्याच लुकवर ते वापरता येतात. त्यामुळे मोत्यांचा वापर यंदा दागिन्यांमध्ये केला गेलाय. सफेद आणि क्रीम रंगाच्या मोतींसोबत रंगीत मोतीही यंदा वापरले गेले आहेत. यांच्यासोबतच रंगीत मिनरल्सचा वापरसुद्धा पेण्डंटमध्ये केला गेलाय.

सोने, चांदी, प्लॅटिनम या खऱ्या धांतूऐवजी प्लास्टिक, सोन्याचांदीचं पाणी चढवलेले धातू, लेदर, कापड यांचा वापरही दागिन्यांमध्ये केला गेलाय.

चोकर आणि नाजूक नेकपीस

यंदा इअररिंग्सवर अधिक लक्ष दिलं गेल्याने नेकपीस सिंपल ठेवण्याकडे बऱ्याच डिझायनर्सनी पसंती दिली आहे. विशेषत: ९०च्या दशकातील गळ्याभोवती घट्ट बसणारा चोकर पुन्हा पाहायला मिळतो आहे. पण यंदा त्याचं रूपं विस्तारलं आहे. पारंपरिक लेदर किंवा प्लास्टिकच्या पट्टय़ाच्या चोकरसोबत धातू, मणी यांचा वापर करून केलेले मोठाले चोकरसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत.

तुम्हाला गळाबंद चोकर नको असेल तर नाजूक पेण्डण्ट किंवा नेकपीसचा पर्यायसुद्धा डिझायनर्सनी दिला आहे. मध्यम आकाराच्या खडय़ांची नाजूक माळ किंवा नाजूक सरीसोबत मोठाले पेण्डण्ट  हे प्रकार यंदा आवर्जून पाहायला मिळतील. अर्थात हे पेण्डण्टसुद्धा इअररिंग्सप्रमाणेच आकाराने मोठे आहेत. कानातून गळ्याभोवती जाणारा नेकपीस, स्कार्फप्रमाणे गळयामागून येत समोर मोकळा सोडलेला नेकपीस असे कित्येक प्रयोग डिझायनर्सनी यंदा केले आहेत.

आर्मकफ आणि अंगठय़ा

मघाशी म्हटल्याप्रमाणे अंगभर दागिने घालण्यापेक्षा एक नजरेत भरणारा दागिना घालण्याकडे डिझायनर्सचा यंदा कल आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे आर्मकफ. थोडक्यात सांगायचं झाल्यास अंगठी आणि कडय़ाला जोडणाऱ्या हातफुलाचं उदाहरण घेता येईल.  पण इअररिंग्सप्रमाणेच या आर्मकफचा आकार मोठा आहे. फ्लोरल आकारांसोबत दोरीची नॉट, वेल, भौमितिक आकार या विविध आकारांचा वापर यात केला आहे.

यावर्षी खडे, मोती, माणिक यांच्या मोठय़ाला अंगठय़ासुद्धा नक्की पाहायला मिळतील. पण हल्ली एकच अंगठी घालून भागत नाही. सगळ्या बोटांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या अंगठय़ा घालायची पद्धत आता रुजू झाली आहे. अगदी एकाच बोटात दोन-तीन अंगठय़ाही घातल्या जातात. त्यानुसार नाजूक अंगठय़ाही पाहायला मिळतात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत परदेशातील हे ट्रेण्ड्स भारतात येईपर्यंत दोन-तीन वर्षे जायची. पण हल्ली मात्र जागतिक ट्रेण्ड्स भारतात लगेचच पाहायला मिळतात. त्यामुळे हे ट्रेण्ड्स न्यूयॉर्क, पॅरिसमध्ये दिसून आले असले, तरी भारतातसुद्धा त्यांची चाहूल लागलेली आहे. विशेषत: यांचे फोटो पाहिल्यास येत्या सणांच्या मौसमात हे ट्रेण्ड्स सहजच वापरता येतील, हे लक्षात येईल. त्यामुळे या जागतिक ट्रेण्ड्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मृणाल भगत
response.lokprabha@expressindia.com