आपल्या देशात तरी जन्माला आलेल्या बाळाचा जात-धर्म कोणताही असो, त्याला उष्टावण करताना पहिला घास भरवला जातो तो बहुधा भाताचाच. आईच्या दुधापासून लांब जाताना त्याचं पहिलं अन्न असतं ते म्हणजे भात. दूधभात, तूपभात, वरणभात असं काहीही ज्याच्या-त्याच्या उपलब्धतेनुसार. त्यामुळे त्या अर्थाने भात हे पहिलं अन्न. जगभरात अनेक ठिकाणी तर ते प्रमुख अन्न आहे. त्यानुसार तांदळाला ठिकठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. आता आपल्याकडेच लग्नामध्ये तांदळाच्या अक्षता टाकणं हा महत्त्वाचा विधी असतो. लग्न झाल्यावरसुद्धा गृहलक्ष्मी माप ओलांडून गृहप्रवेश करते, ते तांदळाचंच माप. फिलिपाइन्समध्ये लग्न किंवा तत्सम महत्त्वाच्या प्रसंगी तापूय नावाची तांदळापासून तयार केलेली वाइन प्यायची प्रथा आहे. जपानी, सुदानी, बाली (इंडोनेशियन ) लोकांमध्ये महत्त्वाच्या प्रसंगांना सेरी नावाच्या देवीची आराधना केली जाते. ही तांदूळ पिकाची पारंपरिक देवता मानली जाते. थायलंडमध्ये फोसोप, कंबोडियामध्ये फो इनो नोगर, लाओसमध्ये नांग खोसोप या अशाच तांदूळदेवता आहेत. तांदूळ हे या सगळ्या देशांमधलं मुख्य पीक आणि भात हे मुख्य अन्न आहे हा यामागचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. भात पिकवायच्या प्रत्येक पायरीवर या देवतांची आराधना करणाऱ्या वेगवेगळ्या प्रथा या समाजांमध्ये आहेत.

तर असा हा तांदूळ आणि त्याच्यापासून केला जाणारा भात. आपल्याकडेही त्याला आहारात महत्त्वाचं स्थान आहे. लहानग्या जिवाला सोसेल, पचेल असा मऊ भात, त्यावर तूप, दूध-दही अशी साधारण आपल्याकडे भाताची ओळख होते. हळूहळू त्याच्यावर वरणाचं पाणी यायला लागतं, ते पचतंय असं दिसलं की दाट वरण बाळाला भरवायला सुरुवात होते. बाळाच्या पोटात दोन घास जास्त जावेत, अशी आईची धडपड आणि बाळाचा सारखा नन्ना यात मग चिऊकाऊचे घास सुरू होतात तेही भाताचे.

शरीराला आवश्यक असणारी प्रोटिन, कॅलरीज डाळ-तांदुळातून मिळतात. डाळ-भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखंच वाटत नाही, असं अनेकांना वाटतं ते त्यामुळेच असावं. भात हा अनेकांना पोटाला आधार म्हणूनही खायचा असतो. खूप तहान तहान झालीय, अरबट चरबट खाणं झालंय अशा वेळीही आता रात्री घास-दोन घास भात खाऊन झोपेन, बरं वाटेल, अशी वाक्यंही त्यातूनच येतात.

अर्थात डाळभात, दहीभात हे भाताचं अगदीच सामान्य रूप. त्यानंतर जी काही भातावळ सुरू होते, ती म्हणजे करणाऱ्याला हात हजार, खाणाऱ्याला तोंडं हजार अशीच असते. कारण भाताचे पारंपरिक असे असंख्य प्रकार तर आहेतच. शिवाय करणारा, करणारीच्या इच्छेनुसार, आवडीनिवडीनुसार त्यात भर पडत जाते. पोटभरीचा आणि चविष्ट नाश्ता म्हणून फोडणीचा भात ऊर्फ ‘फोभा’ अनेकांना आवडतो. म्हटलं तर तो साध्या रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी देऊन घाईघाईत उरकायचा नाश्ता, पण ते करतानासुद्धा त्यात केवढी तरी व्हरायटी करता येते. केली जाते. मग निगुतीने रांधायच्या भाताचं कौतुक तर काय आणि किती सांगावं.

