-सुनिता कुलकर्णी

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १९९८ मध्ये ‘इंडिया 2020’ हे पुस्तक लिहून २०२० साली भारत महासत्ता झालेला असेल अशी मांडणी केली होती. आज त्याच तथाकथित महासत्तेची लक्तरे शेकडो मैलांची पायपीट करत शहरांमधून आपापल्या खेड्यांकडे निघाली आहेत. तिथेही त्यांच्यासाठी कुणी ताट वाढून ठेवलेलं नाही. तिथे काही मिळत नाही म्हणून तर जगण्यासाठी हे जीव शहरांकडे धाव घेत होते. शहरांमध्ये जगण्याची परवड होत असली तरी त्यांच्या हाताला काम मिळत होतं. गावातली जातीची ओळखही शहरात काही प्रमाणात का होईना पुसली जात होती. अशा अनेक घटकांमुळे गेली काही वर्षे ‘शहरीकरण आवडे सर्वांना’ ही अवस्था आलेली होती. कारण त्यातून एकाच ठिकाणी केंद्रित होणारी बाजारपेठ. त्यातून होणारी उलाढाल. अशा बाजारपेठांचे गोडवे गेली काही वर्षे गायले जात होते. पण आपत्तीच्या काळात शहरांमध्ये आपल्याला जागा नाही हे कळल्यावर कष्टकरी मजूर आपापल्या गावखेड्यांकडे मिळेल त्या मार्गाने धाव घेत आहेत. ‘खरा भारत खेड्यांमध्ये राहतो’ हे गांधीजींचं विधान करोना नामक एका आकाराबाबत क्षुल्लक असलेल्या विषाणूने उदाहरणासहित स्पष्ट केले आहे.

पण हे विधानही तसं अर्धसत्यच, कारण याच भारतात एकेकाळी मोठमोठी नगरे होती. तिथून परदेशांमध्ये रेशीम, मसाले यांचा व्यापार चालायचा. रोमच्या पाडावानंतर तेव्हाच्या भारतात राहणाऱ्या कुशल विणकरांचा रोजगार गेला आणि ते हळूहळू खेड्यांमध्ये विस्थापित झाले, शेती करू लागले. आज जागतिकीकरणाची उलट प्रक्रिया (रिव्हर्स ग्लोबलायझेशन) सुरू होईल की काय या शक्यतेची चर्चा आहे. जागतिकीकरण ही आधुनिक संकल्पना मानली जाते. पण जागतिकीकरण तेव्हाही होतंच. ते मोडकळीस आलं म्हणून नगरांमधला कष्टकरी वर्ग खेड्यांमध्ये विखुरला.

आज पुन्हा तोच अतिसामान्य, कष्टकरी वर्ग खेड्याकडे परत चालला आहे. त्याच्या पोटात भूक आहे, गालावर अश्रू आहेत आणि डोळ्यात भविष्याची भीती. त्याच्या हातात पाण्याची बाटली आणि घासभर अन्न द्यायला ठिकठिकाणचे कार्यकर्ते, सर्वसामान्य माणसे रस्त्यावर उतरली, पण त्याचे अश्रू पुसायला रस्त्यावर उतरलेल्या एकाही नेत्याचं, लोकप्रतिनिधीचं छायाचित्र बघायला मिळालेलं नाही.
आजच कशाला, फाळणीच्या वेळीदेखील त्या भीषण दंगलीचा विखार शमवायला, लोकांचे अश्रू पुसायला एकही राजकीय नेता घराबाहेर पडला नव्हता. पडले ते केवळ अहिंसेचे महत्व सांगणारे, माणुसकीचे आवाहन करणारे गांधीजी.  आजही त्याचीच उणीव जाणवते आहे…