22 July 2019

News Flash

उत्सव विशेष : सण-उत्सव कशासाठी?

आपले सारे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत.

ईश्वराची पूजा भीतीपोटी करण्यापेक्षा श्रद्धेने करावी आणि निसर्गरक्षणाच्या मूळ उद्देशाचे जतनदेखील करावे, हेच आधुनिक व्रत ठरेल.

दा. कृ. सोमण – response.lokprabha@expressindia.com
आपले सारे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. ईश्वराची पूजा भीतीपोटी करण्यापेक्षा श्रद्धेने करावी आणि निसर्गरक्षणाच्या मूळ उद्देशाचे जतनदेखील करावे, हेच आधुनिक व्रत ठरेल.

भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपले सण-उत्सव ज्या पंचांगामध्ये देण्यात येतात त्याविषयी आपण प्रथम माहिती करून घेऊया. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच विषयांची माहिती यामध्ये देण्यात येते म्हणून याला पंचांग म्हणतात.

तिथी : पृथ्वीच्या केंद्रातून सूर्य आणि चंद्र यांच्यामधील अंशात्मक अंतराला तिथी म्हणतात. सूर्य आणि चंद्र यांच्यात बारा अंश अंतर झाले की एक तिथी होते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावास्या अशी तिथींची नावे आहेत. शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा तिथींना शुक्लपक्ष म्हणतात. कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतच्या पंधरा तिथींना कृष्णपक्ष म्हणतात. सूर्योदयाच्या वेळची तिथी पंचांगात दिलेली असते. प्रत्येक तिथीसमाप्तीची वेळ भारतीय प्रमाण वेळेत दिलेली असते. इसवी सन पूर्व १५०० वर्षांपासून आपल्या देशात तिथी प्रचारात आहेत.

वार : पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे मध्यरात्री बारा वाजल्यानंतर वार बदलतो. परंतु भारतीय पद्धतीप्रमाणे एका सूर्योदयापासून लगतच्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत एक वार असतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी वारांची नावे आहेत. भारतात इसवी सन पूर्व १००० वर्षांपासून वार प्रचारात आलेले आहेत.

नक्षत्र : सूर्याच्या भासमान मार्गाचे म्हणजेच क्रांतिवृत्ताचे २७  समान भाग केले म्हणजे प्रत्येक भागास नक्षत्र म्हणतात. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती अशी नक्षत्रांची नावे आहेत. चंद्र सूर्योदयाच्या वेळी ज्या नक्षत्रात असतो ते नाव पंचांगात दिलेले असते. चंद्र किती वाजेपर्यंत त्या नक्षत्रात आहे ते भारतीय प्रमाणवेळेत दिलेले असते. एकूण २७ नक्षत्रे आहेत. इसवी सन पूर्व १५०० वर्षांपासून पंचांगात नक्षत्रांचा वापर सुरू झाला.

योग : क्रांतिवृत्तावरील आरंभ स्थानापासून सूर्य-चंद्र जितक्या अंतरावर असतील, त्यांची बेरीज म्हणजे योग होय. १३ अंश २० कलांच्या बेरजेचा एक योग होतो. एकूण सत्तावीस योग आहेत. त्यांची नावे अशी आहेत. विष्कंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वरियान, परीघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, ऐंद्र, वैधृती. सूर्योदयाच्या वेळी जो योग असतो त्याचे नाव पंचांगात देण्यात येते. तसेच त्याच्या समाप्तीची वेळ दिलेली असते. पंचांगात योग देण्याची पद्धत उशिरा म्हणजे इसवी सन ७०० नंतरच सुरू झाली.

करण : अर्धी तिथी म्हणजे एक करण होय. चंद्र-सूर्याच्या भोगांमध्ये सहा अंश अंतर झाले की एक करण होते. करणांची नावे अशी आहेत. बव, बालव, कौलव, ततिल,  गरज, वणिज, विष्टी.

पंचांगात पूर्वी सूर्योदयकालीन करण दिले जात असे. सध्या तिथीसमाप्तीची वेळ तिथीच्या रकान्यात प्रमाण वेळेत देत असल्यामुळे तिथीच्या पूर्वार्धाचे करण पंचांगात समाप्तीसह दिलेले असते.

