06-lp-plastic-garbageपर्यटनस्थळावर होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करतेय. वारसा स्थळांवरील प्लास्टिकच्या भडिमाराने त्या वारशाचं प्राचीन सुंदर रूप कुरूप करून टाकलं आहे. या प्लास्टिकविरोधातील ‘लोकप्रभा कॅम्पेन’ला मिळालेला वाचक प्रतिसाद.

दीर्घकाळ स्मरणात राहील अशा उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस. मान्सूनपूर्वीचे एक-दोन सरी आल्या, पण त्यामुळे फक्त काहिली तेवढी वाढली. शहरात पाणीटंचाई जैसे थे. सर्वाधिक तापमानाच्या चंद्रपुरातली ही स्थिती.

चंद्रपूर शहर अतिप्राचीन. जिल्हा श्रीमंत वनसंपदेसाठी प्रसिद्ध. इतिहासातले या प्रदेशाचे उल्लेख महाभारत काळापर्यंत जातात. महापाषाण युगातले अवशेष पुरावा म्हणून जिवंत. काही सुस्थितीतले तर काही शेवटाकडे निघालेले किल्ले. दक्षिणमार्ग अधोरेखित करणारी लेणी परिसरात. या प्राचीनतेसोबतच मध्ययुगातली प्रचंड, अतिभव्य बांधकामं. शहराचा विस्तीर्ण बुलंद परकोट. चार भव्य द्वारं आजही त्या काळातलं गोंड नृपतींचं सामथ्र्य सांगतात. महाकाली आणि अचलेश्वर ही देवस्थानं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध. राजे बीरशहाची समाधी म्हणजे स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण. गोंड नृपतींच्या शासनकाळात चंद्रपूर आणि परिसरात अनेक भव्य आणि सुंदर निर्माणं झाली. ते तंत्रज्ञान किती निदोर्ष आणि परिपूर्ण होतं हे आजही जाणवतं.

प्राचीन चंद्रपूर किल्ल्यातली चांदा गडातली जनसंख्या पाहता गोंड नृपतींनी केलेलं जलव्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध आणि परिपूर्ण आहे. किल्ल्यातील सुंदर आणि कलापूर्ण विहिरी पाण्याचा प्रमुख स्रोत. त्या आज चंद्रपूर शहर आणि परिसरात दुर्लक्षित आहेत. काही पूर्णपणे बुजून गेल्या आहेत तर काही बुजण्याच्या मार्गावर आहेत. या नक्षीदार विहिरींत प्लास्टिकचा बेसुमार कचरा पडलाय. या प्लास्टिकनं विहिरींचा श्वासच कोंडून गेलाय. मृतदेहावर पांढरं कापड अंथरल्यासारखं प्लास्टिक अंथरलंय जिवंत पाण्यावर आज.

चंद्रपूर शहर म्हणजे प्राचीन चंद्रपूर जे परकोटाच्या आत वसलं आहे, त्याचा विस्तार जवळपास पावणेदोन आणि सव्वा किलोमीटर लांब रुंद. या शहराची गरज भागवायला एक मोठा तलाव, रामाळा तलाव नावाचा आणि अनेक विहिरी. पंधराव्या ते सतराव्या शतकादरम्यान या विहिरींची निर्मिती झाली. गोंड नृपतींच्या काळातलं हे विहीर-बावडी निर्माणाचं शास्त्र विलक्षण आहे. या विहिरींना सर्वकाळ स्वच्छ पाणी. पाण्यापर्यंत उतरणाऱ्या पायऱ्या. या काही ठिकाणी सरळ रेषेत तर काही ठिकाणी काटकोनात. म्हणजेच काही विहिरी आयताकृती तर काही इंग्रजी एल आकाराच्या. खोलीनुसार पायऱ्यांची संख्या आणि त्यानुसार एकंदर विहिरीचा आकार. या विहिरीत एकावर एक अनेक कमानींची रचना. बांधकामातले बारकावे नियोजन आणि दूरदृष्टी स्पष्ट करतात. एकेका कमानीपर्यंतचा भाग सहज झाकून त्याखाली वास्तव्य करता येत असे. याशिवाय अंतर्गत भुयारी मार्गाच्याही खाणाखुणा आढळतात. युद्धप्रसंग, सुरक्षितता आणि गोपनीयता हे या रचनेचं प्रयोजन असावं.

