मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. नुकत्याच झालेल्या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना दिलेला हा उजाळा.

नोव्हेंबर २६, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एटीएसप्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. मनाला चटका लावणारी ही घटना होती. कारण करकरे हे केवळ कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारीच नव्हते, तर उच्चप्रतीची अभिरुची आणि सौंदर्यादृष्टी रुजलेलं त्यांचं लोभस व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेलं होतं. करकरे यांचे आप्त, मित्र आणि पोलीस दलातील त्यांचे सहकारी यांना हळहळ वाटली ती त्यामुळे.

Mumbai Crime Branch detained two suspects from Navi Mumbai
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोघांना गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं
terrorist attack
अन्वयार्थ: भीषण हल्ल्यातही युद्धाची खुमखुमी?

समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणवान आणि कर्तृत्ववान व्यक्तीविषयी करकरे यांना अपार कुतूहल आणि ओढ होती. त्यामुळे त्या त्या व्यक्तींच्या सान्निध्यात जाण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे. ज्या ज्या व्यक्तींनी स्वत:च्या क्षेत्रात गरुड भरारी घेतली त्यांची जडणघडण, वाटचाल आणि हस्तगत केलेले कौशल्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. या विषयावर बोलताना ते अगदी रंगून जायचे.

मध्यमवर्गीय ते गर्भश्रीमंत परिवारांबरोबर करकरेंचा स्नेह होता. आणि शेवटपर्यंत तो त्यांनी जोपासला. सहपोलीस आयुक्त या पदाची झूल बाजूला ठेवून या परिवारांमध्ये ते मिसळून जात. त्यांच्या या गुणाचं अनेकांना कौतुक वाटे.

पोलीस दलातील रुक्ष, तणावग्रस्त आणि धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत असूनही वाङ्मय, चित्रपट, नाटक, चित्रकला, संगीत, वक्तृत्व, प्रबोधन आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांची त्यांना आवड आणि गोडी होती.

करकरेंचं प्राथमिक शालेय शिक्षण नागपूरला महानगरपालिकेच्या शाळेत झालं.

‘‘माझ्या शाळेला नावाचा बोर्डच नव्हता’’ असं मोठय़ा गमतीनं ते सांगायचे. जिद्द, मेहनत आणि कष्टाळू वृत्तीच्या जोरावर त्यांनी स्वत:चं ध्येय साध्य केलं. सुरुवातीची नागपूरमधील नोकरी असो किंवा मुंबईतील पोलीससेवेत प्रवेश करण्यापूर्वीची नॅशनल प्रॉडक्टीव्हिटी कौन्सिल आणि हिंदुस्थान लिवरमधील उच्च अधिकाराच्या जागा असोत प्रत्येक ठिकाणी स्वत:च्या गुणवैशिष्टय़ाने ते सर्वाच्या ध्यानात राहिले.

पोलीस अधिकारी म्हणून हेमंत करकरे यांचं मोठेपण कशात होत तर त्याचं उत्तर आहे करकरेंच्या नि:पक्षपाती कार्यपद्धतीत! स्वत:चे भावबंध अथवा नातेसंबंध त्यांनी कर्तव्याच्या आड कधीच आणले नाहीत. उलट समाजातील गरीब, पीडित आणि अन्यायग्रस्त व्यक्तीसाठी त्यांनी नेहमीच आपल्या अधिकारपदाचा न्याय देण्यासाठी उपयोग केला. त्या दृष्टीने ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ व मुंबईतील परिमंडळ- ५ चे काम विशेष लक्षवेधी होते.

विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर विविध विषयांवर हितगुज करण्यात, संवाद साधण्यात ते अग्रेसर होते. त्या दृष्टीने अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहआयुक्त या पदावर काम करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रियाशिलतेचा त्यांनी करून घेतलेला सहभाग कौतुकास पात्र ठरला. अनेक समाजोपयोगी सामाजिक संघटनांबरोबर त्यांचा संपर्क होता. त्या दृष्टीने ठाण्यामध्ये पोलीसउपायुक्त पदावरील त्यांच्या कर्तव्यकाळातील त्यांची कामगिरी शहराचं मानसशास्त्र जाणून घेण्याच्या दृष्टीने अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठरली होती.

प्रथमदर्शनी करकरेंचं व्यक्तिमत्त्व शांत, नम्र आणि प्रसन्न वाटे. नागपूरचा आदबशीरपणा त्यांच्या हालचालीमधून, बोलण्यातून जाणवे. संवादाच्या शेवटचं त्यांचं मंद हास्य खूपच आपुलकीचं वाटे. त्यांच्याबरोबर संवाद साधताना खूप मोकळेपणा वाटे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या करकरेंचा स्वभाव खूपच स्निग्ध होता.

करकरेंच्या आयुष्याकडे नजर टाकल्यास त्यांनी स्वत:च्या आयुष्याची आखणी अतिशय विचारपूर्वक केली होती. असच अनुमान काढता येईल. पोलीससेवेत ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली तेथे त्यांनी नवनव्या कल्पना रुजविल्या, नवनवे प्रयोग केले. प्रत्येक ठिकाणची नवीन नेमणूक नव्या प्रयोगाच्या दृष्टीनेच पाहिली. काम करणारा व करून घेणारा अधिकारी अशीच त्यांची ओळख होती.

अभ्यास आणि संशोधन वृत्तीमुळें अनेक वलयांकित व्यक्तींशी त्यांचा संबंध आला. त्या व्यक्तींच्या सहवासात ते स्वत:ला समृद्ध करत गेले. स्वत:चे शालेय सोबती, मित्रवर्ग आणि विविध क्षेत्रांतील गुणजन यांच्यासोबतचे त्यांचे भावबंध अतूट होते. त्याचे पूर्ण श्रेय करकरेंच्या मृदू स्वभावात जाते.

आज हेमंत करकरे आपल्यात नाहीत ही भावना मनाला वेदना देणारी आहे. त्यांना जाऊन आज सात वर्षे झाली. त्यांच्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला करकरेंचं जाणं कायम बोचणार आहे. सुस्वभावी, सौंदर्यप्रेमी आणि प्रेमळ अंत:करणाच्या एका व्यक्तिमत्त्वाला कर्तव्य बजावत असताना आलेलं वीरमरण म्हणूनच चटका लावणारं आहे. त्यांच्या स्मृतीस प्रणाम..!
अरविंद चव्हाण – response.lokprabha@expressindia.com