यावरून आपणास कळून येईल की पूर्वी आत्ताच्या सारखे पाच अंगांचे पंचांग नव्हते. ते एकांग, द्वंग, त्र्यंग, चतुरंग स्वरूपात होते.

पंचांगांचा इतिहास :

पंचांगाचे गणित ज्या ग्रंथावरून केले जाते त्याला करणग्रंथ म्हणतात. पूर्वी सूर्यसिद्धांत या ग्रंथावरून पंचांगे तयार केली जात. सन १५२० मध्ये सूर्यसिद्धांतावरून केलेले गणित आणि प्रत्यक्ष आकाश यात फरक पडल्याचे महाराष्ट्रातील नांदगाव येथे राहणारे गणेश दैवज्ञ यांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रहलाघव हा त्या काळी अचूक गणित देणारा करणग्रंथ लिहिला. अनेक पंचांगकत्रे ग्रहलाघव ग्रंथावरून पंचांगे तयार करू लागले. सन १९२० मध्ये पुन्हा ग्रहलाघव ग्रंथावरून केलेले पंचांग आणि प्रत्यक्ष आकाश यात फरक पडू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ही गोष्ट लक्षात आली. सन १९२० मध्ये त्यांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात एक जाहिरात दिली- ‘जो कोणी ग्रहलाघव ग्रंथावर संस्कार करून अचूक गणिताचा करणग्रंथ तयार करील, त्याला मी एक हजार रुपये बक्षीस देईन!’ नागपूरचे डॉ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांनी ‘करणकल्पलता’ हा दृक् गणिताचा करणग्रंथ १९२३ मध्ये लिहिला. अनेक पंचांगकत्रे या करणग्रंथावरून पंचांगे तयार करू लागले. त्यामुळे जसे पंचांगात आहे तसे आकाशात दिसू लागले. सध्या आम्ही पंचांगकत्रे संगणकाच्या साहाय्याने पंचांगे तयार करतो, त्यामुळे पंचांगाचे गणित अधिक सूक्ष्म झाले आहे. पूर्वी हस्तलिखित पंचांगे तयार केली जात. पहिले छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी प्रसिद्ध केले आणि त्याचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी तयार केले होते.

पंचांगातील सण-उत्सवाचे दिवस ठरविण्यासाठी निर्णयसिंधू, धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, मुहूर्तमरतड इत्यादी ग्रंथांचा उपयोग केला जातो.

सण-उत्सवांचा उद्देश :

प्राचीन कालापासून भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे सण-उत्सवांची रचना शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे तयार करण्यात आली आहे. सण-उत्सवांचा मूळ उद्देश शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहणे हा आहे. शरीराचे आरोग्य विशेषत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहारात बदल केला, की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून शास्त्रकारांनी ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे. श्रावण महिन्यात शेतीची बरीचशी कामे झालेली असतात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. अशा वेळी बरीच माणसे घरातच राहतात. शरीराचे चलनवलन कमी होते. अशा वेळी शरीराला हलक्या आहाराची जास्त गरज असते. म्हणून श्रावण महिन्यात जास्त उपवास करण्यास सांगण्यात आले आहे. पचनास जड असा मांसाहार करू नये, असे सांगण्यात आले आहे. पोटात गॅसेस होऊ नयेत यासाठी कांदा, लसूण खाऊ नका, असे सांगण्यात आले आहे. शेतात धान्य चांगले पिकावे यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तींची उपासना करण्यास सांगण्यात आले आहे. उपवास, उपासना, धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगण्यात आले आहे. जेव्हा शरीराला तेल-तुपाची गरज असते, भूक जास्त लागते असा दिवाळीसारखा सण हिवाळ्यात येत असतो. ज्या वेळी तिळाच्या पदार्थाची शरीराला आवश्यकता असते असा मकरसंक्रांतीचा सण थंडीमध्ये येत असतो.

