04 March 2021

News Flash

स्मरण पंचकन्यांचे…

या पंचकन्यांचे नित्य स्मरण केले तर महापातकाचा नाश होतो हा त्याचा अर्थ.

00-navratri-logo-lpभारतीय संस्कृतीत ज्यांचे नित्य स्मरण करायला सांगितले आहे त्या पंचकन्या मातृत्वासाठी किंवा पत्नीत्वासाठी नाही तर त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी जनमानसात लोकप्रिय आहेत.

अहल्या द्रौपदी सीता

तारा मंदोदरी तथा।

पंचकन्या: स्मरेन्नित्यं

महापातकनाशिनी:॥

असा हा पूर्वापार चालत आलेला श्लोक आहे. या पंचकन्यांचे नित्य स्मरण केले तर महापातकाचा नाश होतो हा त्याचा अर्थ. रामायण, महाभारतातल्या या स्त्री-व्यक्तिरेखा साऱ्यांच्याच आदर्श आहेत. जनसामान्यांच्या स्मरणातून, त्यांच्या श्रद्धेचा विषय बनून राहिल्यात. या श्लोकात कधीतरी सीतेच्या ऐवजी कुंतीही असते, असे काही पाठभेद आहेत. पण आणखी एक पाठभेद आहे त्याला आधार मिळालेला नाही. तो –

अहल्या द्रौपदी सीता

तारा मंदोदरी तथा।

पंचकं ना स्मरेन्नित्यं

महापातकनाशिनी:॥

याचा अर्थ होतो, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पाचांचे (पंचकं) ना म्हणजे पुरुषाने (ना-म्हणजे पुरुष याचे प्रथमा एकवचन) नित्य स्मरण करावे. प्रचलित श्लोकात कुंती फार अभावाने आढळते म्हणून  अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी यांचा विचार करू.

अहल्या

अ+ हल् – हल् म्हणजे नांगरणे. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. (Vergin land) हा अर्थ अहल्या या व्यक्तिरेखेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. त्या आधी आपण अहल्येचे रामायण वा इतर साहित्यातील चित्रण पाहू. अहल्येची उत्पत्ती-कथा रामायणाच्या उत्तरकांडात येते (वा. रा. उत्तरकांड ३०). ब्रह्मदेवाने सजीव सृष्टीमधील सर्वात सुंदर स्त्री निर्माण केली तिचे नाव त्याने अहल्या असे ठेवले. अहल्या याचा अजून एक अर्थ निर्दोष असा आहे. जिचे सौंदर्य वादातीत आहे, निर्दोष आहे ती अहल्या. त्याने तिला गौतम ऋषींजवळ सोपवले. ती वयात आल्यानंतर गौतम ऋषींनी तिला परत ब्रह्मदेवाकडे आणले. गौतम ऋषींनी अत्यंत मायेने, संयमी राहून तिचा सांभाळ केला हे बघून ब्रह्मदेव संतुष्ट झाला आणि त्याने गौतम ऋषींना अहल्येचा भार्या म्हणून स्वीकार करण्यास सांगितले. अशा रीतीने अहल्या गौतम-पत्नी झाली.

