25 February 2021

News Flash

जमिनीवरचे मैत्र

पृष्ठवंशीय प्राण्यांमधला सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग म्हणजे सृप वर्ग.

महाराष्ट्राचा ‘बायो’डेटा
सरिसृप
जैववैविधेतमध्ये सरिसृप वर्गाचा इतिहास जुना असला तरी आजही हा वर्ग दुर्लक्षित असाच आहे. नव्या प्रजातींचा शोध लागत असतो, पण यामध्ये सखोल अभ्यासाची गरज आहे.

पृष्ठवंशीय प्राण्यांमधला सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग म्हणजे सृप वर्ग. महाराष्ट्र राज्याला सृपवर्गाशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण इतिहास आहे. १८९४ साली विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी भारतातले पहिले सापांवरचे पुस्तक लिहिले. त्यानंतर १९२८ साली खं. ग. घारपुरे यांचे ‘महाराष्ट्रातील साप’ हे पुस्तक शिक्षण प्रसारक ग्रंथशाळा, पुणे यांनी प्रकाशित केले. आम्ही माल्कम स्मिथने लिहिलेल्या ज्या ‘फौना ऑफ ब्रिटिश इंडिया’, रेप्टाइल्स, भाग एक ते तीन या पुस्तकांचा आमच्या अभ्यासात उपयोग करतो त्याच्या बऱ्याच आधी या पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. हा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे.

त्यानंतर महत्त्वाचे काम हे ८० च्या दशकात, नीलिमकुमार खैरे ऊर्फ अण्णा यांनी केले. तेव्हा त्यांनी केलेला विषारी सापांबरोबर ७२ तास हा प्रयोग असो किंवा हजारो ठिकाणी व्याख्यानाद्वारे केलेले सर्प संवर्धनाचे काम असो, ते सामान्य माणसाच्या मनातील सापांबद्दल असलेली भीती कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. अण्णांनी पुण्यातील कात्रज येथे केलेले सर्प उद्यान म्हणजे राज्यातील सृपवर्गासाठी केलेले एक महत्त्वाचे योगदान आहे.

भौगोलिक वैविध्याच्या दृष्टीने विचार केला तर, महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्र, त्याच्या बाजूला खंबीर उभा असलेला राज्याच्या पाठीचा कणा असलेला पश्चिम घाट आणि त्याच्या मध्ये असलेले सडे (latarite पठारे), घाटाच्या पलीकडे पसरलेले दख्खनचे पठार, त्यामधील नद्यांची खोरे आणि डोंगररांगा, असे अनेक वैशिष्टय़पूर्ण पर्यावरणीय कोनाडे किंवा विभाग आहेत. उत्तरेकडे असलेली सातपुडा पर्वत रांग आणि पूर्वेकडे असलेली चिरोली टेकडय़ांची रांग या रांगा एक प्रकारचे भौतिक अडथळे निर्माण करतात. पश्चिमेला समुद्रकिनारी असलेल्या अनेक खाडय़ा आणि बेटे या नसíगक संपदेला अजूनच समृद्ध करतात. या अशा अनेक वैविध्यपूर्ण अधिवासांमुळे, सृप वर्गातील प्राण्यांनीसुद्धा राज्यात विविध ठिकाणी आपली जैविक विविधता जपली आहे.

सृप वर्गातील प्राणी हे थंड रक्ताचे प्राणी असतात. याचा अर्थ त्यांना आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. त्यासाठी त्यांना बाहय़ घटकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वातावरणातील बदल, मुख्यत: तापमानवाढ या वर्गासाठी खूपच आव्हानात्मक आहे. आपण तापमानवाढ आणि वातावरणातील बदल थांबवू शकलो नाही तर सृपवर्गातील प्राण्यांचे अस्तित्व सगळ्यात आधी धोक्यात यायची शक्यता आहे. सृप वर्ग चार प्रकारे विभाजित केला गेला आहे. क्रोकोडिलिया (chrocodila), टेस्टुडाइन्स (testudines), स्क्व्ॉमाटा (squamata) आणि ऱ्हाइन्कोसिफॅलिया (Rhyncocephalia). त्यापकी पहिल्या तीन समूहातील प्राणी आपल्याकडे आढळतात.