ठरावीक सण ठरावीक ऋतूमध्ये येणे आवश्यक असते; पण हे कसे घडणार? कारण आपले सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. ठरावीक सण ठरावीक ऋतूत यावेत यासाठी आपल्या पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणतात. सूर्य वृषभेत असताना ज्येष्ठ, मिथुनेत असताना आषाढ, कर्केत असताना श्रावण, सिंहेत असताना भाद्रपद, कन्येत असताना आश्विन, तुळेत असताना काíतक, वृश्चिकेत असताना मार्गशीर्ष, धनू राशीत असताना पौष, मकर राशीत असताना माघ आणि कुंभ राशीत असताना फाल्गुन महिन्याचा प्रारंभ होतो; परंतु कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. अशा वेळी पहिला तो अधिकमास समजला जातो आणि दुसरा तो निजमास मानला जातो. अशा रीतीने ऋतू आणि सण यांची सांगड राहण्यास मदत होते. त्यामुळे उपवासाचा श्रावण महिना पावसाळ्यातच येतो आणि तेल-तुपाचे पदार्थ खावयाची दिवाळी थंडीमध्ये येते. पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातला गेला असल्यामुळे हे शक्य होते.

उत्सव हे मनाचे आरोग्य जपत असतात. उत्सव साजरे करीत असताना आप्तेष्ट-मित्र एकत्र येतात. गावाच्या उत्सवात तर गावातील सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष एकत्र येत असतात. उत्सवामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात. उत्सवांमुळे सहकाराची व समानतेची भावना निर्माण होते. नवीन चांगल्या विचारांचा प्रचार उत्सवात करणे सहज शक्य होते. एखाद्या सार्वजनिक कामासाठी पसा गोळा करणे शक्य होते. सर्वानी एकत्र येऊन मोठे काम करता येऊ शकते. या उत्सवांतून मोठी सार्वजनिक कामे केली जाऊ शकतात. उत्सवांमधूनच नेतृत्व निर्माण होऊ शकते. कार्यकत्रे निर्माण होऊ शकतात. म्हणूनच लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांनी स्वराज्यप्राप्तीसाठी आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी सार्वजनिक उत्सवांची प्रथा सुरू केली. उत्सवात सहभागी झाल्याने होणाऱ्या आनंदप्राप्तीबरोबरच माणसे आपल्या जीवनातील दु:ख, चिंता विसरून जातात उत्सवातून कला सादर करूनच कलावंत मोठे होतात. उत्सवांमुळे हजारो हातांनाही काम मिळते. राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवांमुळे राष्ट्राभिमान जागृ होण्यास मदत मिळते.

निसर्गाशी नाते! :

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगण्यात आले आहे. या दिवशी मातीचीच गणेश मूर्ती पूजावयाची असते. त्यानंतर येतो भाद्रपद कृष्ण पक्ष! पितरांचे स्मरण करण्याचे दिवस! ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, चांगले संस्कार दिले, घर-शेतजमीन ठेवली अशा पितरांविषयी नवीन धान्य घरात येण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस! त्यानंतर येते नवरात्र! हा निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव असतो. आश्विन महिन्यांत शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात आणले जाते म्हणून निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. कारण नऊ या ब्रह्मसंख्येचा आणि निर्मितीशक्तीचा संबंध आहे. जमिनीत धान्य रुजत घातल्यानंतर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. सर्व अंकांमध्ये नऊ हा अंक सर्वात मोठा आहे. निर्मितीशक्ती उपासनेच्या नवरात्रानंतर सीमोल्लंघनाचा विजयादशमी – दसरा हा सण येतो. विजयादशमीपर्यंत शेतातील धान्य घरात आणल्यानंतर पूर्वी लोक स्वारीला घराबाहेर पडत असत. हे सर्व झाल्यावर सर्व घरे धनधान्यांनी भरलेली असत. त्यानंतर प्रकाशाचा उत्सव दिवाळीचा सण येतो. अशा रीतीने सणांची रचना शेतीच्या कामांप्रमाणे करण्यात आलेली आहे. सण-उत्सवांमध्ये मानवाला सुंदर-आनंदमय जीवन जगण्यासाठी निसर्गातील ज्या ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्या सर्व गोष्टींचा पूजेमध्ये समावेश करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. नद्या, वृक्ष, फुले, फळे, प्राणी, पक्षी अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.

