21 February 2019

News Flash

परंपरा : पिटसईमध्ये देवासाठी मासेमारी

निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू यातून उलगडतो.

पिटसई गावात माशांच्या देवराईत वर्षांतून एकदाच मासेमारी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू यातून उलगडतो.

मासेमारी म्हटलं की साधारणत: समुद्र, मोठय़ा मच्छीमार नौका, आठवडेच्या आठवडे अथांग सागरावर वादळवाऱ्यांना तोंड देऊन जाळी भरभरून मासळी पकडून आणणारे कोळी बांधव असं दृश्य अगदी सहजपणे डोळ्यांपुढे येतं; विशेषत: मुंबईकरांच्या. खाली कोकणात उतरलं तरी थोडय़ाफार फरकाने या साऱ्या गोष्टी नजरेला पडतातच. अंतर्गत, गोडय़ा पाण्यात केल्या जाणाऱ्या मासेमारीकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही. अलीकडे अनेक तलाव, धरणं तसंच शेततळ्यांमध्ये व्यावसायिक पद्धतीने रोहू, कटला, मिरगळ, तिलापिया, कोलंबी, खेकडे यांची खाण्यासाठी पैदास केली जाते, शिवाय पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे आणि दिवाळीनंतर कोरडे पडणारे ओढे, तलाव, नद्या आणि भातखाचरं माशांचा मुबलक पुरवठा करतात.

गोडय़ा पाण्यातील मासेमारीच्या असंख्य स्थानिक आणि पारंपरिक पद्धती आजही खेडोपाडी वापरात आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये विलक्षण वैविध्य आढळते. त्यांची नावंही देशकालपरत्वे बदलत जातात. वाहत्या पाण्यात दगड, ओंडक्यांच्या साहाय्याने ‘कीव’ नावाचा तात्पुरता बंधारा बांधून त्याच्या तोंडाशी बांबूने विणलेली भोकशी, मळई, तोंडय़ा, बुडदुल, आसू अशी साधने पाण्यात पुरून ठेवून थोडय़ा वेळाने त्यात सापडलेले मासे गोळा केले जातात. शेतातली (किंवा इतर) कामं होईपर्यंत जवळच्या पाणवठय़ावर यापैकी एखादा सापळा लावून ठेवून एक वेळच्या जेवणाला पुरतील इतके मासे त्यात सहज गोळा करता येतात. स्थानिक भौगोलिक परिस्थिती, जलस्रोत आणि उपलब्ध माशांच्या जातींवर या मासेमारीच्या उपकरणांचं वैविध्य अवलंबून असतं. अनेकदा दोन किंवा अधिक पद्धती एकत्रितपणे वापरल्या जातात. विविध क्लृप्त्या आणि साधनं वापरून केली जाणारी ही मासेमारी स्थानिक मच्छीमार, गावकरी, आदिवासी यांच्या पोटाची आणि जीवनसत्त्वांची गरज तर भागवतेच, शिवाय वेळोवेळी त्यांना चार पैसेही मिळवून देते. कदाचित त्या पैशांच्या मोहापायीही असेल, पण सध्या मासेमारी करताना अनेक घातक प्रकार अवलंबिले जातात. कीटकनाशके टाकून (छोटय़ा) पाणवठय़ाचा एखादा भाग सरसकट विषारी करणे, पाण्यात विद्युतप्रवाह सोडणे अशा भयंकर, प्रदूषणप्रवण आणि अर्थातच बेकायदेशीर पद्धतींनी मासे मारले जातात. या प्रकारच्या शॉर्टकटमधून एकाच वेळी भरपूर उत्पन्न मिळत असले तरी असे प्रकार अनेकदा करणाऱ्यांच्या जिवावरही बेततात.

