वाट म्हणजे आपल्या पावलांखाली रुळलेली की महानगराची? वाट म्हणजे रानातली की नागर वस्तीतली? वाट म्हणजे मनातली की वैचारिक? आपण नेमक्या कोणत्या वाटेचे प्रवासी?

‘ही वाट दूर जाते स्वप्नातल्या गावा’ हे भावगीतेचे शब्द कानावर पडले अन् मनात सहज विचार आला, खरेच स्वप्नामधल्या गावाची वाट प्रत्यक्षात असती तर किती बरे झाले असते. त्या भावविश्वात जाऊन स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगता आला असता; पण ही वाट कोठे आहे? तेच तर या वाटांनी भरलेल्या वास्तवात कळत नाही. ती वाट सापडतच नाही. आपल्या जीवनाचा विचार केला, तर असे लक्षात येईल की, जे जे चल आहे त्याला वाट असावीच लागते, नाही तर ते चल असूच शकत नाही. एकाच बिंदूवर स्वत:भोवती भ्रमण हे या सदरात मोडत नाही. ती भ्रमणगती आहे. तिला स्थिर बिंदू आहे. ते स्वकेन्द्री भ्रमण आहे. तेव्हा चल म्हणजे स्थानांतर करणारे आणि स्थानांतर आले की वाट आलीच. तेव्हा वाटेशिवाय जीवन सजीव सचलांचे असूच शकत नाही. तेव्हा या ‘वाट’ या शब्दाने संबोधित जे आहे त्यावर विचार करता करता ‘वाट’ किती जीवनव्यापी आहे याबरोबरच ती किती मनोरंजक आहे हे पुढील परिच्छेदांतून जे लिहिले ते वाचता वाचता ‘वाट’ गवसेल विचारांची असे वाटते.

‘वाट’ म्हणजे दोन ठिकाणांना जोडणारा दुवा. वाट कोठेही जात नाही आणि कोठूनही येत नाही, तरीही आपण विचारतो, ‘‘ही वाट कोठे जाते?’’ जात आणि येत असतो आपण आणि त्यासाठी हा दुवा आपणच निर्माण केलेला असतो, पण विचारवंतांना मात्र ‘‘वाट कोठे जाते?’’ वाट म्हणजे पावलांची जा-ये करणारी सोय. अर्थात हा अर्थ भौतिक आहे. वाट अस्तित्वात असू शकते तशीच मनोव्यापाराचे संचालन करणारी शब्ददर्शित वा शब्दरूपही असते. वाट चरांनी निर्माण होते. चर म्हणजे सजीव, चैतन्य असणारे, मग ते द्विपाद असोत वा चतुष्पाद. पावलांची वहिवाट म्हणजे भौतिक वाट. उद्दिष्ट ठेवून केलेली पायपीट वाट निर्माण करू शकते, नव्हे वाट ही उद्देशानेच निर्माण केली जाते, होते आणि म्हणूनच काही वेळा ती इतिहासजमा होते. म्हणून तूर्त तरी वाट हे दोन उद्दिष्टांमधील पाऊलबंधन आहे असे समजण्यास हरकत नाही/ नसावी. वाट म्हणा, मार्ग म्हणा, पथ म्हणा, मूळ ‘वाट’ या शब्दाचीच ही रूपे. वाटेचे रूप बदलले की, प्रतिष्ठेप्रमाणे गोंडस, राजस नावे/ नामाभिधाने, पण म्हणून ‘वाट’ शब्दकुळाशी नाते थोडेच संपते. वाट मिळाल्याशिवाय कोणासही पुढे जाता येतच नाही, मग ते कोणी माणूस असो, जनावर, विचार वा द्रव, वायू काहीही असो. वाट हवीच हवी त्यांच्या प्रवहनासाठी. नाही तर त्यांचे काय होते माहीत आहे? साचलेल्या पाण्याची अवस्था जशी होते तशी अवस्था होते व प्रदूषण नाही तर विलय ठरलेलाच. अशाचसाठी ‘वाट’ या विषयावर विचारांना दिलेली वाट म्हणजेच हा लेख असे समजण्यास हरकत नाही.

वाटा किंवा वाट दोन प्रकारची मुख्यत्वे असते. भौतिक आणि आध्यात्मिक किंवा वैचारिक. भौतिक वाटा जंगलातल्या, रानावनातल्या, कडेपठारावरच्या, ग्रामीण भागातल्या, तसेच शहरी, भुयारी (चोरवाटा) अशा विविध स्वरूपांच्या असतात. काही वाटा मध्येच एकाएकी संपतात, तर काही मध्येच सुरू होतात. काही वाटा सागर व जमिनीच्या किनारवाटा असतात. जंगलातल्या वाटा जंगलातच फिरतात. त्या निर्माण होतात वाटचालीने. त्यांचे रूप खरे तर प्राकृतिक असते. त्या वाटांचे निसर्गाशी नाते असते. भूपृष्ठाशी गोत्र असते अन् प्रकृतीशी सूत्र असते. दिवसा सूर्यप्रकाशाने त्या उजळतात, तर रात्री चंद्रप्रकाशात न्हाहून निघतात अन् चंद्रप्रकाश नसला तर तारकांच्या मंद प्रकाशात अंधारात बुडून जातात. झाडांची जीर्ण पाने त्यांच्यावर आच्छादली जातात, तर वाऱ्याने ती उडूनही जाऊन वाटांची रूपे उघडी करतात. पावसाच्या धारांनी त्या भिजतात. कधी खचतात, कधी वाहूनही जातात वा बुजतात- शिशिरात रानफुलांनी सजतात, तर ग्रीष्मात झाडांचे शुष्क पर्णहीन रूप पाहात वाट पाहातात मेघांची, पावसाळय़ाची, वर्षां ऋतूची. हिवाळय़ात दवबिंदूंनी ओलावतात, तर कधी धुक्यात हरवतात तात्पुरत्या. कधी त्यांचा काही भाग फलपुष्प मोसमात पडलेल्या फळांनी आच्छादला जातो, तर कधी विविध फुलांनीही. सहाही ऋतूंत त्या ऋतुमानाप्रमाणे रूपडे थोडेसे बदलवतात.

