00-lp-devi-logoसोने, चांदी डायमंडइतकीच मागणी सध्या मोत्यांनादेखील आहे. विशेषत: पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिली जातेय. त्यांना आधुनिक साज चढवल्याने त्यांचं सौंदर्य अधिकच खुलत जातं. मोत्यांचे सोनेरी क्षण जपत महिला दागिन्यांचा आनंद घेत असतात.

एखादा सण जवळ आला की चर्चा रंगू लागते ती पेहराव कोणता करायची याची. एकदा पेहराव ठरला की पुढच्या गोष्टी ठरवता येतात. या यादीत दागिने, केशरचना, टिकली, नेलपेंट असं सगळं येतं. पण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असतात दागिने! साडी किंवा कुर्तीच्या रंगावरून दागिन्यांची निवड होते. त्यात असलेला एखादा रंग उचलून त्याला शोभेल असा दागिना घालायचं पक्कं होतं. मग दागिन्यांमध्ये सोनं, कुंदन, डायमंड असे अनेक प्रकार येतात. पण एखादा पारंपरिक पेहराव करायचं ठरलं तर मात्र पसंती असते ती मोत्यांच्या दागिन्यालाच! त्यातही नऊवारी असेल तर मोत्यांच्या दागिन्याला नो अदर ऑप्शन! पण आता यात थोडा बदल होऊ लागलाय. म्हणजे पारंपरिक पेहराव आणि मोत्यांचे दागिने हे समीकरण योग्य असलं तरी हे दागिने आता वेगवेगळ्या साडय़ांवर किंवा कुर्ती, पंजाबी ड्रेसवरही सुंदर दिसतात. अर्थात नऊवारीवर केला जाणारा मोत्यांच्या दागिन्यांचा संपूर्ण साज इतर पेहरावांवर केला जात नाही. पण एखाद्-दोन दागिने नक्कीच घातले जातात. मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांना मिळालेला आधुनिक साज हे त्यामागचं एक कारण आहे.

sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

मोत्यांचे दागिने खरेदी करताना मंोत्यांविषयी किमान माहिती असावी. साधारणत: सर्वसामान्यांसाठी मोत्यांच्या दागिन्यांमधला मोती म्हणजे पिवळसर आणि पांढरा. पण मोत्यांच्या या प्रकारांमध्येही वैविध्य आहे. मोती खरा की खोटा याची पारख अनुभवी दुकानदारालाच असते. पण मोत्याचा दागिना खरेदी करताना त्याबद्दल माहिती असली तर सगळा विचार करून तुमची खरेदी होते. बसरा मोती, रिअल कल्चर्ड मोती, फ्रेश वॉटर फॉल, साऊथ सी, ताहिती सी, व्हेनेझुला, माबे मोती असे मोत्यांचे अनेक प्रकार आहेत. यापैकी बसरा आणि व्हेनेझुला मोती समुद्रात तयार होतात.

समुद्रातील मोती टिकायला जास्त चांगले असतात. या दोन्ही मंोत्यांचा तजेलदारपणा अतिशय उत्तम असतो. हे दोन्ही प्रकारचे मोती वेडय़ावाकडय़ा आकाराचे असतात. ते गोलाकार नसतात. त्यामुळेच या मोत्यांपासून ठरावीक दागिनेच बनवले जातात. नथ, लफा, कुडय़ा, चिंचपेटी, मोत्यांचे सर, तन्मणी हे दागिने करताना बसरा आणि व्हेनेझुला हे मोती वापरले जातात. अशा मोत्यांचा रंग पांढरा, मोतिया, करडा, खाकी असा असतो. समुद्रात तयार होणारे हे मोती असल्यामुळे त्यांचा आकार आणि रंगाबद्दल आधीच सांगता येत नाही.

रिअल कल्चर्ड हा मोती मानवनिर्मित आहे. शिंपल्याच्या आतमध्ये एक गोळी टाकली जाते आणि त्यातून त्या शिंपल्यात मोती तयार होतो. या मोत्यापासून सर्व प्रकारचे दागिने बनवले जातात. या मोत्याचा आकार गोलाकार असून मोतिया, पांढरा आणि गुलबट रंगांमध्ये तो असतो. याचं वैशिष्टय़ म्हणजे याचा तजेलदारपणा दीर्घकाळ राहतो. हा मोती ज्या शिंपल्यात तयार होतो त्यातच अर्धा मोती तयार करण्याचीही प्रक्रिया आहे. अर्धा मोती म्हणजे एका बाजूने फुगीर आणि एका बाजूने सपाट असा असतो. या मोतीला माबे मोती म्हणतात. माबे मोती साधारणपणे हार, ब्रेसलेट, अंगठी अशा काही दागिन्यांमध्ये दिसतो. नदी किंवा गोडय़ा पाण्यातल्या मोत्यांना फ्रेश वॉटर मोती म्हणतात. रंगाने पांढरे असणारे हे मोती आकाराने वेडेवाकडे असतात. हे मोती ठिसूळ असल्याने लवकर झिजतात. यांचा विशिष्ट आकार नसल्याने या मोत्यांचे फक्त सर बनवले जातात. नदी किंवा गोडय़ा पाण्यातल्या मोत्यांपेक्षा समुद्रात तयार होणारे मोती जास्त टिकतात.

