lp26प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं चित्रपटाचं पोस्टर  करण्यासाठी मेहनत, अभ्यास, ज्ञान, कौशल्य हे सगळं हवंच. सिनेसृष्टीतल्या काही गाजलेल्या सिनेमांचे पोस्टर्स तयार केलेत; सचिन गुरव या कलावंताने.

‘क्वीन’ हा सिनेमा आठवतोय? विसरता येईल असा सिनेमा नाहीच तो. या सिनेमाचा उल्लेख केला की, सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतं ते त्याचं पोस्टर. गुलाबी रंग, कंगना राणावतचं एक हात वर करून मनसोक्त नाचणं यामुळे ते पोस्टर भन्नाट झालं होतं. अनेकींच्या डीपीमध्ये या पोस्टरने जागा पटकावली होती. मराठीत ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली होती. पोस्टरमध्ये दिसणारी सायकल, लहान मुलांचे निरागस, खोडकर चेहरे हे त्याचं कारण. ‘लोकमान्य.. एक युगपुरुष’ या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये टिळकांची पगडी आणि मिशा हे एवढंच दाखवून सिनेमाबाबतचं आकर्षण वाढलं. तसंच ‘रेगे’च्या पोस्टरचंही. पोस्टरवर असलेला चेहरा उलटा लावून कुतूहल वाढवलं. अशा अनेक सिनेमांच्या पोस्टर्समधली गंमत, वेगळेपण लक्ष वेधून घेतो. ही कमाल आहे सचिन गुरव या कलावंताची. हिंदी-मराठी सिनेमे, नाटकं, अल्बमची गाणी अशा अनेक कलाकृतींच्या पोस्टरचं काम सचिनने केलंय. सातआठ वर्षांपासून या क्षेत्रात असलेल्या सचिनने सिनेसृष्टीत चांगलं नाव कमवलंय. या पोस्टर बॉयने मराठी सिनेमांनाही आता पोस्टरमधून वेगळी ओळख दिली आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
What Kangana Said?
“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

हिंदीतले प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करताना सचिनचा पोस्टर बनवण्याचा प्रवास सुरू झाला. तो त्यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. तो सांगतो, ‘माझे आजोबा, जनार्दन गुरव ‘प्रभात’मध्ये कला दिग्दर्शनाचं काम करायचे. त्यामुळे घरात कलेचं वातावरण होतंच. राम गोपाल वर्माना एखाद्या सिनेमाचं पोस्टर कसं असायला हवं किंवा एखाद्या पोस्टरमध्ये आणखी काय करायला हवं असं सतत सांगायचो. मला पोस्टरचं काम चांगलं जमेल याचा आत्मविश्वास त्यांनी दिला. यातच करिअर कर असं सुचवलं. त्यांच्या ‘नि:शब्द’ या सिनेमासाठी मी पहिल्यांदा पोस्टर तयार केलं. इथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. नंतर एजन्सीमध्ये, काही वेळा फ्रिलान्सिंग काम केलं. यात स्थिर होऊ लागल्यानंतर ‘ट्वेंटी फोर एटीवन पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड’ ही स्वत:ची कंपनी सुरू केली. सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीशी तसा फारसा संबंध नव्हता. सुनील भोसले दिग्दर्शित ‘आव्हान’ या सिनेमाचं पोस्टर केलं. हा माझा मराठीतला पहिला सिनेमा. हळूहळू मराठीत एकेक कामं मिळत गेली.’ सचिनच्या कामाचा आवाका आता प्रचंड वाढला आहे.

चित्रपटांचं स्वरूप वेगाने बदलतंय. हिंदी-मराठी सिनेमांमधली दरी कमी होत चालली आहे. काही मुद्दे वगळता दोन्हीकडील सिनेमांची प्रक्रिया सारखीच आहे. पूर्वीसारखं शूटिंग झालं आणि सिनेमा प्रदर्शित झाला असं आता राहिलं नाही. आता मार्केटिंग, प्रमोशन या मधल्या भल्या मोठय़ा पायऱ्या चुकवता येत नाहीत. सिनेमाचं शूटिंगची प्रक्रियासुद्धा कदाचित इतकी मोठी नसेल तितके मोठे प्रमोशन आणि मार्केटिंग केले जाते. सिनेमा प्रदर्शनास सज्ज झाला की, सिनेमाच्या काही गोष्टी कधी, काय, कुठे, कसं प्रेक्षकांसमोर आणायचं याचं रीतसर नियोजन केलं जातं. प्रत्येकाचाच एक इव्हेंट होत असतो. कधी गाणं, कधी संगीत! पण, या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असतो तो सिनेमाचा ‘फर्स्ट लुक’. अर्थातच पहिली झलक. सिनेमाचं शूटिंग होत असतानाच त्या विषयी चर्चा, गॉसिप्स, बातम्या पसरत असतात. पण, हा ‘फर्स्ट लुक’ सध्या इंडस्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा झालाय. सिनेमाचं पहिलं पोस्टर दाखवण्याचा एक सोहळा केला जातो. पोस्टरमुळेच सिनेमाचा प्रभाव प्रेक्षकांवर पडत असतो.

