हस्तसामुद्रिक ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे.

प्रत्येकालाच आपल्या नशिबात पुढे काय होणार हे जाणून घेण्याची इच्छा, उत्सुकता असते. ही उत्सुकताच आपल्याला भविष्य जाणून घेण्याच्या निरनिराळ्या पद्धतींकडे घेऊन जाते. त्याचमधील हस्तसामुद्रिकशास्त्र ही एक महत्त्वाची पद्धती आहे. विष्णूपुराणानुसार हे शास्त्र लक्ष्मीने विष्णूस सांगितले व ते समुद्र देवतेने ऐकून त्याचा प्रचार केला असे म्हटले जाते. त्यामुळे त्यास हस्तमुद्रिका शास्त्र म्हणतात.

कुंडलीशास्त्र किंवा अंकशास्त्र यावर जसा नवग्रहांचा प्रभाव असतो अगदी तसेच हस्तरेषांवरही नवग्रहांचा प्रभाव असतो. परंतु त्याचबरोबर हात पाहत असताना हाताचा आकार, त्वचा, रंग, हाताचा लवचीकपणा, बोटे, अंगठा, नखे, शुR कंकण, शनीकंकण, गुरूकंकण, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा, भाग्यरेषा, रवीरेषा, बुधरेषा, मंगळरेषा, अंतरज्ञानरेषा, विवाहरेषा, संतानरेषा, वासनारेषा, प्रवासरेषा आणि मणिबंधरेषा या सर्वाचा अभ्यास करावा लागतो.

हातावरील उठावदारपणे दिसणाऱ्या तीन रेषा म्हणजे मस्तकरेषा, आयुष्यरेषा, हृदयरेषा.

मस्तकरेषा :

तळहातावरील मस्तकरेषा निर्दोष, सलग असायला हवी. मस्तकरेषा जितकी निर्दोष आणि सरळ तितके त्या व्यक्तीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभलेले असते. स्वतंत्र विचार करण्याची क्षमताच मनुष्यास श्रीमंती बहाल करते. अशा व्यक्तीवर जास्त संकटे येत नाहीत. सर्वसामान्यपणे जीवनामध्ये संघर्ष तर करावाच लागतो, परंतु यांनी गंभीरपणे केलेले प्रयत्न सहसा वाया जात नाहीत. अशा व्यक्ती स्वबळावर निश्चितपणे श्रीमंत होऊ  शकतात.

हृदयरेषा :

तर्जनी क्षेत्रापासून बुध क्षेत्रापर्यंत जाणाऱ्या रेषेला हृदयरेषा असे म्हणतात. या रेषेवरून मानवी जीवनातील प्रेमप्राप्ती, माया व ममतेबाबतचे भाकीत केले जाते.

हृदयरेषा बुध उंचवटय़ापासून गुरू उंचवटय़ापर्यंत जात असेल तर अशा व्यक्तीत आत्मसन्मानाची प्रखर भावना आढळून येते, तसेच या व्यक्ती अत्यंत महत्त्वाकांक्षीही असतात. हृदयरेषा मध्यमा व तर्जनीदरम्यान जाऊन संपत असेल तर त्या व्यक्तीस प्रेमाच्या जीवनात स्थैर्य लाभते. तुटक हृदयरेषा हातावर असलेल्या व्यक्ती निराशावादी असतात.

आयुष्यरेषा :

अखंड व स्पष्ट आयुष्यरेषा तर्जनीच्या तळापर्यंत गेलेली असेल तर त्या व्यक्तीला १०८ वर्षांचे आयुष्य लाभते. हाताच्या डाव्या भागातून निघालेली एखादी वाकडी रेषा आयुष्यरेषेला छेदत असेल तर त्या व्यक्तीला पाण्यापासून धोका असतो. वाकडी रेषा आयुष्यरेषेला छेदून गेलेली असेल तर त्या व्यक्तीला अग्नी, विद्युत सयंत्र किंवा सापापासून धोका असतो. हाताच्या डाव्या बाजूने निघालेली सरळ रेषा आयुष्यरेषेला छेदत असेल तर त्या व्यक्तीला शस्त्रापासून धोका असतो. आयुष्यरेषेच्या शेवटी एखादी वाकडी रेषा असेल तर त्या व्यक्तीला भरधाव जाणाऱ्या दुचाकी वाहनापासून धोका असतो. आयुष्यरेषेच्या शेवटी काळपट रंगाची वाकडी रेषा असेल तर एखाद्या मूर्ख व्यक्तीमुळे अशा व्यक्तीला धोका निर्माण होतो. आयुष्यरेषेच्या शेवटी लालसर रंगाची रेषा असेल तर त्या व्यक्तीला रक्ताचा विकार उद्भवण्याचा धोका असतो. आयुष्यरेषेवर ज्या ठिकाणी लाल तीळ असेल तर आयुष्याच्या त्या वर्षांत गंभीर रक्तविकार उद्भवण्याचा धोका असतो. आयुष्यरेषेच्या मध्यभागी दोन उभ्या रेषा असतील तर त्या व्यक्तीला उंचावरून पडण्याचा धोका असतो.

आयुष्यरेषा जितकी लांब तितके आयुष्य असा समज आहे; परंतु ते अर्धसत्यच आहे. आयुष्यरेषा किती लांब आहे यापेक्षा ती किती गोलाकार आहे यावर तिची फळे अवलंबून असतात. गोलाकार नसलेल्या किंवा एकदम सरळ आयुष्यरेषा कमी फलदायी समजल्या जातात.

