19 February 2019

News Flash

रेखाचा स्वसंवाद

रेखाच्या चित्रांमधून येणारा स्त्रीवाद हा पाश्चात्य मुशीतून घडलेला स्त्रीवाद नाही तर त्याला भारतीय मातीचा रंग आणि गंधही आहे.

रेखाच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतात त्या स्त्रीप्रतिमा.

अरूपाचे रूप
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab
जगभरातील अनेक राष्ट्रांना एकत्र आणणारी आणि महायुद्धानंतरच्या कालखंडात जगभरात शांतता नांदावी यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत राहिलेली महत्त्वाची संघटना म्हणजे  संयुक्त राष्ट्रसंघ. या संघटनेच्या स्थापनेला १९९५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जगभरातील तब्बल ६० कलांवतांना सोबत घेऊन एक महत्त्वाचे प्रदर्शन पार पडले, त्यात रेखा रौद्वित्य या भारतीय चित्रकर्तीचा समावेश होता. साँग्ज फ्रॉम द ब्लड ऑफ द वेअरी या शीर्षकाखाली तब्बल १२ चित्रे तिथे प्रदर्शित करण्यात आली होती. हे प्रदर्शन संपल्यानंतर भारतीयांसाठी म्हणून या चित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू केंद्रातर्फे आयोजित करण्यात आले. त्या प्रसंगी चित्रकार व संग्राहक जहांगीर निकल्सन यांनी ती चित्रे विकत घेतली. ती आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत प्रदर्शन रूपाने.

रेखाने आता साठीत प्रवेश केला असून गेल्या अनेक वर्षांमध्ये तिच्या चित्रांमधील काही घटक तसेच सातत्याने चित्रात डोकावत आहेत. तर काहींच्यामध्ये काळानुरूप बदल झाले आहेत. फेमिनिस्ट पक्की स्त्रीवादी असण्याच्या तिच्या भूमिकेत कोणताही मोठा बदल झालेला नाही. किंबहुना ती भूमिका आता अलीकडच्या चित्रांमध्ये अधिक टोकदार होत चालली आहे. पूर्वीच्या केवळ स्त्रीवादाच्या पलीकडे जाऊन आता त्यातील चित्रात्म टीका ही अधिक राजकीय स्वरूपाचीही होत चालली आहे. अर्थात त्या राजकीय होण्याला आताची सामाजिक- राजकीय परिस्थितीही तेवढीच कारण आहे. मात्र रेखा ही काही केवळ कथित स्त्रीवादी नाही. म्हणजे तिचा किंवा तिच्या चित्रांमधून येणारा स्त्रीवाद हा पाश्चात्य मुशीतून घडलेला स्त्रीवाद नाही तर त्याला भारतीय मातीचा रंग आणि गंधही आहे, हे विशेष. म्हणूनच तिच्या स्त्रीवादामध्ये येणारी रूपके ही अस्सल भारतीय रूपके आहेत. ती स्वत याबद्दल म्हणते की, भारतात जन्म झाल्यानंतर इथली संस्कृती तुम्हाला आवडो न आवडो तुमच्यासोबत असते. इथले संस्कारही तसेच तुमची सोबत करतात. हे इथपर्यंतच महत्त्वाचे नसते. तर तुमची कलात्मकताही त्याच मुशीत घडते. त्याच्या तळाशी असलेला एक पापुद्रा हा इथल्या गतानुगतिक अशा सांस्कृतिकतेचाही असतोच. तो नाकारता येत नाही किंबहुना नाकारू नयेच असे तिचे म्हणणे आहे. ज्या समाजामध्ये आपण राहातो, काम करतो, त्याचा आपल्या कामावर परिणाम होणे हे साहजिक आहे. व्यक्ती म्हणून घडत असताना काही विषयांबाबत आपली मते तयार होत जातात. आपले  व्यक्तिमत्वही घडते. आपल्या भूमिका तयार होतात. मते अनेकांना असतात पण ती फारच कमी जणांना व्यक्त करता येतात. लेखक त्याची मते, भूमिका त्याच्या लेखनातून व्यक्त करतो. मला माझ्यासमोर असलेला भव्य कॅनव्हॉस हाच त्या कोऱ्या कागदासारखा वाटतो. दृश्यभाषा ही माझी भाषा आहे, असे मला वाटते आणि मग मी ब्रश उचलते, व्यक्त होते, रेखा सांगत असते.