रामायणाच्या आदिकांडात (वा. रा. आदिकांड ४८) विश्वामित्र अहल्येची कथा सांगतात. इंद्राला अहल्येसारख्या सर्वात सुंदर स्त्रीचा उपभोग घेण्याची इच्छा असते. तो गौतम ऋषींचे रूप घेऊन आश्रमापाशी येतो. या कामात त्याला मदत करण्यासाठी चंद्र कोंबडय़ाचे रूप घेऊन रात्रीच्या दोन प्रहरात आरवतो. गौतम ऋषींना वाटते पहाट झाली आणि ते स्नानसंध्यादि नित्यकम्रे करण्यासाठी गोदातीरी जातात. तेव्हा गौतम ऋषींचे रूप घेतलेला इंद्र आश्रमात येतो आणि अहल्येकडे मीलनाची मागणी करतो. (वा. रा. आदिकांड ४८. १८) अहल्येला त्याच्या रूपाची शंका येते तरीही ती कुतूहलाने त्याच्या मागणीचा स्वीकार करते. त्यानंतर ती इंद्राला म्हणते- ‘मी कृतज्ञ आहे. पण हे देवेंद्रा आपण येथून त्वरित निघून जावे आणि गौतम ऋषींपासून आपले आणि माझे रक्षण करावे’ (वा. रा. आदिकांड ४८. २१). इंद्र निघून जात असतानाच तिथे गौतम ऋषी येतात. त्यांच्या शापामुळे इंद्राचे वृषण गळून जाते. अहल्येला ते सर्व जगापासून अलिप्त, फक्त वायू भक्षण करून, राखेची शय्या करून, पश्चातापदग्ध होऊन निबिड अरण्यात उग्र तपश्चर्या करावी अशी शिक्षा देतात. अहल्येने रामाचा आदरसत्कार केल्यावर तिची या शिक्षेतून सुटका होईल आणि तिचा ते स्वीकार करतील असेही सांगतात (वा. रा. आदिकांड ४८. २९-३२). येथे अहल्येचे वर्णन जसे आहे तसे केले आहे. जगातील सर्वात रूपवती स्त्रीला साक्षात देवेंद्राच्या मागणीचा मोह पडू शकतो. पाíथव स्त्री-सौंदर्य हे स्वर्गीय सौंदर्य आणि पौरुषत्वाकडे आकर्षलेि जाते या घटनेचा वेध येथे घेतला आहे. या घटनेआधी अहल्येला गौतम ऋषींपासून शतानंद नावाचा पुत्र आहे. तरीही तिच्यातली कामेच्छा अतृप्त आहे. तिने संभाव्य धोके माहीत असूनही आपल्या मनातील इच्छा तृप्त करण्याचे धाडस दाखवले आणि पतीने दिलेली शिक्षाही समजूतदारपणे भोगली.

20-panchaknya-lp

‘कथासरित्सागर’मध्ये या कथेत तत्कालीन समाजातील स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेचे प्रतििबब पडलेले दिसते. त्यात गौतमऋषींचे आगमन होताच इंद्र भीतीने मांजरीचे रूप घेऊन पळून गेला. गौतमऋषींनी कोण आहे असे विचारताच अहल्येने मज्जार असे सांगितले. याचा अर्थ मांजर आणि माजा-जार असाही होतो. त्यावेळी गौतमऋषींच्या शापामुळे इंद्राच्या शरीरावर शंभर छिद्रे निर्माण झाली आणि अहल्या शिळा झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. याचा अर्थ ती खरेच शिळा झाली होती का किंवा रामाने तिचा उद्धार केला का? अहल्येला तिची चूक कळल्यामुळे ती पश्चात्तापदग्ध झाली आणि ती मनाने दगड झाली. तिचा पुत्र शतानंद तिला सोडून गेला तरीही तिला त्याचे काहीही वाटले नाही. ती आत्ममग्न, शीलवत राहिली. तिचा सारा आत्मसन्मान, पावित्र्य नष्ट झाले. रामाच्या पदस्पर्शाने (मानसशास्त्रीय समुपदेशनामुळे) तिचा सारा आत्मसन्मान पुन्हा तिला प्राप्त झाला.

कुमारील भट्टाने ही कथा नसíगक वर्णन आहे असे प्रतिपादिले आहे. त्याच्या मते अहल्या हे रात्रीचे तर इंद्र हे सूर्याचे प्रतीक आहे. अर्थात इथे हा अर्थ घेतलेला नाही. रामायण आणि कथासरित्सागर या दोन्ही कथेत पुरुषसत्ताक, पारंपरिक समाजातही अहल्या, अत्यंत रूपवती, ब्रह्मदेवाची प्रथम कन्या, स्वत:च्या इच्छेला प्रमाण मानणारी, जे घडले ते स्पष्टपणे सांगणारी, पतीने दिलेली शिक्षा भोगणारी स्वतंत्र अशी स्त्री आहे. रामायणात तिला अधिक स्पष्ट, धीट, निर्भीड दाखवली आहे. भारतीय परंपरेत स्त्रीला नेहमी भूमीची उपमा दिली जाते. स्त्री ही जमीन आणि पुरुष हा नांगर/फाळ. तिच्या नावाचे अर्थ लक्षात घेता असेही म्हणता येईल की अहल्येला इंद्राने घर्षण करूनही ती अ-हल्या म्हणजे न नांगरलेली आणि निर्दोष राहिली. परपुरुषाशी समागम केल्याच्या पातकातून मुक्त राहिली. अर्थात पुरुषसत्ताक समाजात तिला त्यासाठी तपश्चरण करावे लागले.

