14 October 2019

News Flash

या साखळीचा पर्दाफाश केव्हा? (पंजाब)

परवाना रद्द केल्याच्या घटनांवरून पंजाबमध्ये औषध निरीक्षकांना धमक्यांचे दूरध्वनी नेहमीच येत असतात.

खबर राज्यांची
गोविंद डेगवेकर – response.lokprabha@expressindia.com

महिला औषध निरीक्षक अधिकाऱ्याच्या हत्येतून पंजाबमधल्या अमली पदार्थाच्या वास्तवाचं भयाण चित्र समोर आलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच यामागे असलेली आंतरराष्ट्रीय साखळी तोडता येईल.

पंजाबमध्ये एकूण ४० औषध निरीक्षकांपैकी सहा महिला आहेत. त्यांच्यापैकी नेहा शौरी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. शौरी यांची हत्या झाली, त्या दिवशी औषध निरीक्षक बबली कौर शौरी यांच्या कक्षाशेजारील खोलीत होत्या.

‘अचानक कक्षातून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. शौरी यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली होती. मी जाऊन पाहिले तर शौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्या घटनेने काही क्षण आम्ही सुन्न होऊन  गेलो होतो’. बबली कौर सांगत होत्या.

परवाना रद्द केल्याच्या घटनांवरून पंजाबमध्ये औषध निरीक्षकांना धमक्यांचे दूरध्वनी नेहमीच येत असतात. परंतु त्यासाठी कुणीतरी आपला जीवच घेईल, असे कधी वाटले नव्हते. त्या दिवसापासून बबली कौर या खटल्यांसाठी न्यायालयात हजर राहतात, पण आजूबाजूला कोणीतरी दबा धरून बसल्याची भीती मनात सतत असल्याचेही त्या सांगतात. २०१५ साली एका औषध दुकानदाराने परवाना रद्द केल्यावरून आत्महत्या केली होती. अर्थात ही कारवाई कौर यांच्या अधिकार कक्षेत येत होती. त्यासाठी कौर यांना पोलिसांसमोर कबुलीजबाब देण्यासाठी हजर राहावे लागत असे वा पोलीस अधिकारी त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांचे म्हणणे नोंदवून घेत. म्हणजे २०१५ साली औषध दुकानदाराला आत्महत्या करायला कौर यांनी भाग पाडले, असा आरोप त्यांच्यावर होता.

पंजाबमधील बहुतेक शहरांत काही औषध दुकानांमध्ये कमी दर्जाची औषधे ठेवली जातात. अर्थात त्यांचा वापर नशेसाठी केला जातो. शहरातील या साऱ्या प्रकरणांमागे कोण सूत्रधार याचा पत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही, किंबहुना ही गोष्ट नेहमीच गुलदस्त्यात राहते. शहरांसारखी ग्रामीण भागातील स्थिती आहे. सीमेनजीकच्या गावांमध्ये नेहमीच अफू आणि हेरॉइनची तस्करी सुरू असते. अनेकदा शेतामध्ये अमली पदार्थ दडवलेले असतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी शेतात सफेद रंगाची पावडरची पाकिटे पिकांच्या मधोमध टाकण्यात आलेली होती. ती कोणी टाकली, का व कसे याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अमली पदार्थ हे पाकिस्तानातून येतात, हा सार्वत्रिक समज आहे. परंतु खरी गोष्ट वेगळीच आहे. अफगाणिस्तानात अफूची शेती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्यानंतर अफूची पाकिस्तानात वाहतूक केली जाते आणि नंतर त्याची भारतात तस्करी होते, असे गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यासाठी कुरिअर सेवेचा उपयोग केला जातो. शेतात टाकलेली पांढऱ्या पावडरीची पाकिटे काही जण घरी आणतात. त्यानंतर ती ‘कुरिअर’ने शहराच्या ठिकाणी पाठवली जातात. हे काम इतक्या गुप्त पद्धतीने पार पाडले जाते, की त्याचा थांगपत्ताही कोणास लागत नाही. या साऱ्या तस्करी साखळीतील देशांतर्गत सूत्रधार कोण आहे, याचा छडा अद्याप लागलेला नाही, ही मोठी आश्चर्याची बाब आहे, असे मत एका सुरक्षा अधिकाऱ्याने नोंदवले.

अमली पदार्थाच्या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय साखळी आहे. सीमा भागातून अफूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होत असते. हे सारे सुरक्षा जवानांच्या नजरेतून कधी कधी सुटते. कारण सीमेवरील तारेच्या कुंपणांमध्ये काही प्रमाणात त्रुटी आहेत. त्यातून तस्कर भारतीय भूमीत शिरतात. खासकरून हिवाळ्यात अमली पदार्थाच्या तस्करीत वाढ झालेली असते. कारण सीमा भागांत दाट धुके पडते. या धुक्यात ३० ते ५० मीटर अंतरावरीलही गोष्ट दृष्टीस पडत नाही. त्याचा फायदा हे तस्कर उठवतात. अर्थात हे तस्कर पाकिस्तानातील असतात. त्यांचा भारतातील काही शेतकऱ्यांशी संपर्क असतो. कारण पोलिसांना काही शेतकऱ्यांकडे पाकिस्तानातील ‘सिमकार्ड’ आढळली होती. तस्करी दरम्यान धोक्याची सूचना देण्यासाठी वा अमली पदार्थ सुरक्षित ठिकाणी लपविण्यासाठी शेतकऱ्यांकडून माहिती मिळविण्यासाठी तस्करांनी सिमकार्ड आम्हाला दिलेली होती, असे एका शेतकऱ्याने तपासादरम्यान सांगितले होते. याशिवाय पाकिस्तानातून येणाऱ्या रेल्वेच्या मालगाडीला जोडण्यात आलेल्या काही डब्यांमध्ये अमली पदार्थ सापडले होते. याचा अर्थ पंजाबातील अमली पदार्थ सेवन हे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे, याला सीमा भागातील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेची ढिलाई आणि ही समस्या मुळासकट उपटून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहेत.

मोहालीजवळील खरार येथे औषध निरीक्षक नेहा शौरी यांची एका औषध दुकानदाराने केलेली हत्या, ही वाटते तितकी सहज घटना नाही. यामागे अमली पदार्थ तस्करीतील आंतरराष्ट्रीय साखळी आहे. नेहा शौरी यांनी ही साखळी तोडण्यासाठीचे पहिले पाऊल उचलले आणि ते पाऊल त्यांच्या जिवावर बेतले. भविष्यात अशी पावले निर्भयपणे उचलायची की राज्यात जे काही घडत आहे, ते उघडय़ा डोळ्यांनी पाहायचं, या प्रश्नाचे उत्तर पंजाबमधील सत्ताधारी कधी देणार, याचीच प्रतीक्षा अखिल पंजाबवासीयांना आहे.

First Published on May 10, 2019 1:02 am

Web Title: punjab youth drugs problem