वाढते नागरीकरण आणि शहरांचा झालेला अमर्याद विस्तार यामुळे माणसाबरोबर पाळीव प्राण्यांची गुणात्मक वाढ होण्याऐवजी नकारात्मक वाढ ही मानवी जीवनास अपायकारक ठरत आहे. मानवाने आपल्या बरोबर काही प्राण्यांचा उपयुक्त म्हणून सहजीवनात समावेश केला. गाई, म्हशीसोबतच रखवालीसाठी त्यातल्या त्यात इमानदार प्राणी आणि थोडासा िहस्र असलेल्या श्वानाची संगत माणसाला उपयुक्त ठरली. मात्र आजही श्वानाची संगत महागात पडत असताना दिसत आहे.

मानव राना-वनात वस्तीसाठी राहत असताना चोरा-चिलटापासून संरक्षण व्हावे, किमान शत्रूची चाहूल लागावी यासाठी कुत्रा या प्राण्याची मदत घेऊ लागला. आजही एक शौक म्हणून या प्राण्याकडे पाहिले जाते. आजच्या घडीलाही श्वानाच्या बाजारपेठेत दहा हजारांपासून लाखा-दोन लाखांचे व्यवहार या कुत्र्यांच्या देवघेवीत होत असल्याचे दिसते. यामागे श्रीमंती थाट तर आहेच, पण एक शौक म्हणून याकडे पाहिले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी डॉगशोचे आयोजन करून या माध्यमातून नवीन अर्थकारण उदयाला आले आहे.

मात्र शहरातील लोकवस्ती अस्ताव्यस्त प्रमाणात जशी वाढत गेली तशी भटक्या कुत्र्यांची समस्याही वाढत गेली. आजच्या घडीला सांगली महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या २८ हजार ते ३० हजारच्या घरात आहे. दरवर्षी या कुत्र्यांच्या संख्येत वाढच होत असून याचे परिणाम लहान मुलांवर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी सांगलीत एका बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या उत्तरप्रदेशातील रखवालदाराची मुलगी सुंदरी भारती या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या कुत्र्यांनी अक्षरश: या मुलीला जिवंतपणी फाडून खाण्याचा प्रकार घडला. दोन दिवसाच्या झुंजीनंतर या मुलींचा मृत्यू झाला. याच पद्धतीने मिरजेजवळ असलेल्या कत्तलखान्याजवळील वड्डी येथेही एका मुलीला आपला जीव या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वर्षांपूर्वी गमवावा लागला.

शहराला भटक्या कुत्र्यांची समस्या आजकाल भेडसावत नसून गेली कित्येक वर्ष हा प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. महापालिकेचे श्वान पथक कार्यरत आहे, मात्र या पथकाकडे श्वान पकडण्यासाठी केवळ दोन कर्मचारी तनात आहेत. मात्र त्यांनाही श्वान पकडण्याचे खास प्रशिक्षण दिलेले नाही. गेल्या वर्षी शहर सुधार समितीचे कार्याध्यक्ष अमित िशदे यांनी मुलीचा बळी गेल्यानंतर भटक्या कुत्र्यांची समस्या महापालिकेला कळावी यासाठी एक श्वान आरोग्य विभागात नेऊन सोडले. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेता प्रशासनाने त्यांच्यावरच फौजदारी करण्याची तप्तरता दाखवली.

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी त्यांना मारून टाकणे हा यामागील उपाय आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र त्यांची वाढ रोखणे हे तरी शक्य आहे. यासाठी कुत्र्यांचे निर्बजिीकरण करणे म्हणजेच नसबंदी करणे शक्य आहे. मात्र यातही महापालिकेच्या प्रशासनाची दिरंगाई पुढे येत आहे. निर्बजिीकरणासाठी किती रक्कम खर्च करायची यावरूनही वाद आहेत. सेवाभावी संस्था यासाठी पुढाकार घेण्यास तयार असताना त्यांची नेमकी योजना काय आहे याची दखल घेण्याची मानसिकता आरोग्य विभागाची दिसत नाही. स्वयंसेवी संस्थेने भटक्या कुत्र्यांचे निर्बजिीकरण करण्यासाठी ४५० रुपयांचा खर्च दर्शविला असताना आरोग्य विभाग मात्र ७५० रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे सांगत आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही शून्य असल्याचे दिसते.

भटक्या कुत्र्यांचे अन्नस्रोत थांबविणे हासुद्धा उपाय आहे. मात्र आज शहरात रस्त्याकडेला मांसाहारी पदार्थाची विक्री करणाऱ्या गाडय़ा पदोपदी आपणास पाहण्यास मिळतात. या गाडय़ांवरील चिकन ६५चे टाकावू पदार्थ तसेच रस्त्याकडेला टाकण्यात येतात. यावरही ही भटकी कुत्री जगत असल्याचे दिसत आहे. याशिवाय घन कचऱ्याचे वर्गीकरण न करता मिळेल तसा कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. या कचऱ्यात अनेक मृतप्राणी तसेच टाकलेले आढळतात. यावर ताव मारणारी कुत्री अधिक िहस्र बनल्याचे चित्र आहे. मिरजेजवळील बेडग रोड आणि सांगलीजवळील समडोळी रोड येथील कचरा डेपोवर िहस्र श्वानांची फौज पाहण्यास मिळते.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात प्रामुख्याने लहान मुले हे लक्ष्य असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. विशेषत: घराबाहेर खेळत असलेली मुले, मॉìनग वॉकसाठी पहाटे बाहेर पडलेले लोक यांच्यावर या भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ८० टक्के हल्ले हे लहान मुलांवर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यातील काही हल्ले हे गंभीर स्वरूपाचे असतात तर काही किरकोळ. मात्र यामुळे मुलांच्या मनात कुत्र्याबद्दल निर्माण झालेली अढी आयुष्यभराची ठरते. याशिवाय अचानकपणे दुचाकीच्या आडवे आल्याने अपघातही होत आहेत. काही अपघाती मृत्यूला भटकी कुत्रीच कारणीभूत झाल्याचे दिसून येते.

महापालिकेने शहरातील कुत्र्यांची गणनाच केलेली नाही. कायद्याने पाळीव प्राण्यांना क्रमांक देणे आवश्यक आहे. ज्या कुत्र्यांना मालक नसतील त्यांच्यासाठी स्वतंत्र कोंडवाडा करून त्यामध्ये त्यांचे निर्बजिीकरण आणि संगोपन केले तरच ही समस्या सुटेल अन्यथा आणखी काही दिवसांनी ही समस्या विक्राळ स्वरूप घेईल अशी धास्ती वाटते.
दिगंबर शिंदे – response.lokprabha@expressindia.com