05 December 2019

News Flash

स्त्रियांमधील शत्रूभाव : आकलनाच्या दिशेने

स्त्रियाच स्रीविरोधी भूमिका घेतात आणि एकमेकींच्या प्रगतीच्या आड येतात असं चित्र नेहमी मांडलं जातं.

स्त्री  हीच स्त्रीची खरी शत्रू असते, हा गैरसमज समाजात मोठय़ा प्रमाणात प्रचलित आहे.

भगवान फाळके – response.lokprabha@expressindia.com
भूमिका
स्त्रियाच स्रीविरोधी भूमिका घेतात आणि एकमेकींच्या प्रगतीच्या आड येतात असं चित्र नेहमी मांडलं जातं. पण त्यांनी असे वर्तन करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पुरुषप्रधान व्यवस्थाच कारणीभूत असते.

स्त्री  हीच स्त्रीची खरी शत्रू असते, हा गैरसमज समाजात मोठय़ा प्रमाणात प्रचलित आहे. त्याला व्यापक रूपात सामाजिक अधिमान्यताही मिळालेली आहे. परिणामी या गरसमजाला नसíगक सत्य म्हणून स्वीकारले जाते. त्यामुळे त्यामागील कारणव्यवस्थेचा शोध दुर्लक्षित राहतो.

खरे तर असा गरसमज समाजात दृढ होण्याची विविध कारणे आढळून येतात. स्त्रियांच्या प्रश्नांची गुंतागुंत सोडवता न आल्यामुळे बरेचदा नराश्य येते. त्यामुळे असा ग्रह बळावण्याची शक्यता असते. तर कधी कधी स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी स्त्रियांचा सहभाग मिळत नाही, इतकेच नव्हे तर उलट अशा समस्या वाढविण्यातच त्यांचा सहभाग दिसून येतो. हे बघून समस्या सोडवू बघणाऱ्यांना चीड येते. त्यातूनही मग असा गरसमज वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. वरवर बघता या गरसमजाच्या दृढीकरणात अशी काही कारणे दिसत असली तरी त्यामागे स्त्री-पुरुषांतील सत्तासंबंधाचेही कारण महत्त्वाचे असते, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणे शक्य नाही. स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे, हा गरसमज समाजात प्रचलित व प्रस्थापित होण्यामागे केवळ काही जुजबी कारणे नसून त्यामागे पुरुषप्रधान मूल्यांचे एक व्यापक राजकारण अंतर्भूत आहे. यामुळेच या गरसमजाचे रूपांतर सार्वत्रिक सत्यात होते, हे नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने वास्तवाचा वेध घेण्याच्या प्रयत्न प्रस्तुत मांडणीत केला आहे.

स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू आहे, असे आपण म्हणतो तेव्हा आपण काही बाबी कळत-नकळत मनाच्या पातळीवर स्वीकारलेल्या असतात. जसे की, स्त्रियांच्या दुय्यमत्वाला पुरुष जबाबदार नसून त्या स्वत:च जबाबदार आहेत. स्त्रियांमध्ये एकी होऊन त्या कधी एकत्रच येऊ शकणार नाहीत आणि या सर्वात सामाजिकीकरणाची काहीही भूमिका नाही. हे सारे ग्रह एकदा मनाच्या पातळीवर स्वीकारले की आपले गरसमज दृढ होतात.

