15 October 2018

News Flash

अरूपाचे रूप : रसभावनांचा दृश्यखेळ!

मनुष्याकृती पाहून जशीच्या तशी रेखाटायची यात कौशल्य अधिक असते.

मनुष्याकृतीतील रेषांना स्वत:च्या पद्धतीने कधी वळवून, कधी मुरड घालून तर कधी जोरकस रेटून नेटक्या रेखाटनाचे नियम मोडत जतिन दास त्या रेखाटनाला कलाकृतीच्या दिशेने नेतात.

रंग, रूप- आकार, रेषा, पोत, चित्रचौकट आणि विषय हे सारे घटक एकत्र आले की, चित्र तयार होऊ शकते, असा एक समज आहे. हे सारे चित्राचे घटक आहेत हे खरे पण त्यांचे एकत्र येणे म्हणजे चित्र नव्हे. अनेकांच्या कथित चित्रामध्ये हे सारे घटक असतात पण त्याला चित्र म्हणता येत नाही. मग चित्र तयार होते तरी कसे?  चित्र नेमकं कशाला म्हणायचं? चित्र ही कलावंताची अभिव्यक्ती असते असे म्हणतात यात कितपत तथ्य आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हे सारं समजून घेण्याची एक महत्त्वपूर्ण संधी तीही कधी नव्हे ती तब्बल दोन आठवडे रसिकांना अलीकडेच मुंबईत मिळाली होती. निमित्त होते विख्यात चित्रकार जतिन दास यांचे प्रदर्शन.

जतिन दास असे म्हटले की, जाड रेषांचे फटकारे असलेली रेखाटने अशी प्रतिमा गेली अनेक वष्रे रसिकांच्या मनात आहे. पण त्यांची चित्रे पाहताना हे नक्कीच जाणवते की, ही केवळ जशीच्या तशी मनुष्याकृतींची रेखाटने नाहीत तर यात रेषेमध्ये लय असते; ती त्या रेखाटनातील व्यक्तिमत्त्वाला आकार देते तर कधी त्या रेषेच्या कमी-अधिक जोरकसपणातून विविध रसभावांची निर्मिती होते. दास यांची ही रेखाटने म्हणजे रसभावनांचा असा दृश्यखेळच असतो. मनुष्याकृती पाहून जशीच्या तशी रेखाटायची यात कौशल्य अधिक असते. पण ती रेखाटने दास यांच्या शैलीतून उतरतात तेव्हा ती मनुष्याकृतीप्रधान चित्रे किंवा व्यक्तिचित्रे राहत नाहीत तर त्याला झालेल्या सृजनस्पर्शाने ती निखळ कलाकृतीचा आनंद देतात. या रेखाटनाला शरीररचनाशास्त्र लावायला गेले तर दास काठावर उत्तीर्ण होतील. पण अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता, कलात्मकता हा निकष असेल तर पूर्णपणे कसास उतरतील. शरीररचनाशास्त्रानुसार मनुष्याकृती रेखाटणारे अनेक आहेत. त्यात नकलाकार अधिक आहेत. पण मनुष्याकृतीतील रेषांना स्वत:च्या पद्धतीने कधी वळवून, कधी मुरड घालून तर कधी जोरकस रेटून नेटक्या रेखाटनाचे नियम मोडत जतिन दास त्या रेखाटनाला कलाकृतीच्या दिशेने नेतात. कलाकाराच्या मनात जे आहे ते ती रेषाच अभिव्यक्त करते. ती बोलू लागते, हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी अनेक वर्षांनंतर सादर केलेल्या या खेपेसच्या प्रदर्शनाचा विषय ‘फिगर्स इन मोशन’ असा होता.