मोती म्हटलं की त्यात एक नाजूकपणा येतो. छोटे, चकचकीत मोती डोळ्यांसमोर येतात. पण आकाराने मोठे आणि वजनाने जास्त असेही मोती असतात. साऊथ सी मोती आणि ताहिती सी मोती अशी या दोन मोतींची नावं. साऊथ सी मोत्याचे वजन आणि आकारच फार मोठा असल्यामुळे त्याचे कानातले आणि सर बनवले जातात. बांगडी, नथ, पेण्डण्ट यासारखा छोटा दागिना या मोत्यातून केला जातो. मोत्यांची माळ हे याचं खास वैशिष्टय़ असतं. ताहिती सी मोती काळ्या रंगाच्या शिंपल्यातील काळ्या रंगाचे मोती असतात. कधी कधी करडय़ा रंगाचेही असतात. हा मोतीसुद्धा जड आणि मोठा असल्यामुळे याचेही साऊथ सी मोतीसारखेच आहे. हे दोन्ही मोती १० मिमीपासून ते २०-२५ मिमीपर्यंतच्या आकारापर्यंत मिळतात. मोत्यांचे इतके विविध प्रकार असून त्यांची विशिष्ट प्रक्रिया ठरलेली असते. त्या मोत्यांच्या वैशिष्टय़ांनुसार दागिने केले जातात. त्यांचे आकार, वजन, तजेलदारपणा, नाजूकपणा, रंग हे मुद्दे दागिना तयार करताना विचारात घेतले जातात.

एखाद्या ग्राहकाला एखादा मोती आवडला असेल आणि त्याला हवा असलेला दागिना त्या मोत्यामध्ये हवा असेल तर तसं तो सांगतो. ग्राहक तशी मागणी करत असतात. याविषयी लागू बंधू ज्वेलर्सच्या दादर शाखेचे मॅनेजर धवल कांबळी सांगतात, ‘‘ग्राहक त्याची मागणी आम्हाला सांगत असतो. त्यांच्या मागणीमध्ये असलेला दागिना करताना काही मर्यादा येऊ शकतात. तसं होत असेल तर आम्ही ग्राहकाला ते पटवून देतो. त्यांना हवा तसा दागिना का होऊ शकत नाही याचं कारण स्पष्ट करून सांगतो. मोतीचा आकार, वजन आणि हवा असलेला दागिना हे जुळून येत नाही, असं त्यांना सांगतो. मग त्यातून दुसरा पर्याय त्यांना सुचवतो.’’ सोनं, चांदी, डायमंड इतकंच सौंदर्य मोतीमध्येही आहे. खरं तर अतिशय साधा, गोल आकाराचा छोटा असा मोती असला तरी त्यात एक वेगळंच सौंदर्य आहे. त्याला एक प्रकारची चकाकी, तेज आहे. मोती फक्त पारंपरिक दागिन्यांमध्ये वापरला जातो हा समज आता पुसट होत चाललाय. दैनंदिन जीवनात वापण्यास सुसह्य़ असा मोत्यांचा दागिना अतिशय सुटसुटीत वाटू लागलाय.

आता मुली त्यांच्या लग्नात नऊवारी साडी नेसतात. त्यावर त्यांना पारंपरिक दागिन्यांचा साज हवा असतो. तरुणींमधला हा ट्रेण्ड सध्या वाढताना दिसतोय. त्यामध्येही त्या मोत्यांच्या दागिन्याला पसंती देतात. या दागिन्यांच्या यादीत चिंचपेटी, हार, कानातले, वेल, बांगडय़ा, बाजूबंद, वाकी, कंबरपट्टा, पैंजण असे अनेक दागिने येतात. एकदा लग्न झालं की, हेच दागिने पडून राहण्याची शंका मनात असताना त्याच तरुणी वेगवेगळ्या पारंपरिक पेहरावावर ते दागिने घालताना दिसतात हे विशेष. केरळची पांढरी सोनेरी काठापदराची साडी आणि मोत्यांचा एखादा छोटा हार, बांगडय़ा, कानातले हा पेहराव तर हिट झालाय. सणासुदीची पांढरी साडी न नेसण्यावर आता महिलावर्गाने काट मारली आहे. काही ऑफिस, ट्रेन-बस, सोसायटीच्या ग्रुप्समध्ये तर या पेहरावाची थीमच ठरवलेली दिसून येते; पण अशा साडीवर एकच छोटा नाजूक मोत्यांचा हार चांगला दिसतो. तसंच कानात मोत्यांची कुडी किंवा स्टड घातलात तर उत्तम. बांगडय़ा फार नकोत. मोत्याची एक-एक बांगडी पुरेशी आहे. प्रत्येक हातात दोन हव्या असतील तर दोन बांगडय़ांमध्ये साडीच्या काठाच्या रंगानुसार नाजूक बांगडय़ा घातल्या तरी चालतात. सर्वसाधारण हा पेहराव पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतो.