त्यांचे नामांकन नसते. त्यांची देखभाल प्रकृती करते. त्यांच्यावरून वाद होत नाहीत. का काही नाही होत. नि:शब्द वातावरणात पक्ष्यांचे संगीत, श्वापद व रानवासींची ये-जा यांनी गजबजतात. कधी कधी एरव्ही तटस्थ निसर्गात रमलेल्या, विसावलेल्या, निसर्गात उगम व विसर्ग पावणाऱ्या. याचे मोजमाप वगैरे नसते. ती कोठून आली, कोठून जावी, कशी जावी याबद्दल वनचर व वनवासी यांच्यात वादविवाद होत नाहीत. तिची देखभाल निसर्ग करतो. त्याबद्दल कधी रानात आंदोलने होत नाहीत. रस्ता रोको वगैरेनी ती कधी कोणी बंद करत नाहीत. फक्त वापर केला जातो. तिच्यावर वाहतुकीचे नियम नसतात. खऱ्या अर्थाने मुक्त परिवहनाची ती असते. सर्वाना मुक्त प्रवेश/मुक्त वापर परवाना, अहोरात्र खुली सर्वासाठी सर्व काळ. सर्वाची निरपेक्ष पाऊलवाहिनी. प्रकृतीशी, मातीशी, निसर्गाशी इमान राखणारी. तिच्या दोन्ही बाजूंना ना टपऱ्या ना पथारीवाले. सारे कसे शांत शांत. या वाटांनाही वाटा फुटतात वा वाटास वाटा मिळतात. याचे हे चौक प्राकृतिक असतात. येथे वाहतुकीचे सिग्नल नसतात ना कोणी पोलीस. येथे कोणाचाही पुतळा वा वाटपाटय़ा नसतात. शेजारचा भूभागच त्यांची ओळख सांगतो. झाडे वा वृक्ष  वाटखुणांसाठी स्वयंभूपणे उभे असतात. किती सुरेख अस्सल प्राकृतिक रंगरूपाची ही वाट असते ते प्रत्यक्ष त्यावरून चालल्याशिवाय कळणे नाही. सारा शिणवटा निघून जाईल. येथे पक्ष्यांचे आवाज, किलबिल, झाडांच्या पानांची सळसळ, वाऱ्यावर डोलणारी झाडे, गवताचे रान, सारे कसे मन प्रसन्न करणारे वातावरण. या धुंद पदभ्रमणाने मन प्रसन्न होईल. या वाटांवर वाटमारी नसते. क्वचित एखादा हिंस्र पशू समोर आला तरी धोका/ दगा दर वेळी होईल/ करील असे नाही. एखादा अपवाद वगळता बाकी सर्व कसे शांत, प्रसन्न. ही निसर्गवाहिनी कशी प्रसन्न असते ते शब्दात वर्णन करणे कठीण. प्रत्यक्षात तीवरून वाटचाल करावी व अनुभवावे. ट्रेकिंग (पदभ्रमंती) ला जाणाऱ्यांना याचा अनुभव घेता येईल, पण जर त्यांच्याजवळ निसर्ग वाचवण्याची दृष्टी व मन असेल तरच आणि तेव्हाच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती॥’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचीती व यथार्थता लक्षात येईल.

या रानवाटा सर्व तऱ्हेच्या रानांत असतात. घनदाट अरण्यात तर दिवसाही त्यांच्यावर सूर्यप्रकाश येत नाही. कधी कधी या वाटांवरून छोटेमोठे जलप्रवाह, ओढेही वाहतात. भूपृष्ठाप्रमाणे त्या सरळ वा वक्र व चढउताराच्याही असतात. त्याच्यावर कोठेही पूल नसतात वा विश्रांतीसाठी कट्टे नसतात. सर्व वाटच निसर्गमय.

अशा या प्राकृतिक रानवाटा अभयारण्यात मात्र थोडे गोंडस, राजस रूप घेतात. त्यांच्यावरून बंद चारचाकी मोटारीतून, हत्तीवरून वा बसमधून प्राकृतिक/नैसर्गिक वातावरणातील वन्यप्राणी दर्शनासाठी माणसे हिंडत असतात. या रानवाटा प्रशस्त केलेल्या असतात व पृष्ठभागही सपाट केलेला तसेच मुरुमादी खडी वगैरे टाकून कडक/ कणखरही केलेला असतो. ही बंदिस्त माणसांची वर्दळ/ दर्शन घेऊन वन्यजीव काय म्हणतील वा म्हणत असतील? कोण खरा दुर्बळ आणि कोण खरा निर्भय आहे या निसर्गात? हेच ना? अगदी खरे आहे. ही रानवाट असली तरी तिचे सौंदर्य नागरी असते. आदिवासी वन्यजमातीच्या मुलींना ब्युटीपार्लरमध्ये सजवले, तर त्या कशा दिसतील तसे. ही पुष्कळदा कृत्रिमही असते केलेली. हिचे नाते रानाशी अन् गोत्र निसर्गाशी, पण सूत्र आधुनिकतेशी सांगणारी, थोडी नटखट रूपडवलेली ही रानवाट.