आयुष्यरेषेबद्दल हे सर्व सांगितले आहे, आयुष्याचे मोजमाप सांगितलेले आहे, हे सर्व आपण बदलू शकत नाही का? या शरीराची, आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आपले आरोग्य आणि आयुष्य अबाधित राहणारच ना. खरे सांगायचे तर हातावरील प्रत्येक रेषेचे एक वेगळे भाकीत आहे. या रेषा हातावर कशा प्रकारे असतील तर त्याचे काय भविष्य असेल हे आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करू या. या तिन्ही रेषा चांगल्या असतील तर त्याचे फळ चांगले मिळणार आणि जर वाईट असतील तर चांगले फळ मिळणार नाही.

अशा वेळी आपण काय केले पाहिजे? हे वाईटच आहे हे नशिबाला दोष देण्यापेक्षा, आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. थोडक्यात काय, तर आपल्यातील दुर्गुणांना सोडून चांगल्या गुणांना वाव दिला पाहिजे.

धनरेषा (भाग्यरेषा) :

धनरेषेचा उगम शत्रुक्षेत्रात झाला असेल तर त्या व्यक्तीचा भाग्योदय वयाच्या ३५व्या वर्षी होतो.

चंद्र उंचवटय़ावरील निघालेली एखादी रेषा धनरेषेला जाऊन मिळत असेल तर त्या व्यक्तीला नोकरीबरोबरच व्यवसायामधूनही चांगला आर्थिक लाभ होतो.

धनरेषेचा उगम आयुष्यरेषेबरोबर झाला असेल तर वडिलोपार्जित व्यवसाय केल्यामुळेच त्या व्यक्तीचा भाग्योदय होतो.

धनरेषेवर कोठेही त्रिकोणाचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला समाजामध्ये चांगली प्रसिद्धी व लोकप्रियता लाभते.

मणिबंधापासून निघालेली धनरेषा अंगठय़ाच्या तळाशी जाऊन संपत असेल तर अशा व्यक्तीला राजसुखाची प्राप्ती होते, म्हणजे त्या व्यक्तीला सर्वोच्चपद प्राप्त होते, सर्व प्रकारची भौतिक सुखे उपभोगण्यास मिळतात.

मणिबंधातून निघालेली धनरेषा तर्जनीच्या तळाशी जाऊन संपत असेल तर अशी व्यक्ती राजकारणात मोठे कर्तृत्व गाजवू शकते. मंत्रिपद किंवा त्याहूनही मोठे पद अशा व्यक्तीला लाभते.

मणिबंधातून निघून मध्यमेकडे गेलेली धनरेषा प्रसिद्धी व कीर्ती दर्शविते. अशा व्यक्तीला तिच्या क्षेत्रात मोठे मानसन्मान, प्रसिद्धी व अफाट कीर्ती लाभते. समाजातही हे लोक लोकप्रिय असतात.

मणिबंधातून निघालेली धनरेषा अनामिकेकडे जात असेल तर अशी व्यक्ती श्रीमंत किंवा गर्भश्रीमंत असतेच, पण समाजाचे नेतृत्व करण्याची संधीही तिला मिळते. समाजाचा चांगला पाठिंबा यांना कायमस्वरूपी मिळत राहतो.

मणिबंधापासून निघालेली धनरेषा करंगळीकडे जात असेल तर अशा व्यक्तीला यश व प्रतिष्ठा भरभरून लाभते. सर्व प्रकारची प्रापंचिक व भौतिक सुखे या व्यक्तीच्या वाटय़ाला येतात. त्यामुळे साहजिकच ही व्यक्ती समाधानी आणि उत्साही दिसते.

राजयोग हा योग हातावर असलेली व्यक्ती सुंदर आणि आकर्षक असते. अशा व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेले असते. तिला आर्थिक स्थैर्य चांगले मिळते. अशा व्यक्तीने अगदी किरकोळ पदावरून नोकरीस सुरुवात केली तरी कष्ट, जिद्द आणि धडाडीच्या बळावर सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते. पण हा राजयोग सहज मिळतो का? तर त्याच्याबरोबर जिद्द, कष्ट, धडाडी ही आलीच, त्याशिवाय का मिळते ते? म्हणजे सरतेशेवटी हातावरील धनरेषा कितीही चांगली असेल तरी कष्टाशिवाय फळ नाही, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे कधी होत नाही.

तळहातावर शनी आणि शुक्र उंचवटा अत्यंत प्रभावी असल्यास आणि धनरेषेचा उगम शुक्र उंचवटय़ावरून होत असेल आणि ती शनी उंचवटय़ाच्या मध्यबिंदूपर्यंत पोहोचत असल्यास राजयोग निर्माण होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र ऐश्वर्याचा आणि शनी कष्टाचा, कर्माचा कारक आहे आणि हे दोघे परममित्र आहेत. त्यामुळे राग, अहंकार सोडून कष्टाला, कर्माला प्राधान्य दिले तरच तुम्हाला या राजयोगाचे फळ मिळणार.

शुक्र उंचवटय़ावरून निघालेली रेषा बुध उंचवटय़ाकडे जात असेल तर तिलाही धनरेषा म्हणतात व ही रेषा व्यक्तीस श्रीमंत बनवण्यास निश्चितपणे मदत करते.

