गृहनिर्माण क्षेत्रात अवतरलेल्या तथाकथित मंदीची झुळूक ठाण्यापर्यंत पोहोचेल आणि येथील घरांचे दर कधी तरी खाली कोसळतील, अशा स्वप्नरंजनात राहणाऱ्या ग्राहकांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भ्रमनिरास होत आला आहे. ठाणे शहरात आता मध्यमवर्गीयांना परवडणारी फारशी घरे उपलब्ध नाहीत.

घोडबंदर मार्गावरील घरांचे दर अद्यापही चढेच असताना स्वस्त आणि तुलनेने लहान घरांसाठी ग्राहकांना सध्या मुंब्र्याच्या पलीकडे शीळ आणि ठाणेपल्याड भिवंडीच्या बांधकाम बाजाराकडे पाहावे लागत आहे. घोडबंदर मार्गावर ओवळा, कावेसर अशा पट्टय़ात काही विकासकांकडून ५०० ते ७०० चौरस फूट आकाराची अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच घरांची बांधणी सुरू असताना दिसते. त्यामुळे ठाण्यात लहान घरे खरेदी करण्याचे फारसे पर्याय ग्राहकांकडे सद्य:स्थितीत उपलब्ध नाहीत. कल्याण-

डोंबिवलीत कचरानिर्मूलनाबाबत सुयोग्य व्यवस्थापन नसल्याने शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या भागात नव्या बांधकामांना परवानगी देऊ  नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ाच्या रिअल इस्टेट विश्वात आमूलाग्र बदल दिसू लागले असून जेमतेम दहा वर्षांपूर्वी मुंबई महानगर क्षेत्रात घर घेण्याचा अगदी शेवटचा पर्याय असणाऱ्या बदलापूरला सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. एके काळी सेकंड होमपुरतेच या शहरातील बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाई. मंदीच्या चर्चेतही ठाण्यातील घरखरेदीचा श्रीमंती बाज कायम असल्याने कल्याण, बदलापूरकडे स्वस्त घरांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

बाजारात फारसा उठाव नाही, अशी ओरड ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील विकासकांकडून दबक्या सुरात सातत्याने केली जात असते. उठाव नाही तरीही घरांचे दर काही उतरत नाहीत, असा ग्राहकांचा अनुभव आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा यांसारख्या परिसरात सुमारे एक हजारांहून अधिक घरे विक्रीअभावी पडून असल्याची कबुली मध्यंतरी या भागातील विकासक संघटनेने दिली होती.

मुंबईसारख्या महानगराला पर्याय म्हणून नवी मुंबईचा झपाटय़ाने झालेला विकास नजरेत भरणारा असला तरी आजही मुंबईखालोखाल ठाण्यात घर असणे हे अनेकांसाठी प्रतिष्ठेचे ठरते. खरंतर नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, रोडपाली, नवीन पनवेल यांसारख्या सुनियोजित उपनगरांच्या तुलनेत ठाण्याचे घोडबंदर नियोजनाच्या आघाडीवर तसे विस्कळीतच. संपूर्ण ठाणे शहरासाठी एकमेव रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे दळणवळणाच्या फारशा सुविधा आजही या ठिकाणी फारशा विकसित झालेल्या नाहीत.

खासगी विकासकांनी सुरू केलेल्या बेकायदा बस वाहतुकीवर येथील रहिवाशांचे निम्म्याहून अधिक दळणवळण अवलंबून असते. तरीही घोडबंदर म्हणजे श्रीमंत वस्तीचे ठाणे असे चित्र कायम आहे. ठाण्याच्या या जी.बी. रोडवर घर घेऊ  इच्छिणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. यामागचं एक कारण म्हणजे घोडबंदर मार्गावरून बोरिवली, कांदिवली, गोरेगावसारखी उपनगरे तुलनेने जवळ आली आहेत. याशिवाय पवईसारखा व्यावसायिक पट्टाही फारसा लांब नाही. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये बडय़ा कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करणाऱ्या नोकरदाराला मुंबईच्या तुलनेने घोडबंदर फारच ‘स्वस्त’ वाटू लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी घरांची विक्री रोडावल्याचे चित्र असले तरीही या ठिकाणी लोढा, रुस्तमजी, हिरानंदानी, दोस्ती, कल्पतरू यांसारख्या बडय़ा विकासकांच्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या दरांचा आलेख गेल्या वर्षीच्या तुलनेत चढाच राहिला आहे.