या खऱ्या रानवाटा कधी खणल्या जात नाहीत, उकरल्या जात नाहीत तसेच त्यांच्या अंतर्भागातून पाण्याच्या शुद्ध व अशुद्ध जलवाहिन्या, विजेची व दूरभाषेची तारांचीही टाकणी, परिगमनत्व इ.इ. काही काही जात नसते, तसेच त्यांच्यावर दुरुस्तीची, मलमपट्टीची/ प्लॅस्टिक सर्जरीची नक्षी / ठिगळे नसतात. या खऱ्या निसर्गाच्या ‘फेअर अँड लव्हली’ क्रीम न लावलेल्या अभिजात सौंदर्य ल्यालेला वनवाटा, यांच्या प्रकृतीची उत्पत्ती, स्थिती व लय या सर्वावस्थांचा कर्ता करविता निसर्गच. रानाची, रानासाठी रानवट, रानसौंदर्याची, रानवासींची रानसुंदरी पाऊलसखी. रानाच्या कानात सांगणारी, रानाचे कान देऊन ऐकणारी राजकन्या, नाही कोणाची नाही कोणाची. ही तर सखी सगळय़ांची. निसर्गाचे रंग, रूप, प्रकृती, सारे सारे पाहाणारी, ऋतुचक्राचे बदल अनुभवणारी व जगणारी. आता या रानवाटा हळूहळू लुप्त होऊ लागल्यात, कारण मानवाने वनेच नष्ट केली, करत आहे व करतच राहील. निसर्गाचा व निसर्गचक्राचा ताल व तोल दोन्ही ढासळल्यामुळेच या रानवाटांचे अस्तित्व पुसले जात आहे. ‘कालाय तस्मै नम:’। वनचरांच्या अनेक पिढय़ांच्या या साक्षीदार हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहेत. हे न थांबविता येणारे नाही, पण हे करणार कोण? कधी? कसे? इ. प्रश्न काळच जसे सोडवील तसेच घडेल. काळाच्या गती गहन एवढेच खरे.

आता या वाटांचे शहरी रूप बघा. केवढे जमीन-अस्मानाचे अंतर आहे. ही शहरी वाट केवळ मानवनिर्मित. वाटा निर्माण करण्याच्या खर्चातील धनवाटा वाटून घेतल्यामुळे प्रकृतिमान नाजूक असलेल्या व वारंवार आजारी पडल्याची चिन्हे ठिगळय़ाच्या रूपाने सजलेल्या.  यातील रहस्य सर्वाना ठाऊक, पण कधीही त्यात सुधारणा होत नाहीत, त्यामुळे दुरुस्तीच्या ठिगळांची संख्या कधीच कमी होत नसणाऱ्या या नागरी वाटा.

ही नागरी वस्तीची वाहिनी दोन्ही बाजूला इमारतींनी सजलेली. सर्व तऱ्हेच्या, सर्व आकार प्रकाराच्या, सर्व जाती-धर्म-वंशाच्या, प्रकृतीच्या लोकांच्या इमारतींच्या दुतर्फा रांगा व क्वचित थोडी पिंजऱ्यातून कडेला लावलेली झाडे (वृक्ष?) असलेली वा त्यांच्या अस्तित्वाचे रिकामे िपजरे, दिव्याचे खांब, टेलिफोनचे खांब आणि अंतर्भागातून शुद्ध व अशुद्ध जलवाहिन्या, टेलिफोनच्या तारा, विजेच्या तारा नेणारी एक नागरी संस्कृती निर्मित नागरपाऊलवाहिनी.

या वाटांच्या निर्मितीपासूनच त्या पुष्कळदा वादग्रस्त ठरतात. त्यांचं रूपडं काळंकुळकुळीत बहुतांशी डांबरीकरणाचे असते. क्वचित काही वाटा सिमेंट काँक्रीटच्या असतात. माणसं, वाहनं, जनावरं सगळ्यांची भाऊगर्दी. त्यातच पथाऱ्या टाकून पोट भरणारे पोटार्थी धंदेवाले, हातगाडीवाले विक्रेते दोन्ही बाजूला विविध स्वरूपांत दिसतील, तसेच एखादे देऊळ-मंदिर या  वाटेलगत असेल तर भिकाऱ्यांची गर्दी तसेच पूजासामान, इ. इ. धार्मिक वस्तुविक्रेते व दर्शनार्थीच्या रांगा व कधी कधी मोकाट जनावरांनी वाटेवरच ठाण मांडलेले. या वाटांचा पृष्ठभाग रात्रंदिवस गजबजलेला व विविध आवाजांनी ही वाट नादमय असते. यात वाहनांचे आवाज, विक्रेत्यांचे आवाज, ध्वनिक्षेपकांचे आवाज, कुत्र्यांचे आवाज, इ. अनेक आवाज मिसळलेले असतात. काहींना ती वाट असते तर काहींची ती वाट लावणारीही असते. हिच्यावरून रंगयात्रा, रथोत्सव, मिरवणुका ते