चंद्र उंचवटय़ावरून उगम पावलेली धनरेषा सरळ आणि स्पष्ट असून गुरू उंचवटय़ाकडे गेलेली असेल तर अशी व्यक्ती धनधान्याच्या बाबतीत नशीबवान ठरते.

बुध उंचवटय़ावरून निघालेली धनरेषा कोठेही न तुटता अखंडपणे शनी उंचवटय़ावर जात असेल तर राजयोग बनतो. चंद्ररेषा व धनरेषा शनी उंचवटय़ावर जात असेल तर राजयोग बनतो.

मणिबंधापासून निघून थेट शनी उंचवटय़ावर जाणारी धनरेषा श्रेष्ठ मानण्यात आलेली आहे, त्यामुळे श्रीमंतीबरोबर शुद्ध चारित्र्य लाभते. गुरू व बुध उंचवटय़ाकडे जाणारी धनरेषा त्या ग्रहांच्या शुभ फलात वाढ करते.

साम्राज्यपतीयोग म्हणजे निव्वळ श्रीमंत बनविणारा योग नव्हे. या योगाच्या प्रभावाने माणूस गर्भश्रीमंत बनतोच, पण त्याचबरोबर त्याला जागतिक पातळीवर लोकप्रियता, प्रसिद्धी व नावलौकिकही मिळू शकतो. दोन्ही हातांवरील रेषांनी मणिबंधावर माशाची आकृती तयार झाली असेल, नंतर त्या रेषा शनी उंचवटय़ावर गेलेल्या असतील आणि रवीरेषा लांब असून बुध उंचवटय़ाला स्पर्श केलेली असेल, तसेच हातावर रवी, शनी, शुक्र हे उंचवटे प्रभावी असतील तर साम्राज्यपतीयोग बनतो. हातावर असा योग असेल तर अशा व्यक्तीस सामाजिक, प्रापंचिक, कौटुंबिक, भौतिक अशी सुखे मिळतात. पण एक लक्षात ठेवा, या योगामध्ये तळहाताचा रंग लालसर असावा आणि दोन्ही हातांवर स्पष्ट शनीरेषा व रवीरेषा असावी, त्याचबरोबर रवी, शुक्र व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी उंचवटा प्रभावी असावा.

हस्तसामुद्रिकशास्त्रामध्ये ब्रह्मांडयोग नावाचा एक योग आहे. हा योग हातावर असलेली व्यक्ती आर्थिकदृष्टय़ा संपन्न असून त्या व्यक्तीला राजेशाही थाटाचे ऐशोरामी जीवन लाभते. हा योग हातावर असेल तर तो हात आदर्श प्रकारचा असतो. चंद्र व शुक्र उंचवटे दोन लांब रेषांनी जोडलेले असतील तर हातावर ब्रह्मांडयोग निर्माण होतो. अंगठा लांब, मागच्या बाजूला झुकलेला असेल व शुक्र उंचवटा प्रभावी असेल तर ब्रह्मांडयोग बनतो. चंद्र उंचवटय़ावरून दोन रेषा निघून त्यांपैकी एक रेषा शुक्र उंचवटय़ावर व दुसरी बुध उंचवटय़ावर जात असेल आणि त्याचबरोबर हातावर रवीरेषा असेल तर ब्रह्मांडयोग निर्माण होतो. मध्यमेच्या म्हणजे शनी बोटाच्या दुसऱ्या पेरावर तीन किंवा चार उभ्या रेषा असतील तर ब्रह्मांडयोग बनतो.

चंद्र, गुरू, शुक्र हे शुभ ग्रह आहेत. हे ग्रह शुभ फल देणारच, परंतु शनी ग्रहाला पाप ग्रह मानतात. तरीसुद्धा प्रत्येक योग हा शनीपर्यंत जाऊन बनलेला आहे. म्हणूनच की काय, शनी हा पापग्रह नसून तुमच्या जीवनाला घडवून खरा अर्थ लावणारा तुमचा गुरू आहे. त्याची फक्त तत्त्वे समजून घ्या म्हणजे त्याच्याबद्दलचे गैसमज दूर होतील. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. ब्रह्मांडयोग सांगत असताना अंगठा मागच्या बाजूस झुकलेला असावा असे सांगितले आहे. अंगठा मागच्या बाजूस झुकणे म्हणजे ती व्यक्ती नम्र व लीन आहे असे समजले जाते. म्हणजे थोडक्यात काय, सहनशीलता, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची क्षमता आणि नम्रता असेल तरच हे सगळे योग आपल्या नशिबात आहेत.

रवीरेषा :

तळहातावर रवीरेषा असणे हस्तमुद्रिकाशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. हाताच्या अनामिकेखाली रवी उंचवटा असतो. या रवी उंचवटय़ावर असणाऱ्या रेषेला रवीरेषा म्हणतात. रवीरेषा ही यश, प्रसिद्धी व लोकप्रियतेचे प्रतीक आहे. हातावर धनरेषा व आयुष्यरेषा चांगली असेल तर त्या व्यक्तीस चांगले यश मिळते, परंतु रवीरेषा नसेल तर प्रसिद्धी व लोकप्रियता मात्र मिळणार नाही. सेलिब्रिटी व्यक्तींच्या हातावर हमखास चांगली रवीरेषा आढळून येते.

रवीरेषेबरोबरच अनामिकाही लांब, सुडौल, निर्दोष असल्यास अशी व्यक्ती प्रसंगी धोके पत्करूनही यश खेचून आणते.