कधीकधी मात्र आजूबाजूला मोठमोठे चार-पाच फूट लांबीचे शेकडो मासे दिसताहेत आणि कोणी त्यांना काही करत नाही अशीही काही ठिकाणं पाहायला मिळतात. अशा जागा साधारणत: एखाद्या नदीतील विशिष्ट खोल डोह असतात, जवळपास एखादे जागृत देवस्थान असते. देवाच्या नावाने मासेमारीला संपूर्ण बंदी असणाऱ्या या ठिकाणांना सुटसुटीत भाषेत आपण ‘माशांची देवराई’ किंवा अभयारण्याच्या चालीवर ’अभय डोह’ म्हणू शकतो. कित्येकदा डोहातील मासे हे त्या देव किंवा देवीची ‘मुले’ आहेत, त्यामुळे त्यांची हत्या करायची नाही असा प्रवाद आढळतो आणि तो कटाक्षाने पाळलाही जातो. येणारे भाविक देवाबरोबरच त्या माशांनाही नमस्कार (कधीकधी नवसही) करतात; कुरमुरे, पीठ, लाह्य़ा खाऊ  घालतात. माशांच्या पिढय़ान्पिढय़ा तिथे सुखाने नांदत असतात. भारतभर सर्वच प्रांतांत असे ‘देवाचे डोह’ (Sacred Ponds) आढळतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर १८८५ च्या ‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या पुणे विभागात फक्त पुणे व परिसरातील अशा जवळपास २५-२७ माशांच्या देवरायांचा उल्लेख आहे. अर्थात कालौघात त्यातील अनेक ठिकाणे अनास्था आणि प्रदूषणाची बळी ठरली. मात्र देहू, आळंदी (जि. पुणे), कांबळेश्वर (जि. सातारा), औदुंबर (जि. सांगली), माचनूर (जि. सोलापूर), वाळणकोंड (जि. रायगड), तिळसा (जि. पालघर) अशी अनेक स्थळे आजही तग धरून आहेत.

गंमत म्हणजे या देवाच्या डोहांमध्ये एक ठिकाण असंही आहे, की देवाच्याच नावाने वर्षांतून एक दिवस तिथे ठरवून मासेमारी केली जाते.

रायगड जिल्ह्य़ातील तळा तालुक्यात ‘पिटसई-कोंड’ या छोटय़ाशा गावी मासेमारीची ही आगळीवेगळी प्रथा पाहायला मिळते. या गावाच्या तिन्ही बाजूंना डोंगर आणि एकीकडे पाताळगंगा नदी आहे. गावाच्या विरुद्ध दिशेच्या काठाला नदीत सात आसरांचा डोह आहे. या जलदेवता फार कडक मानल्या जातात आणि सहसा त्यांच्या परिघात स्त्रियांना जाण्याची बंदी असते. पिटसई येथील या डोहाला स्थानिक लोक ‘कोंड’ (कुंड) आणि देवींना ‘कोंडकरीण/कोंडकरणी’ असे म्हणतात. डोह बराच खोल असून एरवी तिथे कुणी जात नाही. गेलेच तर पूजा करायला, अमावस्या-पौर्णिमेला नारळ वाहायला तसेच जवळपासचे शेतकरी मळणी झाली की नवे धान्य, पुरणपोळी वाहून खणानारळाने देवींची ओटी भरतात. अशा या डोहावर एरवी वर्षभर मासेमारीला संपूर्ण बंदी असते. कार्तिक अमावास्येला मात्र सारे गाव तिथे एकत्र जमून मासेमारी करते. हा एखाद्या उत्सवासारखा दिवसभराचा कार्यक्रमच असतो. डोहाच्या कोंडकरणींची ही संपत्ती या एका दिवशी मात्र (फक्त) ग्रामस्थांसाठी खुली असते.

