18 October 2018

News Flash

प्रकाशन व्यवसाय : वाचाल तर वाचाल! (भाग ३)

पुस्तक वाचणं आणि वाचण्यास प्रवृत्त करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत.

वाचन कमी झालंय, पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचत नाही अशा अनेक नकारात्मक विषयांवर नेहमी चर्चा होत असते. पण या चर्चाकडे दुर्लक्ष करत पुस्तक वाचकांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने काही साहित्यप्रेमी सकारात्मक पावलं उचलत आहेत.

पुस्तक वाचणं आणि वाचण्यास प्रवृत्त करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. पुस्तक प्रकाशित होतं, काही रसिक वाचक ते पुस्तक बाजारात आल्या आल्या विकत घेतातही. पण ही संख्या फार नाही. चांगली, नवीन, वेगळ्या विषयांची पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवणं आता महत्त्वाचं ठरू लागलंय. ऑनलाइनच्या जमान्यात पुस्तकांचा प्रसार आणि प्रचार करणं हे काही साहित्यप्रेमींना महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच ते हे महत्त्वाचं काम आपुलकीने आणि वाचनसंस्कृती वाढवण्याच्या जिद्दीने करत आहेत. अशा काहींच्या उपक्रमांची, प्रयत्नांची ही ओळख करून घेणं गरजेचं आहे.

आता पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही, ही अलीकडे सातत्याने येणारी सबब आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे खरं तर कदाचित काहींना वेळ मिळत नसेल. पण खरं तर ते पुस्तक ग्रंथालयातून आणणं आणि पुन्हा नेऊन देणं यालासुद्धा वेळ मिळत नाही, हेदेखील त्यामागचं कारण आहे. मग अशावेळी वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचणार कशी? व्याख्यानमाला, लेखकांशी गप्पा अशा काही उपक्रमांमधून हा प्रयत्न सफल होतोय. पण यापलीकडेही जाऊन काही जण जिद्दीने काही उपक्रम राबवत आहेत. नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे त्यापैकीच एक आहेत. ते खऱ्या अर्थाने पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. समाजासाठी काहीतरी करावं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. पण सुदृढ समाज निर्माण करायचा असेल तर त्याला वाचनाशिवाय पर्याय नाही, असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांना वाचनालयाची कल्पना सुचली.

‘माझी पूर्वीपासूनची एक सवय आहे. माझ्या ओळखीत कोणाचा वाढदिवस असला तर मी त्या व्यक्तीच्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींनाही एक मेसेज करायचो. त्यात ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचं नाव असायचं. असं केल्याने माझ्यासह त्या इतरांच्या शुभेच्छाही संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचायच्या. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप नव्हतं. साधेच मेसेज करून शुभेच्छा द्यायचो. असं करत करत माझा संपर्ककक्ष मोठा होत गेला. पण हे सगळं वाचनालय सुरू करण्याच्या कल्पनेच्या आधीचं आहे. पण माझ्या त्या सवयीचा फायदा मला नंतर वाचनालय सुरू करण्यास झाला. ज्याचा वाढदिवस आहे त्याने किमान एक पुस्तक विकत घेता येईल इतकी देणगी वाचनालयासाठी द्यायची, असं मी नंतर ठरवलं. माझ्या या कल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतल्या अनिल देशपांडे या माझ्या मित्राने १५ लाखांची देणगी दिली. त्यामुळे वाचनालय लगेच सुरू करता आलं. त्या सुरुवातीच्या दोन वर्षांत पाच लाख पुस्तकं जमा झाली. यासाठी नाशिकसह महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि देशाबाहेरूनही मदत मिळाली. पुस्तक लिहिणं, ते प्रसिद्ध करणं यानंतर महत्त्वाचं काम असतं ते वाचकांपर्यंत पोहोचवणं किंवा वाचकांनी पुस्तकांपर्यंत पोहोचणं. वय, वेळ आणि अंतर या तीन कारणांमुळे वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. याच विचारांतून २००९ साली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात झाली’, विनायक रानडे त्यांच्या उपक्रमाच्या सुरुवातीबद्दल सांगतात.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम अनोखा आणि वाचकांच्या दृष्टीने सोयीचा आहे. यामध्ये पुस्तकांच्या पेटय़ा वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवल्या जातात. एका पेटीत १०० पुस्तकं असतात. एका पेटीतल्या पुस्तकांची देवाणघेवाण ३५ जणांमध्ये होते. या पेटीत वेगवेगळ्या विषयांची आणि लेखकांची पुस्तकं असतात. चार महिन्यांनी एका ठिकाणची पेटी दुसऱ्या ठिकाणी जाते. याबद्दल विनायक रानडे सांगतात, ‘ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम वाचनालयाला पूरक आहे; पर्यायी नक्कीच नाही. सरासरी विचार करता २०० रुपयाचं एक पुस्तक असेल तर एका पेटीसाठी साधारणपणे २० हजार रुपये लागतात. हा खर्च संपूर्णपणे पुस्तकांसाठी मिळणाऱ्या देणगीतून केला जातो. एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे २० हजार दिले तर त्या पेटीवर त्या देणगीदाराचं नावं असतं. जर दोघांनी १०-१० हजार अशी देणगी दिली तर दोघांच्या नावे ती पेटी फिरते. हा उपक्रम सुरू झाला होता तेव्हा म्हणजे २००९ मध्ये ११ पेटय़ा होत्या. आता २०१७ मध्ये या पेटय़ांची संख्या १५०० वर गेली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्येही हा उपक्रम राबवला जातो. भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अ‍ॅटलांटा, स्वित्र्झलड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी अशा देशांमध्येही या उपक्रमाला चांगली पसंती  आहे.’