रवीरेषा आयुष्यरेषेवर उगम पावली असेल तर अशी व्यक्ती स्वबळावरच यशस्वी कारकीर्द घडवते. मदतीच्या कुबडय़ांची तिला गरज लागत नाही.

हृदयरेषेच्या शाखेच्या स्वरूपात रवीरेषा उगम पावली तर त्या व्यक्तीला तिचे लग्न शुभ आणि लाभदायक ठरते. लग्नानंतर झपाटय़ाने प्रगती होत जाते.

रवीरेषा शुक्र उंचवटय़ावरून निघाली असेल तर बालपण सुखात, आनंदात जाते.

निर्दोष रवीरेषेबरोबरच प्रभावी मंगळ उंचवटा हातावर असेल तर पोलीस, लष्कर, क्रीडा इत्यादी क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवता येते.

दुहेरी रवीरेषा एकाच वेळी अनेक क्षेत्रांत यश मिळवून देऊ  शकते.

तुटक, अस्पष्ट रवीरेषा सामान्य यश दर्शविते. अशा व्यक्तीला अत्यंत मर्यादित यशावर समाधान मानावे लागते.

रवीरेषा म्हणण्यापेक्षा रवी उंचवटय़ावर असणाऱ्या उभ्या व तिरक्या रेषेमुळे व्यक्ती राजकारणात ओढली जाते. अशी व्यक्ती राजकारणात गेली तर तिला यश तर येत नाही; परंतु हितशत्रू खूप होतात. फसवणुकीच्या प्रकरणामध्ये ती अडकण्याची शक्यता असते. अशा व्यक्तीने कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तरी तिने आपल्या कामाशी मतलब ठेवून राहावे. वर्चस्व गाजवण्यास जाऊ  नये व कोणास सल्ला द्यायला जाऊ  नये. त्यांच्या जवळची व्यक्ती त्यांची शत्रू बनण्याची शक्यता असते.

विवाहरेषा :

विवाह ही मनुष्याच्या जीवनातली  महत्त्वाची सांस्कृतिक आणि सामाजिक घटना. विवाह त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो. त्यामुळेच वैवाहिक जीवन सुखी, समाधानी होईल का, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हस्तशास्त्रामध्ये विवाहरेषा या प्रश्नाचे उत्तर देते.

विवाहरेषा हृदयरेषेजवळ बुध उंचवटय़ावर असते. हृदयरेषेपासून निघालेली विवाहरेषा लहान आणि सरळ असेल तर ती उत्तम वैवाहिक जीवन मिळवून देते. विवाहरेषा हृदयरेषेच्या जितकी जवळ तितके लवकर लग्न होते. एकाच हातावर दोन-तीन किंवा चारही विवाहरेषा असू शकतात, परंतु त्यातील सर्वाधिक स्पष्ट आणि निर्दोष रेषाच विवाहाचे द्योतक असते. इतर अस्पष्ट रेषा अपयशी प्रेमसंबंध दर्शवतात.

विवाहरेषा लांब असून गुरू उंचवटा प्रभावी असेल आणि त्यावर क्रॉस चिन्ह असेल तर पती-पत्नीमध्ये प्रेमपूर्वक संबंध राहतात.

विवाहरेषेला शेवटी दोन फाटे फुटलेले असल्यास जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद राहतात.

विवाहरेषा हृदयरेषेला छेडून आयुष्यरेषेला मिळत असेल तर अशुभ मानवी, अशा जोडप्यांदरम्यान सतत भांडणे होत राहतात.

विवाहरेषेवर द्वीपचिन्ह असल्यास ती व्यक्ती व्यभिचारी असून वैवाहिक जोडीदाराबरोबर सातत्याने खटके उडत राहतात.

विवाहरेषा निर्दोष असून चंद्र उंचवटय़ावरून निघालेली एखादी रेषा धनरेषेला जाऊन मिळत असेल तर त्या व्यक्तीला श्रीमंत वैवाहिक जोडीदार मिळतो.

विवाहरेषा करंगळीच्या जास्त जवळ असेल तर विवाह उशिरा होतो. तसेच विवाहरेषा निर्दोष, अखंड ठाशीव व आखीव रेखीव असल्यास वैवाहिक जीवन निश्चितपणे सुखी समाधानी बनते. तसेच विवाहरेषेला समांतर असलेल्या छोटय़ा रेषा अनैतिक संबंध किंवा अनैतिक संबंधाची तीव्र भावना दर्शवतात.

हातावर विवाहरेषा नसेल तरी त्या व्यक्तीस लग्न करण्याचा योग येतो, परंतु त्या पती-पत्नी दरम्यानचे प्रेम दीर्घकाळ दृढ राहत नाही.

दोन्ही हातावर तुटलेली विवाह रेषा असेल तर मतभेद विकोपाला जाऊन पती—पत्नीला एकमेकापासून विभक्त व्हावे लागते.

अपत्यरेषा :

विवाहरेषेवरील उभ्या रेषांना अपत्यरेषा असे म्हणतात. शुR  उंचवटय़ावर अंगठय़ाखाली असलेल्या सरळ रेषांनाही काहीजण अपत्यरेषा मानतात.

पातळ लांब व स्पष्ट अपत्यरेषा पुत्र संतती दाखवतात. आखूड व पुसट अपत्यरेषा कन्या संतती दाखवतात.

तुटक पुसट अपत्यरेषा अशुभ मानल्या जातात.