ताटात भात घेऊन त्यावर दही-दूध घालून खाणं हे तर रुटीन झालं पण रसिक खवय्या आणि कोणतीही सुगरण त्याला दहीभात म्हणणारच नाही. मऊ  शिजवलेला भात एखाद्या मोठय़ा परातीत किंवा पसरट भांडय़ात ऊन ऊनच काढायचा. त्यात सढळ हाताने तूप सोडायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि तो सगळं हाताला चटके बसत असतानाच कुस्करून आणखी मऊ करत राहायचं. मग मधेच त्यात मनापासून सायीचं दही घालायचं. पुन्हा ते नीट कालवायचं. मग त्यात थंड दूध घालायचं, पुन्हा कालवायचं. असं सगळं केल्यावर गॅसवर फोडणीचं भांडं चढवायचं. त्यात पुन्हा तूप घालायचं. त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची, हिंग, कढीपत्ता, मेथीची मिरची, ती नसेल तर हिरवी मिरची घालायची. ती फोडणी चांगली तडतडली की दहीभातावर घालायची. आवडीनुसार त्या भातात कोथिंबीर चिरून घालायची आणि झाकून खायच्या आधी तासभर फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंतर तो जिऱ्याची फोडणी, मिरची यांच्यामुळे खमंग झालेला थंडगार दहीभात म्हणजे खरा दहीभात. तो जिभेला एकाच वेळी मुग्ध आणि तरतरीत अशा दोन्ही चवी देतो की बास. त्याच्याबरोबर एखादा पोह्याचा पापड, कैरीचं लालबुंद लोणचं किंवा एखादी पाटवडी असेल तर कुणी पंचपक्वानांकडे ढुंकूनही बघणार नाही. खरा दहीभात असतो तो असा. पण तो तासाभरात खायचा असेल तरच. नाही तर प्रवासात वगैरे दहीभात नेताना गरमागरम भात, तूप-मीठ घालून चांगला कुस्करून त्यात भरपूर कोमट दूध घालतात आणि चमचा-अर्धा चमचाभर दही. चार-पाच तासात त्या दुधादह्यचं भातातच विरजण लागतं. तो खाल्ला की प्रवासातल्या चोरटय़ा भुकेला एकदम चाप बसतो.

एरवीही भात हा पोटभरीचा ऐवज खाणाऱ्याला पोट भरल्याचं खरंखुरं फीलिंग देत असावा. दक्षिण भारतीय मंडळींच्या ताटातला भाताचा डोंगर बघून आपल्या पोटात गोळा येत असला तरी आपल्याकडेही पुढचा भात, मधला भात आणि शेवटचा भात असं आवडीने जेवणारी मंडळी काही कमी नाहीत.

काही वर्षांपूर्वी तेव्हा टॉपवर असताना माधुरी दीक्षितला एका मुलाखतीत तुझा आवडता पदार्थ कोणता असं विचारलं गेलं होतं तेव्हा तिने वरणभात आणि मोदक असं उत्तर दिलं होतं. मोदक हा तसा कलाकुसरीचा पदार्थ. तर वरणभात त्याच्या अगदी विरुद्ध. कुणालाही, कधीही, कुठेही, कसाही म्हणजे अगदी साध्यातल्या साध्या घटकांपासून, साध्यातली साधी उपकरणं वापरून करता येईल असा पदार्थ. वरण साधं आहे की फोडणीचं, फोडणी तेलाची की तुपाची, कढीपत्ता, लसूण मिरचीची की साधी जिरे-मोहरीची या कोणत्याही गोष्टी वरणभात म्हटल्यावर बिनमहत्त्वाच्या असतात. ताटातला पांढराशुभ्र वाफाळता भात, त्याच्यावर पिवळधम्मक तुरीचं किंवा मुगाचं वरण आणि चवीपुरतं मीठ हे फक्त पोटालाच नाही तर जिभेला आणि डोळ्यांनाही निववतात. मग त्या गरम भातावर तुपाची धार सोडलीय की नाही, सोबतीला लिंबाची फोड आहे की नाही, याशिवाय तोंडी लावणं म्हणून काही आहे का, असे प्रश्न आसपाससुद्धा उभे राहत नाहीत. आपल्यालाच कशाला माधुरी दीक्षितलादेखील वरणभात बघितल्यावर तो खायचा सोडून असे प्रश्न पडत नसणार.
वैशाली चिटणीस -response.lokprabha@expressindia.com  
Twitter: @cvaishali