कोणताही उपक्रम सुरुवातीच्या काळात प्रयोग म्हणूनच करावा लागतो. ‘प्रतिसाद कसा मिळेल’ किंवा ‘नुकसान होणार नाही ना’ असे विचार करून प्रयोगशील उपक्रमांचा श्रीगणेशा कधीच होत नाही. हे जाणून काही साहित्यप्रेमींनी वाचन चळवळ सक्रिय ठेवल्या आहेत. आता याचं स्वरूप बदलेलं असलं तरी हेतू तोच आहे; पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवणे. आपल्याकडे वाचनालयांची संख्या बरीच आहे. वाचकांनी वाचनालयात यायचं, त्यांना हवं ते पुस्तक घेऊन जायचं, मासिक शुल्क भरायचं आणि नियमाप्रमाणे ते पुस्तक पुन्हा वाचनालयात आणून द्यायचं; हा वाचनालय प्रक्रियेचा सर्वसाधारण साचा आहे. पण काही वाचनालयं यापलीकडे जाऊन विचार करतात. वाचकांना पुस्तकांच्या अधिकाधिक जवळ कसं आणता येईल याचा सातत्याने विचार करत विविध उपक्रम राबवत असतात. त्यापैकीच एक ठाणे जिल्ह्य़ातील बदलापूर शहरातील ‘ग्रंथसखा वाचनालय’. या वाचनालयाचे संस्थापक श्याम जोशी गेले अनेक र्वष साहित्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते सांगतात, ‘आमच्या वाचनालयाच्या ग्रंथपाल वाचकांचं समुपदेशन करतात. अनेकदा पुस्तकांची निवड कशी आणि कुठून करावी हे काही वाचकांना समजत नाही. अशावेळी ग्रंथपाल त्यांना त्याविषयी मार्गदर्शन करतात. त्यांची आवड लक्षात घेत त्यांनी कोणत्या पुस्तकापासून वाचनाला सुरुवात करायला हवी, हे सुचवतात. यामुळे कोरी पाटी घेऊन आलेल्या वाचकाला बरीचशी माहिती मिळाल्यामुळे त्याला वाचनाची योग्य दिशा मिळते. ‘ग्रंथसखा वाचनालया’त कोणत्याही प्रकारचा कडक नियम नाही. पुस्तक विशिष्ट दिवसात परत करणे, पुस्तक उशिरा दिल्याचं शुल्क असे कोणतेच नियम नाहीत. वाचनसंस्कृती वाढवली पाहिजे तर नियम शिथिल करायला हवेत.’