अंत्ययात्रा असे सगळे सोहळे माणसे नेतात. याचेवरच ते चालतात- जगण्यासाठी, जगविण्यासाठी तसेच जन्म देण्यासाठीही तसेच जन्म संपविण्यासाठीसुद्धा. माणसांची सर्व रूपं, नीतिधर्माची, अनीतिधर्माची, इ. सगळी ही वाट चालतात. शेजारील उंच इमारतींमधून हिच्यावर सर्व त्याज्य (कचरा इ. इ.) निर्विकारपणे सहजतेने टाकलं जातं. हिच्या पावित्र्याची कोणासही ना खंत, ना खेद, ना इच्छा. हिच्यावरून जाणाऱ्यांच्या  पावलांच्या व रहदारीच्या भाऊगर्दीत ती अगदी हरवून गेल्यासारखी असते. आवाज, धूर, आग, सांडलेले विविध द्रव पदार्थ, कचरा काय काय तिला सहन करावं लागतं ते तिलाच माहीत. या वाटांना नागरी संस्कृतीत पथ, रस्ता, मार्ग, रोड असं संबोधलं जात असतं आणि त्यामागे कोणा थोर पुरुष/ स्त्रीचं नाव लावलं की ते विशिष्ट नामकरण विशिष्ट वाट ओळखण्याचं तिचं गोत्र म्हणा कुळ ठरतं. जसं लो. टिळक मार्ग, म. गांधी स्ट्रीट, पटेल रस्ता, बाजीराव पथ, इ. इ. त्या नामकरणांवरून वादंग माजतात; मोर्चे, निदर्शने, इ. आंदोलने होतात. मारामाऱ्या होतात, अगदी जीव घेण्यापर्यंतही मजल जाते. शेवटी हा वाद केव्हा तरी संपून संमत नावाच्या पाटीचं अगदी हार घालून या वाटेवर रोपण होतं. तिचा अनावरण समारंभ थाटात वाद्ये वाजवून, फटाके वाजवून मान्यवराचे हस्ते करण्यात येतो. अन् तिच्या बारशाचं घोडं एकदाच गंगेत न्हातं. काही वेळा ही पाटी आपोआप नाहीशी होते व गुपचूप दुसऱ्याच नावाची पाटी तिच्या दुसऱ्या टोकाला लावली जाते. मग परत संघर्ष, परत मोर्चे, इ. इ.नी ते पुनर्नामकरण गाजतं. व परत कोठेतरी समझोता होऊन कोणतं तरी नामकरण नक्की होतं. कधी कधी हा वाद तिच्या निर्मितीआधीही सुरू होतो. काही वेळा मात्र एक गमतीदार प्रकार अनुभवास येतो. मोठा विचित्र प्रकार आहे हा शहरी पथाचे नामकरणाचा. पण सत्य आहे म्हणून उल्लेख करणे योग्य. एकच एक लांबलचक सडक वा पथ हा दोन-चार भागांत विभागून त्या वाटेचं विभागावर नामकरण होतं. द्रौपदीचे जसे पाच पती होते तसे या वाटेचे/ पथाचे  एकापेक्षा अधिक नामपती होतात. या मोठय़ा लोकांच्या नावाने तिला नामांकित केले जाते विभागवार. नामवंतांची ती नामांकित होते व राज्यकर्ते/ प्रशासन बदलले की नवीन नामांकित लोकांच्या नावे तिचे परत शुभमंगल होते. वाटेला, पथाला वा मार्गाला म्हणा त्याचे काही सोयरसुतक नसते. वाट ही अखंड कुमारीच असते. नागरी संस्कृतीतील ही वाट नागरी जीवनाचे सर्व प्रकार, स्थित्यंतरे, घडामोडी बघते, अनुभवते, पण मूक साक्षीदार म्हणूनच. या वाटेलाही उपवाटा असतात. ज्या कधी कधी दोन वाटांना जोडतात तर कधी नाही. यांना गल्ली वा बोळ म्हणतात. या उपवाटा म्हणजे गल्लीबोळ तसेच मुख्य वाटांचे नामकरण पुष्कळदा तेथे चालणाऱ्यांच्या व्यवसायावरून, व देवस्थान जे तेथे असेल त्यावरूनही होतं बरं का! जसे लोहार गल्ली, बोहरे आळी, तपकीर गल्ली, सराफ लेन, खाऊ गल्ली, तांबट आळी, जोगेश्वरी बोळ, मारुती गल्ली, सिटी पोस्ट रोड, संसद भवन मार्ग, राजभवन पथ, विद्यापीठ रस्ता, हिराबाग रोड, मेन स्ट्रीट, रेसकोर्स, चतु:शृंगी रोड, पुणे-मुंबई रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, विहारलेक रोड, इ.इ. अनेकविध नावे या वाटांना असतात. ती पूर्वापार रूढ  झालेली असतात, तसेच ती आपोआप रूढ होतात.