स्त्रियांच्या प्रश्नांचे मूळ शोधण्याच्या दृष्टीने आजवर अनेक अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अभ्यास आणि निरीक्षणांमधून स्त्री आणि पुरुषपणाची चौकट ही समाज आणि संस्कृतीद्वारा घडवली जात असल्याची मांडणी पुढे आली. त्यासाठी िलगभाव ही संकल्पना वापरण्यात येऊ लागली. या संकल्पनेमुळेच अशा पूर्वग्रहाविषयी आकलन मांडता येते. स्त्री-पुरुष नात्यामधील गुंतागुंत ही व्यक्तीच्या जडणघडणीशी निगडित आहे. व्यक्तीचे होणारे सामाजिकीकरण सदोष असल्याने समाजात स्त्री-पुरुषपणाची चौकट निर्माण होते. यामध्ये पुरुषांची जडणघडण वर्चस्वशाली मालक / नियंत्रक म्हणून तर स्त्रियांची जडणघडण ही पुरुषी मूल्यांचा (सत्तेचा) डोलारा सांभाळणाऱ्या सेवक / नियंत्रित म्हणून होत असते. िलगभाव संकल्पनेतून हे अधिक स्पष्ट होते. मात्र समाजात केवळ स्त्री-पुरुष भेदभावाची संरचना कार्य करत नसते तर इतरही सामाजिक संरचना अस्तित्वात असतात, याकडेही काही अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. त्यानुसार स्त्री-पुरुष भेदभावाप्रमाणेच समाजात जात, वर्ग, वंश इ. अशा विषमतेच्या इतरही सामाजिक संरचनांचा समावेश होतो. आणि त्यामुळे स्त्री-पुरुषांचे संबंध प्रभावित होत असतात. शिवाय त्यातून स्त्रियांविषयीचे दुय्यमत्व अधिक विस्तारते तसेच दृढही बनते. िलगभेदाच्या स्वरूपाची विविधता आणि तीव्रता ही बदलत जाते. कालौघात यामध्ये विविध बदल होत आलेत. त्यातून स्त्री-पुरुषांच्या नात्यांची जडणघडण होत आली. स्त्री-पुरुष नात्यांममधील नसíगकपणा कमी होत जाऊन हे संबंध सत्तेवर आधारित बनले. परिणामी नात्यांमध्ये वर्तनाचे राजकारण आले. त्याकरिता कराव्या लागणाऱ्या मुत्सद्दीपणाचा भाग म्हणून समाजमनात अनेक भ्रम पसरविले आणि जोपासले गेलेत. हे सर्व कळत-नकळत घडत आले. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात, हा गरसमज याचीच निष्पत्ती मानता येईल.

भेदभावाच्या सामाजिक रचनांनी प्रभावित स्त्री-पुरुषांमधील असमान सत्तासंबंधातून मानवी समाजातील प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यांसारख्या नसíगक भावनांचीही घुसमट होत आली आहे. त्यांची अभिव्यक्ती ही कृत्रिम बनत गेली. यातील अनेक गोष्टी अपरिहार्य बदलांमधून जाताना मानवी विकासक्रमाचा परिपाक म्हणून घडत आल्या. तर काही बाबी या वर्चस्वशाली गटांनी आपल्या स्वार्थासाठी घडवून आणल्या. व्यक्तीचे नसíगक असणे व समाजविकासक्रमाने त्याला व्यक्तिमत्त्व देणे यातील द्वंद्व वा संघर्षांमुळे व्यक्तीची घुसमट होत राहिली आहे. नसíगक भावना जपायच्या की सामाजिक अस्तित्वाच्या सत्तासंघर्षांत आपले हित जपायचे असे द्वंद्व व्यक्तिमनात निर्माण झाले. यामध्ये व्यक्तीने प्रामुख्याने नसíगक भावनांना आणि ऊर्मीना डावलणे निवडले. म्हणून प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा आणि अधिकार, वर्चस्व, मालकी यांच्यातील सीमारेषा पुसट होत गेली. पर्यायाने परस्परांचा स्वीकार माणूस म्हणून न होता त्याला चिटकून असणाऱ्या सामाजिक संदर्भानी होऊ लागला.

वर्तमान भारतीय समाजात स्त्री-पुरुषांचे नाते अशा अनेक संदर्भानी प्रभावित आहे. त्यात संरचनात्मक घटकांचा परिणाम मोठा आहे. जात, वर्ग आणि िलगभावाच्या गुंतागुंतीतून ते आकार पावलेले आहे. त्याला राष्ट्रवाद आणि जमातवादाचे संदर्भही आहेत. शिवाय दैनंदिन जीवन व्यापून असणाऱ्या भांडवली प्रसारमाध्यमांचा  प्रभाव त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

वरवर बघता स्त्रियाच स्त्रियांविषयी विरोधी भूमिका घेताना दिसतात किंवा त्या स्वत:च एकमेकींच्या प्रगतीला बाधा आणताना दिसून येतात. त्यांच्यात परस्परांविषयी असूया व ईर्षां असल्याचेही जाणवते. त्यांच्यात कपट आणि राजकारण घडते, असे वाटून जाते. त्यामुळे अशा अनेक बाबी या निसर्गत:च आजवर घडत आल्या आहेत, ही चुकीची धारणा अधिक दृढ बनते. परंतु या सर्व बाबी पुरुषांमध्ये नसतात का, असाही प्रश्न उपस्थित करता येतो. त्याचा विचार आपण सर्वानी केला पाहिजे. विशेषत: पुरुषांनी तर तो केलाच पाहिजे. सत्तेची कोणतीही चौकट आपण उदाहरण म्हणून घेतली तरी त्यात असे वर्तन स्वाभाविकपणे घडताना दिसून येते. पुरुषांसाठी याबाबतीत कार्यालयीन ठिकाणची सत्तारचना उदाहरण म्हणून बघता येईल. त्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील संबंध बघण्यासारखे आहेत.