आजच्या पिढीला जुनं काही फारसं नको असतं, अशी ओरड असते. जुन्या पिढीचे विचार, आचार, पद्धती आताच्या पिढीला पटत नाहीत, असंही बोललं जातं; पण जुन्या-नव्याची सांगड घालत त्यातून सुवर्णमध्य काढणं हा त्यावरचा नेहमीचा उपाय. नेमकं हेच दिसून येतं ते पारंपरिक दागिन्यांमध्ये. तरुणींना पारंपरिक दागिन्यांचं सौंदर्य तर हवं असतं, पण त्यात आधुनिकताही हवी असते. हाच विचार करत लागू बंधू ज्वेलर्स यांनी पारंपरिक दागिन्यांचा आधुनिक साज चढवला आहे. धवल कांबळी सांगतात, ‘‘पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांचं महत्त्व खूप आहे. आजच्या तरुणींनाही पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची आवड आहे. त्यासाठी आम्ही जुन्या-नव्याचा विचार करत त्यातून मार्ग काढला. पारंपरिकतेला आधुनिक साज देऊन दागिन्यांची निर्मिती केली. पूर्वीच्या चिंचपेटीला कापडाची एक मऊ गादी असायची. चिंचपेटी मानेला घट्ट बसणारा दागिना आहे. त्यामुळे तो मानेला लागू नये यासाठी त्याच्या मागे कापडाची एक छोटी गादी असायची; पण आता त्यात थोडा बदल केलाय. पूर्वी ही पेटी एक इंचाची होती. आता ती एक सेमीची केली आहे. यामुळे चिंचपेटीला एक नाजूकपणा आलाय. चिंचपेटीचा आकार लहान केल्यामुळे तरुणींना ती आता पंजाबी ड्रेसवरही घालता येते. चिंचपेटीसारखा साधारण दिसणारा चोकरही तरुणींच्या आवडीचा आहे. लफा, तन्मणी यांचे आकार आणि वजन कमी केल्यामुळे या दागिन्यांमध्ये नाजूकपणा दिसून येतो. शिवाय हे दागिने एखाद्या भरजरी कुर्त्यांवर, पंजाबी ड्रेसवरही घालू शकतात. नथीचा आकारही लहान केला आहे. तीन इंचांची नथ असायची. आता अर्धा इंच ते तीन इंच अशा वेगवेगळ्या आकाराच्या नथी उपलब्ध आहेत. ब्रेसलेटलाही मोत्यांनी सजवून त्याला आधुनिक रूप दिलं आहे. आम्ही केलेल्या आधुनिक साजातील मोत्यांच्या दागिन्यांमध्ये कल्चर्ड मोत्यांचा जास्त समावेश असतो.’’

खऱ्या मोत्यांच्या दागिन्यांसह आता इमिटेशन ज्वेलरीमध्येही मोत्यांच्या दागिन्यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. इमिटेशन ज्वेलरीमधला मोती खरा नसला तरी तो चांगल्या दर्जाचा असतो. मात्र तो घेताना त्याबद्दलची खात्री करून घेणं गरजेचं असतं. काही वेळा प्लॅस्टिकच्या गोळीला रंग देऊन तो मोती म्हणून वापरला जातो. कालांतराने अशा मोत्यांची टरफल निघून जातात. म्हणून इमिटेशन ज्वेलरीचा मोत्याचा दागिना घेताना ही खबरदारी जरूर घ्यावी. पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांमधील खडय़ांमध्ये लाल, डाळिंबी, जांभळा आणि हिरवा हे रंग जास्त दिसतात. यापैकी तुमच्या साडीला जो शोभून दिसेल तो खडा निवडावा. शक्यतो साडीच्या काठाचा रंग बघून हा खडा निवडला तर ते जास्त उठून दिसतं. एखादा दागिना आवडला असेल पण त्यात तुम्हाला हवा तो खडा नसेल तर दुकानदाराला सांगून तसं बनवूनही घेता येतं.

