सुनिता कुलकर्णी

‘आरोग्य सेतू’ अॅपच्या वापरावरून आपल्याकडे बरेच रामायण घडले. आधी सरकारने ते वापरणे सक्तीचे केले, मग त्याला होणारा विरोध बघून ती सक्ती काढून टाकली वगैरे वगैरे. पण पुतीन यांच्या रशियामध्ये असे काही होत नाही. एखादी गोष्ट सरकारने ठरवली म्हणजे ठरवली. लोकांना ती स्वीकारावीच लागते. रशियामधल्या करोनासंबंधित अॅपबाबत असेच काहीसे आहे. तिथे सरकारने सांगितलेल्या नियमांच्या अधीन राहून त्या अॅपचा वापर केला नाही तर लोकांना भरभक्कम दंड भरावा लागतो आहे.

यासंबंधीची बातमी आजच्याच ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने दिली आहे. मॉस्कोमध्ये राहणाऱ्या मारिया अलेक्झांड्रा नावाच्या नर्सला तिच्या कामादरम्यान करोनाचा संसंर्ग झाला. तिने डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे उपचार घेतले. स्वत:चे विलगीकरण केले. मॉस्को शहराच्या नियमाप्रमाणे करोना रुग्णांशी संबंधित सोशल मॉनिटरिंग अॅप डाऊनलोड केले. हे अॅप जीपीएसवरून संबंधित रुग्णांचा पाठपुरावा तर करतेच शिवाय त्यांच्याकडे ‘तुमचा सेल्फी पाठवा’ अशी अचानक मागणी करते. त्यातून संबंधित रुग्ण विलगीकरणातच आहे की बाहेर पडतो आहे, यावर त्यांना लक्ष ठेवता येते. रुग्ण बाहेर पडला आहे हे लक्षात आले किंवा त्याने मागणी केल्यावर सेल्फी पाठवला नाही तर त्याला ५६ डॉलर्सचा दंड होतो.

मारिया अलेक्झांड्रियाला देखील ‘सेल्फी पाठवा’ असे नोटिफिकेशन आले. पण तिच्या मोबाइलमध्ये काहीतरी गडबड झाली आणि तिला सेल्फी काढता आला नाही. आजारपणामुळे ती इतर कुणाची मदतही घेऊ शकली नाही. तिचे विलगीकरण संपले तेव्हा तिला समजले की तिला एकूण ११ वेळा दंड झाला असून त्यापोटी ६२० डॉलर्स आकारले गेले आहेत. ‘हे तर माझ्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त पैसे आहेत’ असं ती सांगते.

अर्थात असा दंड आकारला गेला असल्याची तक्रार करणारी ती एकटीच नाही, तर हजारो मॉस्कोवासीयांना या प्रकाराला तोंड द्यावे लागते आहे. संबंधित यंत्रणेने एका महिन्यात ५४ हजार जणांना दंड लावला गेला आहे. त्यातून ३० लाख डॉलर्स आकारले जाणार आहेत. संबंधित यंत्रणेच्या मते जे सतत टाळेबंदीचे उल्लंघन करतात त्यांच्याकडूनच हा दंड आकारला जातो आहे, त्यामुळे तो योग्यच आहे. तर नागरिकांच्या मते पहाटे दोन-तीन वाजता देखील ‘सेल्फी पाठवा’ अशी मागणी केली जाते आणि नाही पाठवला तर मग दंड आकारला जातो.

मॉस्कोमध्ये फेब्रुवारीमध्ये फक्त दोन करोना रुग्ण सापडले होते. आता ते रशियामधला करोनाचा हॉटस्पॉट असून संपूर्ण रशियामध्ये आहेत त्याच्या निम्मे करोनारुग्ण एकट्या मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्कोच्या महापौरांनी चिनी नागरिक शोधण्यासाठी फेशियल रेकग्निशन अॅप वापरण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्यावर उजव्या गटांकडून जोरदार टीका झाली होती. एप्रिल महिन्यात घराबाहेर पडू इच्छिणाऱ्या लोकांना डिजिटल पास दिले गेले तेव्हा मॉस्को पोलिसांना मेट्रो स्टेशनबाहेर हजारो लोकांचे स्मार्टफोन तपासत बसण्याची कसरत करावी लागली होती.

या सगळ्यापेक्षाही रुग्णांसाठी असलेल्या सोशल मॉनिटरिंग अॅपवरून आता तिथे सगळ्यात जास्त गदारोळ माजला आहे. एप्रिलपासून हे अॅप वापरणे सक्तीचे केलेले असले तरी ते नेमके कसे वापरायचे, कोणत्या गोष्टी केल्या तर दंड भरावा लागतो हे लोकांना नीटपणे सांगितले गेलेले नाही, त्यामुळे भरमसाठ दंड आकारला जातो आहे आणि लोकांमध्ये अस्वस्थता आहे. पुतीन यांच्या रशियात असं घडतं आहे.