पावसाच्या विविध गाण्यांशी लहानपणापासून आपण सगळेच जोडले गेलेलो आहोत. अगदी शाळेतल्या पावसाच्या कवितेपासून ते अलीकडच्या हिंदी सिनेमांतल्या गाण्यांपर्यंत प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. यंदाच्या पहिल्या टप्प्यातील पावसाचा गारवा अनुभवू या अशाच काही गाण्यांच्या आठवणींनी.

आपल्या लहानपणीच आपली ओळख पावसाशी होते; ‘चिऊअन काऊ’च्या गोष्टीमधून. जोराचा पाऊस येतो अन् कावळ्याचे शेणाचे घरटे वाहून जाते तर चिऊताईचे मेणाचे घर मात्र तग धरून राहते.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

आपण जरा मोठे होतो व शाळेचे लचांड आपल्या पाठी लागते. अभ्यास, बाईंचा ओरडा हे सारे आपल्या मानगुटीवर बसते. हे काही काळापुरते तरी मानगुटीवरून उठावे म्हणून आपण सर्वानीच लहानपणी आर्जव केलेले असते, ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?’ आणि खरोखरच आपली विनवणी ऐकून पाऊस आला की आपला हट्ट सुरू व्हायचा, ‘ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.’

विद्यार्थी दशेतून तारुण्यामध्ये प्रवेश करताना प्रेयसीच्या आधी आपला सखा होतो तो हाच पाऊस. ‘जिंदगी भर नहीं भूलेंगे वो बरसात की रात, एक अनजान हसीनासे मुलाकात की रात’ किंवा ‘एक लडकी भिगी भागीसी’ अशा गाण्यांमुळे आपल्यालाही धुंद पावसाळी संध्याकाळी आपली मधुबाला मिळावी अशी सुप्त मनीषा जागी होते. आपला सखा झालेला पाऊस कधी तरी अवचित बरसावा व आपल्या प्रेयसीला त्याने आपल्या प्रेमात न्हाऊ घालावे अशी वेडी आशा कित्येकजण मनात बाळगून असतात.

19-lp-filmखूप प्रयत्नांती आपण आपली मधुबाला मिळवतोच. तिला ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ असे सांगताना पाऊस पण आपल्यासोबत असेल तर कित्ती बरे होईल असे वाटते. मुसळधार पावसात एकाच छत्रीमध्ये प्रेयसीला घेऊन फिरण्यात काय थ्रिल असते ते राज व नर्गिसने आधीच पडद्यावर दाखविले असल्याने आपण मुद्दामहूनच छत्री विसरलेलो असतो. प्रेयसीचा तो ओलेता स्पर्श पावसाळी वातावरणाला अजूनच नशिला करून जातो. आणि त्यात जर विजेचा लपंडाव सुरू झाला व प्रेयसी ‘बादल यु गरजता है, डर कुछ ऐसा लगता है’ असे म्हणत आपल्याला घाबरून बिलगली की मिळणारा स्वर्गसुखाचा आनंद पावसाच्या धारांना अमृतधाराच बनवून टाकतो.

प्रियकर व प्रेयसी दोघांनाही एकमेकांचा सहवास अनंत काळासाठी हवाच असतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी दोघेही पावसाचीच मदत घेतात. आपल्याला जरा वेळच व तेदेखील चोरून भेटायला आलेल्या प्रेयसीला थांबविण्यासाठी प्रियकर थेट बरखा राणीला आर्जव करतो, ‘बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा दिलबर जा ना पाए, झूमकर बरसो’ आणि जर अनेक दिवसांच्या विरहानंतर प्रियकर भेटला असेल तर प्रेयसीलादेखील तसेच वाटत असते. ‘बरस बरस रे मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम’ असे सांगणारी ती, पुढे जाऊन हेही म्हणते की, ‘बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात.’

प्रेयसी व प्रियकर दोघांसाठी प्रत्येक ऋतू हा प्रेमऋतूच असतो, पण झिम्माड पावसाची नशाच काही और असते. आपल्या बोलाविण्याखातर काळवेळ न पाहता धावत येणाऱ्या प्रेयसीचे अप्रूप प्रियकराला नसले तरच नवल. म्हणूनच त्याच्या तोंडी नकळत येते, ‘भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची.’

पावसामध्ये एकमेकांच्या मिठीमध्ये विसावताना खटय़ाळ प्रियकर आपल्या प्रेयसीला जेव्हा विचारतो, ‘भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में ऐसी बरसातों में, कैसा लगता है?’ तेव्हा प्रेयसीचे उत्तर असते, ‘ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदन को भीगो के मुझे छेडम् रहे हो.’

पाऊस हा दोघांमध्ये तिसरा असूनदेखील कबाब में हड्डी वाटत नाही ते याच कारणांमुळे.

