News Flash

कला : चित्रभाषेतून मदत!

सध्या रोजच्या ठळक बातम्यांपैकी ठरलेली बातमी म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळाची.

गरिबी, भ्रष्टाचार, दुष्काळ असे विषय चित्रांतून नेहमीच मांडले जातात; पण याच प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी प्रत्यक्षपणे चित्रांचाच वापर केला तर? होय, हे शक्य आहे. चिपळूणमधील प्राध्यापक प्रकाश राजेशिर्के यांची संकल्पना असलेली कार्यशाळा आणि प्रदर्शन यातून मिळणारी मिळकत थेट जाणार आहे दुष्काळग्रस्तांकडे.

सध्या रोजच्या ठळक बातम्यांपैकी ठरलेली बातमी म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळाची. त्यात दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांसाठी ठिकठिकाणचे लोक जमेल तशी मदत करण्याच्याही बातम्या वाचनात येतात. विशिष्ट संस्था, तरुण पिढी, सांस्कृतिक कार्यक्रमांमार्फत लोकांची मदत करण्याची वृत्ती दिसून येते. असाच एक कल्पक उपक्रम काही महिन्यांपूर्वी चिपळूण येथे राबवण्यात आला होता. दुष्काळग्रस्तांना फक्त पैसे देऊन मदत न करता खास दुष्काळग्रस्तांसाठी पैसे कमावण्याचं समाधानही मिळायला हवं. या समाधानाने मिळवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना देण्याचा आनंद वेगळा असतो, म्हणून या हेतूने चिपळूणमधील प्राध्यापक प्रकाश राजेशिर्के यांनी तिथे चित्रकारांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचं स्वरूप अनोखं असल्याने चित्रकारांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

प्रकाश राजेशिर्के हे सह्य़ाद्री स्कूल ऑफ आर्ट्स, सावर्डे या कॉलेजमध्ये शिल्प व प्रतिमानबंध कला, रेखा व रंगकला मूलभूत अभ्यासक्रम आणि कलाशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम हे विषय शिकवतात. त्यांच्या या कल्पक उपक्रमाबद्दल ते सांगतात, ‘‘सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असताना माझ्या नजरेस रोज एक तरी दुष्काळग्रस्त भागासंदर्भातील बातमी पडायची. यासाठी आपण काही तरी करायला हवं असं नेहमी वाटायचं. कलाकार म्हणून दुष्काळग्रस्तांना काही तरी मदत करावी असा विचार यायचा; पण हे काम माझ्या एकटय़ाचं नव्हतं. मग मला एक कल्पना सुचली. आपल्या कलेचा यासाठी वापर केला तर मदत केल्याचा आनंद द्विगुणित होईल. म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक चित्रकारांशी संपर्क केला. चिपळूण येथे त्यांची कार्यशाळा घ्यायची, त्यांनी तिथे चित्रं काढायची आणि त्यांचं प्रदर्शन भरवून त्यातून मिळणारी रक्कम दुष्काळग्रस्त भागांना द्यावी, असा तो उपक्रम होता. ही सगळी माहिती मी चित्रकारांना दिली. त्या सगळ्यांनी या उपक्रमासाठी लगेचच होकार दिला.’’ अशा अनोख्या उपक्रमासाठी कोणताही कलाकार आनंदाने तयार होईल. आपल्या कलेतून सामाजिक कार्य घडत असल्याचं समाधान त्यांनाही मिळणारच होतं. या सगळ्या चर्चेतून ‘कलासंस्कृती आर्ट कार्यशाळा’ची सुरुवात झाली.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सात दिवसांच्या कार्यशाळेत चित्रकारांनी निसर्गाच्या सान्निध्यात चित्रं काढण्याचा मनसोक्त आनंद लुटला. रत्नागिरी जिल्हय़ात चिपळूण तालुक्यात असलेलं गांगरी हे गाव निसर्गाच्या कुशीत आहे. या कार्यशाळेसाठी ही जागा उत्तम ठरली. कार्यशाळेत काढली जाणारी चित्रं प्रदर्शनात मांडली जाणार होती. या प्रदर्शनातून विकत घेतलेल्या चित्रांची अर्धी रक्कम चित्रकाराला आणि अर्धी रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी दिली जाईल, असं कार्यशाळेचे संयोजक प्रकाश राजेशिर्के यांनी चित्रकारांना निमंत्रण देताना आधीच सांगितलं होतं. मानधनाविषयीचा हा मुद्दा सांगूनही अनेक चित्रकारांनी या कार्यशाळेस होकार दिला होता. ही कार्यशाळेची सकारात्मक बाजू होती.

कलासंस्कृती आर्ट कार्यशाळा सात दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या चित्रकारांची राहण्याची सोय करणं आवश्यक होतं. त्यामुळे प्रकाश यांनी तेथील आमदार सदानंद चव्हाण यांची मदत घेतली. त्यांना कार्यशाळा आणि त्याच्या हेतूविषयी सांगितल्यानंतर आमदार चव्हाणांनीही लगेच होकार कळवला आणि त्यांच्या रेस्ट हाऊसमध्ये सगळ्या चित्रकारांची निवासाची उत्तम सोय केली. ठिकठिकाणांहून आलेले ३४ चित्रकार त्यांची कला कॅनव्हासवर सुरेखपणे टिपत होते.