क्रोकोडिलिया म्हणजे मगरींचा विभाग. भारतात तीन प्रकारच्या मगरी आढळतात. सॉल्टवॉटर (Saltwater) किंवा इस्टुरिन क्रोकोडाइल (Esturine crocodile). तिला आपण खाऱ्या पाण्यातील मगर म्हणू शकू. सृप वर्गातील सगळ्यात मोठी असलेली ही मगर सुंदरबन, भितरकणिका आणि अंदमान-निकोबार या ठिकाणी आढळून येते. यातील नर २० फुटापर्यंत वाढू शकतो तर मादी मात्र १० ते १२ फुटांपर्यंतच वाढते. स्थानीय अन्नसाखळीत शिखरावर असलेली ही परभक्षी मगर अनेक वेळा मनुष्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे बदनाम झाली आहे. आपल्या राज्यात मात्र ती आढळून येत नाही.

आणि दुसरी म्हणजे घडियाल. चंबळ, गंधक, रामगंगा या नद्यांमधून आढळून येणारी घडियाल. ही फक्त मासे खाते. या प्रकारातल्या मगरीच्या नराच्या नाकावर एक प्रकारची घडय़ाच्या आकाराची वाढ असते म्हणून यांना कदाचित घडियाल असे म्हणत असावेत. नर या घडय़ाचा उपयोग प्रदर्शनासाठी करतात. घडियालचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लहान पिल्लांची काळजी फक्त आई आणि वडीलच नाही तर मावश्या आणि काका म्हणजे इतर घडियाल पण घेतात. भारतात अस्तित्वात असलेल्या मगरींमध्ये यांचे अस्तित्व जास्त धोक्यात आले आहे.

तिसरी मगरीची जात म्हणजे मार्श क्रोकोडाईल (Marsh crocodile). तिला आपण दलदलीतील मगर म्हणू शकू. भारतभर अनेक ठिकाणी ही मगर आढळते. नर मगर साधारणत: १२ ते १४ फूट असते तर मादी मगर सात ते आठ फूट असते. राज्यातील अनेक नद्या, तलाव व धरणांच्या अडवलेल्या पाण्यात यांचे वास्तव आढळून येते. विशेषकरून कोकणातील वशिष्ठी आणि सावित्री नद्यांमध्ये यांचे मोठय़ा प्रमाणे वास्तव्य आहे. या मगरी नदी किंवा पाणवठय़ाच्या काठाजवळ जमिनीत छान गुहा (Den) तयार करतात. त्याचा उपयोग त्यांना तापमान नियंत्रित ठेवायला, राहायला व लपायला होतो. मादी काठावर अंडी घालतात व बरेचदा त्यांचे रक्षण करताना आढळून येतात.

अजून तरी मनुष्य आणि या मगरी यांच्यामध्ये राज्यात मोठा संघर्ष निर्माण झालेला दिसत नाही पण भविष्यात हा संघर्ष व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी यांची संख्या, अधिवास आणि राहणीमान यांचा अभ्यास झाला पाहिजे.

टेस्टुडाइन्स (testudines) म्हणजे कासवांचा विभाग. जमिनीवर राहणारी, गोडय़ा पाण्यात राहणारी आणि समुद्रात राहणारी कासवे अशी त्यांची अधिवासावर अवलंबून रचना करता येईल. राज्यातील कासवांचा फारसा अभ्यास न झाल्याने, आपल्याकडे माहितीचा तसा अभावच आहे .

पश्चिम किनाऱ्यावर झालेले ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवाच्या संवर्धनाचे काम या पाश्र्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात पाच प्रकारची समुद्री कासवे आढळून येतात, ऑलिव्ह रिडली , हॉक्सबिल, लॉगरहेड , ग्रीन आणि लेदरबॅक. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर यापकी लॉगरहेड सोडून अन्य चारही कासवांचे अस्तित्व नोंदले गेले आहे. समुद्री कासवे फक्त अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि तीही फक्त मादी कासवे. नर कधीच किनाऱ्यावर येत नाहीत. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालताना आढळून आली आहेत. ही कासवांची अंडी बरेचदा किनाऱ्यावरून चोरून खाण्यासाठी विकली जायची. वयस्क लोकांच्या माहितीतून असेही आढळून आले आहे की, पूर्वीच्या काळीही अंडी किनाऱ्यावरून चोरताना, अर्धी अंडी देवाला म्हणून तिथेच वाळूत सोडली जायची. पण या जुन्या प्रथा बंद पडल्या आणि सगळ्याच अंडय़ांची चोरी व्हायला लागली. त्यामुळे राज्यातील ऑलिव्ह रिडलेचे अस्तित्व धोक्यात आले होते. ‘सह्य़ाद्री निसर्ग मंडळा’ने या बाबतीत कोकणकिनारी अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. वेळासचा ‘कासव महोत्सव’ हे याचेच अतिशय उत्तम असे उदाहरण आहे. गेल्या दहा ते १५ वर्षांच्या कालावधीत ऑलिव्ह रिडलेच्या घरटय़ांना संरक्षण देऊन पिलांना परत समुद्रात जाईपर्यंत सगळे नियंत्रण स्वयंसेवकांनी अतिशय उत्तमरीत्या केले आहे.