तलरंग आणि अ‍ॅक्रेलिक चित्रण, जलरंग आणि शाई तसेच निव्वळ रेखाटने अशी तीन प्रकारांतील चित्रे त्यांनी सादर केली होती. या सर्वच चित्रांतील रेषा कृतिशील होती. हालचाल म्हणजे नेमके काय, तिचे वैविध्य सारे काही या रेखाचित्रांतून अनुभवता आले. यातील तलरंग आणि अ‍ॅक्रेलिक चित्रण या भागात तांडव, ऑन माय शोल्डर, लन्रेड, लिबरेटेड, नायिका, बरागी, मिथुन, इंटिमसी, कपल ही चित्रे वेधक होती. दास रेषांचा वापर आवश्यक तितकाच आणि कमीत कमी करतात. डोळे दाखविण्यासाठी केवळ दोन गोल दाखविलेले असले, डोळे नीट काढलेले नसले तरी फरक पडत नाही. कारण रेषाच एवढी बोलकी आणि प्रभावी असते की, चित्रकाराच्या मनातील भाव तिने केव्हाच साधलेले असतात. प्रभावी रेषा व रंगच भावनिर्मिती करतात.

शिल्पकलेमध्ये आम्रेचरचा वापर तोलून धरणाऱ्या सांगाडय़ाप्रमाणे असतो. जतिन दास यांनी तसाच रेषांचा वापर जलरंग आणि शाईचित्रांमध्ये केलेला दिसतो. यातील शाईचा वापर मूड किंवा भाव निर्माण करतो. तर रेषा थेट अभिव्यक्त होते. इथेही रेषेचा वापर कमीत कमी तर रंगांचा वापर माफकच आहे. टु टुगेदर, फिजिसिस्ट, ट्रायो कलरफूल, टु असेटिक्स, स्ट्रेच्ड, अ‍ॅटिटय़ूड, गॉसिप, डायलॉग ही प्रभावी चित्रे होती. डायलॉगमध्ये निवांत संवाद दिसतो. हा निवांतपणा दोन व्यक्तींच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये आहे. गॉसिपमध्ये खांद्यावर हात ठेवत साधलेली जवळीक यामध्ये कानगोष्टीचा फील आहे. तर अ‍ॅटिटय़ूडमध्ये अहंचे भिडणे हे दोघांच्याही शारीर वर्तनामध्ये प्रतीत होते. अखेरच्या रेखाटनांमध्ये अ‍ॅँग्विश्ड, कॅरिइंग द अर्थ, टर्न बॅक आणि तांडव ही रेखाचित्रे प्रभावी होती. तांडवातील बळाचा वापर, त्यातील लय, प्रभाव सारे काही रेषांमधूनच प्रकट होते. टर्न बॅकमध्ये मानवी शरीररचनेचा अप्रतिम वापर आहे. त्यातून दास यांची निरीक्षणशक्ती किती प्रभावी आहे आणि विषयात किती हातखंडा आहे, त्याचा प्रत्यय येतो. वजनाचा भार ‘कॅरिइंग द अर्थ’मध्ये पाहणाऱ्याला जाणवल्याशिवाय राहत नाही, हे चित्रकाराचे यश आहे.

एरवी आपण मनुष्याकृतीप्रधान किंवा वास्तवदर्शी चित्रण महत्त्वाचे की, अमूर्तचित्रण असा वाद घालत बसतो. जतिन दास यांची ही रेखाचित्रे या दोन्हींचा मेळ साधून उत्तम कलाकृतीच्या दिशेने प्रवास करणारी आहेत. रेखाटनांचे महत्त्व ते कमी लेखत नाहीत आणि जे अभिव्यक्त करायचे आहे त्यासाठी कथित शैलींची मर्यादाही मानत नाहीत. ते अभिव्यक्त होतात थेट त्यांचा रेषेतून, रंगांतून तर कधी अमूर्ताच्या दिशेने जाणाऱ्या रंग-रेषांतून. ते म्हणतात, मी चित्रकार आहे.. प्रवास कलावंत होण्याच्या दिशेने व्हायला हवा! त्यांची ही भूमिकाच अभिव्यक्तीची दिशा नेमकी स्पष्ट करते.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on November 24, 2017 1:02 am

Web Title: painter jatin das