-सुनिता कुलकर्णी
सगळ्यांचंच करोनाच्या आणि टाळेबंदीच्या बाबतीत ‘जोर का झटका धीरेसे लगे’ असं झालं आहे. त्यामुळे टाळेबंदी सुरू झाल्यावरचं वागणं आणि आताचं वागणं बदलत गेलं आहे. सुरूवातीला तो धक्का होता, भीती होती, अनिश्चितंता होती. नोटाबंदीच्या काळातल्या पैसे आहेत, पण हातात चलन नसल्यामुळे खरेदी करता येत नाहीये, रांगा लावाव्या लागताहेत या अनुभवातून गेलेल्या लोकांनी टाळेबंदी जाहीर होत असतानाच्या काळात सपाटून खरेदी केली. त्यामुळे ठिकठिकाणची दुकानंच्या दुकानं ओस पडली. पण आता करोना आपल्याबरोबर असणारच आहे आणि टाळेबंदी स्वीकारावी लागणार आहे असं लक्षात आल्यावर लोकांचा खरेदीचा कल बदलतो आहे, असं इंडियन एक्स्प्रेसच्या आशिष आर्यन आणि प्रणव मुकुल या दोन वार्ताहरांचं म्हणणं आहे.
आपल्या बातमीत ते म्हणतात की त्यांनी पाहणी केलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये लोकांची टाळेबंदीच्या सुरूवातीच्या काळातली खरेदी आणि नंतरच्या काळातली खरेदी बदलत गेली आहे. सुरूवातीच्या काळात लोक जीवनावश्यक अन्नधान्य खरेदी करत होते तर आता बिस्किटे, चिप्स यांच्याबरोबरच ‘रेडी टू इट’ म्हणजेच दोनपाच मिनिटात शिजवून लगेचच खाता येईल अशा अन्नपदार्थांच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.
टाळेबंदीच्या सुरूवातीच्या दहा दिवसांच्या काळात तांदूळ, डाळी, तेल, पिठं, साखर, मीठ या घटकांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. परत हे घटक लौकर मिळतील न मिळतील म्हणून सगळ्यांनीच ते गरजेपेक्षाही मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवले.
टाळेबंदीच्या पहिल्या तीनचार दिवसातच दूध तसंच दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या एका मोठ्या ब्रॅण्डच्या विक्रीत दहा टक्के वाढ झाली. तर टाळेबंदीच्या पहिल्याच आठवड्यात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या विक्रीमध्ये ५० टक्के वाढ झाली. फ्रोजन म्हणजेच गोठवलेल्या पदार्थांच्या विक्रीत तर १०० टक्के वाढ झाली.
पण टाळेबंदीला महिना झाल्यानंतर मात्र नूडल्स, वेफर्स याबरोबरच ‘रेडी टू इट’ प्रकारच्या पटकन करता येतील अशा पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. रोजचं जगणं सोपं, सुटसुटीत करण्यासाठी लोक असे पटकन तयार करता येतील असे पदार्थ जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांचे असे इन्स्टंट तसेच ‘रेडी टू इट’ पदार्थ दुकानादुकानांपर्यंत पोहोचवणारी साखळी सध्या विस्कळीत झालेली असल्यामुळे लोकांनी स्थानिक ब्रॅण्डचे पदार्थ घ्यायला सुरूवात केली आहे. थोडक्यात काय तर करोनाशी नाही, पण टाळेबंदीशी जुळवून घेत लोकांनी जगायला सुरूवात केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 1:30 pm