ही नामकरणे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करीत नाहीत. ती सर्व जाती-धर्म, वंश-पंथाचे लोकांकडून पिढय़ान् पिढय़ा वापरली जातात. हा खरा सर्वधर्मसमभावाचा एक प्रकार म्हणावा लागेल. या उपवाटा वा गल्ल्या, बोळ यांचेही दोन्ही बाजूंस इमारती/ वाडे/ घरे असतातच. काही वाटांची नावे दिशांवरूनही असतात बरं. जसं ईस्ट स्ट्रीट, नॉर्थ स्ट्रीट, इ. अनेक प्रकारे हे नामकरण होत असतं. काही वेळा त्याच नावाची आणखी गल्ली निर्माण झाली तर मूळच्या गल्लीला जुना/जुनी शब्द जोडून तिचं नामकरण होतं. जुनी तांबट आळी, जुनी तपकीर गल्ली, ओल्ड प्रभादेवी रोड, इ. इ.

कधी तिचा पन्हा- रुंदी कमी पडते आणि मग ती मोठी करण्याचे नाटक न्यायालयापर्यंत रंगते. काही घरे, वाडे, इमारती पाडल्या जातात. संसार काहींचे उद्ध्वस्त होतात तर काहींचे चरितार्थ साधन- दुकाने, इ. नष्ट होतात अन् वाट मोठी होते. या बलिदानात त्यातली सावली देणारे वृक्षही जातात. वाट सर्व अगतिकपणे पाहात असते. मोठं होण्यासाठी काय व कसे वेदीवर चढते याचे हे नाटय़ अनुभवते. दिवसाचे व्यवहार पाहते तसेच रात्री, मध्यान्ह रात्री चालणारे सर्व काळे धंदे, बाजार, अब्रूंचे व्यापार, आकडय़ांची लक्ष्मीप्राप्तीसाठीची उलाढाल करणारे अड्डे, मद्यपींचे वर्तन, इ.इ. बरेच काही रात्री वाटेस बघावे लागते. सभ्य नागरी संस्कृतीची दुसरी असभ्य काळी संस्कृती- जीवननाण्याची दुसरी बाजू. ही वाट रात्री कधीच नीरव शांततेत नसते. सतत या ना त्या प्रकारचा जीवनप्रवाह वहन होतच असतो. कधी कधी रात्री-अपरात्री होणारे खून, बलात्कार, अपघाताचीही ती अबोल साक्षीदार असते. कधी कधी ही बंद केली जाते दुरुस्ती वा मोर्चासाठी, मिरवणुकांसाठी वा व्ही.आय.पीं.च्या आगमन/ निर्गमनासाठी तर कधी काही इमारती पाडण्यासाठी वा मोठा अपघात, दरोडा तपास, इ. गुन्ह्य़ांचे कामी, कधी एखाद्या पथनाटय़ासाठी वा सभेसाठीही ही बंद केली जाते. कधी हिच्यावर रांगोळीच्या नक्षा काढून ती सजविली जाते. जीवनाचा संग्राम पाहणारी, माणसांनी माणसांची केलेली प्रगती, कुचंबणा, संग्राम, काळाबाजार, धर्माछचा खेटा उदोउदो, धर्माच्या नावाखाली होणारी नासधूस, दंगली, कत्तली, वाहनांचे अपघात, अपघाती मृत्यू, माणसांचा माणसांनी केलेला घात, माणसांनी माणसांना घातलेले हार व केलेले प्रहार, निष्पापांचे बळी व बळी तो कानपिळी, धनदांडग्यांचे व्यवहार, इ. इ.ची सर्व साक्षी पण मौन धारण केलेली ही नागरी रूपसुंदरी वाट, नागर संस्कृतीची बिरुदे व लक्तरे ल्यालेली अगतिक वाट. किती भिन्न त्या रानवाटेहून. हिच्यावरून हिंस्र पशू (चतुष्पाद) जात नसले तरी त्याहीपेक्षा हिंस्र मानवी द्विपाद पशू हिच्यावरून जात-येत असतात. रस्त्यावर येऊन निकाल लावणाऱ्या धटिंगणापासून ते भक्तगणांपर्यंत सर्वाची पावले साहणारी नागरी अबलाच म्हणावे लागेल हिला. रहदारीच्या नियमनापासून उल्लंघनापर्यंतच्या मनोवृत्तींची साक्षदायिनी. हिच्यावरून चालणे जीव मुठीत धरून चालण्यासारखे. मृत्युदूतांचे अदृश्य अस्तित्व, नरसिंह ते नरपशू सर्व हिच्यावरून जा-ये करतात पाळीव चतुष्पादांसह. विज्ञानाचे शाप/अभिशाप, वरदान आणि संस्कृतीची गती, उन्नती, अधोगती एकत्र पाहणारी नागरी वाट म्हणजे नागरी जीवनाची वाटचाल वाटमारीसह. सभ्य बगळे, सभ्य कावळे यांनी भरलेली संस्कृती चालविणारी, जुना वाडा, चाळ संस्कृतीपासून बंद दरवाजांचे फ्लॅट संस्कृतीपर्यंतची सर्व स्थित्यंतरे, धार्मिक, राजकीय, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वांशिक, वर्णीय, इ. सर्व स्थित्यंतरे पाहात, पर्यायाने सर्वाची वाट लागलेली, वाटेस लावणारी, वाट दाखविणारी, वाट देणारी, वाट घेणारी संस्कृती स्थित्यंतरे पाहणारी ही नागरसुंदरी वाट. रानवासींतून माणुसकी पाहणारी रानवाट आणि मानवता काढून/ गेलेली सभ्य प्रगत रानटी प्रवृत्तीच्या सभ्य प्रगत रानमाणसे यांची ही शहरी/ नागरी वाट. दोन ध्रुवीय अंतर.

आता या नागरी वाटा भूपृष्ठावरच असतात असं नाही. भूपृष्ठ कमी पडू लागला म्हणून त्या आता भूगर्भवासी/ भुयारीपण काढल्या जातात/ निघतात. मोठय़ा शहारात आता भुयारी वाटा हा एकमेव पर्याय राहिला आहे, वाढत्या वहतुकीची समस्या सोडविण्याचा तसेच दुसरा मेट्रोसारखा. उच्चस्तरीय पर्यायही येऊ लागला आहे. अर्थात भुयारी वाटा वा उंचीवरून जाणारा मेट्रोचा प्रकल्प हे लोहमार्ग म्हणूनच दोन्ही पर्याय काही शहरांत कार्यान्वित आहेत भारतात- कलकत्ता, दिल्ली येथे. मुंबई व अन्य शहरी पुढे-मागे केव्हातरी येतील अस्तित्वात. पूर्वी भुयारी वाटा असत. संकटप्रसंगी बाहेर पडण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ठरावीक लोकांनाच त्या माहिती असत व त्या ठरावीक लोकांनाच वापरण्यासाठी केल्या जात. (पुण्यात शनिवारवाडा ते पर्वती अशी भुयारी वाट होती पेशव्यांसाठी असे जुने/ वृद्ध लोक सांगत असे ऐकिवात आहे एवढेच). तशा त्या गुप्त असल्याने त्यांना भुयारी वा गुप्त वा चोरवाटा म्हणत. आता त्या कालबाह्य़ झाल्या आहेत. आता त्यांचे स्वरूप नागरी झालेय- भुयारी पदपथ तसेच भुयारी वाहनपथ म्हणून त्या मुख्य वाटेवरचा वाहतूकताण कमी करण्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरत आहेत. काही वेळा दोन मुख्य वाटा जेथे परस्परांस छेदतात तेथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक वाट उचलली जाते उड्डाणपूल करून. पण हे उपाय सर्व शहरांत करता येत नाहीत; केवळ महानगरे व प्रमुख मोठय़ा शहरांत या योजना राबविल्या जातात. या भुयारी वा उड्डाणपूलवाटा फक्त एका दृष्टीने वेगळ्या. त्यांचे बाजूस इमारती नसतात वा वस्ती नसते. एवढे सोडले तर बाकीचे सगळे नागरी संस्कृतीचे सभ्यासभ्य जवळ सारखेच भूपृष्ठावरील वाटेसारखे त्या पाहतात.

या नागरी वाटा जाहिरात फलक, पाटय़ा, दिवे, तारांची जाळी (वीज, दूरध्वनी, केबल टीव्ही), कमानी, अन् काय काय सांगावे यांनी सजलेल्या, नटलेल्या इतक्या की नवखा संभ्रमात पडेल. असो हा काळाचा महिमा.

या वाटांखालून सांडपाणी व मैलपाणी वाहणाऱ्या वाहिन्या व जलपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या जातात त्यांची देखभाल दुरुस्तीसाठी काही ठरावीक अंतरा अंतरावर मोठी माणसाच्या उंचीची अंतर्गत चौकोनी वा गोल घरे/ बोगदे/ खड्डे बांधलेले असून त्यावर लोखंडी वा सिमेंटची झाकणे असतात. ही झाकणे काही वेळा चोरीस जातात वा तुटतात व अपघात होतात तसेच या वाहिन्या तुंबतात व ते सर्व प्रवाही द्रव / पाणी वाटेवर पसरत जाते. हा अनुभव आपण घेतोच. जेव्हा ही गटारे अशी तुंबतात. काही वाटांलगत स्वच्छतागृहे (युरिनल्स) असतात. तसेच कचरापेटय़ाही. हेपण लेणे ही वाट मिरवतेच.

