आठव कसला याला महत्त्व नाही, पण तो जागृत करण्याची क्षमता कलाकृतीमध्ये आहे हे महत्त्वाचे आहे.

आपण कुठून आलो, कुठे चाललो आहोत याचा अनुक्रमे शोध आणि अदमास घ्यायला आवडणे हे माणूस असल्याचे लक्षण असते. अलीकडचे भवितव्यतज्ज्ञ म्हणतात की, तुम्ही कुठवर जाणार याचे भाकीत तुमच्या डीएनएमध्येच दडलेले असते, कारण डीएनएच्या माध्यमातून पिढय़ान्पिढय़ांमधून गुणावगुण तुमच्याकडे संक्रमित होत पोहोचतात. यामध्ये गेल्या अनेक पिढय़ांमध्ये घडून गेलेल्या अनेक गोष्टींचाही समावेश असतो. एकूणच मानवी इतिहासाबद्दल बोलायचे तर मानवी इतिहास हा अशा प्रकारे शरीरांतर्गत संक्रमण आणि बाह्यार्थाने स्थलांतरांचा इतिहास आहे. हे स्थलांतरण कधी आपल्या घराण्याचे असते, कधी समाजाचे, तर कधी एखाद्या कुटुंबाचे. त्याच्याशी संबंधित घटना, कथा-दंतकथा यांची चर्चा मग अनेक पिढय़ांपर्यंत होतच राहते. ती चर्चा मनामध्ये मूळ धरते, कधी त्याचे ओरखडेही मनावर उमटतात, तर कधी त्याची प्रतिबिंबं अस्वस्थ करतात, मानवी मनाला. त्यातही ते मन एखाद्या कलावंताचे असेल तर त्याचे पडसाद कलाकृतीमध्ये उमटताना दिसतात. चित्रकर्ती शिल्पा निकम यांच्या कलाकृतींना ‘उमटतात’ हाच शब्दप्रयोग चपखल लागू होतो.

निकम यांचे घराणे गुजरातेतील जाफराबादचे, व्यापारात गुंतलेले. कापड आणि इतरही अनेक वस्तूंचा व्यापार. त्यासाठी जलमार्गाचा वापर. साहजिकच व्यापारी नौकाही मालकीच्या. यातील दोन नौकांना अपघाती जलसमाधी मिळाली आणि मग वणवण माथी आली. त्यानंतर त्यांचे पूर्वज मुंबईत स्थलांतरित झाले. आज भाऊ कापड व्यवसायात व्यवस्थित उभा असला तरी त्यासाठी बराच मोठा कालखंड जावा लागला. शिवाय कुटुंबाला बरेच काही सहनही करावे लागले. त्याचे अनेक ओरखडे कुटुंबीयांच्या मनावर उमटले आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी बालपणापासून शिल्पाला ऐकायला मिळाल्या. सातत्याने त्याची होणारी चर्चा बालपणावरही खूप परिणाम करून गेली. दीर्घकाळ त्यावर विचार झाला आणि अखेरीस आता तिच्या चित्रभाषेच्या माध्यमातून ती व्यक्त झाली आहे. तिने अलीकडेच साकारलेल्या या चित्रकृतींचे प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात मुंबईतील जहांगीरच्या श्रोतृगार दालनात पार पडले. यामध्ये चित्रे आणि भाजक्या मातीच्या तव्यावर केलेले चित्रण यांचा समावेश होता.

दर्शनी अमूर्त वाटणारी ही चित्रे जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यामध्ये अनेक ओळखीचे रूपाकार भासमान होत डोकावत जातात. कापडाचा पोत, त्याच्या जुनाटपणाची छाप, त्यावर सुरुवातीस भासमान होणारे भौमितिक आकार नंतर परिचयाचे वाटू लागतात. कधी नौका, त्यांचे शीड, तर कधी त्यावर फडकणारे झेंडे दिसू लागतात. कधी किनाऱ्यावरील चित्रण ओझरते दिसते. तर याच किनाऱ्यावर बांबूच्या रचनांवर सुकणारी मासळी दिसते. हळूहळू या सर्व छापांमधून एक वेगळेच चित्र नजरेसमोर साकार होते.

प्रदर्शनातील सर्वाधिक वेधक ठरल्या त्या गोलाकारातील भाजक्या मातीच्या तव्यांवरील कलाकृती. तव्याच्या वक्राकार भागावर कोरलेले आकार, कधी त्यात व्यापाराच्या चोपडीवरील ताळेबंद जणूकाही आयुष्याच्या ताळेबंदासारखा मांडलेला, तर कधी काही मंत्राक्षरे. ज्यामध्ये धार्मिकता नाही, पण नाद मात्र नक्कीच आहे जाणवावा असा.

अमूर्त चित्रणामध्ये एक गंमत असते. चित्रकार तुम्हाला थेट काहीच सांगत नाही. अर्थनिर्णयन प्रक्रिया रसिकांवर अवलंबून असते. मग त्यासाठी यातील भासमान होणाऱ्या गोष्टी मदत करतात. प्रत्येकाला सारे एकसमानच भासमान होईल, असेही नसते. कारण प्रत्येक जण आपल्या अनुभव आणि आकलनानुसार कलाकृती समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कलाकृतीचे प्रत्येकाचे आकलन वेगळे असते आणि तसे असण्यास काहीच हरकतही नसते. कधी तरी कुणी कलावंताशी संवाद साधून त्याची किंवा तिची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्नही करते, पण तरीही आकलनासाठी त्या प्रतलावर रसिकाचे अवकाश राहातेच. शिल्पाच्या मनावर बालपणापासून कोरलेल्या गोष्टी या कलाकृतींतून व्यक्त झाल्या. त्या पाहताना, अनुभवताना एखाद्याला त्याच्या घराण्याशी संबंधित असाच भूतकाळ आठवूही शकतो किंवा मग त्या कलाकृतींच्या रंगांमधून आलेली भाववृत्ती एखाद्या वेगळ्या चांगल्या किंवा दु:खद घटनेची आठवणही करून देऊ शकते. आठव कसला याला महत्त्व नाही, पण तो जागृत करण्याची क्षमता कलाकृतीमध्ये आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या संवेदनक्षम कलाकृतीसाठी व त्यासाठी घेतलेल्या अपार मेहनतीसाठी शिल्पाचे कौतुक करणे साहजिक ठरते. तिची कलाकृती गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात आता एका परिपक्व वळणावर उभी आहे.

विनायक परब vinayak.parab@expressindia.com 

@vinayakparab