द्रौपदी

राजा द्रुपदाची कन्या. पुत्रकामेष्टी करत असताना यज्ञनारायणाने दिलेली कन्या. अयोनिजा, श्यामला, नीलपद्मगन्धा, बुद्धिमती, रुपगर्वतिा द्रौपदी, महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र. तिची कथा आपल्याला माहीत आहेच. सासूच्या-कुंतीच्या आज्ञेने बहुपतित्व स्वीकारावी लागणारी पाची पतींना समत्वाने ममत्व देणारी, समíपत होणारी एक तरुण, रूपगर्वतिा, आपल्या पाचही पतींचे गुणदोष जाणून असणारी द्रौपदी म्हणजे पांडवांना बांधून ठेवणारा, त्यांच्यातले पौरुषत्व जागे ठेवणारा धागा आहे. महाभारतात अनेक प्रसंगांमध्ये द्रौपदी आपल्या विलक्षण अशा सौंदर्याने आपल्या पतींना ओंजारत-गोंजारत घायाळ करत तर कधी आपल्या मेधावी बुद्धिमत्तेने, कटू वाग्बाणांनी तीक्ष्ण प्रहार करत ईप्सित हेतू साध्य करते. पाचही पतींची भार्या असूनही तिचे स्त्री-पावित्र्य अबाधित आहे.

तिने कर्ण, कीचक, जयद्रध यासारख्या कामांध पुरुषांना चांगलेच फटकारले आहे. आपल्या पतीच्या साहाय्याने कीचक, जयद्रध यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. द्यूत प्रसंगी धृतराष्ट्राने वर दिले असता ती आपल्या पतींना दास्यातून मुक्त करते आणि शेवटचा वर दिला असूनही मागून घेत नाही. या प्रसंगात तिने कुरु कुळातील ज्येष्ठांशी ज्या पद्धतीने वाद घातला आहे त्यात तिची प्रचंड बुद्धिमत्ता, संस्कारी रूप पण त्याचबरोबर स्त्रीत्वाचा अपमान झाल्यामुळे चवताळलेले स्त्रीमनही दिसते. द्रौपदीचे अजून एक विलोभनीय रूप म्हणजे तिचे कृष्णाशी असलेले नाते. तिचे सखी रूप स्त्रीमनाला भुरळ घालते. दक्षिण भारतात द्रौपदीचा स्वतंत्र देवी म्हणून पंथ आहे. द्रौपदी अबला नाही तर एक सशक्त, स्वतंत्र, विचारी, स्त्रीत्वाची ताकद असलेली, त्याचा पुरेपूर नि योग्य वेळी वापर करणारी एक आदिशक्ति आहे.