ईश्वराचे मूळ रूप :

ईश्वर म्हणजे चराचरात असलेले चतन्य! सजीवातून कोणती शक्ती निघून गेली म्हणजे निर्जीवता येते ती शक्ती म्हणजेच ईश्वर! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा कोप झाला तर केवढा अनर्थ ओढवतो हे मानवाच्या लक्षात आले. त्यांची अवकृपा होऊ नये यासाठी प्रार्थना निर्माण झाल्या. त्यांना यज्ञाद्वारे प्रसन्न करून घेण्याची प्रथा सुरू झाली. निराकार, निर्गुण शक्तीची उपासना करणे सामान्य माणसाला शक्य होणार नाही म्हणून सगुण साकार ईश्वराची उपासना करण्यात येऊ लागली. पाप-पुण्याची व्याख्या महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी अगदी सोप्या भाषेत सांगितली. इतरांना पीडा देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य! स्वत:चे कर्तव्य कर्म हेच यज्ञकर्म, हीच ईश्वरपूजा असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले, दीन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरपूजा! निसर्गाला जपणे हीच ईश्वरपूजा! माणसाने माणसांशी आणि निसर्गाशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म आहे.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सण-उत्सव साजरे करण्यामागचे मूळ उद्देश किती महान व उदात्त होते हे आपणास कळून येते. काळ पुढे सरकत होता. लोकसंख्या वाढत गेली, देशावर अनेक आक्रमणे झाली, सामाजिक- राजकीय- आर्थिक परिस्थिती जशी बदलत गेली तशी सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. मोंगलानी आक्रमण करताना भारतातील ग्रंथ, प्राचीन मंदिरे यांचा विध्वंस केला. सन ११९३ मध्ये बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ आणि हजारो ग्रंथ जाळून टाकले. ब्रिटिशांनी तर ज्ञानाचा खजिना असलेले हजारो मौल्यवान ग्रंथ पळवून नेले. अर्थात भारतीय संस्कृती यामुळे नष्ट झाली नाही हे जरी खरे असले तरी हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या सण-उत्सव साजरे करण्याच्या परंपरेवर याचा परिणाम झाला. महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या समाजसुधारकांनी सार्वजनिक उत्सवांमधून राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे महान कार्य केले.

आजचे सण-उत्सव :

वाढती असुरक्षितता, वाढती महागाई, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, अंधश्रद्धा, बदललेली जीवनशैली, इंग्रजीतून शिक्षण, मॉल संस्कृती, विभक्त कुटुंब पद्धती, पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम, पशाला आलेले वेगळे महत्त्व आणि कमी श्रमात मोठे यश मिळविण्याची इच्छा यामुळे वैयक्तिक सण-उत्सव साजरे करण्याच्या उद्देशामध्ये आणि पद्धतींमध्ये खूप बदल झाला. तसेच वाढती लोकसंख्या, उत्सवात वापर करण्यासाठीची आधुनिक साधने, उत्सवातील अर्थकारण, राजकीय हस्तक्षेप, वाढती जीवघेणी स्पर्धा, प्रसारमाध्यमांचा प्रभाव आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा उद्देश व पद्धतीमध्येही खूप बदल झाला. अर्थात हे बदल चांगले-वाईट दोन्हीही प्रकारचे आहेत असे म्हणता येईल.

आषाढमास :

