शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कचरा संकलनस्थळी भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून बालिकेचा केलेला अंत. रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्नात अपघातात युवकाचा गेलेला बळी. भटक्या कुत्र्यांच्या झुंडी अंगावर आल्याने त्यांच्या चाव्यांनी जखमी होण्याचे वाढत चाललेले प्रमाण. श्वानदंशाचा महागडा उपचार.. अशा अनेक आपत्तीजनक घटनांमुळे करवीरनगरीतील समस्त जनता ‘..कुत्रे आवर’ अशी संतप्तजनक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसते.

केवळ कोल्हापूरच नव्हे तर खेडोपाडय़ातील भटकी कुत्री ही गंभीर समस्या उद्भवली आहे. याला निष्क्रिय प्रशासन जसे कारणीभूत आहे तसेच जनतेचे वर्तनही जबाबदार आहे. रात्रीच्या वेळी नव्हे तर भर दिवसाही कुत्र्यांच्या झुंडी कधी थेट समोरून हल्ला चढवतात तर कधी अचानकपणे त्यांच्याकडून हल्ला होत असल्याने सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. या कुत्र्यांनी जगणे मुश्कील केले आहे. त्यांच्या जीवघेण्या हल्ल्याने प्राण गमवावे लागल्याच्या घटना ताज्या आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या झूम कचरा प्रकल्पस्थळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने बालिकेचे लचके तोडून यमसदनी पाठवले होते. गेल्याच आठवडय़ात भटक्या कुत्र्याला चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरून चाललेल्या युवकाचा अपघाती बळी गेला.

udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

भटक्या कुत्र्यांकडून होणारे हल्ले, त्यातून वाढणाऱ्या समस्या यांचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कुत्र्यांच्या चाव्यांमुळे अ‍ॅॅन्टी रेबिज व्हॅक्सिन या नावाची लस घ्यावी लागते. त्यासाठी दीड-दोन हजार रुपयांचा भरुदड सोसावा लागतो. अनेकदा ही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी होत असतात. पण तरीही प्रशासन पुरेशा प्रमाणात दक्ष राहिले, असे कधीच दिसले नाही.

भटक्या कुत्र्यांबरोबर पाळीव कुत्र्यांचाही त्रास वेगळाच आहे. समर्था घरचे हे श्वान ठरावीक वेळी रस्त्यावर फिरावयास नेले जातात. रस्ता, बगीचा, सार्वजनिक जागा अशा ठिकाणी ते शौच करतात. त्याची स्वच्छता होत नसल्याने दरुगधी कायम राहते. शौचामुळे पादचारी, वाहनचालक घसरून पडून जखमी झाल्याच्या तक्रारी आहेत. व्हाइट कॉलर मंडळींकडून सुरू असलेले श्वानाचे उपद्व्याप आटोक्यात कसे आणावयाचे, ही शहरी भागातील नागरिकांची चिंता आहे. याच मुद्दय़ावरून प्रभातफेरीसाठी आलेले लोक आणि श्वानाचे मालक यांच्यात जुंपल्याचे प्रकार नित्याचे बनले आहेत. कोल्हापुरातील छत्रपतीच्या वाडय़ाच्या परिसरात कुत्र्यांपासून अशा प्रकारचा उपद्व्याप सुरू झाल्याने अशा मंडळींसाठी दरवाजा बंद करावा लागल्याचे निरीक्षण प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई नोंदवतात.

नागरिकांचे वर्तनही भटकी कुत्री वाढविण्यास कारणीभूत आहे. रस्तोरस्ती उभ्या राहिलेल्या चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि खेडोपाडय़ात चिकन विक्रीसाठी उभ्या राहणाऱ्या वाहन्यांकडून मांसाचे तुकडे उघडपणे बाजूला फेकले जातात. साहजिकच या परिसरात भटक्या कुत्र्यांचा कल्ला सुरू होतो. त्यातून कुत्री िहस्र स्वरूप धारण करीत असून त्यांच्याकडून िहसक घटना घडत असून नवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत.

भटक्या कुत्र्यांना आवर घालायचा तर त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे निर्बीजीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे कोल्हापूर महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. २००९ साली पाच हजार पाचशे कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले. त्यानंतर ही बाब खर्चीक असल्याचा शेरा मारला गेल्याने बासनात गुंडाळली गेली आहे. लोकक्षोभ वाढू लागल्यानंतर आता महापालिकेने एक इमारत स्वयंसेवी संस्थांना देण्याची तयारी चालविली आहे. ऑगस्ट महिन्यात या इमारतीत निर्बीजीकरण प्रक्रिया स्वयंसेवी संस्थांकडून मोफत व कायमस्वरूपी होणार आहे. पण तोपर्यंत तरी करवीरकरांच्या मागे लागलेले भटक्या कुत्र्यांचे लचांड सुटण्याची चिन्हे नाहीत.
दयानंद लिपारे – response.lokprabha@expressindia.com