सीता

रामायणाची नायिका, भूमिकन्या, अयोनिजा, शालीन, बुद्धिमती, संस्कारी, स्वतंत्र, सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. वेदकाळात नांगरणीच्या वेळी सीता यज्ञ करीत असत. म्हणून नांगरताना सापडलेली कन्या म्हणून तिचे नाव जनकाने सीता ठेवले. सीतेची व्यक्तिरेखा जी आपल्याला संस्कृत साहित्यातून आणि लोकसाहित्यातून कळते ती थोडीशी परस्परविरोधी आहे. रामायणव्यतिरिक्त संस्कृत साहित्यातील सीता ही आदर्श भारतीय नारी अशा स्वरूपाची आहे तर लोकसाहित्यात सीतेचे स्त्री रूप, तिला स्त्री म्हणून भोगावे लागलेले दु:ख, तिची फरफट, या सर्वाला जबाबदार असलेला तिचा पती, त्याबद्दल त्यात व्यक्त झालेला संताप या गोष्टी स्पष्टपणे अधोरेखित करणारी आहे. रामायणातील सीता ही जास्त वास्तववादी आहे. ती भारतीय स्त्रीचे खरे रूप आहे. शालीन, बुद्धिमती, संस्कारी, जमिनीशी नाते सांगणारी, शिवधनुष्याशी लीलया खेळणारी, बहिणींशी मत्रिणीचे नाते असणारी, सासरी सर्वाची मने जिंकणारी, पतीवर नितांत, अतूट श्रद्धा, प्रेम असणारी अशी आहे. सीतेचे अजून एक रूप आहे जे रामायणात दिसून येते ते म्हणजे बुद्धिमान, धर्मकाय्रे जाणणारी, कर्तव्यनिष्ठ, स्वतंत्र विचारांची स्त्री. वनवासकाळात अथवा लंकेच्या विजनवासात आणि नंतर उत्तरकांडात तिचे हे रूप प्रकर्षांने जाणवते. परिटाने घेतलेल्या शंकेवरून, प्रजानुरंजनाच्या नावाखाली दोहदपूर्तीच्या निमित्ताने लक्ष्मणाला सीतेला कायमची वनवासात सोडण्याची आज्ञा करतो. लक्ष्मण सीतेला हा निरोप सांगतो तेव्हा सीता ज्या तडफेने त्याला प्रत्युत्तर देते ते वाखाण्यासारखे आहे. अश्वमेध यज्ञ समाप्तीच्या वेळी सीता भूमिमातेला पोटात घे असे सांगते तेव्हाचे तिचे वक्तव्य मुळातून वाचण्यासारखे आहे.

तारा

वाल्मीकीने रामायणात तत्कालीन समाज रंगवताना सर्वच पात्रांच्या गुणदोषासहित असलेले त्यांचे स्वतंत्र अस्तित्व रंगवलेले आहे. तारा ही अशीच स्वतंत्र अस्तित्व असलेली सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. ती अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेली, राजनीती निपुण, आत्मभान असलेली स्त्री आहे. जेव्हा सुग्रीवाचा वालीने पराभव करताच सुग्रीव लगेचच पुन्हा वालीला ललकारत असतो तेव्हा तारा संभाव्य धोका ओळखून वालीला युद्धभूमीवर जाण्यास परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण वाली तिला न जुमानता युद्धासाठी जातो आणि वीरगतीस प्राप्त होतो. केवळ अंगदाला त्याचे राजगादीचे हक्क मिळावेत म्हणून ती वालीवधानंतर सुग्रीवाशी विवाह करते. सुग्रीव सीतेला शोधण्यात मदत करण्यात कुचराई करतोय हे जाणवल्यामुळे संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात त्याच्या अन्त:पुरात पोचतो. त्यावेळी तारा त्याची चांगलीच कानउघडणी करते आणि सुग्रीवाचे कवच बनून लक्ष्मणाच्या क्रोधापासून त्याचे रक्षण करते. आपले नाव तारा- रक्षण करणारी- असे सार्थ करते.

मंदोदरी

रामायणात मंदोदरीचे अत्यल्प वर्णन आहे. मंदोदरीने रावणाला दुष्कृत्ये न करण्याचा वारंवार सल्ला दिला. ती केवळ रावणाची सावली नव्हती तर अत्यंत रूपवती, राजनितीज्ञ, विचारी स्त्री होती. तिने रावणाला सीतेला रामाकडे परत पाठवण्याबद्दल तिने रावणाला अनेकवार विनविले पण रावणाने तिला जुमानले नाही. पण मंदोदरीच्या धाकामुळे त्याने सीतेशी कधी गरवर्तन केले नाही. एका आख्यायिकेनुसार, रावणाने योग्यांकडून मिळवलेले रक्त काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी एका पात्रात ठेवले होते आणि ते प्राशन न करण्याबद्दल मंदोदरीला बजावले होते. परंतु उत्सुकतेपोटी तिने ते प्रश्न केले आणि ती गरोदर राहिली. त्यातून झालेले कन्यारत्न तिने लोकलज्जेस्तव एका पेटीत ठेवून दूरदेशी पाठवून दिले. तीच पेटी पुढे राजा जनकाला मिळाली आणि तीच सीता होय.