कुठल्याही समाजातील सत्ताधारी वर्ग हा आपली प्रतिमा ही सर्वगुणसंपन्न अशी उभारतो आणि गुलामांची प्रतिमा सर्व वाईटाचे आगर अशी करीत असतो. पुरुषप्रधान समाजात सत्ताधारी पुरुषीवृत्तीतून होणारे स्त्रियांचे खलनायकीकरण हा त्याचाच एक भाग आहे. आपण स्वीकारलेल्या कुटुंब, विवाह आणि इतर सामाजिक संस्थांचे रूपच मुळात दोषपूर्ण आहे. व्यक्तीचे वर्तन या दोषपूर्ण सामाजिक संस्थांनी आकार पावते. अशा वेळी त्यातून पुरुष किंवा स्त्रीचे घडणारे वर्तन अनेक बाबतीत अयोग्य आणि अन्यायकारक घडण्यास खतपाणी मिळते.

एखादी सासू आपल्या सुनेशी वाईट वागते किंवा सून सासूशी वाईट वागते, तेव्हा त्यामागे खरे तर कुटुंबातील हक्क-अधिकारांचा आणि मानपानाचा भाग असतो. कारण कुटुंबातील आपले अस्तित्व आणि वर्चस्व अबाधित राहण्यासाठीची प्रेरणा त्यामागे असते. त्यातूनच कुटुंबातील सत्ता ज्या पुरुषाच्या भोवती फिरत असते त्याच्याशी आपले नाते अधिक जवळचे असावे, असे स्त्रियांना वाटत असते. यातूनही स्त्रियांमध्ये चढाओढ, असूया, ईर्षां आणि द्वेष वाढतो. यातूनच स्त्रिया स्त्रियांच्या शत्रू म्हणून पुढे येतात. एखादी आई मुलीवर बंधने लादते आणि मुलगी त्यांना झुगारते. तेव्हा दोघींमध्ये शत्रुभाव निर्माण होतो. परंतु खरे तर  आईने मुलींवर बंधने लादावी, ही पुरुषशाहीने आईकडे दिलेली सांस्कृतिक जबाबदारी असते.

स्त्रियांचे विश्व अनेक बाबतीत कुटुंब, नातेसंबंध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आधुनिक काळात कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित असते. त्यांचा वावर हा एक तर कुटुंबात असतो किंवा कामाच्या ठिकाणी असतो. या व्यतिरिक्त सार्वजनिक जीवनात त्यांना फारसा अवकाश उपलब्ध नसतो वा तो असण्याची आवश्यकता मानली जात नाही. बौद्धिक उपक्रमांमध्ये तर त्याची गरजच मानली जात नाही. परिणामी त्यांच्या प्रबोधनाला आणि बौद्धिक विकासाला दडपणमुक्त अवकाश उपलब्ध होत नाही. समाजात स्त्रियांना स्वातंत्र्य असल्याचे दिसत असले तरी ते फार जुजबी आहे. वस्तुस्थिती ही आहे की, स्त्रियांना पुरुषांच्या वर्चस्वाला हादरे बसणार नाही, इतक्याच प्रमाणात स्वातंत्र्य उपलब्ध आहे. एक प्रकारे हे मर्यादित स्वातंत्र्य म्हणता येईल. यामुळे स्त्रियांचे आकलन आणि अभिव्यक्तीला अनेक मर्यादा पडतात. त्यामुळे त्यांना आपल्या अस्तित्वाचा अन्वयार्थ लावण्यास पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. ज्या स्त्रिया पारंपरिक जीवनधारणांना छेद देऊन बौद्धिक व्यवहारात उरतात, त्या समाजव्यवस्थेचे योग्य आकलन करण्याच्या दिशेने जातात. अशाच स्त्रियांच्या चिंतनामुळे स्त्रियांमधील शत्रुभाव हा नसíगक नसून पुरुषप्रधान व्यवस्थेने तो घडवलेला आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात कृती करते, तेव्हा ती अप्रत्यक्षरीत्या जात, वर्ग आणि िलगभेदाची चौकट अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली असते. त्यामुळे विषमतेच्या चौकटी कायम राहतात व त्यातून  भेदभावांचे पर्यायने पुरुषशाहीचे संवर्धन व संरक्षण होते. एकप्रकारे पुरुषी दास्यत्वाच्या चौकटीत स्त्रियांकडून असे घडणे हे अपेक्षितच असते. म्हणून स्त्रीच्या विरोधात वागणारी स्त्री ही खरी गुन्हेगार नसून तिला असे वर्तन करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारण असणारी पुरुषशाहीची व्यवस्थाच खरीखुरी गुन्हेगार असते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते, असे विधान बरेचदा पुरुषांकडून स्वसंरक्षणासाठीही केले जाते. कारण स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायासाठी ते (पुरुष) कारण आहेत, असे त्यांवर वारंवार िबबवले जाते. खरेतर स्त्रियांमधील शत्रुभावामागे प्रथमदर्शनी पुरुष जबाबदार वाटत असले तरी तेही सत्य नाही.  कारण पुरुषांची वाढही सामाजिकीकरणाचाच भाग असते. अनेक स्त्रीवाद्यांनी हे दर्शविले आहे.  पुरुष सामाजिकीकरणच खरेतर याचे मूळ कारण आहे. मात्र ही बाब समजून न घेता सर्व पुरुष सारखे म्हणून त्यांचेही गुन्हेगारीकरण केले जाते. परिणामी पुरुषांकडूनदेखील उलटी प्रतिकिया म्हणून स्त्रियांवरच दोषारोपण करण्याचा प्रकार घडतो. त्यातून असे पूर्वग्रह वेगाने प्रचलित होतात.