एखादा चित्रकार त्याच्या चित्राशी भावनिकदृष्टय़ा जोडलेला असतो. त्याच्या मनात जे येतं ते तो रेखाटत असतो. भावनिकदृष्टय़ा तो त्या चित्रात गुंतलेला असतो. चित्रकाराची हीच भावनिक बाजू समाजाप्रतिसुद्धा असल्याची या कार्यशाळेच्या माध्यमातून दिसून आली. मानधनासारख्या नाजूक मुद्दय़ाबाबतचं म्हणणं ऐकूनही चित्रकारांनी या उपक्रमास होकार दिला होता. ‘‘या कार्यशाळेत चित्र काढताना विषयाचं बंधन नव्हतं. शिवाय कोणता कागद, माध्यम, रंग वापरायचे याचीही त्यांना मुभा होती, कारण निसर्गाच्या सान्निध्यात कार्यशाळा असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं बंधन ठेवलं असतं तर चित्रकाराला मुक्तपणे त्याची कला रेखाटता आली नसती,’’ असं प्रकाश सांगतात. कार्यशाळेत चित्रकारांनी दोन चित्र काढण्याच्या बंधनाशिवाय इतर कोणतीच आडकाठी नव्हती. गांगरी गावात एकांत असल्यामुळे चित्रकारांना काम करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण लाभलं होतं.

कार्यशाळा असलेलं ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात होतं. आजूबाजूला झाडं, डोंगर वगैरे असताना चित्र काढताना उत्साह आला नसता तरच नवल होतं. या ठिकाणी मांडव घातला होता, जेणेकरून चित्रकारांना शांतपणे पुरेसा वेळ घेऊन चित्र काढता यावं. त्यामुळे वरून सूर्यप्रकाश येण्याचा मार्ग नव्हता; पण चारही बाजूंनी सूर्यप्रकाश योग्य पद्धतीने प्रत्येक चित्रकारापर्यंत पोहोचू शकेल अशा प्रकारे मांडवाचं नियोजन केलं होतं.

३४ चित्रकारांची एकूण ८० चित्रं त्या कार्यशाळेत तयार झाली होती. या चित्रांच्या प्रदर्शनांना मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात झाली आहे. याचं पहिलं प्रदर्शन ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये पार पडलं. सात दिवसांच्या या प्रदर्शनात एक लाख ३५ हजार किमतीची चित्रं विकली गेली. दुसरं प्रदर्शन झालं ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे. इथेही २५ हजारांचं एक चित्र विकत घेतलं. शिवाय इथे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रोज ४०० ते ५०० लोक प्रदर्शन बघण्यासाठी येत होते. तिसरं प्रदर्शन पुण्यामध्ये मोनालिसा कलाग्राम पिंगळे फर्म, कोरेगाव पार्क येथे या आठवडय़ातच पार पडलं. इथेही रसिकांचा प्रतिसाद चांगला होता. ठाणे, पुणे, कोल्हापूरप्रमाणे मुंबईतही दोन ते तीन ठिकाणी प्रदर्शन करण्याबाबतची बोलणी सुरू असल्याचं प्रकाश सांगतात. कलासंस्कृती आर्ट कार्यशाळेची साधारण पाच प्रदर्शनं करण्याचा त्यांचा विचार आहे. शेवटचं प्रदर्शन मात्र चिपळूणमध्ये करणार असल्याचं ते आवर्जून सांगतात. याच कार्यक्रमात प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीची रक्कम आणि त्याचं नियोजन याबाबत सांगण्यात येईल, असंही ते स्पष्ट करतात. हा मोठा समारंभ जुलैमध्ये होईल अशी माहिती प्रकाश देतात. या सगळ्या प्रदर्शनांतून साधारण पाच ते साडेसात लाख इतकी रक्कम मिळण्याचा अंदाज ते व्यक्त करतात.

कार्यशाळा डिसेंबरमध्ये पार पडूनही प्रदर्शन लागायला मे महिना उजाडायला लागला. या उशीर होण्यामागचं नेमकं कारण विचारल्यावर प्रकाश सांगतात, ‘‘चित्रांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. चित्रं काढण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं बंधन ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे कॅनव्हास, वॉटर कलर, ऑइल कलर, कागद अशा विविध साहित्यांचा वापर करत अनेकांनी चित्र काढलंय. अशा वेळी ते चित्र योग्य प्रकारे सुकणं खूप महत्त्वाचं असतं. त्याला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं. शिवाय ही चित्रं प्रदर्शनात लावायची असल्यामुळे त्याला आकर्षक फ्रेम्स करणंही तितकंच आवश्यक असतं. या गोष्टी घाईत करून चालत नाहीत. याव्यतिरिक्त प्रदर्शनासाठी गॅलरी म्हणजे सभागृहाची जागा मिळणंही महत्त्वाचं असतं. त्याच्या मोकळ्या तारखा बघाव्या लागतात. बरेच महिने आधी गॅलरीचं बुकिंग करावं लागतं. त्याशिवाय ती गॅलरी उपलब्ध होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आमची कार्यशाळा डिसेंबरमध्ये होऊनही प्रदर्शन मात्र मे महिन्यात सुरू झाले.’’