हिंदी आणि मराठी अशा दोन्हीकडे सचिनने काम केलंय. ‘क्वीन’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘नि:शब्द’, ‘लुटेरा’, ‘रण’, ‘फुंक’, ‘सरकार’ अशा अनेक हिंदी तर ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘डबल सीट’, ‘दुनियादारी’, ‘नारबाची वाडी’, ‘एक हजाराची नोट’, ‘अस्तु’, ‘रेगे’, ‘मितवा’ अशा अनेक मराठी सिनेमांचं पोस्टर त्याने डिझाइन केलं आहे. खरंतर सिनेमांची ही यादी खूप मोठी आहे. यात आता काही हिंदी गाण्यांचंही पोस्टर केलं आहे. हृतिक रोशन आणि सोनम कपूरचं ‘धीरे धीरे’, इम्रान हाश्मीचं ‘मैं रहू ना रहू’, आयुषमान खुरानाचं ‘यहीं हू मैं’, सोनू निगमचं ‘आ भी जा’ अशा गाण्यांचा त्यात समावेश आहे. सचिनचं काम फक्त सिनेमा-गाण्यांपुरतं मर्यादित नाही. तर ते रंगभूमीशीही जोडलं गेलं आहे. अनेक मराठी नाटकांचे पोस्टर्स त्याने क्रिएटीव्ह केले आहेत. नाटकांचे पोस्टर्स ही संकल्पना अलीकडच्या काळात रुजली आहे. पूर्वी वर्तमानपत्रात जाहिरतींपुरतं आणि नाटय़गृहांच्या बाहेर नाटकाचे पोस्टर्स दिसायचे. सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात नाटकांच्या पोस्टर्सनाही बरंच ग्लॅमर मिळालं आहे. ‘दोन स्पेशल’, ‘तिन्हीसांज’, ‘हा शेखर खोसला कोण आहे?’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘समुद्र’, ‘लग्नलॉजी’, ‘ढॅण्टॅढॅण’, ‘सुसाट’, ‘बीपी’, ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’, ‘जस्ट हलकं फुलकं’ या नाटकांचे पोस्टर केले आहेत. नाटकांच्या पोस्टर्समध्येही त्याने वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.

lp27हिंदीत त्याने बरंच काम केल्यामुळे तिथला त्याचा अनुभव वेगळा होता. तो अनुभव घेऊन तो मराठी इंडस्ट्रीत आला. हिंदीतल्या अनुभवाविषयी तो सांगतो, ‘हिंदीचा आवाका मोठा आहे. भव्यदिव्य असं तिथलं काम असतं. फेस व्हॅल्यु असलेल्या कलाकारांची संख्या तिथे मोठी आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे बजेट खूूप जास्त आहे. बजेट जास्त असलं की काम करण्याची मुभा मिळते. कामासाठी एखादा विशिष्ट कॅमेरा हवा असल्यास मी त्याची मागणी करू शकतो. मराठीचं बजेटची थोडी अडचण होते. पण, आता परिस्थिती हळूहळूू बदलतेय. सिनेमाच्या पहिल्या लुकवर सिनेमाला कसा प्रतिसाद मिळेल हे अवलंबूून असतं हे निर्माते-दिग्दर्शकांना आता समजतं. त्यामुळे मराठीतही आता परिस्थिती सुधारतेय.’

मराठी-हिंदी सिनेमा, नाटक यांबरोबरच सचिनने थेट आंतरराष्ट्रीय सिनेमापर्यंत झेप घेतली आहे. चंद्रन रतनाम दिग्दर्शित ‘द रोड फ्रॉम एलिफंट पास’ या आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पोस्टरसाठी त्याने काम केलंय. चंद्रन यांनी स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या प्रोडक्शन टीममध्ये काम केलं आहे. या सिनेमाच्या कामासाठी सचिन खास श्रीलंकेत गेला होता.

