पाऊस मला तसा फारसा आवडत नाही. पावसात घराबाहेर निघायची इच्छाच होत नाही अजिबात. पाऊस फक्त खिडकीत बसून बघितला की छान वाटतं. पाऊस म्हणजे नुसता चिखल, वाहतुकीची कोंडी असंच काहीसं समीकरण वाटतं मला. पण त्या दिवशी मात्र वेगळाच अनुभव आला मला.
आईकडे जाताना थोडासा पाऊस सुरू झाला आणि अचानक पावसाचा वेग वाढला. तसाच पटकन रेनकोट अंगावर चढवला. पाऊस रिमझीम सुरू होता, पण का कुणास ठाऊक कुठेच थांबायची इच्छा होत नव्हती. रस्त्यावरची वर्दळ पावसामुळे काहीशी कमी झाली. काही जण झाडाचा, दुकानाचा आडोसा घेत थांबले. पण मी मात्र कुठेतरी हरवल्यासारखी, पावसात गाडी चालवत रस्त्याने जात होते. अगदी मजेत पावसाचे थेंब चेहऱ्यावर, अंगावर झेलत होते. त्या पावसातही मला एका वेगळ्याच सौंदर्याचा भास होत होता तेव्हा. कुठेतरी पाऊस मला खेचत जात जात होता. खोल, चिंब करून टाकणाऱ्या त्याच्या अस्तित्वात. आणि अचानक..
पाऊस माझ्याशी बोलत असल्याचा भास होऊ लागला मला, तो फक्त माझ्याशी संवाद साधत होता. दिलखुलासपणे एखाद्या प्रियकरासारखा. त्याचे अबोल शब्द कानात गुणगुणल्यासारखे वाटत होते.
तो मला त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देत होता. त्याच्या थेंबाचे शब्द अबोल असूनही बरेच काही सांगू इच्छित होते मला. मग अचानक पावसाचा जोर वाढला, तसा मीही कुठेतरी आडोसा शोधू लागले. आणि थोडय़ाच अंतरावर मला चहाची टपरी दिसली. गाडी एका ठिकाणी लावून, लागलीच मी टपरी गाठली. कोसळणारा मुसळधार पाऊस, आणि हातात गरम चहा. खूप मस्त वाटत होतं. गारव्याला चहाने थोडी ऊब मिळाली. मी त्या क्षणी पूर्वी कधीही न अनुभवलेल्या, आनंदाच्या डोंगरावर उभी होते. सोबत होती ती फक्त बरसणाऱ्या बेधुंद पावसाची.
खूप वर्षांआधीही मला तो असाच भेटला होता बेधुंद. पण त्याचं असं अस्तित्व जाणवलंच नाही तेव्हा, कारण कदाचित प्रवीणची साथ होती तेव्हा मला. त्यानेही मला असंच स्वत:त गुंतवलं होतं. मुसळधार पावसात आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो तेव्हा.. असाच काहीसा वेगळा सुंदर अनुभव होता तो.
तेव्हा पावसाला टाळलं म्हणूनच कदाचित आज मला नव्याने भेटायला आला आहे हा.. स्वत:त गुंतवायला.. मग मीही, माझ्या नकळत बोलायला लागले त्याच्याशी, किती जगावेगळा आहेस रे तू. फक्त देणारा, दातृत्वाने प्रेमाने कंठ कंठ भरलेला, कुणाकडून काहीच न घेणारा, कुणावरही न रुसणारा, माझ्याप्रमाणे इतरांशीही कुठल्या ना कुठल्या रूपात संवाद साधणारा, पाऊस खरंच तू खूप मोठा माणूस सर्वामध्ये रुजून, रुतून बसणारा पाऊस. आणि नकळतपणे, अवेळी भेटलेल्या या पावसासाठी चार ओळी गुंफल्या गेल्या..
अंधाराच्या कुशीतून
उगवली सोनेरी पहाट
कांचन रूपाने
बरसती
पावसाच्या सरी
कधी अलगद,
कधी अवखळ
कधी बरसती धुवाधार
विसावुनि धरणीवर
फुलवूनी तयातून
स्वप्नांचे अंकुर
अश्रू पुसती जनांचे
वाऱ्यासंगे डुलवून
उत्तरा डोंगरे – response.lokprabha@expressindia.com