शेक्सपीअरच्या चारशेव्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या नाटय़संस्थेतर्फे ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपीअरच्या ‘राजा लीअर’ या नाटकाचे नवीन संचामधले प्रयोग सध्या ठिकठिकाणी सुरू आहेत.

सगळं जग हीच रंगभूमी असं मानणारा विल्यम शेक्सपीअर हा जगाचा नाटककार. मानवी मनाच्या रंगभूमीवरची भावभावनांची, वासनाविकारांची, हव्यासाची, अस्सलतेच्या ध्यासाची अशी सगळी नाटय़ं जाणणारा. त्याची कथानकं, त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या भावभावनांचे शेक्सपीअरने मांडलेले स्तिमित करणारे खेळ हे सगळंच अचंबित करणारं, अवाक् करणारं. हॅम्लेट, किंग लीअर, ऑथेल्लो, मॅकबेथ, रोमिओ ज्युलिएट, र्मचट ऑफ व्हेनिससारखी नाटकं, काव्यं, सुनीतं अशी त्याची साहित्यनिर्मिती आजही वाचकांना, नाटय़प्रेक्षकांना भुरळ घालते.

शेक्सपीअरचा ४०० वा स्मृतिदिन अलीकडेच म्हणजे २३ एप्रिल रोजी साजरा झाला. तो त्याचा जन्मदिवसही आणि स्मृतिदिनही. त्याच्या या ४०० व्या स्मृतिशताब्दीनिमित्त ‘प्रत्यय हौशी नाटय़ कला केंद्र, कोल्हापूर’ या नाटय़संस्थेने ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी अनुवादित केलेलं ‘राजा लीअर’ हे नाटक नव्याने प्रेक्षकांसमोर आणलं आहे. नव्याने असं म्हणण्याचं कारण असं की ‘प्रत्यय’ने २३ वर्षांपूर्वीही ‘राजा लीअर’चे प्रयोग केले होते. पंचवीस-तीस कलाकारांचा ताफा घेऊन ‘राजा लीअर’ करणं ही अजिबात सोपी नसलेली गोष्ट. ती ‘प्रत्यय’ने समर्थपणे पेलली होती. १९९३ च्या राज्य नाटय़स्पर्धेत ‘प्रत्यय’ने सादर केलेल्या या नाटकाला तिसरं पारितोषिक मिळालं होतं. तेव्हा या नाटकाचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग झाले होते. नाटकाच्या प्रयोगांचं, राजा लीअरची भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या डॉ. शरद भुताडिया यांचं कौतुकही झालं होतं. आता पुन्हा एकदा प्रत्यय ताज्या दमाच्या कलाकारांसह ‘राजा लीअर’ घेऊन आलं आहे. ४०० व्या स्मृतिदिनानिमित्त शेक्सपीअरला अभिवादन करण्यासाठी ‘प्रत्यय’ या  नाटकाचे पुन्हा प्रयोग करत आहे.

शेक्सपीअरने निर्माण केलेल्या शोकांतिकांमध्ये ‘किंग लीअर’ ही एक महान शोकांतिका मानली जाते. एरवी शेक्सपीअरवर टीका करणाऱ्या नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनीसुद्धा ‘किंग लीअरसारखी शोकांतिका परत कुणी लिहू शकणार नाही’ असं म्हटलं आहे, असं विंदांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे. विंदांच्या आधी मोरो शंकर रानडे यांनी ‘अतिपीडचरित’ (१८८१) आणि आचार्य अत्रे यांनी ‘सम्राटसिंह’ (१९६८) किंग लीअरचं भाषांतर केलं होतं. विंदांचं ‘राजा लीअर’ (१९७४) मध्ये आलं. पण तेच सगळ्यात उत्तम असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