गोडय़ा पाण्यातील कासवांमध्ये सगळ्यात सामान्यत: आढळून येणारे म्हणजे, भारतीय फ्लॅप शेल टर्टल. आपल्या तलावाच्या काठी, विहिरींमधून बऱ्याचदा दिसणारे कासव म्हणजे हे भारतीय फ्लॅप शेल कासव. त्याच्या पायांना झडपा असतात म्हणून त्याला फ्लॅप शेल असे म्हटले जाते. बऱ्याचदा शुभ शकुन म्हणून किंवा वास्तुशास्त्र म्हणून या कासवांना घरामध्ये ठेवले जाते. पण नसíगकरीत्या भारतात मिळणाऱ्या कासवांना घरात ठेवणे हे बेकायदेशीर आहे. मत्स्यालयात जी लाल कानाची स्लायडर कासवे मिळतात ती ठेवता येतात, पण त्यांची चांगली काळजी घ्यावी आणि त्यांना परत कधीच निसर्गात सोडू नये कारण ती विदेशी कासवे आहेत आणि त्यांना आपण जर निसर्गात सोडले तर स्थानीय कासवांना धोका होऊ शकतो किंवा तीही जगू शकत नाहीत.

जमिनीवर आढळणाऱ्या कासवांमध्ये, सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे स्टार बॅक कासव. वन्यजीव कायद्याप्रमाणे संरक्षित असलेले हे कासव चुकीने बरेच लोक पाळताना दिसतात. पाठीवर चांदण्यांची नक्षी असलेले हे कासव अतिशय सुंदर दिसते आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात याची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होते. मुंबईत विमानतळावर ही कासवे अनेक वेळा शेकडय़ाने पकडली जातात आणि मग त्यांची रवानगी त्यांच्या नसíगक अधिवासात करावी लागते. महाराष्ट्रातील त्यांचे अस्तित्व संशयास्पद आहे. माहितीअभावी या पूर्वीच्या काळात अनेक स्टार बॅक कासवे ही आपल्या जंगलामधून सोडली गेली आहेत.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा तिसरा विभाग म्हणजे पाली, सरडे, सापाची मावशी, घोरपडी आणि साप यांचा विभाग. समाजातल्या सगळ्या अंधश्रद्धा, भीती, उत्सुकता आणि गरसमजुती या प्राण्यांबाबतीत असतात. हा विभाग परत तीन उपविभागांत विभागला गेला आहे. लॅसर्टिलिया हा सरडे, पाली, सापाची मावशी आणि घोरपडींचा उपविभाग आहे, तर सर्पेटिस हा सापांचा उपविभाग आहे. तिसरा एआँफिसबनिया हा उपविभाग, भारतात आढळत नाही.

पाली आणि सरडे या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतात आढळणाऱ्या सगळ्या पाली आणि सरडे हे बिनविषारी आहेत. एखादी पाल किंवा सरडा चावल्याने कसल्याही प्रकारची विषबाधा व मृत्यू व्हायची शक्यता नसते. ‘दुधात पाल पडल्याने माणसांना विषबाधा’ अशा बातम्या आपण बरेचदा वाचत किंवा ऐकत असतो. दुधात कोणताही प्राणी मरून पडला असेल तर त्याने अपचन होऊन पोट बिघडू शकते. तो कोणता प्राणी आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो.

त्याचप्रमाणे ‘पाल चुकचुकली’ हा शब्दप्रयोग काही तरी अशुभ घडेल या अर्थाने वापरला जातो. पण तुमच्या घरात पालीचा आवाज येतो आहे, म्हणजे तुमच्या घरात माश्या, झुरळे आणि डास यांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणावर असावे आणि त्यांना खाण्यासाठी पाली तुमच्या घरात येत असाव्यात. याचा अर्थ पाली एक प्रकारे तुमच्या घरातील या कीटकांवर नियंत्रणच ठेवत असतात. आपल्या घरात आढळणाऱ्या पालींना ‘हाऊस गेको’ असे म्हटले जाते. दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची अशा पालींच्या दोन जाती आपल्या घरांमध्ये आढळून येतात.