चंद्रपूरपासून सुमारे आठ-दहा किलोमीटर अंतरावर जुनोना या गावाजवळ जुनोना तलाव आहे. या तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर खोलीसदृश बांधकाम आहे. याला जलमहाल म्हणतात. उन्हाळ्यातल्या वास्तव्यासाठी ही जागा असावी. या खोलीखालून पाणी जात असावं जे पलीकडच्या विहिरीतून पुढे वाहत असावं. आज हे सर्व स्थापत्यविशेष नष्ट झालेत, आणि विहिरींत उरलंय फक्त प्लास्टिक.

गोंड नृपतींच्या या चांदागडातील राजवाडय़ापासून तर जुनोना जलमहालापर्यंत थोडय़ा थोडय़ा अंतरावर विहिरी दिसतात. त्यांच्यासोबतच इतरही विहिरी बुजल्या आहेत किंवा कचराकुंडय़ा बनल्या आहेत. काही भाग्यवंत विहिरींना अजूनही पाणी आहे. अनेक वर्षांच्या उपशाशिवाय स्वच्छ निर्मळ पाणी असणे हा खरंतर प्राचीन वास्तुशास्त्राचा चमत्कार आहे. पण त्याचा किंचितही आदर न बाळगता अत्यंत बेमुर्वतपणे प्लास्टिक त्यावर तरंगत आहे. त्या पाण्यापर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांवरही कचरा साठला आहे, त्या कचऱ्यातूनच वाट काढावी लागते. महाकाली मंदिराजवळची विहीर अगदी वपर्यंत कचऱ्यानं भरली आहे, काही महिन्यांत ती पूर्ण भरेल. ही विहीर कलापूर्ण आहे, या विहिरीच्या कठडय़ावर आतून सुंदर शिल्पांकन आहे. गोंड नृपतींच्या समाधी परिसरातली राजे बीरशहांची समाधी तिच्या भव्यतेमुळे आकर्षक ठरते. पण पाण्यावर तरंगणारं प्लास्टिक मन विषण्ण करून टाकतं.

बाबुपेठ चौकातली-जुनोना चौकातली विहीरही अशीच कचऱ्यानं भरून गेलीय. पाणी जिवंत आहे पण प्लास्टिकनं त्याचा जीव घेतलाय.

शेकडो वर्षांआधी किल्ल्याच्या आत असलेलं शहर बेसुमार फोफावलंय. चहुबाजूंनी वाढलंय. किल्ल्याबाहेर दूपर्यंत विस्तारलंय, तरी आत्मा मात्र किल्ला हाच आहे. पाण्याच्या या स्रोतांवर आज शहर अवलंबून नाही. नळाद्वारे नदीचं पाणी येतं. शिवाय स्वतंत्र बोअर आहेतच. विहिरींच्या सभोवार बांधकामं झालीत. विहिरी लपून गेल्या. त्यांची वास्तपुस्त करण्याचीही गरज उरली नाही. वर्तमान गतीत हे साहजिकही आहे, पण या विहिरी कालबाह्य़ ठराव्या हेही योग्य नाही. ते तंत्रज्ञान अजोड आहे. आजच्या उन्हाळ्यातल्या पाण्याच्या हाहाकारावर या विहिरीच मार्ग दाखवू शकतात याची जाण मात्र वर्तमानाला नाही, हा कृतघ्नपणा आहे.

प्राचीन काळी गोंड नृपतींनी नियोजनबद्ध पद्धतीनं केलेलं हे जलव्यवस्थापन दूरदृष्टीनं केलं होतं, जे आजही आदर्श असं आहे. योग्य पद्धतीनं उपसा झाला आणि निगा राखली गेली तर या विहिरी आजही उत्तम जलस्रोत ठरू शकतात.

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा काळाचा नियम आहे आणि काळाच्या योजनेप्रमाणे तो सिद्धही होत असतो. प्रत्येक घटकाचा विनाश अटळ असला तरी मानवी हस्तक्षेपानं विनाशाची वेळ जवळ येत चालली आहे. वर्तमानानं निर्मिलेल्या या विनाशाच्या मार्गानं जाऊन सगळं प्राचीन वैभव नष्ट होणार आहे. आणि वर्तमानानंच निर्मिलेला प्लास्टिक हा घटक मात्र अविनाशी ठरणार आहे.
संजीव देशपांडे – response. lokprabha@expressindia. com

वाचकांना आवाहन

आपण देखील या ‘लोकप्रभा कॅम्पेन’मध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या परिसरात जर अशा प्रकारचं ठिकाण असेल तर त्याची माहिती छायाचित्रांसहीत आम्हाला पाठवावी. त्याला योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता : संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा,  प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.फॅक्स : २७६३३००८ ई-मेल : response.lokprabha@expressindia.com,  lokprabha@expressindia.com