स्पष्ट उभी अपत्यरेषा किंवा पातळ उभी अपत्यरेषा मधोमध तुटलेली असणे अत्यंत अशुभ मानले जाते.

हातावर जितक्या ठळक अपत्यरेषा असतील तितकी अपत्ये होतात, असे शास्त्र मानते.

अशुभ फले :

तळहातावर मुख्य रेषेवर तीळ, दीपचिन्ह किंवा डाग असणे अशुभ आणि नुकसानकारक समजले गेले आहे. प्रगतीत अडथळे येणे, फसवणूक, विश्वासघात होणे, गंभीर आजार उद्भवणे, डाव्या तळहातावरील अशा प्रकारचे तीळ जास्त अशुभ फळे मिळवून देतात.

शुभ फले :

बोटांवर आढळणारे शंख व चक्र त्या व्यक्तीचा दृढनिश्चय, प्रखर इच्छाशक्ती दर्शवतात. हातावरील मत्स्य, स्वस्तिक, कमळ, त्रिशूल इत्यादी चिन्हे शुभ फळे मिळवून देतात.

हातावर धनरेषा नसेल परंतु हात व बोटे सुडौल असतील व हातावरील इतर रेषा निर्दोष असतील तरी अशी व्यक्ती प्रयत्नांती निश्चितपणे श्रीमंत बनू शकते.

गुरू उंचवटय़ावर ताऱ्याचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला राजकारणात किंवा स्वत:च्या कार्यक्षेत्रात उच्च, सर्वोच्च पद मिळण्याची शक्यता निर्माण होते.

डॅशसारखी तुटक रेषा कामात यश मिळवून देते.

एकापेक्षा जास्त रेषा भाग्योदय, नवीन कामांकडे ओढा दाखवतात.

एकमेकांना छेदणाऱ्या रेषा : कनिष्ठ प्रतीचे विचार, समस्या, अडचणी

ठिपके : सामाजिक प्रतिष्ठेत कमतरता.

क्रॉस : वैवाहिक जीवनात समाधानी, घरात मंगळ कार्य यशस्वी.

नक्षत्रचिन्ह : उच्च महत्त्वाकांक्षांची पूर्तता.

वर्तुळ : कल्पनाशक्ती आणि विधायक दृष्टिकोनाचा समन्वय.

जाळी : अंधश्रद्धा, अशुभ घटना, हानी.

गुरूचे चिन्ह : गुरूशी संबंधित गुणांचा विकास.

शनीचे चिन्ह : तंत्र-मंत्र, गूढविद्येत पारंगतता.

सूर्याचे चिन्ह : कलांमध्ये रुची.

बुधाचे चिन्ह : प्रशासकी कामांमध्ये कौशल्य.

शुक्राचे चिन्ह : महिलेशी असलेल्या नात्यामुळे लाभ होण्याची शक्यता.

रवी उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यात किमान एकदा तरी बदनामी सोसावी लागते.

चंद्र उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असल्यास पाण्याशी संबंधित रोगामुळे किंवा पाण्यात बुडून मृत्यू होण्याचा धोका असतो.

मंगळ उंचवटय़ावरील क्रॉस चिन्ह त्या व्यक्तीला गजाआड करू शकते. अशी व्यक्ती आत्महत्या करण्याचीही शक्यता असते.

बुध उंचवटय़ावरील क्रॉस चिन्ह असलेली व्यक्ती लुटालूट, फसवणूक, विश्वासघात अशा वाममार्गाने धन कमावण्याचा प्रयत्न करते.

गुरू उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असल्यास सुशिक्षित पत्नी मिळते. तसेच सासरच्या मंडळीकडूनही चांगले सहकार्य लाभते.

केतू उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असल्यास उमेदवारीच्या काळात खडतर संघर्ष करावा लागतो.

राहू उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असल्यास तरुणपण हालअपेष्टांत जाते.

प्लुटो उंचवटय़ावर क्रॉस चिन्ह असलेली व्यक्ती दुसऱ्याची हत्या करून नंतर आत्महत्या करण्याची दाट शक्यता असते.

प्रवासरेषेवर क्रॉस चिन्ह असल्यास प्रवासातच त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

आयुष्यरेषेवर क्रॉस चिन्ह असल्यास आयुष्याच्या त्या कालखंडात खडतर कष्ट करावे लागतात.

अपत्यरेषेवर क्रॉस चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला अपत्य होत नाही.

आयुष्यरेषेवर तीळ असल्यास त्या व्यक्तीस दीर्घकाळ वेदना देणारा रोग उद्भवतो.

मस्तकरेषेवर तीळ असता डोक्याला जखम, डोळ्याचे विकार किंवा अर्धशिशी उद्भवू शकते.

हृदयरेषेवरील तीळ अशुभ असून तो अपयश, प्रेमसंबंधात निराशा किंवा हृदयविकार दर्शवतो.

रवीरेषेवरील तीळ स्वत:च्याच चुकांमुळे हानी, अपयश, आर्थिक फटका इत्यादीची पूर्वसूचना देतो.

धनरेषेवरील तीळ दुर्दैव, कमनशिबीपणा व प्रिय व्यक्तीचा विरह दर्शवतो.

आरोग्यरेषेवरील तीळ असता प्रकृती वारंवार बिघडते, स्वभाव इर्षां करणारा बनतो.