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या पाली आढळतात. झाडावर आढळणारी खोड पाल, पश्चिम घाटात आंबोली येथे आढळणारी प्रसादीची पाल, सह्याद्रीच्या किल्ल्यांवर आणि कडय़ांवर आढळणारी अ‍ॅरन बौरीची पाल, सडय़ांवर आढळणारी सातारची पाल किंवा पश्चिम घाटात सापडणारी डेक्कन बॅण्डेड पाल अशा अनेक पालींवर संशोधन महाराष्ट्रात झाले आहे. डॉ. वरदगिरींनी केलेले पालींवरचे काम हे एक भारतातील सृपवर्गाच्या कामातील अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.

सहय़ाद्रीत भटकंती करताना नाणेघाट व आसपासच्या भागात एक खूप मोठय़ा आकाराची पाल पाहिल्याचे आठवतंय. पण तिचा अभ्यास करून तिची हेिमडेक्टलास अ‍ॅरेन बौरी अशा प्रकारची नवीन जात निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण काम याच राज्यात झाले आहे. कदाचित भारतातली सगळ्यात मोठी पाल म्हणूनही तिची गणना होऊ शकते. महाराष्ट्राला सहय़ाद्री आणि त्यात होणारी भटकंती, प्रस्तरारोहण आणि शिवकालीन इतिहास यांचा खूप अभिमान आहे. पण जैविक विविधतेच्या दृष्टीने मात्र अजूनही खूप कमी जण याच सहय़ाद्रीत काम करताना दिसतात. त्याला एक अपवाद म्हणजे वरील पालीवरचे संशोधन.

बहुतांशी पाली या निशाचर असतात. त्याला अपवाद दिवसा सक्रिय असणाऱ्या निमेस्पिस प्रजातीच्या पाली. यात सुद्धा राज्यात नीमेस्पिस कोल्हापुरेन्सिस ही नवीन जात गिरी यांच्या संशोधनातून समजली आहे. या पालींची बुबुळे गोल असतात.

आपल्याकडे आणखी एक गोंधळाचा प्रकार म्हणजे सापसुरळी किंवा सापाची मावशी. इंग्लिशमध्ये या सरडय़ांच्या प्रकाराला िस्कक म्हणतात. पाय खूप छोटे आणि शरीर लांब असल्यामुळे तिला सापाचा प्रकार समजला जातो आणि मग भीती आणि अंधश्रद्धा सुरू होते. कीटक खाऊन जगणारी ही सापसुरळी पूर्णपणे निरुपद्रवी आहे.

बागेतला सरडा किंवा कुंपण सरडा (कॅलॉट्स व्हरसिकलर ) हा आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, प्रजननाच्या काळात त्याच्या नराची मान रक्तासारखी लाल होते आणि म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये ब्लडसकर असे म्हटले जाते. याशिवाय जंगलामध्ये आढळणारा जंगल सरडा आणि बऱ्याच ठिकाणी आढळणारा अतिशय सुंदर असा पंखा असलेला सरडा, ( फॅन थ्रोटेड ) हे आपल्या राज्यात सामान्यत: आढळून येतात.

चाळकेवाडीच्या पठारावर मिळणार सरडा, नुकताच ‘सरडासुपर्बा’ अशा शास्त्रीय नावाने प्रसिद्ध झाला आहे. अतिशय सुंदर दिसणारा हा सरडा राज्याचे एक भूषणच आहे. नराच्या घशाखाली लाल, निळ्या आणि काळ्या रंगाचा पडदा असतो. त्याच्या माध्यमातून तो मादीला आकर्षित करून घेतो. हा सरडा फक्त चाळकेवाडी परिसरातच सापडतो. इतर ठिकाणी सापडणारा तसाच एक सरडा ‘सरडाडार्वििन’ या शास्त्रीय नावाने ओळखला जातो.

घोरपड आपल्या राज्यात सगळ्या ठिकाणी आढळून येते.  खाण्यासाठी काही भागात सांधेदुखीवर वापरण्यासाठी तिची अवैध शिकार होते. तिला उकळून तेल काढले जाते त्यासाठी काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर तिची शिकार होते. राजस्थानमध्ये वाळवंटातील घोरपड खूप विषारी समजली जाते. पण ते खरे नाही. भारतात कुठल्याही प्रकारच्या पाली, सरडे आणि घोरपडी विषारी नाहीत.