चत्र महिन्यात चित्रा, वैशाख महिन्यात विशाखा, ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा, आषाढ महिन्यात पूर्वाषाढा, श्रावण महिन्यात श्रवण, भाद्रपद महिन्यात पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यात आश्विनी, काíतक महिन्यांत कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यात मृग, पौष महिन्यात पुष्य, माघ महिन्यात मघा आणि फाल्गुन महिन्यात उत्तरा फाल्गुन नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या नक्षत्रापाशी दिसतो. असे जानेवारी, फेब्रुवारीचे नाही बरं का ! आपल्या चांद्रमहिन्यांची नावे किती विज्ञानाशी निगडित आहेत हे दिसून येते.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आकाश अभ्राच्छादित राहिल्यामुळे आकाशातील नक्षत्र तारका दिसत नाहीत म्हणून ‘देव झोपी जातात’ ही कल्पना आली असावी. आषाढ शुक्ल एकादशीपासून काíतक शुक्ल एकादशीपर्यंतच्या कालाला चातुर्मास म्हणतात. चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी! या दिवशी उपवास केला जातो. उपासनेत उपवासाला विशेष महत्त्व आहे. शरीरातील मांद्य घालविण्यासाठीही उपवासाची जरुरी आहे. उपवास करताना हलका आहार घेणे आवश्यक आहे. ‘एकादशी आणि दुप्पट खाशी!’ असे करणे योग्य नाही. सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली िदडी निघाली. हैबतरावांनी पादुका पालखीतून नेण्याची पद्धत सुरू केली. वारकरी संप्रदायाने एकतेची आणि समानतेची मोठी शिकवण जगाला दिली. तुम्ही कधी वारीतून पंढरपूरला गेला आहात का? नसल्यास एक दिवस तरी जा. भक्तीच्या या महासागरामध्येच तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडेल.

आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते. ज्या गुरूनी आपणास शिक्षण दिले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! खरं म्हटलं तर गुरुजनांविषयी आदर भावना वाढविण्यासाठी शाळा-कॉलेजातून गुरुपौर्णिमा साजरी व्हावयास हवी आहे. सध्या अध्यात्म, संगीत व नृत्य क्षेत्रातच गुरुपौर्णिमा साजरी होताना दिसते. आषाढ अमावास्या ही दिव्याची अमावास्या  म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातील दिवे घासून फुसून स्वच्छ करावयाचे, नंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजन करावयाचे. आधुनिक भाषेत सांगायचे तर प्रकाश देणाऱ्या या साधनांचा मेंटेनन्स करावयाचा.

हासरा, नाचरा श्रावण! :

समजा बारा महिन्यांतून पावसाचा श्रावण वगळला तर काय शिल्लक राहील? शून्य ! श्रावणात सारी सृष्टी नटते, म्हणून गीतकारांनी श्रावणाला ‘हसरा, नाचरा श्रावण’ म्हटले आहे. श्रावणात सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरीपूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारूती पूजन करण्यास सांगितले आहे.

श्रावण सोमवारी मी एका शिवमंदिरात गेलो होतो. शिवभक्त रांगेत उभे राहून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करीत होते. शंकराच्या िपडीवर कुणी दूध अर्पण करीत होते, कुणी दही अर्पण करीत होते. कुणी भगिनी धान्याची शिवामूठ अर्पण करीत होत्या. त्यामध्येच एका गृहस्थांनी िपडीवर अर्पण करण्यासाठी एक लिटर दुधाची पिशवी आणली होती. त्यांनी ती पिशवी आपल्या दातांनीच तोडली. तोंडात आलेला पिशवीचा तुकडा तिथेच टाकला. नंतर त्या पिशवीतील दूध िपडीवर जोरात ओतले आणि पिशवी गाभाऱ्यातील कोपऱ्यात भिरकावून दिली. यालाच शिवभक्ती म्हणायची का? याउलट ठाणे येथील ज्ञानेश्वर मंदिरात वेगळे दृश्य दिसले. तिथे भाविक आणलेली दुधाची पिशवी तिथे टेबलावर ठेवलेल्या कात्रीने उघडून तिथे ठेवलेल्या मोठय़ा पातेल्यात ओतीत होते आणि एक चमचा दूध शंकराला अर्पण करीत होते. व्यवस्थापक पातेलीतील दूध गरम करून प्रसाद म्हणून सर्वाना देत होते .

शंकराला शिवामूठ का अर्पण करावयाची ? घरात आलेल्या नवीन सुनेला एक मूठभर धान्य तरी देण्याची सवय व्हावी यासाठी!