राजा असो की सामान्य माणूस, कुणाच्याही वाटय़ाचे भोग चुकत नाहीत, ही गोष्ट शेक्सपीअरने या नाटकात अशा पद्धतीने मांडली आहे की किंग लीअरची शोकांतिका एक वेगळीच उंची गाठते. आपल्या वयाची जाणीव झालेला राजा लीअर आपलं राज्य, आपली सगळी संपत्ती आपल्या तीन मुलींमध्ये वाटून टाकायचं ठरवतो. तो मुलींना म्हणतो की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, ते सांगा. त्याच्या गॉनरील आणि रीगन या त्याच्या दोन मुली विवाहित आहेत, तर त्याची लाडकी सगळ्यात धाकटी मुलगी कॉर्डिलिया अविवाहित आहे. मोठय़ा दोन्ही मुली शब्दांचा फुलोरा फुलवत आपल्या बापावर आपलं किती प्रेम आहे ते सांगतात. धाकटी मात्र असा कोणताही बडेजाव न मिरवता किती प्रेम आहे ते सांगता येणार नाही, पण वेळ आली तर ते सिद्ध होईल असं सांगते. हे उत्तर ऐकून चिडलेला राजा आपलं सगळं राज्य आपल्या दोन्ही मुलींमध्येच वाटून टाकतो. त्याने झिडकारलेली धाकटी कॉर्डिलिया राजा फ्रान्सबरोबर लग्न करून निघून जाते. राजाने  इतक्यातच अशा पद्धतीने राज्य वाटून टाकू नये यासाठी त्याला त्याचा विदूषक आणि केंट हा एक स्वामीनिष्ठ सेवक परोपरीने विनवतात. पण राजा लीअर कुणाचंच ऐकत नाही. हातात संपत्ती आल्यावर हळूहळू दोन्ही मुली बदलतात. राजा लीअरच्या जगण्यावागण्यावर बंधनं घालायला लागतात.

मुलींच्या वागण्यामुळे मनातून मोडून पडलेला राजा लीअर रानोमाळ भटकतो. लौकिक पातळीवरही तो उद्ध्वस्त झाला आहे आणि मानसिक पातळीवरही. शेक्सपीअरने रंगवलेला राजा लीअरचा बाह्य़ आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवरचा संघर्ष जितका विलोभनीय तितकाच क्लेशदायक आहे. बापाच्या अस्सल भूमिकेतून त्याने देऊन टाकलेलं सर्वस्व, कमअस्सल माणसांच्यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेले दुख:भोग हा सत् आणि असत् यांच्यामधला सनातन लढा शेक्सपीअरने बाप आणि मुली यांच्या माध्यमातून मांडला आहे. जगातल्या सगळ्यात मूलभत आणि निव्र्याज मानल्या जाणाऱ्या नात्यातली वादळं माणसाला कशी भोवंडून टाकतात हे ‘राजा लीअर’मधून अधोरेखित होतं. जे राजाच्या वाटय़ाला त्याच्या मुलींमुळे येतं, काहीसं तसंच त्याच्या ग्लॉस्टर या सगळ्यात एकनिष्ठ नोकराला त्याच्या एडमंड या अनौरस मुलामुळे भोगावं लागतं. एडमंडकडून ग्लॉस्टरचा विश्वासघात होतो तर ज्याच्याबद्दल प्रवाद असतात, तो  एडगर हा औरस मुलगा वेषांतर करून, बापाची पाठराखण करतो. राजा लीअरला मुलींपासून पळून जाण्यास मदत केली म्हणून ग्लॉस्टरचे दोन्ही डोळे काढले जातात. वृद्ध अगतिक बापाला मदत केली म्हणून कॉर्डिलियाला मारलं जातं आणि तिच्या मृतदेहापाशी बसून विलाप करणाऱ्या राजा लीअरचा मृत्यू होतो.

राजाच्या स्तरावर जे चाललं आहे, तेच त्याच्या नोकराच्या म्हणजे सामान्य माणसाच्या स्तरावरही चाललं आहे, असं दाखवून शेक्सपीअरने दु:खाच्या जातकुळीच्या मुळालाच हात घातला आहे. जवळची माणसं बघता बघता परकी होऊन जातात आणि ज्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नसते अशी माणसं जिवाला जीव देत झळाळून उठतात, हे चिरंतन सत्य शेक्सपीअर इतक्या प्रभावीपणे मांडतो की हे नाटक बघता बघता ते पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं होऊन जातं. शेक्सपीअरच्या व्यक्तिरेखा रंगवण्याच्या हातोटीमुळे, त्याच्या भाषेमुळे, विंदांच्या समर्थ अनुवादामुळे आणि ‘प्रत्यय’च्या सादरीकरणामुळे राजा लीअरमधे प्रेक्षक गुंतून जातो.  राजाची भेलकांडत गेलेली  परिस्थिती, त्याच्या मनातली वादळं शेक्सपीअरने प्रामुख्याने रंगवली असली तरी ती एका राजाची, त्याच्या मुलींची, किंवा त्याच्या एकनिष्ठ सेवकाची, अशी कुणा एकाची शोकांतिका उरत नाही. ती जीवनाच्या अपरिहार्यतेची शोकांतिका बनून आपल्यापुढे येते.

