14 December 2017

News Flash

..तरच स्वातंत्र्य समजणार

इतिहास भूगोलावर घडतो. इतिहास मूल्यांसाठीचा लढा माहीत करून देतो, जाणवून देतो.

रेणू दांडेकर | Updated: August 11, 2017 9:37 PM

रेणू दांडेकर

‘‘आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं.’’  ‘‘ का मिळालं?’’ ‘‘कारण आपण खूप लढा दिला. बलिदान केलं.’’ ‘‘का मिळालं स्वातंत्र्य?’’ ‘‘आपण पारतंत्र्यात हातो. आपल्याच देशात आपण स्वतंत्र नव्हतो..’’ ‘‘का?’’  याचं उत्तर काय द्यायचं पाचवी, आठवीतल्या मुलांना! तरीही उत्तर त्या मुलाला द्यावेच लागणार होते. ‘‘आपण गुलाम झालो. कोणीतरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं.’’ शिक्षक बोलतच होते. दोन्ही गोष्टी त्याला अनुभूत होत नव्हत्या. वस्तू हिरावून घेता येते, खसकन ओढून घेता येते. स्वातंत्र्य काय वस्तू आहे? नि हिरावून कशी घेता येईल? स्वातंत्र्य ही संकल्पनाच समजली नाही तर मग देशप्रेम, देशभक्ती वगैरे मूल्यांचं रोपण, जतन आणि संवर्धन कसं होणार? वेगवेगळ्या वयांसाठी ते समजून कसं द्यायचं?

शाळेजवळ रहाणाऱ्या एका मुलाच्या घरी २०-२५ जण गेले.  त्या घरातल्या मुलाला कोंडलं. बाहेर यायला परवानगीच दिली नाही. तो मुलगा रडू लागला, ओरडू लागला, दार उघडा दार उघडा असं म्हणू लागला. त्याचे वडील आले. त्यांना हे सर्व माहीत होतं. ते म्हणाले, ‘‘घर आमचं. मुलगा माझा. ही खोली आमची. तुम्ही कोण कोंडणार त्याला?’’ ‘‘याला जेवायला नाही मिळणार, झोपायला काही मिळणार नाही..’’ बाकीच्या मुलांना समजेना हा काय प्रकार आहे? घर याचंच आहे नि असं का? कोंडलेला मुलगा दारावर धडका देऊ लागला. एक वेळ अशी आली की दार उघडून तो बाहेर पडला. ‘‘कोंडलेला होतास तेव्हा काय झालं रे?’’ ‘‘कसं तरी झालं. भीती वाटली. मला बाहेर यायचं होतं. मला रागही आला.’’ ‘‘रडायला लागलास. का रे?’’ ‘‘माझे बाबा म्हणाले आमच्याच घरात तुम्ही मला कोंडणारे कोण? मग धडपड..’’ सगळी मुलं हा प्रकार पाहात होती. सगळ्या मुलांना घेऊन शिक्षक मैदानावर आले. मातीत त्यांनी  भारताचा नकाशा काढला. ‘‘आपण सचिनला त्याच्याच घरात कोंडल्यावर त्याची जी अवस्था झाली ते पारतंत्र्य. आपल्याच घरात आपल्यावर बंधन. बाहेर यायचं नाही. जेवायचं नाही. तो बाहेर पडायला धडपडू लागला. दारं धडधडू लागली. रडला. चिडला. कारण त्याला कोंडलं होतं. हे पारतंत्र्य.’’  मुलं शांत होती. कदाचित समजून घेत असावीत.

‘‘देश म्हणजे काय?’’ ‘‘भारत’.’’ ‘‘पण म्हणजे काय?’’ मग शिक्षक म्हणाले आपल्या गावासारखी अनेक गावं आहेत. आपण मराठी बोलतो. आपला महाराष्ट्र. काही लोक कानडी बोलतात त्यांचा कर्नाटक. काही बंगाली बोलतात त्यांचा बंगाल. यांना म्हणतात राज्य. अशा राज्यांचा मिळून हा नकाशा तयार झालाय. याला म्हणायचा भारत. देश आपलाच पण इंग्रजांनी आपल्याला कोंडलं. आपल्यावर बंधन आणली. कसे होते इंग्रज? तुम्ही सिनेमा बघता. इंग्रजी सिनेमे. त्यात जसे गोरे लोक असतात तसे. एक दिवस आला नि सगळी राज्ये, आपण गुलाम झालो..’’ शिक्षकांनी पृथ्वीचा गोल आणला. इंग्लंड दाखवलं मुलांना. लंडन दाखवलं. नि तिथले लोक कुठून कसे कसे आपल्या देशात आले तेही दाखवलं. मुलं भारावून गेली होती.  ब्रिटिश भारतात आले या वाक्याचा अर्थ पाहात होती. खरं तर क्रांती, सशस्त्र उठाव, बंड हे सगळे शष्ट मुलांना पचवण्यासाठी वर्ष जाणार होतं. तरच मुलांना पारतंत्र्याचा अर्थ आणि स्वातंत्र्य हे मूल्य समजणारं होतं. त्यासाठी होणारे हाल समजणार कसे? सोसणं कसं समजणार?

इतिहास भूगोलावर घडतो. इतिहास मूल्यांसाठीचा लढा माहीत करून देतो, जाणवून देतो. यासाठी चित्रपटांची जाणीवपूर्वक माहिती करून दिली तर खूप उपयोग होतो. मुलांना सिनेमा दाखवून कदाचित हे घडणं अवघड आहे. ‘भाग मिल्खा भाग’ ‘रंग दे बसंती’, ‘गदर’, ‘लिजेंड ऑफ भगतसिंग,’ ‘गांधी’, असे  चित्रपट भूतकाळ जाणवण्यास नक्कीच मदत करतात. ती जाण एकदा रक्तात आली की देशभक्ती – देशप्रेम ही शिकवण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत, हे भान येते. तेव्हाचा देश डोळ्यांपुढे आला तरच पारतंत्र्य समजणार नि दिलेल्या लढय़ाचा अर्थ कळणार. एरवी १५ ऑगस्ट म्हणजे सुट्टी, गोडधोड मजा. झेंडे दुसऱ्या दिवशी कचऱ्यात नि फक्त भाषणं असं घडणार नाही. स्वातंत्र्याचं त्यांचं भान लहान वयात यायला हवं हेच खरं.

First Published on August 11, 2017 9:37 pm

Web Title: renu dandekar special article on independence day 2017