या धार्मिक मासेमारीतही पिटसईचे ग्रामस्थ तीन-चार स्थानिक पद्धतींचा एकत्रितपणे उपयोग करतात; धरण किंवा बांध, ‘कोयनी’ (बांबूचे शंक्वाकार मासे मारण्याचे साधन), माज घालणे आणि कापडाने झोळणे. पावसाळा संपल्यामुळे पाणी बरेच आटलेले असते आणि दोन्ही बाजूंचे खडकाळ काठ उघडे पडतात. हा डोह नदीच्या एका काठालगत आहे. तीन बाजूंना खडक आणि चौथ्या बाजूला वाहती नदी. डोहाचा नदीलगतचा भाग नैसर्गिकरीत्या उथळ असून पुढे खोली वाढत जाते. या भागात झाडांच्या फांद्या, गवताच्या पेंढय़ा, दगडधोंडे यांच्या साहाय्याने तात्पुरता बांध घालतात. त्याला ‘धरण’ म्हणतात. तडफडणारे मासे उंच उडतात, ते निसटून खोल पाण्यात जाऊ  नयेत म्हणून धरण बांधायचे. ते सहा फुटांहूनही थोडे अधिकच उंच बांधतात. बांधलेल्या धरणात कोयनी पुरून ठेवतात. ‘कोयनी’ हे तीन ते पाच फूट लांबीचे मासेमारीचे साधन आहे. कुडाच्या कामटय़ा किंवा बांबूच्या पट्टय़ांनी विणलेला हा पाइप एका टोकाला निमुळता असतो. आतल्या बाजूला भक्कमपणासाठी बांबूच्या दुहेरी पट्टय़ा विणून शेवटी मोकळ्या सोडून दिलेल्या असतात. निमुळत्या अरुंद तोंडातून आत शिरलेला मासा किंवा खेकडा पुढे सरकतो, पण अध्र्यात सोडलेल्या मोकळ्या पट्टय़ांमुळे त्याला मागे फिरता येत नाही. तो तिथेच अडकून पडतो. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक मासे या सापळ्यात अडकत जातात. लवकरच ही कोयनी (काही भागात तिला ‘काठोळे’ म्हणतात) माशांनी भरून जाते.

धरण बांधायचे काम चालू असताना एकीकडे माज घालण्याचीही तयारी केली जाते. सकाळीच गेळा या वनस्पतीची (Catunaregam spinosa) फळे गोळा करून ठेवतात. दुपारच्या निवांत वेळेत ती कुटून त्यांचा लगदा केला जातो. संध्याकाळी हा सगळा लगदा आणून शेजारच्या उथळ डबक्यात ओततात; माती, पाण्याबरोबर चांगले कुटून हे मिश्रण एकजीव करतात. हळूहळू गेळाचा फेस तयार होतो; मात्र हा फेस किंवा फळांचा अंश डोळ्यांत जाणे धोकादायक असते. गावकऱ्यांचे म्हणणे असे की, मासेही या फेसामुळे आंधळे होतात.

सूर्यास्ताच्या वेळेस डोहाच्या सभोवार सगळे गावकरी हातात माज घेऊन उभे राहतात. कोणी ज्येष्ठ व्यक्ती देवींना आवाहन करतो, ‘हे आई कोंडकरीन देवी, ही आज गावची पांढर तुझ्यासमोर उभी आहे. तू सर्वाना आशीर्वाद दे. भाजीपाला, धान्य, मासे जी काय त्यांची गरज असेल ते भरपूर मिळू दे.’ देवीचे मागणे झाल्याबरोबर कालवून ठेवलेला माज भराभर सर्व बाजूंनी पाण्यात ओततात, लगोलग काठावर जमवून ठेवलेले दगड फेकले जातात (पाणी ढवळून निघावे म्हणून). यामुळे एकच घुसळण होऊन पाण्यावर भरपूर फेस तयार झालेला दिसतो. पाठोपाठ लहानमोठे मासे तडफडत उथळ पाण्याकडे येऊन बांधलेल्या धरणावर पडायला सुरुवात होते. मात्र या वेळी कोणीही तिथे थांबायचे नाही, असा दंडक आहे. सर्व जण भराभर मागे फिरून घराकडे निघतात.