‘ग्रंथसखा वाचनालया’चा आणखी एक साधा पण महत्त्वाचा उपक्रम आहे. वर्तमानपत्र, मासिकांमध्ये पुस्तकांबाबत परीक्षण येत असतात. त्याची भाषा समीक्षणाची असते. ती भाषा सामान्य वाचकांना कठीण वाटत असल्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत ती परीक्षणं सोपी गोष्टीरूप केली जातात. अशा परीक्षणांची एक वही केली आहे. ही वही नवनव्या परीक्षणांनी भरत असते. एखाद्या वाचकाला विशिष्ट पुस्तकाचं परीक्षण वाचायचं असेल तर त्याला ती वही दिली जाते. हा उपक्रम खूप अनोखा आहे. फक्त पुस्तक वाचनाची आवड न लावता त्या पुस्तकाबद्दल जे लिहिलं आहे तेही वाचण्याची गोडी यानिमित्ताने लागते. याशिवाय त्यांचं वाचनालय कवी, लेखकांच्या कार्यशाळा राबवत असतं. ही कार्यशाळा पुस्तकांच्या मजकुराबद्दल तर असतेच, शिवाय त्याचं मुखपृष्ठ, शीर्षक याबद्दलही विश्लेषणात्मक असते. तसंच कॉपीराइट, पुस्तकांच्या आकाराचे प्रकार अशा काही तांत्रिक बाबींबद्दलही या कार्यशाळेत माहिती दिली जाते. या सगळ्या कार्यशाळा विनामूल्य असतात. पुस्तकांच्या प्रदर्शनासह दिवाळी अंकांचंही प्रदर्शन मांडलं जातं. दिवाळी अंकांच्या अंतरंगासह बाह्य़रंगही समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. दिवाळी अंक कसे वाचावेत याबद्दल ग्रंथपाल वाचकांना समुपदेशन करतं. ग्रंथसखामध्ये आता ४२० प्रकारचे दिवाळी अंक असून एकूण प्रती चार हजार इतक्या आहेत. या वाचनालयाच्या ग्रंथपाल अर्चना कर्णिक आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल सांगतात, ‘एखाद्या साहित्यिकाचं निधन झालं तर त्या आठवडय़ांमध्ये त्यांची पुस्तकं  वाचकांना ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी मांडली जातात.तसंच याच्याबद्दलचे लेख नोटीस बोर्डला लावले जातात. आपल्या साहित्यिकांची माहिती लोकांना मिळावी यासाठीचा हा प्रयत्न असतो.’

शहर आणि ग्रामीण भागातील वाचनसंस्कृती असा नेहमी भेद केला जातो. पण इथली वाचनसंस्कृती वेगळी असली तरी त्यांची साहित्याप्रतिची आवड सारखीच आहे. ग्रामीण भागात पुस्तकं पोहोचत नाहीत, तिथली वाचनालयांची अवस्था याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. पण यावर अंतिम उपाय कधीच काढले जात नाही. उपायांवरही चर्चाच केली जाते. पण ही चर्चा न संपणारी आहे. त्यामुळे एका व्यक्तीने ही चर्चा करत वेळ न घालवता एक पाऊल पुढे उचललं आहे. मूळच्या वाईच्या असलेल्या प्रदीप लोखंडे यांनी ‘ग्यान की’ हा उपक्रम २०१० मध्ये सुरू केला आहे. ग्रामीण भागांतल्या माध्यमिक शाळांमध्ये वाचनालयं सुरू करायची हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील माध्यमिक शाळाच का, या प्रश्नाचं प्रदीप लोखंडे उत्तर देतात, ‘माध्यमिक शाळांमध्ये ११ ते १६ या वयातील मुलं असतात. या वयात त्यांची आकलन क्षमता चांगली असते. या वयात त्यांच्या हाती पुस्तक देणं मला महत्त्वाचं वाटतं. या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. यामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं असतात. ही वाचनालयं विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी चालवत असतात.’

