ती गेली.. लोकांना चटका लावून गेली. अगदी आबालवृद्धांना. तसं तिचं वय नव्हतं जायचं. पण ५४ वर्षांत पन्नास र्वष तिने चित्रपटसृष्टीत घालवली. अभिनयामध्ये ती काही फार क्रांतिकारी वगैरे होती असे नाही. पण तिची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली होती. स्त्रीवादी भूमिका हा काही तिचा पिंड नव्हता, पण तिच्या म्हणून अशा काही ठोस भूमिका तिने साकारल्या होत्या आणि प्रेक्षकांवर त्यांचा आजही ठसा आहे हे तिचं वैशिष्टय़. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून हिंदीत येत यशाची शिखरं सर करणाऱ्यांचा एक ठरावीक साचा होता. श्रीदेवीनेदेखील हा साचा काही प्रमाणात चोखाळलाच, पण त्यापलीकडे जात तिने स्वत:ला स्थान आहे हेदेखील दाखवून दिले. ज्या ‘मिस्टर इंडिया’मुळे ती ‘हवा हवाई गर्ल’ म्हणून ओळखली जाते आणि त्या गाण्याची मोहिनीदेखील तमाम सिनेरसिकांवर दिसते तो ‘मिस्टर इंडिया’ हा काही तिला मध्यवर्ती ठेवून लिहिलेला नव्हता. पण या मिस्टर इंडियानेच तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. इतकी की तिच्या आधीच्या चित्रपटांची आठवणच राहिली नाही.

खरे तर तिने शेकडो भूमिका केल्या आहेत. म्हणजे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच तिने कमल हासनबरोबर किमान वीस दाक्षिणात्य चित्रपट केले होते. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत म्हणजे घरच्याच अंगणात अगदी लीलया वावरली. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलीवूडच्या मायावी जगात अवतरली. खरं तर बॉलीवूड तिला ओळखायला लागले ते ‘सदमा’ आणि ‘हिम्मतवाला’मुळे. दोन्ही एकाच वर्षी प्रदर्शित झालेले. पण ‘सदमा’ तसा एका ठरावीक वर्गापुरताच गाजला. कारण तो काळ टिपिकल अभिनेत्रींची अपेक्षा करणारा होता. ‘हिम्मतवाला’ असो की ‘तोहफा’ तिच्या भूमिका या काहीशा साच्यातल्याच होत्या. खरं तर ‘सदमा’ या सर्वापेक्षा सर्वाथाने वेगळा होता. कस पाहणारा होता, पण तिला थेट तळागाळापर्यंत म्हणजे जो बॉक्स ऑफिसवर गर्दी करणारा प्रेक्षक असतो त्यापर्यंत नेणारा नव्हता. ते काम केलं ‘नगिना’ या चित्रपटाने. अगदी देशातल्या ग्रामीण भागापर्यंत ती जाऊन पोहोचली. त्याचाच दुसरा भाग असा की तो चित्रपट तिच्याभोवतीच फिरणारा होता. कथेला चमत्काराची डूब होतीच पण विषय सर्वांपर्यंत पोहचणारा होता. यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत नागिणीवरचे दोन चित्रपट आले होते. श्रीदेवीचा ‘नगिना’ गाण्यांमुळे गाजलाच, पण तिच्या नृत्य आणि उग्र अदाकारीचा त्यात अधिक प्रभाव होता.

तिच्या नावावर चित्रपट चालतो हे सिद्ध झाले होते. मसालापट असले तरी श्रीदेवीची प्रतिमा ठसणारी असायची. ‘मिस्टर इंडिया’नंतर गाजला तो ‘चांदनी’. तमाम प्रेमि-प्रेमिकांसाठी हा चित्रपट आयकॉनिक ठरावा असा. त्याला कारण त्यातील गाणी हे तर होतेच, पण त्याबरोबरच श्रीदेवीचं असणे हे देखील होते. ‘चालबाज’, ‘लम्हे’’ असे अनेक चित्रपट आले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारबरोबरही तिचे काही चित्रपट झाले. अगदी धर्मेद्र आणि सनी देओलच्या नायिकेच्या भूमिकाही तिने केल्या. बॉलीवूडचे सुपरस्टारपद पण मिळवले. पण लक्षात राहिल्या त्या महत्त्वाच्या मोजक्याच भूमिका.

पण ती घाऊक भूमिका करणारी नव्हती हे नक्कीच. व्यावसायिकता ठेवून नेमके जे हवे ते सारे तिने केले. कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतांश कलाकार तसे पडद्याआड होत जातात. स्त्री कलाकार तर त्याही आधीच अस्तंगत होतात. श्रीदेवीदेखील काही काळ अशीच पडद्याआड झाली होती. तुरळक काहीतरी करायची, एखाद्या शोमध्ये वगैरे दिसायची. पण ती पुन्हा खऱ्या अर्थाने दिसली ती ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये. जणू काही तिच्यात आजवर दबून राहिलेली काम करण्याची उर्मीच त्यातून पडद्यावर साकारली गेली. आजच्या पिढीला कदाचित ‘सदमा’ आठवणारदेखील नाही, पण ‘इंग्लिश िविग्लश’मधील श्रीदेवी त्यांना विसरणे कठीण असेल. तिने गर्दीला हवे असते ते सारे दिले, पण ते मर्यादा राखून. क्लासेसलादेखील तिने मोजकेच दिले, पण तिच्यात ती ताकद होती हे दाखवणारे. कदाचित तिला अजून तसे करता आले असते, तेवढी तिची ताकद होती पण ते होऊ शकले नाही इतकेच.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2