विवाहरेषेवरील तीळ वैवाहिक सुखाची कमतरता, वैवाहिक समस्या दर्शवितो. लग्न झाले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही.

मंगळावरील तिळामुळे मनुष्य निष्क्रिय बनतो.

चंद्ररेषेवरील तीळ प्रगतीचा मार्ग अडवून धरतो, कितीही आणि कसेही प्रयत्न केले तरी कामे सातत्याने अपयशी ठरतात.

तळहात रुंद असून बोटांची टोके जाड असतील, अंगठा लहान व सर्व ग्रहांचे उंचवटे चपटे असतील तर अशा व्यक्तीला इंजिनीअिरग क्षेत्रात जास्त यश मिळू शकते.

बोटे लांबसडक व सुडौल असून शनी उंचवटा प्रभावी असेल, धनरेषा लांब व अखंड असेल आणि बुध उंचवटय़ावर तीन किंवा चार उभ्या रेषा असतील तर अशा व्यक्तीला विज्ञान क्षेत्रामध्ये सर्वाधिक यश मिळते.

अनामिका लांब असेल, रवीरेषा पूर्ण विकसित असेल, चंद्र व गुरू उंचवटे प्रभावी असतील तर अशी व्यक्ती शिल्पकार म्हणून उदंड यश मिळवू शकते.

तळहातावर रवी उंचवटा प्रमाणापेक्षा जास्त फुगीर म्हणजे जवळ जवळ बेढब असेल तर, तळहातावरील बहुतेक रेषा अस्पष्ट, तुटक व जाड असतील तर, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. त्या व्यक्तीला सामान्य नोकरीवर समाधान मानावे लागते.

हाताची बोटे लांबसडक व गाठीदार असतील तर अशा व्यक्तीस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होते.

मंगळ उंचवटा प्रभावी असून त्यावर शुभ चिन्हे असतील तर त्या व्यक्तीस पोलीस खाते किंवा लष्करात नोकरी लागते.

बुध उंचवटा प्रभावी असून त्यावर तीन उभ्या रेषा असतील तर त्या व्यक्तीस बौद्धिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो.

बुध उंचवटा प्रभावी असून करंगळीचे पहिले पेर लांब असेल व नखे छोटी असतील तर त्या व्यक्तीस कायद्याच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो.

बुधाच्या बोटाचे दुसरे पेर लांबसडक असेल तर त्या व्यक्तीस व्यापारातून मोठा लाभ मिळू शकतो.

बुध उंचवटय़ावर ताऱ्याचे चिन्ह असल्यास संशोधन क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो.

बुध उंचवटय़ावर त्रिकोण चिन्ह असल्यास त्या व्यक्तीस व्यापार किंवा राजकारणात मोठे यश मिळते.

गुरू उंचवटा प्रभावी असून तर्जनीचे पहिले पेर लांब असेल तर त्या व्यक्तीस राजकारण क्षेत्रात संधी उपलब्ध होते.

गुरू उंचवटा निर्दोष असेल व तर्जनीचे दुसरे पेर लांब असेल तर त्या व्यक्तीस व्यापारात मोठे यश मिळते.

करंगळी अनामिकेकडे झुकलेली असल्यास व्यापार व्यवसायात झपाटय़ाने भरभराट होते.

गुरू उंचवटय़ावर ताऱ्याचे चिन्ह असता नोकरीत नशीब उघडते व प्रतिष्ठा लाभते.

चंद्र उंचवटय़ावर त्रिकोण असल्यास त्या व्यक्तीला उच्च कोटीची कल्पनाशक्ती लाभलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वत:च्या कार्यक्षेत्रात मोठे यश, प्रसिद्धी व लोकप्रियता मिळते.

मंगळ उंचवटय़ावर त्रिकोणाचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला संरक्षणखात्यात उच्च पदाची नोकरी मिळते. संकटाच्या वेळीही सारासार विवेक न गमावता तारतम्य राखून योग्य तो निर्णय घेणे हे अशा व्यक्तींचे वैशिष्टय़ असते.

बुध उंचवटय़ावरील त्रिकोण यशस्वी व्यापारी किंवा यशस्वी शास्त्रज्ञ बनवतो.

गुरू उंचवटय़ावरील त्रिकोण असलेल्या व्यक्तींना गूढविद्यांमध्ये विशेष रस व प्रवीण्यही असू शकते.

शुक्र उंचवटय़ावरील त्रिकोण संगीतात प्रावीण्य मिळवून देतो, परंतु अशा व्यक्तीचे वैवाहिक जीवन मात्र सुखी-समाधानी होत नाही.

शनी उंचवटय़ावरील त्रिकोणामुळे व्यक्ती उदार मनाची बनते. अपघात, दुर्घाटनांपासून संरक्षण मिळते.

रवी उंचवटय़ावरील त्रिकोण असलेली व्यक्ती बुद्धिमान असते व तिला कलाकार म्हणूनही चांगले यश मिळू शकते.

गुन्हेगारी प्रवृत्ती :

रूच्या बोटाची लांबी कमी असेल तर अशा व्यक्तीमध्ये महत्त्वाकांक्षेची कमतरता आढळते व कालांतराने व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश करते.

रवीचे बोट प्रमाणापेक्षा जास्त लांब असेल तर अशी व्यक्ती अतिरेकी महत्त्वाकांक्षी असते. स्वत:च्या खुनाशी व विकृत भावनांना ती वेसण घालू शकत नाही, परिणामी गुन्हेगारी प्रवृत्ती मनात जन्म घेते.

