स्मरण
राजन चेऊलकर – response.lokprabha@expressindia.com
‘श्वास’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख मिळाली. या चित्रपटाचा विषय, त्याची हाताळणी, अभिनय या सर्वच बाबींमध्ये हा चित्रपट सरस ठरला. मी या चित्रपटाचा निर्माता म्हणून त्याच्याशी जोडलो गेलो. अरुण नलावडे माझे मित्र. ते मला एक कथा सांगत होते. आणि म्हणाले की, अशा विषयावर चित्रपट काढायला हवा. त्यांना सुचलेला विषय मलाही भावला. त्यावर खरंच काही करायला हवं असंही मला वाटलं. म्हणून मी त्यांच्यासोबत ‘श्वास’च्या निर्मितीत उतरलो.

अरुण नलावडे यांच्या संकल्पनेतून ‘श्वास’ हा चित्रपट घडला. चित्रपटाला वाहवा मिळत होती. पण बॉक्स ऑफिसवर तो विशेष चालत नव्हता. पण तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एके दिवशी मला अरुण नलावडे यांचा फोन आला. ते कामानिमित्त मुंबईबाहेर गेले होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मुंबईत आले आहेत. अमुक एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. त्यांना आपल्या चित्रपटाचं स्क्रीनिंग दाखवायचं आहे. ते खास त्यासाठी तिथे आले आहेत. तू तिथे जा. त्यांना भेट आणि चित्रपट दाखव.’ मला सुरुवातीला काही कळेचना. माजी पंतप्रधानांना चित्रपट दाखवायचा या कल्पनेनेच मी भारावून गेलो. पण अरुणजींनी सांगितल्याप्रमाणे लगेच ते हॉटेल गाठलं.

पंतप्रधान हॉटेलमध्ये आहेत म्हटल्यावर तिथे कडक बंदोबस्त असणं स्वाभाविक होतं. त्यांना चित्रपट दाखवायचा आहे म्हटल्यावर मला सरळ आत जाऊ देतील असा माझा समज होता. तिथल्या माणसांना, ‘मी चित्रपटाचा निर्माता. पंतप्रधानांना भेटायला आलोय. त्यांना चित्रपट दाखवायचा आहे,’ असं सांगितल्यावर मला लगेच आतमध्ये सोडतील असा माझा समज होता. पण तो पूर्णपणे चुकीचा ठरला.

मी हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे आत जात असताना बराच बंदोबस्त दिसला. एक-एक टप्पा पार करत मी पुढे जात होतो. पण, ‘मी चित्रपटाचा निर्माता आहे आणि मला पंतप्रधान यांना भेटायचं आहे,’ हे एवढं सांगून पुरेसं ठरलं नाही. मला बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागलं. कोणता चित्रपट, तुम्ही कोण, कुठून आलात, पंतप्रधानांकडे काय काम, तुम्हाला त्यांनी बोलावलं आहे का, वगैरे अनेक प्रश्न विचारले गेले. या सगळ्या शासकीय शिष्टाचाराला मी पहिल्यांदा सामोरा गेलो असेन. अखेर त्यांना माझी ओळख पटली आणि त्यांनी मला पंतप्रधानांपर्यंत जाण्यास परवानगी दिली.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मी भेटलो. अतिशय नम्र व्यक्तिमत्त्व. त्यांना ‘श्वास’ चित्रपटाबद्दल माहिती होती. चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दलही माहीती होते. त्यामुळे त्यांनी ‘श्वास’ चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी खास यासाठी वेळ काढला होता. त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यांना मराठी भाषा चांगली समजते. चित्रपट बघून झाल्यानंतर त्यांनी आमच्याशी चित्रपटाविषयी चर्चाही केली. चित्रपट कसा आहे याबाबत प्रतिक्रियाही आवर्जून नोंदवली. आमच्यासोबत फोटो काढला. एवढा मोठा माणूस आणि त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला याचा आम्हाला खूप आनंद झाला.

आमच्या चित्रपटाला एवढय़ा मोठय़ा माणसाची दाद मिळाली हे सुखावह होतं. त्यांच्या भेटीचा अनुभव खूप काही देऊन गेला. श्वास’ चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नाही पण पंतप्रधानांसोबतची भेट त्याहीपेक्षा सरस ठरली होती.

‘श्वास’ चित्रपट दाखवण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम त्यांना भेटली. चित्रपट बघून झाल्यानंतर मी त्यांना भेटले, नमस्कार केला. त्यांनी पाठीवर ठेवलेला हात मला आजही मोरपिसासारखा वाटतो. तो प्रसंग माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

चित्रपट बघून ते म्हणाले, ‘बेटा, आपने बहुत बडा काम किया है।’

मी म्हणाले, ‘भगवान की कृपा और आप लोगोंके आशीर्वाद है। सिनेमा बन गया लेकीन बहुत संघर्ष करना पडा।’

ते म्हणाले, ‘बेटा, एक ध्यानमें रख, संघर्षके बिना इस जिंदगीमें किसीको क्या मिला है? सूरजकी तरफभी देखिए। उसेभी रोज संघर्ष करना पडता है की वो अपना काम करनेमें जरासीभी गलती नहीं करता। अपने समयपे आता है, अपना काम कर जाता है। सूरजके घोडे देखिए। सूरजके घोडेभी विषम थे। सम संख्यामें नहीं थे। सूरज के रथका पहीयाभी एकही था और सूरज का सारथीभी लुला लंगडा था। ऐसा होने पर भी संघर्ष करके उसने अपने काम करने में जरासी भी चूक नहीं की। तो संघर्ष किससे नहीं करना पडता है? बेटा, चिंता मत कर। पुरा यश मिलेगा।’

त्यांचे हे शब्द मला आजही जसेच्या तसे आठवतात. अतिशय प्रोत्साहन देणारे हे शब्द मी कधीच विसरू शकत नाही.

– माधवी घारपुरे, ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका.

शब्दांकन : चैताली जोशी