News Flash

आगिनगाडी झाली दुधाची गाडी

आंध्र प्रदेशमधील रेनीगुंठाहून दिल्लीला हजरत निझामुद्दीनपर्यंत रेल्वेने पाठवले दूध

संग्रहित छायाचित्र

सुनिता कुलकर्णी

‘झुकझुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे गाणं ज्यांनी ज्यांनी लहानपणी ऐकलं आहे, आणि त्या गाण्यावर बालडान्स केला आहे, सगळ्यांची ती गाडी आता ‘आगिनगाडी’ राहिली नाही आणि ती आता ‘धुरांच्या रेषा’ हवेत काढत नाही हे खरं असलं तरी सध्याच्या करोनाकाळात ती दुधाची गाडी झाली आहे.

रेल्वेच्या साऊथ सेंट्रल झोनने २६ मार्च रोजी आंध्र प्रदेशमधील रेनीगुंठाहून दिल्लीला हजरत निझामुद्दीनपर्यंत दूध पाठवून दूध दुरांतो या करोनाकाळातील विशेष सेवेची सुरूवात केली. या विशेष ट्रेनला सहा टँकर आहेत. एका टँकरमधून ४० हजार लीटर दूध वाहून नेलं जातं. म्हणजे रोज अडीच लाख लीटर दुधाची वाहतूक केली जाते.

ही दूध स्पेशल दुरांतो एक दिवसाआड चालवली जाते. टाळेबंदीच्या काळात तिच्या ४२ फेऱ्या झाल्या असून तिने १.४ कोटी लीटर दूध दिल्लीत पोहोचवलं आहे. तिला ताशी ११० किलोमीटरच्या वेगाने दिल्ली पोहोचायला ३६ तास लागतात. दूध दुरांतोच्या सहा डब्यांची आतली रचना स्टेनलेस स्टीलची आहे. दुधाची वाहतूक करण्याचा हा स्वस्त, वेगवान आणि सुरक्षित पर्याय आहे, असं रेल्वेमंत्री सांगतात.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या देशाला जोडणाऱ्या रेल्वेचं आपल्या सगळ्यांनाच कौतुक असतं. मुंबईत तर लोकलने रोजच्या रोज युरोपातल्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येइतके प्रवासी ये जा करीत असतात. प्रचंड लोकसंख्येची, सामानाही वाहतूक करणारी रेल्वे ही आपल्याकडची प्रचंड यंत्रणा आहे. मेट्रो, मोनो या तिच्या ग्लॅमरस बहिणी आणि बुलेट ट्रेन हा तिचा येऊ घातलेला उधळ्या भाऊ चर्चेत असला तरी डब्यांना डबे जोडलेली नागमोडी वळणं घेत जाणारी रेल्वेच जास्त कामाची ठरली आहे. एक दोन वर्षांपूर्वी दुष्काळाच्या काळात लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचंही अनेकांना आठवत असेल.

तर आता तीच आपली रेल्वे करोनाकहरात प्रचंड काम करत आहे. आपापल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्याच्या महत्त्वाच्या कामाबरोबरच रेल्वेने या काळात दुधाबरोबरच धनधान्य, भाजीपाला या अत्यावश्यक वस्तूंचीही वाहतूक केली. एरव्ही ही ती रेल्वेनेच होत असते. पण देश ठप्प असताना रेल्वे लोकांचं घरातलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी मालवाहतूक करीत होती. रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार करोना काळात २४ मार्चपासून २२ मे पर्यंत रेल्वेच्या २३.२ वॅगनमधून वाहतूक झाली. त्यातून १३.५ दूध, धान्य अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली गेली.

एवढंच नाही तर करोनाच्या सुरूवातीच्या काळात पीपीई कीट्सची कमतरता असल्याचं लक्षात आल्यावर रेल्वेने पीपीई कीट्सची निर्मिती सुरू केली. मध्ये रेल्वेच्या मुंबईतल्या परळ येथील वर्कशॉपमध्ये हॉट एअर सीम सीलिंग टेप पद्धतीने पीपीइ कीट्सचं उत्पादन केलं जातं. हे रेल्वेने विकसित केलेलं नवं तंत्रज्ञान आहे. त्याबरोबरच रेल्वेने मुखपट्ट्या, सॅनिटायझर, वैद्यकीय बेड, स्टूल यांचंही या काळात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं आहे. रेल्वेने एका ऑटिस्टिक बाळासाठी अजमेरहून मुंबईला उंटिणीचं दूध पोहोचवल्याची बातमीही प्रसारमाध्यमांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:31 pm

Web Title: railway is became milk cart lokprabha article aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown Memories : मालवणच्या छोटेखानी फिल्ममेकर्सची पडद्यामागची कहाणी
2 डॉक्टरच खरे हिरो…
3 एक तरी वारी अनुभवावी…
Just Now!
X