राज्यामध्ये पाली, सरडे यांचे खूप मोठय़ा प्रमाणावर जैववैविध्य आहे. पश्चिम घाटात मोठय़ा प्रमाणावर त्यांच्या टॅक्सोनॉमीवर काम झाले आहे. मात्र विदर्भामध्ये या प्रकारचे काम झाले पाहिजे. त्यातून कदाचित अणखीही नवीन जाती सापडतील. सुरुवातीला लिहिले आहे त्यानुसार वातावरणातील बदलांचा या प्राण्यांना सगळ्यात आधी धक्का बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर पर्यावरणीयदृष्टय़ाही संशोधन झाले पाहिजे.

सृप वर्गातील सगळ्यात प्रसिद्ध प्राणी म्हणजे साप, ज्याच्याबद्दल गरसमज, अंधश्रद्धा, भीती आणि पौराणिक कथा यांची समाजावर अतिशय घट्ट पकड आहे. काही साप विषारी असतात. त्यांच्या दंशातून विष शरीरात गेले असेल आणि वेळीच उपचार मिळाले नाही तर जीव जायची शक्यता असते. मात्र त्यामुळे सगळ्याच सापांबद्दल प्रचंड भीती असते.

निसर्गामध्ये सापांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. उंदरांचे नियंत्रण हे सगळ्यात मोठे पर्यावरणीय काम साप करत असतो. आपल्या अनेक पुराणकथांतून आणि पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींमधून सापांना पुजले गेले आहे, पण त्याचबरोबर दिसला साप की त्याला मार असा विरोधाभासही समाजात आढळतो. भारतामध्ये साधारणत ३०० च्या आसपास सापांच्या जाती आहेत. त्यापकी अनेक वैशिष्टय़पूर्ण जाती राज्यात आढळून येतात.

अंडी खाणारा भारतीय साप (Indian egg eater) हा अनेक वष्रे विलुप्त (extinct) समजला गेलेला होता. पण अमरावतीच्या पराग दांडगेमुळे त्याची महाराष्ट्रात नोंद झाली. सापांवर काम करणाऱ्यांसाठी हा अतिशय विशेष आहार असलेला साप अनेक वर्षे एक आव्हान होता. अचानक त्याची विदर्भामध्ये नोंद झाली. याचे कारण म्हणजे गेल्या दोन दशकांत सर्पमित्र हे संशोधनाकडे वळले आहेत. त्याचे श्रेय ‘भारतीय साप’ या पुस्तकाचे सहलेखक, पुण्याचे अशोक कॅप्टन आणि वरद गिरी यांना नक्कीच दिले पाहिजे.

अण्णा अथवा नीलिमकुमार खैरेंनंतर, या दोघांनी राज्याच्या सृप वर्गातील प्राण्यांच्या संशोधनाला चालना दिली. अनेक शोधनिबंध लिहिले गेले. अनेक विद्यार्थी गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातून तयार झाले.

भारतातला सगळ्यात मोठा बिनविषारी साप, अजगर राज्यात सगळीकडे आढळून येतो. वन्य जीव कायद्याप्रमाणे, वाघासारखेच संरक्षण दिलेला हा साप बऱ्याचदा गरसमजुतींमुळे मारला जातो. त्याशिवाय सामान्य दिसणारा बिनविषारी साप म्हणजे धामण. १० ते १२ फुटांपर्यंत वाढणारा हा साप उंदीर खायला म्हणून आपल्या आजूबाजूला आढळून येतो. पूर्णपणे निरुपद्रवी असलेला हा साप निव्वळ भीतीपोटी मारला जातो. इतर अनेक बिनविषारी साप, दिवड, नानेटी, गवत्या, हरणटोळ, कवडय़ा, मांजऱ्या आपल्या आजूबाजूला आढळतात. मानवाला त्यांच्यापासून काहीही धोका नसतानासुद्धा ते मारले जातात. हरणटोळ तर गरसमजुतीमुळे अतिशय कुप्रसिद्ध झालेला साप आहे. हा साप माणसाच्या टाळूला चावतो असा मोठा गरसमज गावागावांतून आहे. झाडावर राहणार हा साप बऱ्याचदा संपर्कात आला तर आपल्या डोक्याच्या जवळपास असतो आणि आपल्याला वाटते की हा आता डोक्याला चावणार. अतिशय सुंदर आणि निरुपद्रवी असणारा हा साप मात्र अशा गरसमजुतीमुळे आणि वृक्षतोडीमुळे धोक्यात आला आहे. याशिवाय काही नव्या सापांच्या जाती गेल्या काही वर्षांत सापडल्या आहेत. त्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे, खैरेंचा खापर खवल्या (‘khaires shield tail), गिरीचा रुका साप (giris bronze back), पाण्यातला ऑलिव्ह फॉरेस्ट स्नॅक (rhabdops aquaticus) .

