19 February 2019

News Flash

कलिंगडाचे डोहाळे

कलिंगडाची पिशवी फाटून कलिंगड रस्त्यावर पडलं होतं!!

निमित्त
काही गोष्टी आठवणी ठेवून जातात. कलिंगड हे एक मधुर फळ, पण या फळाने सोनावणे कुटुंबालाही कायमची एक गोड आठवण दिली आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या सोनावणे यांची पत्नी गरोदर होती. सोनावणे कामावरून नुकतेच घरी आले होते. चहा पिताना ते पत्नीशी गप्पा मारत होते.

पत्नी म्हणाली ‘आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज असं वाटतंय की कलिंगड खावं!’

आपल्या पत्नीला कलिंगडाचे डोहाळे लागले आहेत हे सोनावणेंनी ओळखलं. त्यांनी लगेच सायकल काढली. बाजारात पोहोचले. फळवाल्याकडे कलिंगड मागितलं. फळवाल्याने सोनावणेंना वरून खाली पाहिलं,

‘साहेब, डिसेंबरमध्ये कलिंगड मागणारे तुम्ही एकटेच. कलिंगड मार्चनंतर मिळतं, आता नाही’

मग सोनावणेंनी फळवाल्याला सांगितलं, ‘मिसेस प्रेग्नंट आहे. तिला कलिंगड खायची इच्छा झाली आहे.’

मग तो फळवालाही खुलला, म्हणाला, ‘असं सांगा ना..एक काम करा. तुम्ही मुंब्रा ते पनवेल रस्त्यावर शिळफाटा आहे. तिथे जा. तिथे बारा महिने कलिंगड विकतात.’

बदलापूर ते शिळफाटा अंतर ३० किलोमीटर होतं. सायकलने जाऊन परत यायला तीन तास लागणार होते. त्यावेळी आजसारख्या फार रिक्षा नव्हत्या. मग सोनावणेंनी शिळफाटय़ाच्या रस्त्यावर सायकल पळवायला सुरुवात केली. रस्ता कच्चा होता, खड्डय़ांनी भरला होता. त्यामुळे पँडल जोरात मारावं लागत होतं. त्यामुळे सोनावणेंना चांगलाच दम लागत होता.

तब्बल दीड तास सायकल हाणल्यानंतर ते घामाघूम होऊन शिळफाटय़ावर पोहोचले. तिथे एका तंबूमध्ये कलिंगडाचा ढीग लावला होता. हिरवीगार, गोल कलिंगड एकावर एक रचली होती.  सोनावणेंनी आधी अनेक वेळा कलिंगड पाहिलं होतं. पण आज त्यांनी डोळा भरून कलिंगड पाहिलं. एक कलिंगड विकत घेतलं आणि ते प्लास्टिक पिशवीत घालून पिशवी सायकलच्या हँडलला लावली.

शिळफाटय़ाकडून ते बदलापूरकडे निघाले. तोवर रात्रीचे ८ वाजले होते. रस्ता खराब होता. तरीही सोनावणे जोर लावून सायकल पळवत होते. अचानक अंधारात ‘धप’ आवाज झाला.

सोनावणेंनी सायकल थांबवली. पाहतात तर कलिंगडाची पिशवी फाटून कलिंगड रस्त्यावर पडलं होतं!! त्याचे दोन तुकडे झाले होते. सगळी धूळ लागली होती. सोनवणेंना खूप वाईट वाटलं.

बायकोला कलिंगड द्यायचंच असं त्यांनी ठरवलं होतं. कारण त्यातून प्रेम व्यक्त होणार होतं. पण कलिंगड तर फुटलं, मातीत खराब झालं. क्षणभर सोनावणे यांनी मनात काहीतरी विचार केला. अंधारात घडय़ाळ पाहण्याचा प्रयत्न केला. पण काहीच दिसत नव्हतं.

पुढच्या क्षणाला त्यांनी सायकल वळवली. पुन्हा शिळफाटय़ाकडे पळवायला सुरुवात केली. शिळफाटय़ापर्यंत पोहोचायला त्यांना एक तास लागला. तोवर कलिंगड विकणारा तंबू बंद करून निघून गेला होता. पण बाजूचा पानवाला टपरीत बसला होता. त्याची गिऱ्हाइके येत होती. सोनावणे यांनी पानवाल्याला सगळा किस्सा सांगितला – ‘प्रेग्नंट बायकोसाठी कलिंगड नेलं. पण ते फुटलं.’ ते ऐकून कधी न हसणाऱ्या त्या पानवाल्याच्याही तोंडावर खळी उमटली.

तो टपरीमधून बाहेर आला. कलिंगडाच्या तंबूचा एक पडदा उचलून आत गेला आणि दोन मोठी कलिंगडं त्याने आणली. एका गोणीत ती भरली आणि ती गोणी सोनावणेंच्या सायकलला घट्ट बांधून दिली. मग पानवाला म्हणाला, ‘दीदी को बोलना. शील फाटेपर तुम्हारा एक भाई पान बेचता है. उसने यह टरबुजा भेजा है.’

सोनावणे ती दोन्ही कलिंगडं घेऊन पुन्हा बदलापूरकडे निघाले. घरी पोहोचेपर्यंत १२ वाजले. पत्नी काळजी करत बसली होती. पण सोनावणे यांनी इतक्या लांबून कलिंगडं आणली हे पाहून तिला खूप आनंद झाला.

कोणीतरी पानवाला मला दीदी म्हणाला आणि त्याने कलिंगड पडू नयेत म्हणून गच्च बांधली हे ऐकून तिचे डोळे भरून आले.

सोनावणेंना मुलगा झाला. मोठा झाल्यावर त्याचं लग्न झालं.

लग्नानंतर त्याची पत्नी गरोदर राहिली. मग सोनावणेंनी मुलाला आणि सुनेला कलिंगडाचा किस्सा ऐकवला.

मग त्या मुलाने आपल्या गरोदर पत्नीला सांगितलं ,

‘मी तुझ्यासाठी कलिंगड आणतो.’

तिलाही आनंद झाला.

पण बदलापूरमध्ये कलिंगड मिळत असूनही तो मुलगा शिळ फाटय़ावर गेला. तिथून कलिंगड आणलं.

बदल इतकाच झाला होता की तो मुलगा चांगल्या रस्त्यावरून बाईक घेऊन शिळफाटय़ावर अध्र्या तासात पोहोचला. त्याला कोणतीही अडचण आली नाही.

पण वडिलांनी सांगितलेला पानवाला तिथे नव्हता.

पाहू न शकलेल्या मामाचे त्याने मनात आभार मानले.

..आणि दोन कलिंगडं घेऊन तो बदलापूरच्या दिशेने निघाला.

कलिंगड एक मधुर फळ आहे. सोनावणे कुटुंबाला त्या फळाने मधुर आठवणही मिळवून दिली आहे.
निरेन आपटे – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 30, 2018 1:04 am

Web Title: pregnant woman want to eat watermelon