18 February 2019

News Flash

अरूपाचे रूप : दृश्योपनिषद

‘उपनिषत्सु्’ हे वासुदेव कामतांचे प्रदर्शन ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान जहांगीरच्या श्रोतृगार दालनात पाहता येईल.

या सर्व चित्रांमध्ये एक लहानसे कासव सर्वत्र पाहायला मिळते. हे स्व-अस्तित्व आहे. कासवच का तर त्याची बैठक पक्की आहे.

कलावंत विचारी असेल तर कोणताही, कदाचित दृश्यात्म नसलेला विषयही तो हाती घेऊन साकारू शकतो हेच यातून प्रतित होते.

वेद आणि उपनिषदे यामध्ये दृश्यात्मक बाबी त्या काय असणार, असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात असतो. पण उपनिषदांचा विषय घेऊन प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत काम करताहेत, असे कळले की, काही तरी नवीन पाहायला मिळणार याची खात्री मनोमन अनेक रसिकांना असते. अर्थातच यामागे ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ आणि ‘मेघदूत’ या कामत यांनी केलेल्या चित्रमालिकांची पार्श्वभूमी असते. त्यांनी चितारलेले रामायण पाहिलेले असते त्यामुळे त्यांनी लावलेला अन्वयार्थ वेगळा असतो आणि तो दृश्यरूपात अनुभवताही येतो हेही ठाऊक असते. म्हणूनच उपनिषदांवरील चित्रांबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. ‘उपनिषत्सु्’ हे त्यांचे प्रदर्शन ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान जहांगीरच्या श्रोतृगार दालनात पाहता येईल.

‘तेजस्विनावधीतमस्तू’ या चित्रापासून प्रदर्शनाची सुरुवात होते. दिसायला हे तसे साधेच चित्रण वाटते. दीर्घ पसरलेल्या वटवृक्षाखाली आसनस्थ गुरू आणि जमिनीवर आसनस्थ शिष्य, त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. उपनिषद म्हणजे गुरूसोबत खाली बसून केलेली चर्चा होय. चर्चा, संवाद, प्रश्नोत्तरे यांमधून ज्ञानग्रहण ही आपली परंपरा आहे. वटवृक्षच्या छायेत इतर काही कधी उगवत नाही असे म्हणतात, ते खरेही आहे. पांथस्थाला काही काळ विश्रांती देणे, छाया देणे हे त्याचे काम. गुरूही तेच काम करतो फक्त ज्ञानदानाच्या संदर्भात. ज्ञान घेतले की, शिष्याने तिथे थांबायचे नसते, बाहेर पडायचे असते. तर तो मोठा होतो, हेही कामत दृश्यरूपात सहज सुचवून जातात. कठोपनिषदची सुरुवात शांतीपाठाने होते. त्यावर हे चित्र बेतलेले आहे.

‘इंद्रियसुखाचे अश्व धावती’ या चित्रात रथरूपक पाहायला मिळते. नचिकेत-यम संवाद कठोपनिषदात येतो, त्यावर हे चित्र आधारलेले आहे. पाच इंद्रियांचे पाच अश्व; यात अश्व ज्या इंद्रियाचे प्रतीक म्हणून येतो, केवळ त्या इंद्रियाचेच स्पष्ट चित्रण दिसते. जीभ असलेला अश्वच केवळ शेपटीसह पूर्ण दिसतो. जिभेची संवेदना शेपटापर्यंत पोहोचते, असे म्हणतात. स्पर्शाच्या दृष्टीनेही हे इंद्रिय इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते, हे इथे प्रतीकात्मकरीत्या चित्रात येते. मागच्या बाजूस चाक व हाती मनाचा लगाम असलेला सारथी दिसतो.

माणसाचे संपूर्ण शरीर हे अन्नमयच असल्याचे तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितले आहे. ‘जाणिजे यज्ञकर्म’ हे चित्र त्यावरच आधारलेले आहे. जे खातो ते अन्न त्यातून शरीर पोसले जाते पण भान राहिले नाही तर अन्न नंतर शरीराला खाऊन टाकते. माणसाची ब्रह्मजिज्ञासा सतत जागृत असेल, सद्हेतू लक्षात असेल तर मग अन्नानेच आपल्याला खाऊन टाकण्याची भीती राहणार नाही, हे या चित्रातून सूचित होते.

आपले शरीर हे वृक्षासारखे असून त्यावर जिवात्मा व शिवात्मा हे दोन पक्षी राहतात, असेही एक रूपक मुण्डकोपनिषदामध्ये येते. त्यावर ‘जिवात्मा शिवात्मा’ हे चित्र बेतलेले आहे. यातील जिवात्मा सारी भौतिक सुखे अनुभवतो. शिवात्मा फक्त पाहत असतो. एक क्षण असा येतो की, भौतिक सुख कमी करत तो अध्यात्माच्या दिशेने प्रवास सुरू करतो. पण तिथे सारे काही संपत नाही. कारण तिथेही आध्यात्मिक आनंदात तो अडकतो. मग तेही मागे पडते. त्याचा आनंद-दु:ख याच्याशी काहीच संबंध राहत नाही; अखेरीस त्या अवस्थेनंतर जिवात्मा व शिवात्म्याची भेट होते, असे हे सूचक चित्र आहे. इथे मानवी जीवन उध्र्वमूल: अध: शाखा असे सुचविताना पाश्र्वभूमीस वरच्या बाजूस असलेली झाडाची मुळे दिसतात. आध्यात्मिक आनंदातील अडकणे जिवात्मा या पक्ष्याने तोंडात पकडून ठेवलेल्या जपमाळेच्या रूपाने कामत प्रतीकात्मकतेने दाखवतात.