आपल्या परिसरात उंदीर असतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूला लपण्यासाठी सापाला बऱ्याच चांगल्या जागा असतात. सृप वर्गातील प्राण्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी बाह्य़घटकांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांचे आपल्या घरांच्या आजूबाजूचे वास्तव्य हे आपल्यावरच अवलंबून असते. थंडीमध्ये गावात बरेचदा साप हे चुलीजवळ, लाकडाच्या-गवताच्या मोळीत किंवा गादी व पांघरुणात आढळून येतात कारण त्यांना ऊब हवी असते. तसेच उन्हाळ्यात बरेचदा, पाण्याच्या बाजूला, बागेमध्ये पाणी दिल्यानंतर किंवा सांडपाण्याच्या ठिकाणी, शहरात तर बरेचदा वातानुकूलित यंत्रांमध्ये साप आढळून येतात. सापाचा आणि आपला संबंध, त्याचे खाद्य, त्याला अनुकूल तापमान आणि प्रजननाच्या काळात मादीची शोधाशोध या घटकांमुळे येतो.

लोकांनी घराच्या आजूबाजूला स्वछता ठेवली, धान्याची साठवण झोपायच्या जागेपासून दूर ठेवली, िभतीतील, बिळे आणि भोके बुजवली, रात्री चालताना विजेरी किंवा कंदिलांचा वापर केला, शेतामध्ये काम करताना बुटांचा वापर आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर केला तर बरेचसे सर्पदंश हे टाळता येतील. आपल्या आजूबाजूला चार प्रकारच्या विषारी सापांचा वावर असतो. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग त्याच्या फण्यामुळे तुम्ही ओळखू शकता. मण्यार हा काळ्या रंगाचा असतो. त्याच्या अंगावर पांढऱ्या पट्टय़ांच्या जोडय़ा असतात. त्याचे तोंड आपल्या अंगठय़ासारखे बोथट असते आणि पाठीवर षटकोनी खवले असतात. घोणस हा त्रिकोणी डोक्याचा साप असून त्याच्या अंगावर काळ्या ठिपक्यांच्या रांगा असतात. बरेचदा हे ठिपके एकमेकाला जोडले गेले असतात. जवळपास काही धोका जाणवला तर घोणस शरीराचे वेटोळे करून प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. फुरसे हा साप छोटा असून एक ते दोन फुटांपर्यंत वाढतो. त्याच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची बाणाच्या टोकासारखी खूण असते. त्याला धोका जाणवला तर तो आपल्या शरीराचे वेटोळे एकमेकांवर घासून खरखर असा आवाज काढतो. या चारही विषारी सापांच्या विषाविरुद्ध प्रतिसर्प विष हे उपयोगी आहे. विष शरीरात गेले असेल, (बऱ्याच वेळा विषारी साप चावला तरी तो विष शरीरात सोडत नाही) तर प्रतिसर्प विषाला पर्याय नाही. हे एक औषधच तुमचा जीव वाचवू शकते.

कोकणामध्ये मण्यारला सूर्यकांडर (सूर्याला खाणारा) असे संबोधले जाते. तिथे असे मानतात की, मण्यारचा दंश झालेली व्यक्ती सूर्योदयाच्या आत मरण पावते. मण्यार हा निशाचर साप आहे. तो रात्रीच भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याचा माणसाशी संबंध फक्त रात्री येतो. आणि त्यात दंश झाला आणि विष शरीरात गेले असेल आणि वेळीच उपचार मिळाले नाहीत तर खरंच दंश झालेली व्यक्ती दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय बघू शकत नाही.

तुम्हाला एक आकडेवारी सांगतो. दहा माणसे साप चावल्यावर मांत्रिकाकडे जातात. त्यापकी पाच जणांना बिनविषारी साप चावलेला असतो असे समजू या. आणि पाच जणांना विषारी साप चावला आहे असे समजू या. ज्यांना विषारी साप चावला आहे त्यांपकी दोन ते तीन जणांच्या शरीरात सापाने विषच सोडलेले नसते. म्हणजे एकंदर दहा पकी आठ जणांना काहीही होणार नसते. पण त्यांचा जीव मांत्रिकांमुळे वाचतो आणि जे दोन जीव जातात त्यांनी खूप पापे केलेली असतात. त्यामुळे मांत्रिक त्यांना वाचवू शकत नाही.

