News Flash

चिंबधारा : पाऊस उच्चभ्रूंचा आणि पाऊस गरिबांचा

बाहेर पाऊस धो धो पडत होता. उन्हाळ्याच्या काहिलीनंतरचा पहिला पाऊस.

बाहेर पाऊस धो धो पडत होता. उन्हाळ्याच्या काहिलीनंतरचा पहिला पाऊस. रावसाहेब उठले. गरम चहा पिता पिता बाहेर नजर गेली. त्यांना वाटले अरे! वा काय मस्त पाऊस आहे. चला पार्टीला लवकरच सुरुवात करू. पाऊस पडतो तोपर्यंत मजा करू. चार-पाच प्रतिष्ठित लोकांना फोन करून पार्टीचं आमंत्रण दिलं! अरे, आज आपण एकत्र येऊन पावसाचं जंगी स्वागत करू या. सात वाजताच या!
मंडळी जमली. डॉक्टर, वकील, बिझनेसवाले आणि दोघे तिघे प्रतिष्ठित माणसे जमली. टेबल लावलं. ड्रिंक्स, त्यासोबत सोडा, चकणा- काजू, बदाम, चिवडा, स्मोकिंगचं साहित्य. मधुर गाणी. सेंटचा वास. वातावरण तर सुंदर झालंच. मित्र आले. हॅलो, हाय, शेकहँड पार पाडीत वेलकम ड्रिंक्सपासून सुरुवात झाली. मग राजकारण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत पेयपानाला सुरूवात झाली. सगळ्यांनी चीअर्स करून जोक करता करता बाटली संपली. काकडी, टोमॅटो, लिंबूची ऑर्डर झाली. असं करत बाटल्यांवर बाटल्या फुटल्या. जेवणाला शाही बिर्याणी. हलतडुलत, तोल सांभाळत डीनर झालं. पान, स्मोकिंग, स्वीट डिश सगळं झालं! आता मात्र बोलण्याला ताळतंत्र नव्हता. प्रत्येकाचे ड्रायव्हर तयार होतेच. बिझनेसमन घरी गेला. नोकराला विचारलं, ‘‘माझी डाìलग कोठे आहे?’’ नोकर म्हणाला, ‘‘मैत्रिणीबरोबर..’’ ‘‘अरे वा! ते पण पाऊस एन्जॉय करतात वाटतं.’’ त्यांचं पेयपान आटोपल्यावर टाटा बाय बाय करता करता बाईसाहेबांची ओढणी पायात अडकली आणि त्या पडल्या. नोकर मंडळी कुजबुजू लागली. तरी बरं इथे गटार नव्हतं. नाही तर सगळ्यांनीच म्हटलं असतं बाईसाहेब गटारीत (तर्र होऊन) पडल्या.. असो. असं पहिल्या पावसाचं स्वागत झालं. आणि दोघं आपापल्या रूममध्ये गेले.
असं झालं रावसाहेबांच्या बंगल्यात पहिल्या पावसाचं स्वागत!!!

पाऊस आला.. पाऊस आला.. उकाडय़ाने हैराण झालेले, शेतकरी आकाशाला नमस्कार करत पोरंबाळं पहिल्या पावसाचं स्वागत करायला अंगणात जमली. आनंदाने नाचू लागली. ‘‘अगं आज कसली तरी खीर कर. पावसाचं स्वागत खीर खाऊन करू.’’ धर्मा शेतकरी बायकोला म्हणाला. सगळ्यांनाच आनंद झाला होता. घरात येण्याचं नावच घेईनात. मग आईने घरात पेलाभर तांदूळ होते त्याची पेज केली. सगळ्यांना गरमागरम पेज आणि खोबऱ्याचा तुकडा दिला. पोरंबाळं खूश. मग धर्मा शेतकरी खोकत खोकत हातात काठी आणि डोक्यावर इरलं घेऊन आपल्या समवयस्कांना भेटायला गेला. सगळेच शेतकरी खूश. पावसाच्या, शेतीच्या गप्पा मारत. पानसुपारीची देवाणघेवाण झाली. सगळे घरी परतले. पहिल्याच पावसात घरात पाणी आलेलं. पोरंबाळं सांज झाली तशी घरी आली. सगळ्यांनाच चमचा चमचा खीर, सकाळची उरलेली पेज. दमलेली पोरं झोपून गेली. खोकल्यामुळे धर्माला काही केल्या झोप येईना. त्याने आपल्या बायकोला साद दिली, ‘‘लक्ष्ये अर्धा कप चाय दे गं बघू. त्याने तरी बरं वाटतं का?’’ लक्ष्मी म्हणाली, ‘‘अहो सकाळीच नाही का खीर केली. दूध संपलं, साखर संपली. तरी बघते थांबा हं’’ असं म्हणत दुधाच्या पातेल्यात पाणी घातलं, साखरेचा डबा पुसून कसाबसा अर्धा कप चहा धर्माच्या हातात दिला. तेवढाच घोटभर चहा पिऊन धर्मा म्हणला, ‘‘चुलीत आणखी दोन लाकडं टाक. तेवढीच उब येईल. आणि तू बी घोंगडी घेऊन माझ्याजवळच पड.’’ असं झालं झोपडीत पहिल्या पावसाचं स्वागत!!!
उषा रेणके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:28 am

Web Title: rich and poor people rain
टॅग : Monsoon
Next Stories
1 चिंबधारा : मी माझ्यात हरवून जाते…
2 चिंबधारा : मला भेटलेला पाऊस…
3 चिंबधारा : पावसाळा आणि खेकडे
Just Now!
X