सत्यकाम जाबालीची कथा छांदोग्योपनिषदाशी संबंधित आहे. याही पूर्वी कामत यांच्या एका चित्रात या कथेचा संदर्भ येऊन गेला आहे. दोनशेच्या एक हजार गाई झाल्या की मग शिकवेन, असे त्याला गौतम मुनींनी सांगितलेले असते. यापूर्वीच्या चित्रात हजारावे वासरू बागडत येते त्या वेळेस सत्यकाम मुनींच्या पाया पडताना पाहायला मिळाला होता. पण ‘उपनिषत्सु्’मध्ये ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्तीची कवाडे खुली होणार त्या वासराच्याच पाया पडताना दिसतो. यातील ऋणनिर्देश, उपकृततेचा भाव महत्त्वाचा होता, असे कामत सांगतात.

श्वेताश्वरोपनिषदात ध्यान कसे करावे, त्याचे टप्पे काय व कसे याचा उल्लेख येतो. या मालिकेतील एक चित्र हे त्या कथेवर आणि कामत यांच्या विपश्यनेदरम्यानच्या आत्मानुभूतीवर अवलंबून आहे. ध्यानाच्या काळात अनेकविध दृश्यानुभव नजरेसमोर तरळतात. तेच या चित्रात पाहायला मिळतात. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये स्त्रियांनाही तेवढेच महत्त्व होते. त्यामुळे गार्गी-याज्ञवल्क, कपिलमुनी व त्यांची आई देवाहुती माता, अगस्त्य आणि लोपामुद्रा असे विषयही या चित्रांमध्ये येतात. अगस्त्य मुनींनाही सुनावण्याचे धाडस त्यांची पत्नी लोपामुद्रा दाखवते. हा महत्त्वाचा क्षण कामत यांनी चित्रबद्ध केला आहे. ज्ञानदेव आणि निवृत्तिनाथ यांच्यातील संवाद हाही एका अर्थाने उपनिषत्सुच आहे. म्हणून पसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानदेव व पसाच्या खांबाच्या रूपाने आशीर्वचन त्यांच्यावर धरणारे निवृत्तिनाथ असेही एक चित्र कामत यांनी साकारले आहे. केनोपनिषदामध्ये असुरांवरील विजयानंतर अग्निदेव, वायुदेव यांना झालेल्या अहंकाराचे हरण करणारा प्रसंग आणि इंद्र-माया संवाद येतो. त्यावरील चित्रात मध्यभागी एक काडी दोन हातांमध्ये असलेला यक्ष, एका बाजूस वरुण व पलीकडे अग्नी असे चित्रण आहे. दोघेही आपापली शक्ती पूर्णपणे वापरतात, मात्र काडी ना जागची हलते; ना जळून खाक होते. हा अनुभव ते देवेंद्रांकडे कथन करतात, तेव्हा कोण आहे हा, हे पाहण्यासाठी इंद्र प्रत्यक्ष येतो त्या वेळेस यक्ष अंतर्धान पावतो व तिथे माया येते. त्या वेळेस देवांच्या अहंकाराची चर्चा होते, असा हा खूप काही शिकवून जाणारा प्रसंग. यामध्ये कामत यांनी चितारलेला यक्ष दृश्यरूप लाभलेला आजवरचा सर्वात सुंदर यक्ष ठरावा. कारण यक्षांचे चित्रण हे बव्हंशी पोट सुटलेला, बुटका अशाच प्रकारचे पाहायला मिळते. मात्र इथे या निमित्ताने निसर्गरूप असलेला, प्रेमळ व सुंदर यक्ष पाहायला मिळेल. याशिवाय निष्काम कर्मयोगी हो, भवति भिक्षां देही, कल्याणमस्तु, शिवोहम शिवोहम, संचिताचि काष्टे अíपतो अशी काही लहान आकारांतील चित्रेही आहेत. तर गेल्या खेपेस केवळ भगवंतांचे मोठे पाऊल आणि अज्ञानाच्या अंडय़ातून बाहेर आलेला अर्जुन असे एक चित्र प्रदर्शनात होते. या खेपेस कुरुक्षेत्रावरील गीतानिरूपणानंतर कृष्णाच्या पावलांवर मुकुट ठेवून तोच अर्जुन सारे काही अर्पण करता झालेला दिसतो. या प्रदर्शनाच्या अखेरीस नेति नेति हे स्वच्छ पांढऱ्या कॅनव्हॉसवर पांढऱ्याच रंगात चितारलेले चित्रे दिसेल. चुरगळलेले पांढरे कागद त्यावर दिसतील.. हे काहीसे अमूर्ताच्या दिशेने जाणारे असे हे चित्र आहे.

या सर्व चित्रांमध्ये एक लहानसे कासव सर्वत्र पाहायला मिळते. हे स्व-अस्तित्व आहे. कासवच का तर त्याची बैठक पक्की आहे. ते एकमेव आहे ज्याला जाणिवेनंतर सारे अवयव आत ओढून घेत टणक कवचात जाता येते, असे सूचन कामत करतात. कलावंत विचारी असेल तर कोणताही, कदाचित दृश्यात्म नसलेला विषयही तो हाती घेऊन साकारू शकतो हेच यातून प्रतित होते. मनुष्याकृतिप्रधान चित्रण किंवा यथार्थवादी अशी लेबले लावत कामत यांची हेटाळणीही कलाक्षेत्रात अनेकदा झाली, पण ते आपल्या निश्चित मार्गावर संथपणे त्या कासवासारखे पुढे सरकताहेत. हे दृश्योपनिषद अवश्य अनुभवा. कारण अनुभव लेबले लावून कधीच टाळायचा नसतो!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab

First Published on February 2, 2018 1:04 am

Web Title: painter vasudev kamat