मेट्रोचे गाजर

ठाण्यात मेट्रो सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याने घोडबंदर मार्गावरील बिल्डरांचे अक्षरश: फावले आहे. मेट्रोच्या नियोजित मार्गालगत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमधील घरांच्या दरात मेट्रोच्या नावाने आतापासूनच प्रतिचौरस फुटास ३०० ते ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अवाच्या सवा दराने विकत घेतलेल्या जमिनींवर उभी राहिलेली घरे स्वस्त विकणार तरी कशी, असा बिल्डरांचा साधासरळ सवाल आहे. विशेष म्हणजे, महागडय़ा घरांना मागणी नसतानाही ती विक्रीशिवाय रोखून धरण्याची ताकद यापैकी अनेकांमध्ये आहे. अर्थातच मोठय़ा प्रमाणावर असलेले राजकीय लागेबांधे आणि त्या माध्यमातून आलेल्या आर्थिक गुंतवणुकीवर हे सगळे गणित अवलंबून असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. वडाळा-घाटकोपर-ठाणे मार्गावरील नियोजित मेट्रोमुळे तर बिल्डरांच्या उत्साहाला भरते आले आहे. मुंबईतून येणारी मेट्रो तीन हात नाकामार्गे घोडबंदरच्या ओवळा भागापर्यंत नेण्यात येणार आहे. या सगळ्या पट्टय़ातील घरांच्या विक्रीची जाहिरात मेट्रो प्रकल्पास केंद्रस्थानी ठेवूनच केली जात आहे.

घोडबंदर, बाळकुम, माजिवडा, वसंत विहार यांसारख्या भागांत नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांतील घरांचे दर प्रतिचौरस फूट दहा हजारांपेक्षा अधिक आहेत. घोडबंदर भागातील ओवळा आणि आसपासच्या परिसरात बहुतांश गृहप्रकल्पांमधील घरांचे दर प्रतिचौरस फुटाला अकरा ते बारा हजारांच्या घरात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच मार्गावर काही बडय़ा बिल्डरांनी उभ्या केलेल्या ‘विशेष नागरी वसाहती’मधील घरांच्या दरांनीही एव्हाना प्रति चौरस फुटाला ११ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्वस्त आणि किफायतशीर घरांच्या शोधात असाल तर ग्राहकांपुढे शीळ, भिवंडीशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही

तरीही मोठय़ा घरांचा सोस

कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबई, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, नाशिक, देवळाली परिसरांत राहणारे अनेक नागरिक मुंबई परिसरांत नोकरी, व्यवसाय करतात. या परिसरांतील रहिवाशांचा कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे घर घेण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी याच भागात मालमत्ता प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनास भेट देणाऱ्या ७५ टक्के रहिवाशांनी ४०० ते ७५० चौरस फुटांच्या घरासंबंधी विचारणा केली. याचा अर्थ कल्याण, अंबरनाथ या पट्टय़ात लहान घरांना मोठी मागणी आहे.

अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शहापूर या पट्टय़ात ‘सेकंड होम’ ही संकल्पना मध्यंतरी भलतीच तेजीत होती. गेल्या काही महिन्यांपासून ही नवी संकल्पना काहीशी ओसरू लागली आहे. ठाण्यात घरांच्या किमतींनी कोटींचा पल्ला गाठलेला असताना अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अजूनही २५ ते ३० लाखांत घर मिळते आणि ही परिस्थिती गेली तीन-चार वर्षे कायम आहे. नेरळ-वांगणीत त्यापेक्षा कमी म्हणजे १० ते १५ लाखांत घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे मंदी असूनही या भागातील घरविक्री व्यवसायात तेजी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांना परवानगी देणे बंद झाल्यानंतर तर त्यात कमालीची वाढ झाली. ठाणे शहरातही लहान घरांना मोठी मागणी आहे.

ठाणे शहरात लहान घरांना मोठी मागणी आहे. ठाणे शहरात मध्यंतरी भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनात ५०० ते ७०० चौरस फूट आकाराच्या घरांना सर्वाधिक विचारणा झाल्याचे सांगितले जाते. असे असले तरी मोठी घरे बांधण्याकडे विकासकांचा अधिक कल दिसून येतो, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. जागांची चढय़ा दराने केलेली खरेदी आणि नफ्याचे गणित लक्षात घेता लहान घरे उभारण्यास विकासक फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे स्वस्त आणि लहान घरांची उभारणी ही केवळ फुकाची बडबड ठरली आहे. एका अर्थाने लहान आणि तुलनेने स्वस्त घरे हवी असतील तर भिवंडी, कल्याणचा रस्ता धरा असाच काहीसा संदेश बिल्डरांकडून दिला जात आहे.

घरांचे दर स्थिरावतील…

ठाणे महापालिकेने मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणात ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये सुमारे १५ कोटी चौरस फूट एवढे अवाढव्य बेकायदा बांधकाम उभे राहिले आहे. यापैकी बऱ्याचशा इमारती धोकादायक ठरल्या असून या इमारतींचा पुनर्विकासाचा आराखडा समूह विकास योजनेच्या माध्यमातून तयार केला जात आहे. या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली असून न्यायालयाच्या अंतिम संमतीनंतर हा आराखडा प्रत्यक्षात उतरेल. बेकायदा बांधकामाच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ठाणे शहरात हजारो नव्या घरांची उभारणी होऊ शकणार आहे. या माध्यमातून शहरात लहान घरांच्या बांधणीचा मार्ग प्रशस्त होऊ शकणार आहे. तसेच घरांचे दर स्थिरावतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

घरांचे दर (रु./चौ. फूट)

  • तीन हात नाका परिसर : १३ ते १५ हजार
  • घोडबंदर, बाळकुम, माजिवडा, लोकपुरम : १० ते १२ हजार
  • सूरज पार्क :
  • ९ हजार ते ९५००

जयेश सामंत – response.lokprabha@expressindia.com