या पाच अंकी संपूर्ण नाटकातल्या व्यक्तिरेखांचं शेक्सपीअरने केलेलं रेखाटन जबरदस्त आहे. राजा लीअर, त्याच्या आसपासच्या सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांच्यामधले बारकावे, त्यांची मनोभूमी, त्यातली भावनिक आंदोलनं, त्यातले चढउतार या सगळ्यावर आजपर्यंत खूप लिहिलं गेलं आहे. पण तरीही ते अपुरंच वाटावं असं शेक्सपीअरच्या प्रत्येक नाटकाचं संचित आहे. नाटकातले हे सगळे बारकावे समजून घेत ते सादर करण्याच्या पातळीवर येण्यासाठी पुढचा महत्त्वाचा आणि अवघड टप्पा म्हणजे शेक्सपीअरची भाषा. ती पल्लेदार, काव्यात्म भाषा पेलायला आणि अभिनयातल्या, भाषेतल्या सगळ्या बारकाव्यांसकट रंगभूमीवर सादर करायला अभिनयातलं दहा हत्तींचं बळच हवं. ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर यांनी अनुवादाच्या पातळीवर हे आव्हान लीलया पेललं आहे. शेक्सपीअरचं मूळ पाच अंकी आणि २६ प्रवेश असलेल्या नाटकाचा विंदांनी चार अंकात अनुवाद केला आहे. पण तो रंगभूमीवर सादर करताना आणखी संपादित होऊन दोन अंकांत आपल्यासमोर येतो.

दोन अडीच तास आपल्यासमोर माणसाच्या जीवनातलं नाटय़, अभिनय आणि भाषा या सगळ्याचा जो काही खेळ चालतो तो दिग्मूढ करून टाकणारा असतो. राजा लीअरच्या व्यक्तिमत्त्वामधला भारदस्तपणा, त्याचं राजा असणं, त्याच्यामधला प्रेमळ बाप, स्वत:ची स्तुती आणि फक्त स्तुतीच ऐकायला हपापलेला त्याच्यामधला हट्टी माणूस, आपण काय गमावलं हे समजल्यावर त्याला आलेली उद्विग्नता, नात्यांमधल्या अनुभवातून आलेलं भ्रमिष्टपण, त्याचं रानोमाळ भटकणं हे सगळं सादर करणारा डॉ. शरद भुताडिया यांचा अभिनय नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.

एकाच वेळी राजा आणि त्याचा एकनिष्ठ सेवक या दोन पातळ्यांवर हे नाटक घडतं. त्यामुळे त्यात भरपूर व्यक्तिरेखा आहेत. त्या सगळ्यांचं एकाच वेळी रंगमंचावर वावरणं, एकमेकांमधली सिम्फनी सगळ्याच कलाकारांनी चांगली सांभाळली आहे. नाटकाच्या तांत्रिक बाजूही नाटकाचा बाज चांगल्या पद्धतीने उठावदार करतात.

प्रत्ययबद्दल

‘प्रत्यय’ हौशी नाटय़ कला केंद्र’ गेली ३५ वर्षांहून अधिक काळ नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे. दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत कल्लोळी, पवन खेबुडकर, किरण खेबुडकर, अनिल सडोलीकर, शेखर पडळकर, उदय नारकर, माया पंडित, शरद नावरे या तरुण मंडळींनी ‘प्रत्यय’ची स्थापना केली.