शनी व रवीचे बोट एकमेकांकडे झुकलेले असेल आणि शुक्र व शनी तसेच रवी व बुध या बोटांत जास्त अंतर असेल तर अशी व्यक्ती गुन्हेगारी विचारांकडे सहजपणे आकर्षित होतात.

बुधाचे बोट म्हणजे करंगळी जास्त लांब असेल तर अशी व्यक्ती सारासार विचार न करता अविवेकी निर्णय घेणारी असते.

मस्तकरेषेवर यवचिन्ह असेल आणि ते यवचिन्ह हृदयरेषेवर संपत असेल तर अशी व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारी असते.

हृदयरेषा कोणत्याही बाजूला जास्त झुकलेली असेल तर अशी व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारी असते.

मस्तकरेषा वाकडीतिकडी असून तळहातावर चौकोन असेल तर अशी व्यक्ती सांगत-सोबतीने गुन्हेगारी कृत्ये करू लागते.

भ्रष्टाचारी हात :

हाताची बोटे आखूड असून धनरेषा पहिल्यापसून शेवटपर्यंत एकसारखी जाड असेल व मस्तकरेषा आखीव रेखीव स्पष्ट असेल तर अशी व्यक्ती भ्रष्टाचारी असते, परंतु अत्यंत सावधपणे लाच घेत असल्यामुळे कायद्याला दीर्घकाळ चकविण्यात यशस्वी ठरते.

हृदयरेषा व आयुष्यरेषेदरम्यान द्वीप असून बोटे आखूड, गुरूचे बोट सूर्याच्या बोटापेक्षा लहान, धनरेषेत द्वीप अशी लक्षणे हातावर असलेल्या व्यक्तीमध्ये भ्रष्टाचाराची प्रवृत्ती निर्माण होते.

बोटे लांब, गुरू उंचवटा प्रभावी, मस्तकरेषा सुबक असेल अशी व्यक्ती सहसा लाचखोरी करीत नाही, परंतु इतरांच्या प्रोत्साहनामुळे मात्र अशी व्यक्ती वाममार्ग स्वीकारू शकते.

धनरेषा खोल असेल व बुधाचे बोट थोडे तिरके असेल व मंगळ उंचवटा प्रभावी असून मस्तकरेषेची सुरुवात मंगळ उंचवटय़ापासून होत असेल तर अशा व्यक्ती संधी मिळताच लाच घेत असतात.

धनरेषा जाड, हृदयरेषा बेडौल असून गुरूचे बोट सूर्याच्या बोटापेक्षा लहान अशी लक्षणे हातावर असता अशी व्यक्ती पैशाच्या आमिषाला भुलून वाईट कामे करू शकतात.

मैत्री कुणाशी करावी/टाळावी :

आयुष्यरेषा अर्धवर्तुळाकृती असण्याऐवजी जास्तच सरळ असेल आणि शुक्र उंचवटा जास्त प्रमाणात फुगीर असेल तर अशी व्यक्ती अत्यंत स्वार्थी असतात व चारित्र्यही चांगले नसते, त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर मैत्री टाळावी.

मस्तकरेषा प्रमाणापेक्षा जास्त खोल व ठळक असेल, स्पष्ट असेल अशी व्यक्ती खऱ्याचे खोटे व खोटय़ाचे खरे करणारी असते. त्यामुळे अशा व्यक्तीशी मैत्री करणे कटाक्षाने टाळावे.

हातावर हृदयरेषा व मस्तकरेषा समांतर असल्यास अशी व्यक्ती स्वार्थासाठी मित्राचा विश्वासघात फसवणूक करू शकते. त्यामुळे अशा व्यक्तीशीही मैत्री करू नये.

बोटे आखूड व जाड असलेल्या व्यक्तीशी मैत्री करू नये.

मस्तकरेषेला एकही फाटा फुटलेला नसेल तर अशी व्यक्ती अत्यंत स्वार्थी असते, त्यामुळे अशा व्यक्तीशी मैत्री करू नये.

तळहात मऊ  व गुलाबी रंगाचा असून आयुष्यरेषा गोलाकार असेल आणि धनरेषा पूर्णपणे पातळ किंवा सुरुवातीला जाड आणि नंतर पातळ असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव नम्र, समंजस मनमिळाऊ  व लाघवी असतो. त्यामुळे त्यांच्याशी आवर्जून मैत्री करावी.

ही झाली हस्तरेषेची थोडक्यात शास्त्रोक्त माहिती. मंगळ हा नवग्रहामध्ये सेनापती आहे. मंगळाच्या अधिपत्याखालील लोक धाडसी व कणखर निर्भीड असतात. म्हणून अंकशास्त्राप्रमाणे ‘९’ अंकाच्या आधिपत्याखाली येणारे लोक, कुंडलीप्रमाणे मंगळाच्या आधिपत्याखाली येणारे आणि हस्तरेषेप्रमाणे मंगळ उंचवटा व मंगळ रेषेचा प्रभाव असलेले असे लोक असतात.

हाताच्या हालचालीवरून :

कधी कधी गंमत म्हणून माणसांचे स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून ओळखण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांच्या हाताच्या हालचालीवरून ठरवला जातो. त्यातलाच सांगण्यासारखा एक छोटासा प्रयत्न खालील प्रमाणे.