खरंतर पोस्टर करणं हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. सिनेमाची गोष्ट न सांगता प्रेक्षकांमध्ये त्याविषयी उत्सुकता निर्माण करणं, आकर्षकरीत्या तयार करणं, त्यातली श्रेयनामावली पोस्टरवर असलेल्या चित्रामुळे झाकली न जाणं अशा अनेक जबाबदाऱ्या पोस्टर करणाऱ्याला सांभाळाव्या लागतात. सचिन या प्रक्रियेबद्दल सांगतो, ‘थिएटरच्या बाहेर किंवा मोठमोठय़ा ठिकाणी पोस्टर्स उभी असतात. तिथल्या पोस्टर्समध्ये प्रत्येक गोष्ट ठळकपणे दिसून येते. पण, तेच पोस्टर वर्तमानपत्राच्या जाहिरातींमध्ये कसं दिसेल याचाही विचार करावा लागतो. त्यातले शब्द ठसठशीत दिसतील का, पोस्टरवर असलेल्या फोटोमधल्या व्यक्तिरेखा स्पष्टपणे दिसताहेत का, पोस्टर धुरकट वाटतोय का; अशा अनेक गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक बारकाव्यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कलाकाराला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं की, त्याचं काम अधिक चांगलं होतं. माझंही तसंच आहे. घाईघाईने काम करण्याची मागणी असेल, माझ्या कामात मला स्वातंत्र्य मिळणार नसेल तर मी ते काम घेत नाही. कारण त्याचं समाधान, आनंद मला मिळत नाही. याउलट परिस्थितीही असते. काही दिग्दर्शक मला सिनेमाबाबत एकदाच पण बारकाव्यांनिशी माहिती देतात. ती माहिती पुरेशी आणि अचूक असते. त्यामुळे अशा दिग्दर्शकांसोबत काम करायला मजा येते. त्या कामात समाधान मिळतं.’

lp28सचिनने म्हटल्याप्रमाणे या क्षेत्रातही खरंच खूप अभ्यास आहे. एखाद्या सिनेमाचं पोस्टर दिसायला साधं, सोपं वाटत असलं तरी त्यामागे मोठा अभ्यास असतो. सचिन सांगतो, ‘सर्वप्रथम मी सिनेमाचा बाज समजून घेतो. त्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शकासोबत एक मीटिंग होते. सिनेमाची कथा, विषय विशिष्ट स्वरूपाचा असला तरी तो प्रेक्षकांसमोर कसा आणायचा आहे याबाबत मी त्यांना विचारतो. मार्केटिंगची गणितं समजून घेणंही इथे महत्त्वाचं असतं. पोस्टरसाठी वेगळं फोटोशुट करण्याची गरज असेल तर तसं मी सांगतो. अन्यथा सिनेमाच्या प्रसंगांमधले काही फोटो वापरतो. सिनेमातले कोणते घटक सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये वापरायचे, कोणते नंतर प्रेक्षकांसमोर आणायचे हेही ठरवलं जातं. ज्या सिनेमाचं पोस्टर करायचंय तो सिनेमा आधी बघतो. त्यानंतर मी माझ्या काही प्रतिक्रिया दिग्दर्शकासमोर नोंदवतो. विचारांची देवाणघेवाण होते. सिनेमाच्या नावाची कॅलिग्राफी हवी की वेगळा फाँट वापरायचा इथवर सगळी चर्चा होते.’

सिनेसृष्टीत सध्या प्रत्येक विभागामध्ये स्पर्धा असते. सिनेमांची संख्या वाढतेय तशी त्यासंबंधित गोष्टींमध्येही बदल होताहेत. सिनेमाच्या मार्केटिंगवर अतिशय बारीक लक्ष दिलं जातंय. त्यातली पहिली पायरी म्हणजे सिनेमाचं पोस्टर. यातही स्पर्धा वाढतेय. सर्व बाजू लक्षात घेत एखाद्या चित्रपटाचं पोस्टर करणं आव्हानात्मक काम. हे आव्हान पूर्ण करत या स्पर्धेत टिकून ही आणखी मोठी जबाबदारी. सचिन ती समाधानाने पार पाडतोय. ‘मी या स्पर्धेकडे सकारात्मकदृष्टय़ा बघतो. चांगलं काम करायचं इतकंच मला माहीत आहे. माझं काम बघूून कोणी मला ‘हे आधीच्याच एका कामासारखं आहे’ असं बोललं नाही पाहिजे. यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत रहावं, हा माझा कामाचा फंडा आहे. मी स्वत:ला स्पर्धेपासून लांबच ठेवतो. तुमचं नाणं खणखणीत असलं की आपसूकच तुमच्या कामाचं कौतुक होणार आणि तुम्हाला काम मिळत राहणार, असं माझं मत आहे’, सचिनचा हा सकारात्मक दृष्टिकोन त्याला अधिकाधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन देतो.

lp29‘गुरू’, ‘उळागड्डी’, ‘बंध नायलॉनचे’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’ असे काही आगामी मराठी सिनेमांसाठी त्याने काम केलंय. तर हिंदीत फॉक्स, फँटम आणि धर्मा या बडय़ा कंपन्यांसाठी तो काम करतोय. सचिनच्या उत्तम कामगिरीमुळे त्याच्याकडे येणाऱ्या कामाचा ओघ वाढला आहे. येणाऱ्या वर्षभरात काही बडय़ा प्रोजेक्टच्या कामात त्याचा सहभाग असेल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @chaijoshi11