पावसाची गंमत असते नाही! बाहेरून तो अंग-प्रत्यांग ओलेचिंब करत असतो, पण प्रियकर-प्रेयसीच्या अंतरंगात मात्र मदनज्वर भडकावीत असतो. आणि हा ज्वर चढला की जगाची बंधने झुगारत मन बंड करून उठते व खुशाल गाऊ लागते, ‘आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ, आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ. बादल से छम-छम शराब बरसे, सांवरी घटा से शबाब बरसे’ अशी काहीशी अवस्था झाल्याने प्रेयसीचा पदरदेखील ढळलेला असतो, अगदी ‘नमक हलाल’मधील स्मिता पाटीलसारखा.

पण एखादी प्रेयसी मात्र शालीनतेचा पदर ओढून प्रियकराला आडूनच सुचवू पाहते. ‘ओ सजना, बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अँखियों में प्यार लाई.’ जेव्हा ती सुचविते, ‘हे राजसा, आता मला जास्त दूर ठेवू नकोस.’ आणि तिच्या या आर्जवाला प्रतिसाद देऊन प्रियकर तिथे पोहोचला व त्याच वेळी जर प्रेयसीच्या केसांमधून पाऊस ओघळत असेल तर प्रियकर नकळत गुणगुणतो, ‘न झटको झुल्फ से पानी, ये मोती फूट जायेंगे, तुम्हारा कुछ न बिगडम्ेगा, मगर दिल टूट जायेंगे.’ जणू प्रियकराला हेच सुचवायचे असते की प्रिये, तुझे ओलेते दर्शन मला डोळे भरून साठवून दे.

प्रेयसी व प्रियकराला जसे ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ असे गायला आवडते, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिकच पावसात एकमेकांच्या हातात हात घालून ‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन’ असे म्हणत वरळी सीफेस किंवा मरिन ड्राइव्हला फेरफटका मारायला आवडते. आपल्यापैकी अनेक प्रेमवीरांना हे पटले असेलच.

प्रियकर व प्रेयसी एकदाचे नवरा-बायको होऊन ‘नांदा सौख्यभरे’ या उक्तीप्रमाणे दाम्पत्य जीवन एन्जॉय करू लागतात. अशावेळी ‘अनुभव’ चित्रपटातील तनुजा व संजीव कुमारप्रमाणे खिडकीतील पावसाला साक्षी ठेवत हे नवरा-बायकोचे जोडपे परस्परांवरील विश्वास व प्रेम अजून दृढ करतात. ‘मेरी जान; मुझे जान ना कहो’ असे म्हणत लडिवाळपणे बायको जेव्हा नवऱ्याच्या मिठीत विसावते तेव्हा पावसाचे डोळे पण अजून झरू लागतात.

पाऊस जसा आनंदी क्षणांचा सोबती असतो तसा दु:खद स्मृतींचादेखील. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या गाण्यात आपल्या आईचे कायमचे दुरावणे त्या पावसाच्या साक्षीने नायक अनुभवतो. आपल्या रडण्याला ‘घनव्याकूळ’ असे विशेषण लावून तो उदास दु:खी नायक जणू पावसाला ही आपली बोच बोलून दाखवितो.

तर ‘इजाजत’मधील नायिका ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ या गाण्यात प्रियकराला सांगते, ‘पावसाच्या साक्षीने तू व मी अनुभवलेल्या ओलेत्या रात्री, ज्या अजूनही तुझ्या बिछान्यात विसावलेल्या आहेत त्या मला परत कर.’ ‘सावन के कुछ भिगे भिगे दिन’ त्या राहिलेल्या सामानात आहेत त्या परत कर. ‘एक अकेले छत्री में जब जब आधे आधे भिग रहे थे’ त्याच्याशी निगडित सर्व स्मृती, आनंद ज्या काही गोष्टी आहेत त्या परत कर. थोडक्यात काय तर विभक्त होण्याचे दु:ख अनुभवतानादेखील प्रेयसीला आठवतात ते पावसाळी दिवसच.

पाऊस हा अगदी आपल्या सर्व लहानसहान सुखदु:खात नकळतपणे झिरपलेला असतो. पावसात मनसोक्त भिजलेले प्रियकर व प्रेयसी जेव्हा कालांतराने आजी-आजोबा होतात तेव्हादेखील आपल्या नातवंडाला खेळविताना त्यांना आठवतो तो पाऊसच. ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ हेच गाणे ते आपल्या पुढच्या पिढीला अगदी नकळतपणे शिकवितात. कारण सत्य हेच आहे की माणूस पावसाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवत नाही तर पाऊसच सर्व मनुष्यजातीला त्याच्या तालावर खेळवत असतो.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com