आधुनिक व्रते

श्रावणात अनेक व्रते करण्यास सांगण्यात आली आहेत. परंतु आधुनिक काळातील श्रावणात आता वेगळी व्रते करण्याची जरुरी आहे. सोमवारी टी.व्ही बंद, मंगळवारी मोबाइल फोन बंद, बुधवारी फेसबुक बंद, गुरुवारी व्हॉटस्अप बंद ठेवायचे. शुक्रवारी पंधरा मिनिटे तरी ध्यानस्थ बसायचे. शनिवारी घरातील सर्वानी एकत्र बसून गप्पा मारायचा, खेळ खेळायचे. रविवारी कुटुंबातील सर्वानी एकत्रपणे निसर्गात भटकंती करायची. निसर्ग दर्शन घ्यायचे. तुम्हाला ही व्रते कठीण वाटतील. आज काही माणसे या साधनांच्या खूप आहारी गेली आहेत. घरात एकत्र राहणारी माणसे मनाने एकमेकांपासून दूर जात आहेत. काही घरे तर मुकी झाली आहेत. कोणी कोणाशी बोलत नाही. एकमेकांशी बोलायला घरात कुणाला वेळच मिळत नाही. म्हणून श्रावणातली ही आधुनिक व्रते पुढच्या नव्हे तर याच जन्मात फलप्राप्ती करून देणारी आहेत.

श्रावण पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण या गर्दी धावपळीच्या जगात बहीण-भावाचे नाते टिकवून ठेवणारा आहे. भारताला मोठा सागरकिनारा लाभलेला आहे. समुद्रमाग्रे चालणारा व्यापार आणि कोळी बांधवांचे जीवन हे सागरावर अवलंबून आहे. पावसाळ्यात रौद्ररूप धारण करणारा समुद्र श्रावण पौर्णिमेपासून शांत होऊ लागतो. म्हणून त्याला नारळ अर्पण करून पौर्णिमेच्या दिवशी त्याला रक्षणासाठी प्रार्थना केली जाते.

श्रीकृष्ण जयंती म्हणजे केवळ ‘दहीहंडी’ नव्हे! श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेमधील कर्मयोगाचे आचरण करण्याचा दिवस! दहीहंडी उत्सवात उंच थर रचून जिवाशी खेळण्याचा किंवा बक्षिसांची प्रलोभने दाखविण्याचा हा उत्सव नव्हे! सध्या या उत्सवाचे रूप चांगले व्हावे यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत आहे. भगवान कृष्णाने त्या काळात गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो हे सांगितले. अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. या कलियुगात भ्रष्टाचार, अनीती, अंधश्रद्धा, आळस, अस्वच्छता या राक्षसांचा नाश आपल्यालाच करावयाचा आहे. श्रावण अमावास्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या बलांची पूजाही अमावास्येला केली जाते.

सुखकर्ता भाद्रपद :

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणेश हा सुखकर्ता आहे. दु:खहर्ता आहे अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पाíथव गणेशपूजन करावे असे सांगण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात काही पथ्ये पाळणे खूप जरुरीचे आहे. पाíथव गणेशमूर्ती म्हणजे गणेशमूर्ती ही मातीचीच हवी. तसेच गणेशमूर्ती लहान हवी. भक्ती, श्रद्धा मोठी असावी. गणेश मंडळांनी वर्गणीची सक्ती करू नये, ती ऐच्छिक असावी. या कलियुगात कोणताही देव नवसाला पावत नाही. देव योग्य दिशेने केलेल्या प्रामाणिक मेहनतीलाच पावतो. त्यामुळे ‘नवसाला पावणारा’ अशी जाहिरात करणे योग्य नाही. सजावट करताना थर्मोकोल यांचा वापर करू नये. ध्वनिवर्धकाचा वापर संयमाने करावा. इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आहे असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. गणेशपूजेनंतर निर्माल्य पाण्यात टाकू नये. त्यावर पाणी िशपडले म्हणजे त्याचे विसर्जन होते. ते जमा करून त्याचे खत करावे. करमणुकीच्या कार्यक्रमाबरोबर वर्षभर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम ठेवावे. मंडळे नोंदणी केलेली असावीत. गणपतीपुढे जमलेले पसे समाजकार्यासाठीच वापरावेत. तसेच दरवर्षी हिशेब हिशेबतपासनीसाकडून तपासून घेऊन प्रसिद्ध करावेत. वर्षभर इतर सण-उत्सव साजरे करून त्यांची माहिती लोकांना करून द्यावी. गणेशसेवकांना समाजकार्याचे व पर्यावरणरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. आरत्या, मंत्रपुष्प ओरडून म्हणू नये, पवित्र वातावरणात मधुर आवाजात म्हणावे. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. गणेशोत्सव पाहायला अनेक परदेशी पर्यटक येत असतात. स्वच्छता व शिस्त ठेवावी.