आनंद सोनार, जयप्रकाश, जगताप, वासुदेव कामत, रावसाहेब गुरव, जे. जी, पैलवान, प्रकाश कोर्टीकर, विष्णू परीट, प्रतिभा वाघ, ज्योत्स्ना कदम, सयाजीराव नांगरे, एस. निंबाळकर, मनोज साकळे, अनिल अभंगे, अरविंद हाटे, दीपक सोनार, फारुख नदाफ, शिरीष मिटबावकर, शिवाजी म्हस्के, विजयराज बोधणकर, श्रीकांत कदम, गायत्री मेहता, रामचंद्र खरटमल, रेखा भिवंडीकर, वैशाली पाटील, अवधूत खातू, किशोर नादवडेकर, श्रीकांत कांबळे, मंगेश शिंदे, रूपेश सुर्वे, योगेश पवार, मुक्ता पुसाळकर, सुरभी गुळवेलकर, रितेश जाधव, सत्यजित पाटील या चित्रकारांचा या कार्यशाळेत सहभाग होता. लँडस्केप, पोट्र्रेट, अ‍ॅबस्ट्रॅक्ट, भारतीय संस्कृती, सामाजिक प्रश्न असे विविध विषय आणि प्रकार या चित्रकारांनी हाताळले आहेत. विषयाचं बंधन नसल्यामुळेच चित्रांमध्ये वैविध्य आले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात कार्यशाळेची जागा असल्यामुळे काहींना लँडस्केप काढण्याचा मोह आवरता आला नाही. यामध्ये रूपेश सुर्वे या शिल्पकाराचाही सहभाग होता. त्यांनी अतिशय सुंदर शिल्प या कार्यशाळेत तयार केलं होतं.

पाच महिने या चित्रांची योग्य ती देखभाल करण्यात प्रकाश राजेशिर्के यशस्वी झाले आहेत. ८० चित्रे इतके महिने योग्य पद्धतीने जपून ठेवणे, त्यावर धूळ बसू न देणे, त्यांचा रंग फिकट होऊ नये या सगळ्याची त्यांनी उत्तम काळजी घेतली आहे. चिपळूणमध्ये ते शिकवत असलेल्या सह्य़ाद्री स्कूल ऑफ आर्ट्स या कॉलेजच्या गॅलरीमध्ये ही सगळी चित्रं सुस्थितीत ठेवली होती. ‘‘ही चित्रं योग्य ठिकाणी व्यवस्थित राहतील याची काळजी घेणं गरजेचं होतं. सगळी चित्रं एकाच ठिकाणी एकत्र असायला हवी होती. त्यामुळे त्यांना आमच्याच कॉलेजमध्ये जागा मिळवून दिली. शिवाय ही चित्रं प्रत्येक वेळी आणण्या-नेण्याचा खर्चही खूप असतो. तो आटोक्यात आणण्यासाठी कॉलेजच्या गॅलरीचा पर्याय उत्तम वाटला,’’ असं राजेशिर्के सांगतात. चिपळूणमध्ये पार पडलेली कार्यशाळा आणि आता विविध ठिकाणी सुरू असलेले प्रदर्शन यांना मिळणारा प्रतिसाद चांगलाच आहे; पण राजेशिर्के यांना एक खंत वाटते. ते त्याबाबत स्पष्ट करतात, ‘‘खरं तर अशा सामाजिक विषयांशी संबंधित असलेल्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी ठिकठिकाणच्या प्रस्थापित गॅलरींनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा, त्यांनी अशा प्रदर्शनांसाठी थोडी सवलतही द्यावी. त्या प्रदर्शनातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची भावना त्यांनी लक्षात घ्यायला हवी.’’ या प्रदर्शनातून मिळणाऱ्या रकमेतून सभासद विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. या संदर्भात अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनशी संपर्क साधणार आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेचं नियोजन केलं जाईल.

चित्रकला हे माध्यम प्रभावी आहे.  सभोवताली दिसणाऱ्या गोष्टी हेरून  कागदावर अचूकपणे मांडणे ही कला आहे. सामाजिक समस्या चित्रातून नेहमीच मांडली जाते. त्याविषयी एकही शब्द न लिहिता त्या चित्रातून बरंच काही सांगितलं जातं. ही चित्राची ताकद असते, पण याच समस्यांना समोरं जाण्यासाठी चित्रांच्या माध्यमातूनच थोडी मदतही केली जाते, हे कलासंस्कृती आर्ट प्रदर्शनाने दाखवलं आहे.
चैताली जोशी
twitter – @chaijoshi11
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:21 am

Web Title: professor prakash rajeshirke
टॅग : Art
Next Stories
1 रोजगार हमीचा ‘प्रायव्हेट’प्रयत्न
2 निसर्ग : वृक्षोपनिषद
3 कथा : बालमजूर
Just Now!
X