आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सगळ्यांना जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा अर्थ कळला. प्रत्येकालाच आपलं जीवन कसं जगावं याचं स्वातंत्र्य असतं. आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे. आम्ही परदेशात जातो तेव्हा लक्षात येतं की स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच समान हक्क आणि वागणूक मिळते. गेल्या काही वर्षांत आपल्या देशातही स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. हा बदल आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा ठरला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याकडे स्त्रियांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं; पण आता स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाणही वाढलं असल्यामुळे त्या घर सांभाळून पुरुषांबरोबरीने काम करताना दिसतात. याचं आताचंच उदाहरण म्हणजे महिला क्रिकेट संघाची विश्वचषक स्पर्धा. महिला क्रिकेट संघसुद्धा दमदार कामगिरी करून पुरुष संघाप्रमाणेच आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करीत आहे.

प्रत्येकाला आपापली आवड जपण्याचं स्वातंत्र्य असावं. मी ते जपलं. लहानपणापासूनच मला क्रिकेटची खूप आवड होती. तीच आवड मी जपली आणि त्यासाठी खूप मेहनत घेऊन मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. मला मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी कधीच गैरवापर केला नाही. मला  मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. पुढेही तेच करेन. यातूनच मला बरंच काही शिकायला मिळेल, यावर माझा विश्वास आहे.

काही मुलींचे पालक त्यांना क्रिकेट खेळून देत नाहीत. याची काही कारणं मी ऐकली आहेत. क्रिकेट हा खेळ बऱ्याचदा उन्हात खेळला जाणारा खेळ आहे. उन्हात खेळल्यामुळे मुलींचा रंग सावळा पडू शकतो आणि पुढे लग्नकार्यात अडथळे येऊ  शकतात, अशा गैरसमजुतींमुळे पालक त्यांच्या मुलींना क्रिकेट खेळण्यास मनाई करतात. बहुतेकदा मुलींच्या मैदानी खेळाची सुरुवात ही मुलांबरोबरच होते. एका ठरावीक वयानंतर ती गोष्ट पालकांना खटकू लागते आणि त्यामुळेच बऱ्याचशा उभरत्या महिला खेळाडूंना खेळापासून परावृत्त केलं जातं. पण पालकांनी मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळू दिले तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलींची संख्या नक्कीच वाढेल आणि त्याचा भारतीय महिला संघाला फायदाच होईल. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचं प्रोत्साहन दिल्यामुळेच आणि कोणत्याही अवाजवी गोष्टीचं बंधन न घातल्यामुळे मी आज यशस्वी होऊ  शकले. पुरुष संघाचे सामने सतत होत असल्यामुळे त्यांचा भरपूर सराव होतो. तसंच महिला संघाचेही सामने वाढवले तर त्या सरावाचा महिला संघास निश्चितच फायदा होईल, यात शंकाच नाही. आमच्या संघात आम्हाला स्वतंत्रपणे खेळण्याची मुभा आहे म्हणूनच आज आम्ही महिला संघाचं नाव जागतिक पातळीवर नेण्याचं यश संपादन करू शकलो.

माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वानी मला माझ्या पद्धतीने खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं. वेळोवेळी  योग्य मार्गही दाखवला. त्यामुळेच माझा आजवरचा खेळातील प्रवास सफल झाला आहे. प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची आणि  जगण्याची संधी दिली पाहिजे आणि यालाच आपण स्वातंत्र्य म्हणू शकतो. स्वातंत्र्याचा अनुभव घेताना काही गोष्टी चुकल्या तरी त्या व्यक्तीसाठी ती चूक अनुभव म्हणून नेहमीच त्याला योग्य मार्ग दाखवते, असं मला नेहमीच वाटतं.

पूनम राऊत

शब्दांकन : दीपाली पोटे