शहरी वाटेबद्दल/ नागरी वाटेबद्दल खूप काही अजून लिहिता येईल तरी पण थोडे महत्त्वाचे राहिलेले लिहितो, कारण त्याशिवाय वरील भाग अपूर्ण/ अधुरा वाटेल म्हणून. या नागरी वाटांचं मोठं वैशिष्टय़ म्हणजे चौक/तिठ्ठे/तिकटय़ा. या ठिकाणी दोन वाटा एकमेकीस छेदतात व पुढे जातात वा चार वाटा चर दिशांनी येऊन मिळतात. या चौकात कधी पुतळे, तर कधी कारंजी तर कधी स्तंभ असतात. या चौकांचे नामकरण हा एक वादाचा व राजकारणाचा भाग असतो, तसेच तेथे कोणाचा पुतळा उभारावा, कारंजे/ स्तंभ काय असावे यावरूनही मोठे रण माजते. यापैकी काही चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे असतात तर काही चौकांत वाहतूक पोलीस. हे कधी असतील, किती वेळ असतील हे नामवंत ज्योतिषालाही सांगता येत नाही. अन्य चौकात वाहतूक व पादचारी खोखोसारखे मार्ग काढत ये-जा करत असतात. जीव मुठीत धरून पादचारी चालतात व चौक क्रॉस करतात वाहनांच्या जाण्या-येण्यामधून. वाहनचालकही असाच मार्ग काढून चौकातून जातात. तर कधी एखादे वाहन बंद पडून वाहतूक कोंडी. चारही वाटा हे सर्व पाहतात. चौक व शेजारील असलेली चौकी व तिचे राजकारण हा एक मनोरंजनाचा भाग आहे. या चौकात सभा होतात व या चारी वाटा स्तब्ध होतात अन् सभा संपली की दुथडी वाहू लागतात. चौखूर उधळणारी जनावरे तरी बरी अशी भाऊगर्दी त्या वाहून नेतात. नागरी असंस्कृत स्वरूपाचे दर्शन येथेच घडते. माणसातला रानटी पशूपणा वा वृत्ती याचे हे दर्शन असते.

यातल्या काही वाटांना फुटपाथ/ पादचारी मार्ग असतात. साडीला काठ असावे तसे. कधी एकच काठ असतो. यावर विक्रेत्यांची/पथारीवाल्यांची व कधी भिकाऱ्यांचीही ठाण मांडलेली. त्यामुळे या पादचारी मार्गावरून चालणे हे दिव्य असते, ती एक कसरत असते माणसांच्या भाऊगर्दीत जाण्याची. या काठपदरी नागरवाटा रात्री काही गरीब बेघर येथे झोपतातही. स्वरूप थोडे वेगळे. बाकी सर्व तेच पाहणे यांच्याही नशिबी.

आता ग्रामीण वाटा या खेडय़ापाडय़ातल्या. यांचं स्वरूप ग्रामीण संस्कृतीशी सुसंगत. ग्रामीण लोकांनी वापरण्यायोग्य. याची घडणजडण थोडी वेगळी. बहुतांशी कच्च्या, ओबडधोबड, यावरून शहरी पावलांना चालणे कठीण जाते. हिच्यावरून जाणारी ग्रामीण माणसे, जनावरे, वाहने थोडी वेगळी, पण येथील माणुसकी, सभ्यता, सहज जाणवणारी. कधी ही मातीची व खडीची तर कधी जमिनीच्याच पोताची असते. या वाटांना गर्दी आठवडी बाजाराचे वा यात्रेचे दिवशी, पण इतर दिवशी त्या संथ लयीची वाहतूक करणाऱ्या. स्वरूप ओबडधोबड, पण ग्रामीण संस्कृतीस जपणारे, मानवणारे. यांच्या बाजूला वृक्ष, झाडे असतात. त्यांची सावली या वाटेवर पडते. पावसाळ्यात मऊ चिखलांनी त्या घसरडय़ा होतात, पण त्याचे वावडे त्या संस्कृतीस नाही. या वाटेच्या बाजूस एखदा वृक्ष कधी कधी पार बांधलेलाही असतो. त्यावर पादचारी, ग्रामस्थ विसावतात. या वाटांना रात्री दिव्यांनी प्रकाशित केले जाते असे नाही. काही काही सुधारलेल्या गावातील वाटांवर ही सोय असते. जर गावात वीज असेल आलेली तर वा काही वेळा सोलर प्रकल्प राबविला असेल तरच. अन्यथा कंदील वा विजेऱ्यातूनच वाटचाल करावी लागते. रानवाटापेक्षा थोडी नीटस सुधारलेली आवृत्ती. पावसाळ्यात त्या कधी कधी उखडतात वा काही भाग वाहून वा खचून जातो. प्रकृतीने त्या दणकट असतात बरं का! खेडय़ात गेल्याशिवाय, व या वाटांनी भ्रमंती केल्याशिवाय वा त्यावरून चालल्याशिवाय ते समजणार नाही. चला एकदा तरी खेडय़ात. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते ना, ‘‘ भारत खेडय़ात आहे म्हणून. मग भारत बघायला चला. जरा शहरी गावकुस ओलांडा व या ग्रामीण वाटा पायी घाला. शांत वाटा. मन प्रसन्न होतं. कारण कसलीही बंधने, समस्या यांनी न काळवंडलेल्या. कसलाही ताण मनावर येत नाही. या वाटांवर बैलगाडीच्या चाकांचे चर उमटलेले दिसतात कधी कधी. काही विशिष्ट खेडय़ांत एस. टी. बसपण येते-जाते. बाकी सगळे शांत शांत.