रेखाची चित्रे समजून घेताना तिची पाश्र्वभूमी समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. ही पाश्र्वभूमी आपल्याला तिच्या चित्रांच्या अधिक जवळ घेऊन जाते. तिची संयुक्त राष्ट्रसंघात सादर झालेली १२ चित्रे आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जहांगीर निकल्सन दालनामध्ये आपल्याला आणखी दीड महिना पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनादरम्यान ‘रेखासोबत फेरफटका’ या शीर्षकाच्या तीन चार उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात ती रसिकांशी संवाद साधते. ही चित्रे आली कोणत्या मातीतून आणि कशी हे त्यामुळे समजून घेता येते. एक चित्र आणि मग त्या चित्राची कूळकथा असे या प्रदर्शन किंवा कार्यक्रमाचे स्वरूप नाही. त्यामुळे तशी अपेक्षा ठेवून जाऊ नका. कारण तसे झाल्यास अपेक्षाभंग होईल. पण स्वतची जडणघडण आणि स्वतशीच संवाद साधत व्यक्त होणे कॅनव्हॉसवर या प्रक्रियेबाबत मात्र ती त्यात स्पष्टपणे बोलते. एखादा पदार्थ तयार होतो तेव्हा त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू सांगून मग आपल्याला टीव्हीवरच्या रेसिपी शोमध्ये रेसिपी दाखविली जाते. तसे या कार्यक्रमात होत नाही. मात्र त्या रेसिपीमध्ये आलेल्या किंवा घातलेल्या कोणत्या गोष्टी कुठून कशा आल्या आणि त्या मागे नेमकी कोणती पाश्र्वभूमी होती, याचा अंदाज आपल्याला रेखासोबतच्या संवादातून येऊ शकतो. या कार्यक्रमाचे गमक आणि त्यातील गंमत हीच आहे. आपल्या प्रतिमासृष्टीच्या कल्पनेला रेखा कुठेही धक्का लावत नाही. ना ती आपल्याला हे सारे तिच्या नजरेतून पाहण्यासाठी प्रवृत्त करते. ती म्हणते मी माझी पाश्र्वभूमी आणि प्रक्रिया सांगितली, आता तुम्ही तुमच्या नजरेतून पाहा. मग एखादा कुणी असाही प्रश्न विचारतो की, मला जाणवले ते पूर्णपणे वेगळे असले तर, त्यावर तिचे उत्तर असते की, हो असे होवू शकते. चित्र रसिकांनी समजून घ्यावीत. त्यासाठी थोडासा अभ्यासही असायला हवा. म्हणजे आपला चित्रजाणीवेचा प्रवास योग्य दिशेने होईल. म्हणून तर प्रदर्शनांवर लिहिणाऱ्या कलासमीक्षकांनाही ती सोडत नाही. त्यांच्याशी संवादाच्या निमित्ताने खरोखरच यांचा अभ्यास आहे का, झालाय का हे ताडून पाहते. हे पत्रकार आहेत की, पत्रककार (म्हणजे पाठविलेले प्रसिद्धी पत्रक स्वतच्या नावाने प्रसिद्ध करणारे) याचाही अंदाज घेते.

आता थोडेसे तिच्या चित्रांविषयी. तिच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतात त्या स्त्रीप्रतिमा. त्यांचे अक्षम असणे, सक्षम होणे, त्यांच्यावरचे अत्याचार मग ते भ्रूणरूपात असताना होणारे िलगनिदान असेल किंवा मग लग्नाच्या नावाखाली होणारे अत्याचारही या सर्वावर ती व्यक्त होते. लाल, पिवळा, किरमिजी हे साधारणपणे भडक वाटतील अशा रंगांचा ती प्रामुख्याने सूचक वापर करते. ती स्त्रीयांच्या अवकाशाचा त्या त्या काळात वेध घेण्याचा प्रयत्न करते. ती बडोदा स्कूलमधून आली आहे, त्यामुळे माणसे माणसासारखीच चित्रात दिसायला हवीत, हे ती नाकारणारी आहे. पण तरीही तिची चित्रे नवकथनात्म पद्धतीने जाणारी आहेत. त्या चित्रांशी संवाद साधायला हवा, ती स्वसंवाद साधते तसा!
(हे प्रदर्शन १९ ऑगस्टपर्यंत पाहाता येईल.)

First Published on July 13, 2018 1:01 am

Web Title: rekha rodwittiya artiest