प्रदीप लोखंडे यांनी १ हजार ७८० दिवसांमध्ये ३ हजार ७३० शाळांमध्ये वाचनालयं सुरू केली आहेत. हा उपक्रम आतापर्यंत १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक वाचनालयात १९२ पुस्तकं आहेत. देणगी म्हणून अशा वाचनालयांमध्ये बरीच पुस्तकं मिळाली आहेत. ज्यांनी वाचनालयात पुस्तकं दिली आहेत अशा एक लाख ९३ हजार जणांना पत्र लिहून त्यात पुस्तकाबद्दल लिहिलं आहे. तसंच त्यांनाही पुस्तक देणाऱ्यांकडून १ लाख ७५ हजार पत्रं मिळाली असल्याचं लोखंडे सांगतात. डॉ. माशेलकरांनी पाच हजार पुस्तकं, तर सुभाष चंद्रा यांनी चार हजार पुस्तकं आमच्या उपक्रमास देणगी म्हणून दिली आहेत. वाचनालय सुरू करण्याबरोबरच तिथल्या मुलांना आम्ही फक्त वाचायलाच शिकवत नाही तर लिहा आणि बोला असंही शिकवतो. ‘रीड, राइट अ‍ॅण्ड स्पीक’ अशी आमच्या उपक्रमाची टॅगलाइनच आहे. त्यामुळे त्यादृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात. शाळांमधील विद्यार्थी विविध क्षेत्रांतील मोठमोठय़ा व्यक्तींना भेटून त्यांच्याशी संवाद साधतात. अशा मोठय़ा हस्तींना पत्रंही लिहितात. काही कलाकारही अशा वाचनालयांना भेटी देतात. विद्यार्थी त्यांच्याशीही संवाद साधतात. या सगळ्यामुळे त्यांच्या मनातली भीती दूर होते. विद्यार्थ्यांना वाचनासह व्यक्तिमत्त्व विकास होण्यासही मदत होते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सवय लहान वयातच लागली तर उत्तम असतं. त्यांची विशिष्ट गोष्टीबद्दलची आवड त्या वयात विकसित होत असते. त्याबद्दलचा एक दृष्टिकोन आकार घेऊ लागतो. विचारप्रणालीची विशिष्ट पद्धत ठरते. प्रदीप लोखंडे यांच्याप्रमाणेच ग्रंथसखाच्या ग्रंथपाल अर्चना कर्णिक यांचंही हे म्हणणं आहे. त्या लहान मुलांसाठी करीत असलेल्या उपक्रमाबद्दल सांगतात, ‘वार्षिक परीक्षा संपली की दोन महिन्यांच्या सुट्टीत वाचनालयात लहान मुलांसाठी खास वातावरण तयार केलं जातं. साध्या बाहुल्या, बोलक्या बाहुल्या मांडल्या जातात. वाचनालयात मोठय़ा प्रमाणावर बालसाहित्य ठेवलं जातं. या दोन महिन्यांच्या या उपक्रमाचं उद्घाटनही लहान मुलांच्याच हातूनच केलं जातं. बाहुल्यांच्या हातात पुस्तक दिलं जातं. त्या ते पुस्तक लहान मुलांना देतात. बाहुली आपल्याला पुस्तक देतेय ही भावना त्यांना सुखावणारी असते. या संपूर्ण वातावरणात ती मुलं छान रमलेली असतात. मुलांपर्यंत साहित्य पोहोचवणं, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणं, वाचनाची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा हेतू आहे.’

लहान मुलांमध्ये आताच साहित्याची आवड निर्माण झाली तरच ती मोठेपणी साहित्याचा अधिकाधिक आस्वाद घेतील. याच दृष्टीने विनायक रानडे हेदेखील प्रयत्न करीत असतात. त्यांच्या पेटय़ांपैकी काही पेटय़ा खास लहान मुलांसाठीही असतात. त्यामध्ये बालसाहित्यातील विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असतो. लहान मुलांसह कारागृह, दवाखाने, शाळा, कॉलेज अशा विविध ठिकाणीही ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राज्यभर राबवला जातो. त्याशिवाय रानडे ‘पुस्तक द्यावे आणि पुस्तक घ्यावे’ हाही उपक्रम राबवतात. ‘एका व्यक्तीचं एखादं पुस्तक वाचून झालं असेल आणि ते पुस्तक त्या व्यक्तीला आता नको असेल तर त्या व्यक्तीने ते पुस्तक आम्हाला आणून द्यायचं आणि आमच्याकडचं एक पुस्तक घेऊन जायचं. तो जेवढी पुस्तकं देईल तेवढी पुस्तकं त्याला आमच्याकडून मिळणार, अशी पद्धत आहे’, असं ते सांगतात.

पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचावं यासाठी केले जाणारे हे प्रयत्न स्तुत्यच आहेत. अशा प्रकारची वाचन चळवळ ठिकठिकाणी असायला हवी. साहित्यावरचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जिद्द यामुळे साहित्यप्रेमी सतत झटताना दिसतात. शिवाय या सगळ्याला वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असतो. कोणत्याही संस्थेमध्ये उपक्रमशीलता हवी, हे श्याम जोशींचं वक्तव्य अगदी बरोबर आहे. पुस्तकं वाचली जात नाहीत, नवे वाचक तयार होत नाहीत, वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे अशी चर्चा करण्यापेक्षा विविध उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर करणं महत्त्वाचं आहे. तसंच वाचकांनीही त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तरच वाचनसंस्कृतीचा खऱ्या अर्थाने प्रसार, प्रचार झाला असं म्हणता येईल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11

First Published on November 17, 2017 1:06 am

Web Title: publication business keep reading part 3