गेल्या ३५ वर्षांत ‘प्रत्यय’ने २९ नाटके रंगभूमीवर सादर केली. त्यात नाटककार चंद्रकांत देशपांडेंचं ‘एक गगनभेदी किंकाळी’, गो. पु. देशपांडे लिखित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ तसंच ‘एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू’, घोडा, सवाई माधवराव यांचा मृत्यू, राशोमन, उत्तररामचरित, राजा लीअर, सत्यशोधक, आइन्स्टाइन, गो. पु. देशपांडेलिखित ‘अंधारयात्रा, ऐन वसंतात अध्र्या रात्री, क्राईम अँड पनिशमेंट, नागमंडल, ‘उत्तररामचरित’, शनिवार-रविवार, कर्फ्यू, ‘चरणदास चोर’ इत्यादी नाटकांचा समावेश आहे. दिग्दर्शक शरद भुताडिया यांनी दिग्दर्शित व अभिनय केलेल्या ‘किंग लीअर’ या नाटकाचे कोलकाता, दिल्ली, नागपूर, बंगाली एज्युकेशन सोसायटी नागपूर, विदर्भ मराठी साहित्य परिषद, संगीत नाटक अकादमीचे केरळमधील ‘शेक्सपीअर महोत्सव’ या ठिकाणी प्रयोग झाले आहेत.

‘प्रत्यय’तर्फे १९८८ साली रंगमंचावर आणल्या गेलेल्या ‘उत्तररामचरित’ या नाटकाची नवी दिल्ली येथे झालेल्या संगीत नाटक अकादमी महोत्सवासाठी तसेच सन २००९ ‘आइन्स्टाइन’ या नाटकाची निवड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) येथील महोत्सवासाठी निवड झाली होती. ‘प्रत्यय’ला राज्य नाटय़ स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

राजा लीअरच्या जवळ जाऊ शकलो.. -डॉ. शरद भुताडिया

किंग लिअर हे शेक्सपीअरचं महत्त्वाचं नाटक. विंदांनी ते अनुवादित करताना त्याला चाळीस पानांची प्रस्तावना लिहून त्याकडे कसं बघायचं याचं नेमकं मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे आम्ही विंदांचं बोट धरूनच ते नाटक सादर करतो आहोत. हे नाटक भारतीय अभिजात नाटकाच्या पद्धतीने सादर करता येऊ शकत नाही. त्यामुळे ते सादर करणं एक आव्हानच ठरतं. एक तर हे नाटक वैश्विक आहे. ते मूल्यांविषयी सांगतं. त्यामुळे त्याला काळाचं बंधन नाही. ते आजच्या काळाशी देखील ताडून पाहता येतं. माणूस चारशे वर्षांपूर्वी जसा वागत होता, तसाच आजही वागतो आहे. चुका करणं, त्यांचे परिणाम भोगणं, त्या चुकांची जाणीव होणं हे सगळं वैश्विक आणि चिरंतन आहे. मुळात हे नाटक एका वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या म्हाताऱ्या माणसाचं आहे. तेवीस वर्षांपूर्वी आम्ही ते केलं तेव्हा मी ३५ वर्षांचा होतो. आता मी साठी ओलांडली आहे. त्यामुळे आता शेक्सपीअरकडे, किंग लीअरकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही बदलला आहे. मी राजा लीअरच्या भावभावनांच्या जवळ जाऊ शकतो आहे, असं मला वाटतं.

आता हे नाटक आम्ही नव्या संचात सादर करतो आहोत. २३ वर्षांपूर्वी आम्ही ते एकदम पारंपरिक पद्धतीने सादर करायचो. आता नेपथ्य वगैरे  थोडंसं अ‍ॅबस्ट्रॅक्ट करून आधुनिक पद्धतीने करतो आहोत. मुळची शेक्सपीअरची आणि नंतर विंदांनी अनुवादित केलेली भाषा हे आजच्या पिढीसाठी भाषेचं वेगळं आकलन आहे. त्यामुळे ती त्यांच्या अंगवळणी पडण्याची प्रक्रिया आताच्या नव्या संचाच्या बाबतीत अजून सुरू आहे. हे वर्ष शेक्सपीअरचं ४०० व स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्यासाठी हे नाटक करण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आमच्या संस्थेला प्रॉडक्शन ग्रँट दिली आहे. वर्षभर नाटकाचे वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच महोत्सवांमधून प्रयोग होतील. त्यानंतरही आम्ही ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com