‘पारंपरिकतेला आधुनिकतेची साथ’ याचं आणखी एक उदाहरण देता येईल. काही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मुलींना फॉर्मल्स म्हणजे शर्ट आणि पॅण्ट घालावे लागतात. त्यावर झुमके, भरीव, जड असे कानातले घालता येत नाही. अशा कपडय़ांवर स्टड म्हणजे एकच खडा किंवा छोटासा टॉप असं घातलं जातं. तरुणींनी आता याला पर्याय शोधला आहे. स्टडसारखंच एकाच मोत्याचं कानातलं हे मुलींना सुटसुटीत वाटतं. कधी कधी कुर्त्यांवरही असं मोत्याचा स्टड चांगला दिसतो. कुर्त्यांवर मोत्याची कुडीसुद्धा चांगली दिसते. पण, त्याचा आकार जरा लहान असावा. कारण कुर्त्यांवर जितकी छोटी कुडी असेल तितका तिचा लुक खुलतो. कुडी हा दागिना पेशवाई काळात खूप प्रसिद्ध झाला. सोन्याचे किंवा मोत्याचे ठरावीक मणी वापरून केलेला फुलासारखा दागिना म्हणजे कुडी. हा अतिशय जुना दागिना असला तरी तो आजच्या तरुणींना आऊटडेटेड वाटत नाही. उलट त्यांना तो सोयीचा आणि सुटसुटीत वाटतो. इअरकफचासुद्धा सध्या ट्रेण्ड आहे. आता या इअरकफमध्येही मोती मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो. मोती दिसायला अतिशय सोबर असल्यामुळे त्यात भपकेपणा नसतो. म्हणूनच हे मोत्यांचे इअरकफ ऑफिसमध्येही घालता येऊ शकतात. कुर्ता किंवा पंजाबी ड्रेसवर मोत्याचं ब्रेसलेट किंवा मोत्याची एक बारीक बांगडीसुद्धा उत्तम दिसते.

मोत्यांचे दागिने सोन्यांच्या दागिन्यांसोबत घालायचे असतील तर जरा विचार करावा लागतो. मोत्यांच्या रंगांमध्येही फरक असतो. सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्यांचे दागिने घालताना त्यातले मोती पिवळसर रंगाची छटा असलेले हवे. तरच दोन्ही प्रकारचे दागिने उठून दिसतात. आता मीनाकारी वर्क असलेल्या राजस्थानी दागिन्यांमध्येही मोती वापरला जातो. मीनाकारी वर्क असलेले हे दागिने मुळातच देखणे असतात. त्यात आता मोती वापरून क्रिएटिव्हिटी केल्यामुळे त्याचं सौंदर्य आणखी खुललं आहे. मोत्याला थ्रीडी रूप आहे. सर्व बाजूंनी तो दिसतो. म्हणून लेसची डिझाइन असलेल्या पारंपरिक कपडय़ांवर मोत्यांचे दागिने सुंदर दिसतात. जरदोसी किंवा तत्सम प्रकारचे काम केलेल्या कपडय़ांवर मोत्यांचे दागिने चांगले दिसत नाहीत. लेस, बारीक किंवा जाड काठपदर असलेल्या साडीवर मोत्याची अंगठी आणि स्टेटमेंट नेकपीस चांगला दिसतो. एकच मोठा दागिना घालायचाही सध्याचा ट्रेण्ड आहे. एकच मोठा दागिना घातला की दुसरं काहीही घालायची गरज भासत नाही. पण फार जड म्हणजे स्टेटमेंट नेकपीस नको असेल तर त्याऐवजी बारीक चेन आणि त्यात एक छोटं पेण्डण्टही चांगलं दिसतं. एकच मोठा दागिना घालायचा जसा ट्रेण्ड आहे तसाच एकच छोटा, नाजूक, सोबर दागिना घालायचाही ट्रेण्ड आहे.

प्रत्येक दागिन्याची अशी एक वेगळी ओळख आहे. प्रत्येकाचं विशिष्ट सौंदर्य आहे. मोत्यांचंही तसंच काहीसं! मोती अतिशय नाजूक, सोबर दिसतो. त्याचे विशिष्ट रंगांचेच दागिने असल्यामुळे ते फार चकचकीतही दिसत नाहीत. दागिने सोबर असले की ते घालणाऱ्या व्यक्तीचाही लुक साधाच पण देखणा राहतो. मोत्यांच्या दागिन्यांना जुनी परंपरा असली तरी त्याला आजच्या काळाची जोड दिली जातेय. जुन्या दागिन्यांना केवळ आधुनिक साज न चढवता आजच्या तरुणींना दैनंदिन आयुष्यात वापरता यावेत असे ते दागिने आहेत. मोत्यांच्या दागिन्यांचा साज चढवला की कोणत्याही स्त्रीला मोत्यांचे हे सोनेरी क्षण जपावेसे वाटतात!
(छायाचित्र सौजन्य : लागू बंधू ज्वेलर्स)
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com