08-lp-rohan-mapuskarबाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हटलं जातं; पण माझ्या बाबतीत काहीसं वेगळंच घडत गेलं. साधारण प्रत्येक जण आपल्या लहानपणीच ठरवतं, की मोठं झाल्यावर आपण काय होणार? कुठल्या क्षेत्राकडे वळणार? त्याचप्रमाणे माझंही स्वप्न होतं की, मला मोठं झाल्यावर क्रिक्रेटर व्हायचं होतं आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्नसुद्धा केले. क्रिक्रेटर व्हायचं तर नेटप्रॅक्टिससाठी मुंबईला जावं लागणार होतं. श्रीवर्धनसारख्या छोटय़ाशा गावात राहून हे स्वप्न उराशी बाळगलं होतं; पण घरापासून इतकं लांब जाऊन काही तरी करणं, ही कल्पना घरी आईबाबांना मान्य नव्हती. कारण एकच- त्यांना वाटणारी काळजी. ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण श्रीवर्धनमध्येच पूर्ण करून मिल्रिटीत जाण्याची धडपड सुरू केली;. पण तिकडेही सिलेक्शन होऊ शकलं नाही. कराटे शिकलो आणि त्यात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळालं.

माझा चुलत भाऊ राजेश मापुस्कर मुंबईत सिनेसृष्टीमध्ये बरीच वर्षे कार्यरत होता. तो बऱ्याचदा श्रीवर्धनला यायचा आणि बोलता बोलता अनेक किस्से सांगायचा. त्यातलाच त्याने सांगितलेला एक किस्सा म्हणजे संजय दत्तला आपल्या घरचं जेवण आवडतं आणि म्हणून मी त्याला आपल्या घरचा डबा घेऊन जातो. बस्स हे ऐकून मला कमालीचं कुतूहल वाटलं. वाटलं, की खरंच असं होऊ शकतं? एक एवढा मोठा स्टार आणि त्याला आपल्या घरून जेवण जाऊ शकतं? मोठय़ा कलाकारांना भेटणं आणि त्यांच्याबरोबर वावरणं इतकं सोपं असतं? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांनी माझं कुतूहल वाढत गेलं आणि मीसुद्धा मुंबईत जाऊन त्याच क्षेत्रात जायचं ठरवलं. दिवसरात्र फक्त मुंबईत जाऊन सिनेसृष्टीत काम करणं हाच ध्यास घेतला होता मी जणू. दुसरं काहीही डोक्यात येत नव्हतं. मग शेवटी आईने राजेशदादाला माझ्या सिनेसृष्टीच्या वेडेपणाबद्दल कळवलं. त्यानंतर तो जेव्हा परत श्रीवर्धनला आला तेव्हा त्याने मला एक प्रश्न विचारला, ‘‘जर मी तुला सांगितलं, की मला आता एक स्पोर्ट्स बाइक हवीय तर ती तू कशी आणशील?’’ मी उत्तर दिलं, ‘‘आजकाल स्पोर्ट्स बाइकचं खूप वेड आहे. मी सिग्नलवर उभा राहीन, एक ना एक तरी बाइक सिग्नलवर उभी राहील. मग मी त्या राइडरला रिक्वेस्ट करून बाइक शूटिंगसाठी आणेन.’’ हे उत्तर ऐकून तो मला म्हणाला, ये एक दिवस मुंबईला. तेव्हापासून मला मुंबईला जाण्याचे वेध लागले.

एक दिवस मी आईकडून पसे मागितले. आईने सहाशे रुपये दिले आणि काहीही न ठरवता मी अवघे सहाशे रुपये घेऊन मुंबईला निघालो. घरी अजिबातच कल्पना नव्हती, की मुंबईला निघालो. मी मुंबईला येऊन राजेशदादाला भेटलो ते राजकुमार हिरानी यांच्या ऑफिसमध्ये. त्या वेळेस मला कल्पनाही नव्हती की, मी एवढय़ा मोठय़ा दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये आहे. राजकुमार हिरानी सरांनी विचारलं, हा कोण? राजेशदादाने ‘माझा भाऊ. याला या क्षेत्रात यायचंय’ अशी ओळख करून दिली. तेव्हाचे त्यांचे शब्द मला अजूनही आठवतायत. ‘मतलब और एक मापुस्कर इंडस्ट्रीमें जनम ले रहा है!’ मला त्या वेळेस काहीच कळलं नाही, की ते असं का म्हणाले. मी फक्त मिस्कील हसलो. राजेशदादाने मला त्याच्याबरोबर काम करण्यासाठी ठेवलं. मी काय करणार होतो याची मला कणमात्रही कल्पना नव्हती. हे क्षेत्र माझ्यासाठी नवंकोरं होतं. कॅमेऱ्याच्या मागे इतक्या गोष्टी असू शकतात याचा विचार सिनेमा बघताना कधीच केला नव्हता. त्या वेळेस एक एका विभागाची ओळख होत गेली.