वैभवसंपन्न आश्विन!

आश्विन महिन्यात शेतातील धान्य घरात येते. त्यामुळे या महिन्याला वैभवसंपन्न म्हणतात. या महिन्यात निर्मिती शक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव नवरात्र साजरा केला जातो. श्रीमहालक्ष्मी, श्रीसरस्वती आणि श्रीमहाकाली या देवतांचा हा उत्सव असतो. प्रत्यक्षात आपण देवघरातील किंवा मंदिरातील देवीची मोठी भक्ती करतो. परंतु घरात वावरणाऱ्या देवीकडे दुर्लक्ष करतो. काही ठिकाणी तर घरात जन्मू इच्छिणाऱ्या देवीला जन्म नाकारला जातो. हे योग्य नाही. घरातील स्त्री ही महालक्ष्मी असावी. घरातील आíथक व्यवहार हाताळण्याचे तिला प्रशिक्षण द्यावे. ती समर्थ असावी. ती सरस्वती असावी म्हणजे ती सुशिक्षित असावी. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडविण्यास ती समर्थ होते. ती महाकाली असावी. म्हणजे ती आरोग्यसंपन्न असावी. स्वसंरक्षण करण्यास ती समर्थ असावी.

विजयादशमीला आपटय़ाची पाने ‘सोने’ म्हणून देण्याची पद्धत आहे. विचार करा की दसरा जवळ आला की आपटय़ाची झाडे किती दु:खात असतील? तसेच कौत्स्याने खऱ्या सुवर्णमुद्रा वाटल्या. आपटय़ाच्या झाडाची पाने नव्हे! आधुनिक काळात मोबाइलवरून आपण एकमेकाला शुभेच्छा देऊ शकतो. या दिवशी सीमोल्लंघन करण्यास सांगण्यात आले आहे. आपल्यालाही सीमोल्लंघन करावयाचे आहे, अहंकारातून नम्रतेकडे, आळसाकडून उद्योगशीलतेकडे, अंधश्रद्धेकडून वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे!  हे करणे आपल्याच हातात आहे.

दिवाळीचा उत्सव हा प्रकाशाचा उत्सव! जनजागृतीमुळे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण मागील काही वष्रे कमी झाले आहे. आपण आनंदित राहताना इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपले जीवन असते. सध्या बरेच लोक पितृपक्ष आणि दिवाळीत गरजूंना आíथक मदत करीत असतात, ही आनंदाची गोष्ट आहे.

पूजा आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. ईश्वराची पूजा भीतीने करू नका. श्रद्धेने करा. तो शिक्षा करीत नसतो. तो सर्वावर प्रेमच करतो. आपले सण-उत्सव हे निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आहेत.

निसर्गाचे भक्षण करण्यासाठी नाहीत. त्यामुळे सण-उत्सव साजरे करीत असतांना ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि अंधश्रद्धेचे प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. आपल्याला आपली मुले सण-उत्सवांसंबंधी जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच उत्तर द्यावयास हवे आहे. प्रत्येक सण-उत्सवामागचा कार्यकारणभाव समजून घ्यावयास हवा आहे. पुढची पिढी ही चमत्कारांवर विश्वास ठेवणारी नाही. ती निसर्गनियमांवरच विश्वास ठेवणारी आहे. म्हणूनच सण-उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे भान ठेवण्याची खरी गरज आहे.

First Published on August 31, 2018 1:06 am

Web Title: reasons to celebrate festivals