ही परिस्थिती आज भारताच्या गावागावातून आहे. तिच्यात बदल हा फक्त सामाजिक सुधारणा आणि आरोग्य योजनांमधील बदलांमुळेच होऊ शकतो. भारतात आज जवळजवळ ५० हजार मृत्यू सर्पदंशामुळे होतात. सर्पदंश हे एक कारण असते. पण त्यांचे मृत्यू हे अंधश्रद्धा, उपचारांना उशीर, डॉक्टरांचे सर्पदंशाच्या उपचारांचे अज्ञान आणि बऱ्याच ठिकाणी प्रतिसर्प विष उपलब्ध नसल्यामुळे होतात.

या चार विषारी सापांशिवाय, राज्यात आढळणाऱ्या सापांमध्ये सह्य़ाद्रीत चापडा (बांबू पिट वायपर), मलबार चापडा (मलबार पिट वायपर) आणि गडचिरोली भागात मिळणारी आग्या मण्यार (बँडेड क्रेट) आणि पुण्याच्या आजूबाजूला सिंध मण्यार (सिंध क्रेट) या सापांचा समावेश होतो. या सापांच्या दंशावर आज तरी आपल्याकडे प्रतिसर्प विष नाही. चापडा या सापाचा दंश घातक नसतो. आग्या मण्यारच्या दंशाची कुठेही नोंद नाही. सिंध मण्यारच्या दंशाच्या काही घटना आहेत. मात्र त्यामध्ये सध्याच्या प्रतिसर्प विषाचा उपयोग खात्रीचा नाही.

सगळ्यात शेवटी, सर्पदंश झालाच तर फक्त तीन गोष्टी करायच्या.

१) धीर द्यायचा

२) गतिहीन ठेवायचे

३) प्राथमिक आरोग्य केंद्रात/ इस्पितळात जायचे

साप कात टाकतो त्याचे कारण म्हणजे सापाच्या त्वचेचे बाह्य आवरण हे केराटिनचे बनलेले असते. ते कधी वाढत नाही. आपली नखे आणि केसही केराटिनपासून बनलेले असतात. या कातीचा कसलाही औषधी उपयोग नाही. बरेचदा सापाची कात औषध म्हणून विकली जाते. आपण आपली नखे किंवा केस औषध म्हणून वापरतो का?

आपल्याकडे नागमणी आणि साप बदला घेतो या दोन संकल्पना मोठय़ा प्रमाणावर आहेत. नागमण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हे मणी विकणाऱ्यांनी निव्वळ लोकांना फसवण्यासाठी काढलेली एक कल्पना आहे. कदाचित असे झाले असावे, सापाची कात टाकण्याची प्रक्रिया नीट होते की नाही हे आर्द्रतेवर अवलंबून असते. जर ही कात पूर्णपणे निघाली नाही तर तिचे तुकडे सापाच्या शरीराला चिकटून राहतात. ही कात अप्र्वतक असते. तिच्यावर तिरकस उजेड पडला तर ती चमकते. असा डोक्यावर राहिलेला कातीचा एखादा तुकडा तिरकस उजेडामध्ये चमकू शकतो आणि नागमण्याच्या कल्पकतेला पािठबा मिळू शकतो. बदला घेण्याच्या किंवा डूख धरण्याच्या तर इतक्या गोष्टी सांगितल्या जातात की त्याला काही अंतच नाही. कधी कधी होते काय, तर प्रजननाच्या काळात नराला आकर्षति करण्यासाठी मादी साप आपल्या शरीरातून एक प्रकारचे फेरोमोन सोडते. आणि त्या काळात जर एखादा मादी साप मारला गेला आणि हे फेरोमोन त्या ठिकाणी असतील तर नर साप मादीचा शोध घेत तिकडे येऊ शकतो. हे बदला घेण्यासाठी नव्हे तर प्रजननासाठी मादीच्या मागावर असलेले नर साप असतात. आणि हे वर्षांतून फक्त एकदा असणाऱ्या प्रजनन काळात होऊ शकते.

सर्पमित्र चळवळीत महाराष्ट्र खूप आघाडीवर आहे. गावोगावी सर्पमित्र आणि त्यांच्या संघटना आहेत. मात्र गेल्या दोन दशकांत अनेक सर्पमित्रसुद्धा सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडले आहेत. त्याची कारणमीमांसा करायला गेलो तर, प्रसिद्धीच्या नादाने विषारी सापांशी खेळ करणे, अज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाचा अभाव ही त्याची कारणे असू शकतात. एकीकडे राज्य सृपवर्गाच्या संशोधनात आणि सर्पमत्रीच्या चळवळीत आघाडीवर आहे, पण त्याचबरोबर, चुकीच्या संकल्पना आणि उगीचच केलेले खेळ याबाबतीतही मागे नाही.