रात्र झाल्यावर काही मंडळी पुन्हा नदीवर येतात. येताना आपापल्या घरून भात-भाकरी वगैरे जेवण आणतात, दबक्या आवाजात गप्पा मारत, हास्यविनोद करत सहभोजन करतात आणि तिथेच मुक्कामही करतात. या सगळ्या कार्यक्रमात शक्यतो दिवा, टॉर्च, मशाल असे कोणतेही प्रकाशाचे साधन वापरले जात नाही.

सूर्योदयापूर्वीच मासे गोळा करायला सुरुवात केली जाते. प्रथम कापडाने मासे झोळून गोळा करतात. सर्वात शेवटी बरोबर सूर्योदयाच्या वेळेस धरणात पुरलेल्या कोयनी एकेक करून रिकाम्या करतात. त्यात अडकलेले आणि इतरत्र झोळलेले मासे मोठमोठय़ा हाऱ्यांत (टोपल्यांत) गोळा करतात. हे सगळे काम सूर्य वर यायच्या आत पूर्ण झाले पाहिजे असा नियम आहे. गोळा केलेले मासे (या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये हे जवळपास १००-१२५ किलो भरले.) गावात नेऊन घरोघर प्रसाद म्हणून वाटले जातात. लोक श्रद्धेने ते खातात.

अशा प्रथा, परंपरांच्या निमित्ताने, नैसर्गिक घटकांची काळजी घेत जैवविविधतेचा वापर करण्याची वृत्ती पाहायला मिळते. माणसाच्या अन्नाचा नियमित भाग असणारे मासे अशा प्रकारे त्याच्या श्रद्धांशीही जोडलेले आहेत. वेगवेगळ्या युक्त्याप्रयुक्त्या करून मासे पकडले, खाल्ले, विकले जातात आणि त्याच वेळी एखाद्या (धार्मिक का होईना) कारणासाठी ते सांभाळलेही जातात. अर्थात, शहरीकरण, प्रदूषण आणि अपप्रवृत्तींचा संसर्ग याही क्षेत्राला झालेला आहेच; पण सभोवतालच्या निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू म्हणून या माशांच्या देवराया आणि धार्मिक मासेमारीकडे पाहायला हरकत नाही.

मासेमारीच्या पद्धती

माज घालणे : काही विशिष्ट वनस्पतींची फळे, शेंगा, खोडाची साल कुटून पाण्यात कालवतात. त्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे माशांची दृष्टी जाणे, मज्जासंस्था निकामी होणे असे परिणाम होतात. या (काहीशा अमानुष) प्रकाराला ‘माज घालणे’ असे म्हणतात. त्यासाठी अर्जुन सादडा, रामेठा या झाडांची साल वापरतात. २० व्या शतकात ऑस्ट्रेलियातून भारतात आलेल्या आकेशियाच्या शेंगांचाही तसाच वापर केला जातो.

मासे झोळणे : दोन माणसे दोन बाजूंनी एक कापड घेऊन पाण्यात उतरतात; हळूहळू पाण्यात बुडून काही वेळ स्थिर राहतात. मग पटकन (कापडासह) वर येतात. यालाच ‘झोळणे’ किंवा ‘लोधणे’ असेही म्हणतात. अनेकदा मासे झोळायच्या आधी पाण्यात माज घालतात. विषारी माजामुळे बेशुद्ध, म्लान झालेले मासे झोळणे सोपे जाते.

सात आसरा

नदीतील एखादा विशिष्ट डोह, तलाव किंवा एखादी विहीर हे या जलदेवतांचे स्थान असते. रूढार्थाने त्यांच्या मूर्ती वगैरे नसतात. काठावर सात गोटे हळदकुंकू किंवा शेंदूर लावून पुजले जातात. स्थानिक स्त्रियांचे आजार, मूल न होणे वा तत्संबंधी अडचणींमागे सात आसरांचा कोप असल्याची सर्वमान्य समजूत आढळते. पिटसई कोंड येथील हे ठिकाणही या समजुतींना अपवाद नाही.
प्रणिता हरड – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 2, 2018 1:05 am

Web Title: pitsai fishing for god