आतापर्यंत आपण भौतिक भूपृष्ठ वाटा पाहिल्या. आता आपण एका नवीन वाटांचा थोडा मागोवा घेऊ. या वाटा दिसत नाहीत. त्या आखलेल्या नसतात. त्यांच्यावर दिवाबत्ती, इमारती, चौक, इ.इ. काही नसते. या वाटा म्हणजे हवाई वाटा व सागरी वाटा. याशिवाय पुढे भविष्यात अंतराळ वा अंतरिक्ष वाटाही येतील (सध्या त्या मोजक्यात आहेत). काही अतिप्रगत राष्ट्रांपुरत्याच मर्यादित. त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या हवा व पाणी या माध्यमातून येतात व जातात पण कधी दिसत नाहीत. यांचा वापर करणारे पक्षी व जलचर त्यांना बरोबर ओळखून त्यावरून जातात येतात. मानव विमान व जहाज या साधनांद्वारे या माध्यमातून (हवा व पाणी) प्रवास करतो पण पक्षी व जलचरांचा मुक्त आनंद तो उपभोगू शकत नाही. तीच गोष्ट अंतराळप्रवासी यांची. यांना तर विशिष्ट पोशाखातच कायम बंद राहावे लागते. जरा काही यांत्रिक बिघाड झाला की अंतराळयान व ते अंतराळवीर त्या यानातच अडकलेले दोन्ही नष्ट होतात. पृथ्वीवर त्यांचे काहीही अवशेषही येत नाहीत. जहाज व विमान अपघातातही मृत्यू पावतात. तेव्हा पक्षी व जलचरांच्या या वाटा तेच मुक्तपणे आनंदाने वापरतात. पक्ष्यांचे हवाई मार्ग त्यांनाच कळतात, तसेच जलचरांचेही. या मार्गाचं सुख वेगळंच, पण मानवाला ते उपभोगता येत नाही म्हणून मग ‘मी पक्षी असतो तर’ इ. इ. लेखनाद्वारे अनुभवशून्य कल्पनारंजित असा या वाटांचा वैचारिक/ मानसिक प्रवास करून आपली इच्छापूर्ती करतो. या वाटा खऱ्या मुक्त, अदृश्य. माध्यमातच अस्तित्व सामावलेल्या. यांच्यावरून चालणे नसते तर असते ते केवळ उडणे वा पोहणे वा तरंगणे व तरंगती वहन. यांचा कधीही भूपृष्ठाशी ना संपर्क, ना संसर्ग ना संदर्भ, ना संगम, ना सुसंवाद ना विसंवाद. ना यांना वळणे, ना पूल ना फुटपाथ, ना भुयारी मार्ग, ना चौक, ना पुतळे, ना इमारतीशेजारी, ना गल्ल्या ना बोळ, ना कोणतीही अंतर्गत व बहिर्गत जलवाहिनी, ना दिवे ना इतर माध्यमांची तारवाहिनी व खांब. ना दुरुस्ती ना रुंदीकरण काहीच नाही. सर्वमुक्त, सर्वत्र, सर्वव्यापी, सर्वाच्या, पण अदृश्य असल्याने कधीच ना डागळलेल्या. माध्यामाचेच नैसर्गिक प्रकोपानेच यांचा वापर करणारे दगावतात कधी कधी एवढेच काय ते गालबोट. मानव या केवळ विज्ञााननिर्मित साधनानेच जी त्याने बुद्धीने विकसित केली आहे, वापरतो. त्याशिवाय त्या वापरणे केवळ अशक्य. चतुष्पाद प्राणी कधीच वापरू शकणार नाहीत. पक्ष्यांना व जलचरांना निसर्गदत्त देणगीच असते हाच मुख्य फरक. आणि हीच मानवाची उणीव वा निसर्गत: कमकुवतपणा. मौसमी स्थलांतर करणारे पक्षी वर्षांनुवर्षे, पिढय़ान् पिढय़ा आंतरखंडीय प्रवास बिनचूक कसा करतात हे एक कोडेच आहे. तसेच जलचरांचे उष्णकटिबंधातून शीतकटिबंधाकडे जाणे येणेही असेच कोडे आहे. या वाटांवर कधीही पावले उमटत नाहीत वा ठसे नाही.

आतापर्यंत आपण प्राकृतिक/ भौतिक वाटचाल केली. आता एक वेगळाच प्रकार म्हणजे ‘वैचारिक वाटा’ पाहू. या मनोव्यापाराच्या वाटा. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या वाटा. मनाला वळण लावणाऱ्या या वाटा मानवाचे आयुष्य घडवितात, चांगले वा वाईट दोन्हीपैकी एक प्रकारचे आणि यातूनच पुढे माणसे वाटेकरी, वारकरी, वाटमारी, वाटधारी, इ.इ. बनतात. या बुद्धिबळणाच्या वाटा संस्कारिीत होतात/ तयार होतात. त्या सांस्कृतिक जीवनाच्या तत्त्वज्ञानाने तसेच वातावरण व परिस्थितीने व संगतीनेही. या वाटा म्हणजेच माणसाचे सांस्कृतिक जीवन. पशूंना मानवासारखे अमर्यादित बुद्धिवैभव नाही. त्यामुळे त्यांच्यात उपजत बुद्धीची जी वर्धन/ महत्तम सीमा असते तेवढेच ते करू शकतात. पाळीव प्राणी थोडे जास्त करतात एवढेच, म्हणजे शिकवल्याप्रमाणे पण त्यालाही सीमा आहेच. मानवाचे तसे नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आविष्करण म्हणजेच त्याची बौद्धिक वाट/ दर्जा/ प्रत. त्याच्या बुद्धीची वाटचाल म्हणजेच बौद्धिक वाट. माणसाचा बुद्धिभ्रंश झाला की या वाटेची वाट लागते. तिला फाटे फुटतात. या वाटेवरची प्रवासी असते मानव बुद्धी. मानवाचंच नव्हे तर समाजाचं, राष्ट्राचं भविष्य या वाटा घडवतात आणि म्हणूनच उत्तम नागरिकत्वाची वाट बुद्धीला देणारी समर्थ गुरुशक्ती असावी लागते. या वाटा राजस, तामस, सात्त्विक असतात. हे त्यांचे तीन प्रकार. अर्थात या मुख्य प्रकारातही उपप्रकारांचे जाळे/ फाटे असतातच. मानवी चंचल मन स्थिरमती होण्यासाठी फार मोठा प्रयत्न लागतो अन्यथा बुद्धी कशी व कधी कोणत्या मार्गाची वाटचाल करील वा स्थित्यंतर होऊन वाटांतर करील ते सांगणे अशक्य आहे. त्याचा अंदाज करता येणार नाही. या बुद्धीनिर्मित वाटा त्यामुळे ज्याचे बौद्धिक तेज प्रभावी त्याची प्रभावी वाणी इतरांची बुद्धी आकृष्ट करून आपले वाटसरू/ अनुयायी/ गुलाम/ संप्रदायी बनवते व त्यातूनच पुढे धर्म, वंश, पक्ष, गट, जातपात, संप्रदाय, इ. समूह निर्माण होतात, त्या त्या विचारप्रणालीची वाट धरलेले व त्यातून पुढे संघर्ष, कलह इ.ची बीजे जर ती वाट (त्या विशिष्ट प्रणालीची) अहंकार, दांभिकता, इ.च्या रंगांनी रंगलेली असेल तर उत्पन्न होऊन समाजास, राष्ट्रास बिरुड लागते. माणसाचा पशू या पद्धतीच्या वाटांनीच होतो.