आज सृपवर्गातील प्राण्यांचा संवर्धन आराखडा तयार केला तर, त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर सर्पदंश मृत्यू निर्मूलन, सर्पमित्र प्रशिक्षण आणि या वर्गातील प्राण्यांच्या माहितीचा शालेय शिक्षणात समावेश होऊ शकतो. सर्पदंश मृत्यू निर्मूलन मोहिमेत सामाजिक शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्पदंश उपचारांची सज्जता यांचा समावेश होईल. सर्पमित्र प्रशिक्षणाबाबत वन विभागाने पुढाकार घेऊन या वर्षी महाड येथील सर्पमित्र संमेलनात एक आचारसंहिता प्रकाशित केली. या मध्ये सर्पमित्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातल्या या सर्पमित्रांच्या ताकदीला ‘झिरो बाइट्स’ किंवा ‘शून्यदंश’ या संकल्पनेशी जोडून, ग्रामीण भागात होणारे सर्पदंश कमी करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करायचा संकल्प सगळ्या उपस्थित सर्पमित्रांनी सोडला आहे.

आज महाराष्ट्रात वनविभागाने केलेली मार्गदर्शक तत्त्वे काही राज्यांनी त्यांच्या राज्यात लागू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य खातेसुद्धा सर्पदंश मृत्यू मोहिमेत अधिक लक्ष घालून, प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचाराची पूर्ण सज्जता करेल अशी अपेक्षा आहे. काही वर्षांपूर्वी सर्प-मानव संघर्ष ही एक हरवलेली  आघाडी आहे असे मी मानायचो, मात्र गेल्या दोन वर्षांत राज्यात झालेली प्रगती बघता, मी माझ्या सगळ्या सर्पमित्रांचे आणि वनविभागाचे अभिनंदन करतो.

सरिसृप वर्गातील प्राण्यांचा हा विस्तार पाहिल्यावर काही महत्त्वाचे प्रश्न उरतात. आज आपण महाराष्ट्राचा बायोडेटा पाहत आहोत तेव्हा या बायोडेटामध्ये सरिसृप वर्गाला आजही उपेक्षाच झेलावी लागते. बायो डायव्हर्सटिी म्हणजेच जैववैविध्याचा अभ्यास, त्याच्या संवर्धनाचे प्रयत्न हा सर्वामध्ये मुख्यत: स्थान मिळते ते झाडे, पक्षी आणि सस्तन प्राणी यांना. पण सरिसृप वर्गाला तेवढे महत्त्व मिळत नाही. त्यात सरिसृप वर्गाचा पुरेसा अभ्यासदेखील आपल्याकडे झालेला नाही. टॅक्सोनॉमिक स्टडी म्हणजे एखादी प्रजाती शोधून तिचे नामकरण करणे हे आपल्याकडे पूर्वीदेखील झाले आहे आणि आजदेखील होत आहे. पण या वर्गातील प्राण्यांच्या जीवनमानाचा अभ्यास आजदेखील पुरेसा झालेला नाही. साधी घोरपड घेतली तरी तिचा अधिवास काय, तिचे खाद्य काय, प्रजनन कसे होते, तिला कोणते तापमान लागते असा बिहेव्हिरील आणि इकॉलॉजिकल अभ्यास कमीच आहे. तो झाला तर जैववैविध्यामध्ये या वर्गासाठी ठोस योजना आखता येतील आणि त्यासाठी गरजेचे आहेत स्थानिक पातळीवरील प्रकल्प. असे प्रकल्प महाविद्यालयांच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात आणि असा विस्तृत अभ्यास झाला तरच सरिसृप वर्गातील प्राणी जैववैविध्याच्या नकाशावर ठळकपणे पुढे येऊ शकतील.
(छायाचित्र – वरद गिरी, अशोक कॅप्टन.)
लेखक हे सरिसृप प्राणीशास्त्र तज्ज्ञ आहेत
केदार भिडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:02 am

Web Title: reptiles
Next Stories
1 भूमिका : नीरव मोदी, नेहरूनिंदा आणि आपण!
2 सनद हक्कांची : समान अधिकार हेच उत्तर
3 श्रद्धांजली : ज्योतिष हाच त्यांचा ध्यास होता
Just Now!
X