खिडकीतून पावसाळी कुंद हवा अनुभवत, निसर्गावर ओतप्रोत प्रेम करत, काव्य रचत, मी कुठेतरी हरवले आहे, याची बोच मनाला सारखी कुठेतरी ठसठसत होती.

निसर्गावरच प्रेम व्यक्त करायला, तसं बघायला, माझी लेखणी पुरेशी होती. पण मी तेपण आससून करू शकत नव्हते. कारणमीमांसा करायला जावं तर, फार कथित वादाच्या भोवऱ्यात सापडेन, हीपण अनामिक भीती!!

‘स्त्री ही बंदिनी’ या काव्याची ओळ सतत का माझा पाठपुरावा करतेय?

का असं? बंडखोर होऊन जेव्हा जेव्हा तिने आपलं बंधन नाकारलं, तेव्हा तेव्हा तिच्यापेक्षा बलवत्तर समाजाने तिला आपलंसं केलं नाही! तिला स्वीकारलं नाही! अच्छा! म्हणजे माझ्या बोचऱ्या मनात हे सगळं होतं तर! विचारांनी प्रगल्भ झालेल्या, तथाकथित समाजाच्या, थोटय़ा बंधनांनी मला जखडलं होतं! आणि ते झुगारून देण्याचं बळ माझ्या पंखात नाही हे जाणवल्यामुळे मी अस्वस्थ होते.

मी काही समाजसुधारक वगैरे नाही, राजकारणी तर अजिबात नाही. मग माझ्या विचारांत ही बंधनं, समाजाची रचना, मानसिकता या सगळ्या गोष्टी का याव्यात? एका लेखिकेला किंवा कवयित्रीला या गोष्टींचा मूलाधार कसा घडला याची केवळ बौद्धिक भूक म्हणून हा विचार पडला आणि घडला असावा!

निसर्गाची विविध रूपे अनुभवताना, त्याच्यात समाजकारण दिसू लागलं तर ‘डेफिनेटली समथिंग इज राँग!’ हाच माझा शोधप्रवास! कदाचित स्वत:चा ‘आत्मप्रवास’! स्वत:चा शोध पण!!

अवेळी पडणारा हा पाऊस मला अवेळी घडणाऱ्या घटनांचा ‘द्योतक’ वाटतो.

मळभ दाटून यावं आणि शहारे आणणारा आवाज (गडगडाट) करीत, त्याने बरसून जावं.. माघारी उरावा चिखल! कुणाच्या तरी कोवळ्या मनावर, शरीरावर आघात करून आयुष्याचा चिखल व्हावा तसा!

मला आवडेनासा होतो, तो ‘अवेळी पडणारा क्रूर पाऊस!’

’ ’ ’

तिनं (चटई) गोणपाट अंथरलं, वाडगं, तांब्या, पितळेचं ताट पुढं ठेवलं. धनी थकून आला असेल, मनात विचारांचा कोंडमारा! आज काय बातमी असेल धन्याकडे? कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन कसं जगायचं! ज्या जमिनीकरता कर्ज घेतलं, तिनं पिकवायचं नाकारलं आणि मेघराजानंपण पाठ फिरवली, कसं ढकलायचं जीवन?

तो गोणपाटावर बसला. तांब्यातून पाणी घटाघटा प्यायला. भाकरी वाढताना तिच्या नजरेला नजरपण देता येईना! लेकरांना उगाच जन्माला घातलं असंपण वाटून गेलं. त्याच्या तोंडात घास फिरू लागला! ताट तसंच ठेवून त्याची शून्यात नजर!

शेवटी तिने न राहवून विचारलं, ‘‘धनी, काय झालं, तालुक्याच्या कचेरीत?’’

धनी म्हणाला, ‘‘काय व्हनार? गरिबाला कर्जाचा शापच हाए! कुटून कर्ज फेडू आता?  पैका आनु तरी कुटून? तुझं दागिनं विकलं, पणं काई कर्ज फिटतं न्हायी बघ. ही दोन लेकरं पदरात, त्यांचं कसं व्हईल हाच इचार बग मनात! माझ्याकडं एक विलाज आहे, पन तुला कसा सांगू?’’

‘‘सांगा धनी लेकरांसाठी तेपन पचविनं!’’

‘‘मंग मला विष दे! मी मरतो, तुम्हाला तरी जगता इल! सरकार कर्ज माफ करील आनी माझ्या मरनाचं पैकंपण देईल. लेकरांस घेऊन तालुक्याला जा, काय न्हाई तर शाळा शिकिव थोडी, मंग ते करतील काय ते!’’

ती म्हणाली, ‘‘धनी नगा असलं वंगाळ बोलू, कायतरी मार्ग निंगल!’’ धन्याची भाकरी संपली होती!!

सकाळी तिच्या झोपडीभोवती गाव जमलं होतं! कुठल्यातरी वर्तमानपत्राचे पत्रकारपण होते! पेपरात बातमी छापायची होती.

‘‘अजून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली!’’
उज्ज्वला संजीव – response.lokprabha@expressindia.com