या पाचही स्त्री व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या वेगळ्या अनुभूती व्यक्त करतात. जर आपण हा श्लोक पंचकन्या या अर्थाने घेतला तर या कन्या आहेत. कन्या म्हणजे कुमारी, अविवाहित स्त्री. यांना कन्या का बरे म्हटले असावे? खरं तर या सगळ्याच विवाहित स्त्रिया आहेत. यात एक वेगळा अर्थ अनुस्यूत आहे. अहल्या, द्रौपदी यांचा एकापेक्षा अनेक पुरुषांशी संबंध येऊनही त्या पवित्र राहिल्या. तारा, मंदोदरी यांनी आपले राज्य सुस्थिर व्हावे यासाठी पतीनिधनानंतर दिराशी लग्न केले. सीता ही कितीही संकटे आली तरी कायम आपल्या इच्छेनुसार वागली. वनवासात न जाण्याबद्दल तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न तिचे सासू-सासरे, राम यांनी केला, पण तरीही ती वनवासात गेली आणि सारे काही तिने हसतमुखाने सहन केले. शेवटच्या प्रसंगीही तिने भूमातेच्या उदरात जाणे पसंद केले. काही श्लोकांत सीतेएवजी कुंतीचे नाव असते. कुंतीही अशीच कुमारी होती.

या श्लोकाचे विश्लेषण करता एक लक्षात येते की या पाचही जणी त्यांच्या मातृत्वासाठी किंवा पत्नीत्वासाठी ओळखल्या जात नाहीत तर त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता असलेल्या स्त्रिया म्हणून ओळखल्या जातात. स्त्री-पुरुष संबंध किंवा नीती-अनीतीच्या संदर्भात त्याकाळच्या मान्यता वेगळ्या होत्या. या सगळ्या गोष्टीही एका वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येत होत्या. नंतर त्याला अनेक परिमाण लाभले.  आपण पंचकं ना असा पाठभेद घेतला तर या श्लोकाला आणि या पाच जणींना एक वेगळीच उंची प्राप्त होते. पुरुषाने (ना) या पाच जणींचे स्मरण केले पाहिजे हा अर्थ जास्त संयुक्तिक ठरतो. उत्तरोत्तर काळात स्त्रियांवरची बंधने अधिकाधिक दृढ झाली. स्त्री एका पारंपरिक भूमिकेत रूढ झाली. तिचे स्वतंत्र अस्तित्वच लोप पावले. ती पतीची सावली, मुलांची मावली यापुरतीच घराच्या चार िभतीत बंदिस्त झाली. अशा वेळी पुरुषाला या श्लोकाच्या रूपाने जाणीव करून दिली जाते की या पाच जणी भारतीय स्त्रीचे रूप आहेत. स्त्रीला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. तिचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता फुलू दिली पाहिजे. ती पुरुषाच्या बरोबरीने घराचा, समाजाचा, राष्ट्राचा आधारस्तंभ आहे.

आज समाजात भारतीय स्त्रीत्वाचा -स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली, बुद्धिमता असलेली आणि घरदार (कुटुंब आणि समाज) याची समर्थपणे धुरा वाहणारी स्त्री- हाच आदर्श असला पाहिजे हा संदेश हा श्लोक देत असतो.
डॉ. प्राची मोघे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:25 am

Web Title: remembering panchakanya
Next Stories
1 दुर्गरुपेण संस्थित:
2 उत्सव नवरात्रीचा…
3 देवी नवदुर्गा
Just Now!
X