बऱ्याच जणांना बोलताना हाताच्या वेगवेगळ्या हालचाली करण्याची सवय असते. या हालचाली कशा आहेत त्यावरूनही त्या माणसाचा स्वभाव कळतो.

सतत एखाद्या वास्तूशी चाळा करत बोलणारा माणूस चंचल स्वभावाचा असतो.

बोटात साखळी किंवा किल्ली घेऊन फिरवत बोलणाऱ्या माणसाची बेफिकीर वृत्ती असते, अशा माणसाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवलेला बरा.

दोन्ही हात पाठीमागे बांधून बोलणारी व्यक्ती संशयी स्वभावाची असते.

दोन्ही हातांच्या मुठी आवळून कमरेवर ठेवणारा माणूस भांडखोर वृत्तीचा असतो.

एखादी व्यक्ती दोन्ही हात खिशात घालून बोलत असेल तर ती व्यक्ती आपल्या मनातल्या गोष्टी लपवत आहे असे समजावे.

ज्याला आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळत बोलण्याची सवय असेल तो साफ खोटे बोलत असतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.

दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहायची ज्याला सवय असते त्याला सौंदर्याची आवड असते. अशा व्यक्तींशी बोलण्यात दुसऱ्यांना आनंद मिळतो.

अध्यात्मामध्ये किंवा कुंडलीशास्त्रामध्ये आपण सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी म्हणजेच धर्म, अर्थ, काम यावरून मनुष्य स्वभाव जाणण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसेच या तिन्ही प्रकारांनुसार आपण हात जाणण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया.

सत्त्वगुणी (धर्म), रजोगुणी (अर्थ), तमोगुणी (काम) हे तीन प्रकार हातामध्ये पाहायला मिळतात.

सत्त्वगुणी म्हणजे चांगली बुद्धी. चांगल्या बुद्धीची कामे उत्कृष्ट प्रकारे करणारा. तर्कनिष्ठ. चांगल्या गुणांचा जास्तीत जास्त समावेश असणारा.

रजोगुणी व्यक्ती ही बुद्धिमानी असते, पण हे जास्तीत जास्त लोक पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे लागलेले पाहावयास मिळतात.

तमोगुणीमध्ये विचार चांगले नसतात. व्यसनाधीन, व्याभिचार दिसून येतो. खावे, प्यावे आणि ऐश करावी एवढेच यांना जमते.

या तिन्ही गुणांना सोडून चौथा प्रकार म्हणजे ज्याच्या हातावर सत्व आणि रजोगुण याचा प्रभाव दिसून येतो, अशा व्यक्तीचा विचार आणि कृती यामध्ये चांगल्या प्रकारे समतोल साधतात. त्यामुळे जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यश साधून आपले आयुष्य निर्माण करतात.

एखाद्याच्या हातावर रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव असेल तर त्या लोकांना जीवनामध्ये नातीगोती, प्रेम, जिव्हाळा यापेक्षाही पैसाच महत्त्वाचा असतो,

आणि हातावर सत्त्वगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव असेल तर अशी व्यक्ती द्विधा मन:स्थितीत असते. तिचं मन कधी चांगले विचार करते, तर कधी वाईट करते. त्यामुळे संघर्षांत्मक जीवनाकडे यांची वाटचाल असते. यांना स्थिरता सहसा नसते. यांची मन:शांती यांनीच हरवलेली असते.

सत्व, रज, तम या तिन्हीच्या प्रभाव खाली येणारा आणि या तिन्ही गुणांचे योग्य पालन केलेला हात असेल तर तो हात आदर्श हात ठरतो. आदर्श हात अत्यंत सुंदर सुडौल व लांब सडक असतो. बोटे पातळ नाजूक व टोकदार असतात. बोटे वरून पातळ व तळाशी जाड होत गेलेली असतात. असे लोक कष्टाला, बुद्धीला खूप प्राधान्य देऊन जीवनामध्ये मान, प्रतिष्ठा मिळविणारे असतात.

ते जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. त्यांची कल्पना शक्ती उच्चकोटीची असते. मोठय़ा मोठय़ा महत्त्वाकांक्षा यांनी मनाशी योजलेल्या असतात, परंतु ते त्यापैकी काही प्रमाणातही प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत. व्यवस्थापन आणि वेळेचा सदुपयोग करणे यांना सहसा जमत नाही. त्यामुळे यांच्या पदरी क्वचितप्रसंगी अपयश व निराशा पडण्याचीही शक्यता असते. अशा लोकांनी विचारांच्या निर्थक जंजाळात गुंतून न पडता प्रत्यक्ष कृतीला प्रथम प्राधान्य दिल्यास हे चांगले यश मिळवू शकतात. बौद्धिक, वैचारिक आणि कलात्मक कामे करण्यावर यांचा जास्त भर असतो. ते स्वभावाने शांत व समाधानी असतात. पण त्यांना व्यवहार जमत नाही. त्यामुळेही सातत्याने त्यांचे नुकसान होत असते. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असल्यामुळे ते कुणावरही सहज विश्वास ठेवतात, त्यामुळे ते समोरच्याच्या प्रभावाखाली जातात.

आपण याला आदर्श हात म्हणत असलो तरीसुद्धा हे विसरता कामा नये की या हातावर सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीचाही प्रभाव आहे. हे तिन्ही गुण कधी कधी कमीजास्त होतात. त्यामुळे वरील प्रकारचे स्वभाव पाहायला मिळतात.
मानसी पंडित – response.lokprabha@expressindia.com