पुरुष आणि पुरुषशाही या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, हे पहिल्यांदा समजून घेणे आवश्यक आहे. ‘पुरुषशाही’मध्ये पुरुष हा शब्द असला तरी त्याचा एकासएक असा सहसंबंध नाही. त्यात गुंतागुंत आहे, त्याची नीट उकल करणे आवश्यक आहे, हे दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे. मात्र असे होत नाही. परिणामी स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते, ही धारणा वैश्विक सत्याच्या रूपात प्रस्थापित होण्यात पुरुष हे प्रचारकाची भूमिका बजावतात.

स्त्रियांच्या दुखाचे मूळ पुरुषशाहीत आहे, या स्त्रीवादी विश्लेषणाचे अपुरे वा चुकीचे आकलन अनेकांकडून घडत असते.  त्यामुळे  पुरुषशाही  म्हणत असताना पुरुष  म्हणून आपण दोषी असे पुरुषांकडून स्वत:ला गृहीत धरण्यात येते. आणि बऱ्याच जणांकडून असे सांगण्यातही येते. परिणामी त्यांना स्त्रियांवर अन्याय करणारे म्हणून अपराधभाव दिला जातो. यातून आपला बचाव करण्यासाठी मग स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा हेतू नसणाऱ्या पुरुषांकडून जाणीवपूर्वक स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या पुरुषांच्या अशा विधानाला दुजोरा दिला जातो. यामुळे सगळे पुरुष एकीकडे आणि सगळ्या स्त्रिया एकीकडे अशी पुरुष विरुद्ध स्त्री अशी भूमिका सादर केली जाते. वास्तविक बघता हे मात्र खरे नाही.

स्त्री आणि पुरुष ही एक सामाजिकीकरणातून घडवली जाणारी चौकट आहे. या चौकटीने व्यक्तीला दिलेल्या जगण्याच्या पद्धतीनुसार स्त्री-पुरुषांचे वर्तन आकार पावते. त्यातून दोघांचीही घुसमट होते आहे. मात्र ही चौकट मोडण्यासाठी धजावलो तर समाजाकडून बहिष्कृत होण्याची / मानहानी होण्याची भीती असते. त्यामुळे त्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या कमी असते. परिणामी हे धाडस करू न शकणारे बहुसंख्य लोक मग स्त्री विरुद्ध पुरुष या समाजरचित शत्रुत्वभावात जगणे धन्य मानतात. आपण स्त्री-पुरुषपणाची समाजाने दिलेली चौकट मोडू शकत नाही, याचे वैफल्य घालवण्यासाठी मग स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे, असा पवित्रा घेतात. त्याचे समर्थन करतात. खरेतर असे न करता आपण स्त्री-पुरुषपणाची चौकट झुगारून देणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे अशा पूर्वग्रहांमधून होणारे चुकीचे आकलन थांबू शकेल. पर्यायाने व्यक्ती म्हणून परस्परांना समजून घेण्याच्या दृष्टीने स्त्री-पुरुष दोघांचाही सहप्रवास घडू शकेल. यातूनच स्त्री-पुरुषांचे सहजीवन अधिक उन्नत बनू शकेल.

First Published on January 18, 2019 1:02 am

Web Title: rivalry in women
Just Now!
X