अनेक धर्मग्रंथ, वाङ्मय, विज्ञानशास्त्रे, धर्मशास्त्रे, नीतिशास्त्रे, समाजशास्त्रे, योगशास्त्रे, तंत्रमंत्र शास्त्रे, कला शास्त्रे, इ. इ.नी जो माणूस घडविला जातो तो या वैचारिक ज्ञानवाटांमुळे. या वाटा दिसत नाहीत पण त्याचे परिणाम दिसतात. जसा सूर्यप्रकाश दिसत नाही, पण त्यामुळे सर्व वस्तू दिसतात तसेच या वाटांमुळे माणसे माणसांना ओळखतात. त्यांच्या लौकिक व्यवहारावरून की हा याची वैचारिक वाट कोणती? यात मग ‘‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’’ याप्रमाणे या वाटांचे वाटसरू एकत्र येतात. गायक, वादक, चित्रकार, लेखक, कवी, समीक्षक, डॉक्टर, वैद्य, हकीम, कवी, वक्ते, नाटककार, अभिनेते, कारखानदार, इ. इ.चे गट हे उदाहरण.

राजकारण्यांची मूळ वाट कोणती व चालतात ती वाट तरी शाश्वत असेल का हा एक मोठा यक्षप्रश्न आहे. त्यांची वैचारिक वाट स्थित्यंतरे कधी, कशी, केव्हा व का होतात याचे उत्तर नामवंत ज्योतिषीही देऊ शकणार नाहीत. ‘‘राजकारणीस्य बुद्धी मार्गम् देवा न जानति कुतो मनुष्य:।’’ असेच सुभाषित वा म्हण योग्य ठरेल. निर्बुद्ध व वेडे यांना वैचारिक वाटच नसते. कारण बुद्धीचा गुंतावळा झालेला असतो तो सोडविता येणे जवळ जवळ अशक्य असते. बुद्धीची आंदोलने झाली की वाटचाल संभ्रमावस्थेत जाते व जसे आंदोलन स्थिर होईल त्याप्रमाणे स्थिरावते.

देवमाणसाचा दरोडेखोर व दरोडेखोराचा संत अशी अमूलाग्र परिवर्तने या वैचारिक वाटेची आहेत. भक्तीमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग या अध्यात्मातील वाटा साधुसंत योगी यांच्या असतात. सज्जनांच्या वैचारिक वाटा वेगळ्या, त्यावरून चालणारे समाजास सन्मार्गी नेतात. सभ्य लुटारूंच्या वाटा या दांभिक विचाराच्या फसव्या असतात. जनतेला लुबाडणारे हे लोक, समाजास ठगवतात, नागवतात, रसातळास नेतात. हुकूमशहांच्या वैचारिक वाटा  जनतेवर अधिराज्य करण्याच्या विचारांच्या असतात त्याकरिता ते वाटेल ते प्रयत्न करतात. दडपशाही, रक्तपात सर्व त्यांना चालते. सामदामदंडभेद सर्वाचा वापर करून ते कसलाही विधिनिषेध न बाळगता आपली लालसा, वासना तृप्त करतात. समाजाचा विध्वंस झाला तरी यांना ते चालते. कसलीही नीतीबंधने या वैचारिक वाटेत नसतात. तामस वृत्तीच्या लोकांच्या वाटा तामस, राजस वृत्तीच्या लोकांच्या राजस व सात्त्विक वृत्तीच्या लोकांच्या सात्त्विक असतात.

काही व्यक्तींच्या प्रवृत्तीत कधी कधी यांची सरमिसळही दिसते. देशात अराजक, अस्थिरता, दंगे, घातपात, रक्तपात, नासधूस इ. इ. प्रचंड प्रमाणात होऊन जनता हवालदील होते ती या तामस व राजस वैचारिक वाटांच्या अतिरेकी प्रवृत्तींच्या दुर्जनांकडूनच. देशादेशांतील संघर्ष, युद्ध, हे सर्व प्रकार यातलेच. तेव्हा या वैचारिक वाटा नष्ट होणेच योग्य पण ते होत नाही.

आज जगाची व भारताची स्थिती पाहता हेच चित्र दिसते. म्हणूनच विश्वाला तारक वाट दाखविणारा युगपुरुष ‘‘यदा यदा ही धर्मस्य.. संभवामी युगे युगे’’ आश्वासनाप्रमाणे केव्हा येईल व सध्याचे वाटगर्तेत सापडलेल्या मानवजातीस, समाजास, राष्ट्रास व विश्वास उद्धरेल याची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

आचार्य वसंत गोडबोले – response.lokprabha@expressindia.com