राजेशदादाच्या मार्गदर्शनाखाली जे मिळेल आणि जसं जमेल ते काम करत होतो. त्या वेळेस मला कुठल्याही कामाचे पसे मिळत नव्हते, कारण मी एक ट्रेनी असिस्टंट म्हणून जॉइन झालो होतो. तेव्हा मला राजेशदादाने एक गोष्ट सांगितली, कीतुला आता कुठल्याही कामाचे पसे मिळत नाहीत मान्य आहे; पण लक्षात ठेव, तू आता करत असलेलं काम ही तुझी गुंतवणूक आहे. मी ही गोष्ट लक्षात ठेवून चिकाटीने काम करत होतो. त्या वेळेला राजेशदादाचं ‘चंदा की डोली’ या अल्बमचं काम सुरू होतं. तिकडेसुद्धा मी काम सुरू केलं. काही वेळाने मला घरची- गावची ओढ लागली. मला सगळं सोडून घरी जावंसं वाटत होतं, कारण मी जे काम करत होतो त्यात मला गंमत येत नव्हती. वाटलं होतं या क्षेत्रात आपल्याला कलाकारांबरोबर छान वावरता येईल. त्यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध करता येतील; पण हे इतकं सहज सोपं नसतं हे समजत गेलं. खूप इच्छा असूनही श्रीवर्धनला परत जाणं शक्य नव्हतं, कारण कुणालाही काहीही न सांगता स्वत:च्या जबाबदारीवर मुंबईला आलो होतो. बाबांनी एक वर्षांची मुदत दिली होती. सांगितलं होतं की, वर्षभरात काहीही नाही घडलं तर गुपचूप परत निघून यायचं; पण मला माझी जिद्द आणि चिकाटी याच क्षेत्रात पुढे जाण्याची उमेद देत होती. मला आपली संस्कृती, सण या गोष्टी फार आवडतात. आयुष्यात पहिल्यांदा मला शूटिंगचं काम मिळालं ज्यात मला खरंच काही तरी करण्यासारखं होतं. त्याच वेळेस माझा सगळय़ात लाडका दहीहंडीचा सण होता. त्याला दिवशी मी उपस्थित राहू शकलो नाही. खूप वाईट वाटलं; पण मी ठरवलं होतं की, या क्षेत्रात आपले पाय रोवायचे. मी जिद्दीने कामाला लागलो.

अजूनही मला हे ठरवता आलं नव्हतं, की मला या क्षेत्रात नेमकं काय करायचंय. मी सगळय़ाच विभागांमध्ये असिस्टंट ट्रेनी म्हणून काम करत होतो. त्याच दरम्यान मला अजून काही तरी वेगळं शिकता यावं म्हणून राजेशदादाने त्याच्या एका मित्राच्या प्रोजेक्टवर पाठवलं. असिस्टंट म्हणून मी गेलो आणि त्या वेळेस अडीच वर्षांत पहिल्यांदा मला अडीचशे रुपयांचा पहिला चेक मिळाला. तोपर्यंत मुंबईमध्ये जगण्याचे अनेक अनुभव आले. इथे तग धरून राहणं अजिबात सोपं नाही या गोष्टींचाही पुरेपूर अनुभव घेतला. राजेशदादाने मला ‘लगे रहो मुन्नाभाई’साठी काम करशील का, असं विचारलं. मी क्षणाचाही विचार न करता  होकार दिला. त्यानंतर तिकडे माझ्या कामाचं कौतुक केलं गेलं. मग राजकुमार हिरानींची ‘थ्री इडियट्स’ ही फिल्म सुरू झाली, तिथेसुद्धा मी ट्रेनी असिस्टंट म्हणून होतो. या सिनेमासाठी राजेशदादाने मला ऑडिशन्सच्या कॅमेरा असिस्टंटसाठी विचारलं आणि मी हो म्हणालो.
रोहन मापुस्कर – response.lokprabha@expressindia.com
@rrmapuskar