रस्त्यावरील अपघातात जखमी होणाऱ्या माणसांच्या मदतीला कुणी जात नाही तर जखमी प्राण्यांच्या मदतीला जायची गोष्टच अलाहिदा. पण महाडसारख्या गावात एका अवलियाने जखमी प्राण्यांवर उपचार करणारी संस्था काढून वेगळ्या संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातग्रस्त मनुष्यासाठी सारेच जण धावत असतात, पण विविध अपघात, नैसर्गिक आपत्ती यात जखमी होणाऱ्या पशू, पक्षी आणि प्राण्यांचे काय? त्यांच्या मदतीला कोणी पुढे येत नाही. रायगड जिल्ह्यतील महाड एमआयडीसी परिसरातील गणराज जैन दाम्पत्य याला अपवाद ठरते आहे. जखमी प्राण्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी ‘सफर’ नामक प्राणी उपचार केंद्र सुरू केले आहे. त्यांचे हे केंद्र आज अनेक जखमी अवस्थेतील प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे.

महाड एमआयडीसीतील आसनपोईकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावरील एका मोठय़ा वळणावर जांभ्या दगडातील एक छोटेसे घर आज चर्चा आणि कुतूहलाचा विषय ठरते आहे. जवळपास वीस ते बावीस गुंठय़ांचा परिसर आज विविध पशू, पक्षी आणि प्राण्यांचे माहेरघर बनले आहे. विविध प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. यात कुत्रे, मांजर, कबुतर, बदक, ससे, गाय, बैल, बकरी, घुबड, कावळे यांचा या परिसरात सध्या मुक्त संचार आहे.

२००५ साली महाडमध्ये महापूर आला होता. २५ आणि २६ जुलैच्या त्या महापुरात महाड शहर पाच ते आठ फूट पाण्याखाली गेले होते. या जलप्रकोपात अडकलेल्या व्यक्तींसाठी अनेक बचाव पथके काम करीत होती, मात्र पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या प्राण्यांची कोणी मदत करीत नव्हते. हे चित्र पाहून व्यथित झालेल्या गणराज जैन यांनी आपद्ग्रस्त प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि   दोन दिवसांत त्यांनी जवळपास ६७ प्राण्यांचे जीव वाचवले. यात मांजरी, कुत्रे, बकऱ्या, साप यांसारख्या प्राण्यांचा समावेश होता. या बचावकार्यामुळे गणराज यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. प्राण्यांबद्दल त्यांच्या मनात ओढ निर्माण झाली. यातूनच ‘सफर’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

यासाठी गणराज यांनी प्राण्यांच्या अपघातांचा अभ्यासही केला. प्राण्यांच्या अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली, तर तीस टक्के प्राणी अपघातात जागच्या जागी मरतात, तर ७० टक्के प्राणी हे अपघातानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्याने दगावतात. त्यामुळे जखमी प्राण्यांच्या उपचारांसाठी काही तरी पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेल्या काही वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर दोन ते तीन बिबटय़ांचा अज्ञात वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला. कुत्रे, मांजरी, बकऱ्या, गाई, जंगली डुकरे यांची संख्या किती तरी जास्त आहे. जखमी झालेल्या प्राण्यावर उपचार करता येईल असे एकही केंद्र मुंबई ते गोवा महामार्गावर अस्तित्वात नव्हते. ही बाब लक्षात घेऊन ‘सफर’ या कोकणातील पहिल्या प्राणी उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली.

सुरुवातीला राहत्या घरातच गणराज यांनी प्राणी उपचार केंद्र सुरू केले होते. मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या. घरच्यांकडूनही त्याला तीव्र विरोध होत होता. गणराज यांचे हे काम पाहून महाडजवळील आसनपोई ग्रामपंचायतीने त्यांच्याकडील २० ते २२ गुंठे जागा या कार्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली. मात्र उपचार केंद्र सुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ जैन यांच्याकडे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला जागेभोवती कच्चे बांधकाम करून केवळ एका पिंजऱ्याच्या साह्यने सफरची सुरुवात करण्यात आली. महाड परिसरात अपघातग्रस्त, अनाथ झालेली मांजरी, कुत्रे, गाई, बैल, बकऱ्या इथे आणून उपचार करण्यास सुरुवात केली. ऊन, वारा आणि पावसामुळे या कामात व्यत्यय येत होता. प्राण्यांवर उपचारासाठी भक्कम शेड आणि जास्त पिंजऱ्यांची गरज होती. मात्र त्यासाठी मोठा निधी लागणार होता. लग्नानंतर पाच-सहा वर्षांत नोकरी आणि व्यवसायातून जमा केलेली सर्व पुंजी या कामासाठी लावण्याचा निर्णय जैन दाम्पत्याने घेतला. गाडी, दागिने आणि मुलांच्या अंगठय़ा, घरातले सामानही विकून गोशाळा आणि उपचार केंद्राची इमारत उभी केली.

सुरुवातीला जैन दाम्पत्याने सुरू केलेल्या या कामाकडे संशयाने बघितले गेले. जखमी प्राणी आणि जनावरांना मोफत उपचार कसे दिले जाऊ  शकतात, यावर प्रश्न उपस्थित केले गेले. पण उपचारांनंतर बऱ्या होणाऱ्या प्राण्यांना बघून संशयाची धार बोथट होत गेली. संशयाने बघणारे अनेक जण सफरच्या कामात मदतीसाठी पुढे येत गेले. आज महाड परिसरातील २० ते २२ जण सफरशी जोडले गेले. शहरातील नामांकित व्यक्ती आर्थिक मदत घेऊन पुढे येऊ  लागल्या आहेत.

मदत आणि बचावकार्य करताना गणराज यांना अनेक चांगल्या-वाईट अनुभवांना सामोर जावे लागले आहे. जैन मुळचे सर्पमित्र. त्यांनी आजवर साडेतीन हजारहून अधिक सापांची सुटका केली आहे. पण २०१३ साली एका नागाची सुटका करताना गणराज यांना त्याने दंश केला. त्या वेळी आठ दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. मात्र या अपघातातून बचावल्यानंतर पुढील सर्व आयुष्य प्राण्यांच्या शुश्रूषेसाठी वेचण्याचा पण त्यांनी केला.

‘सफर’ च्या कामात पशुसंवर्धन विभाग आणि वन विभागानेही सहकार्याचा हात पुढे केला आहे. ‘सफर’ च्या माध्यमातून आजवर २२ गाई, १६ कुत्रे, पाच मांजरी, चार बकऱ्या, पाच बदके, सहा जखमी पक्ष्यांना जीवदान देण्यात आले आहे. सहा मगरी, दोन घारी, आठ सर्प, तीन जखमी मोरांनाही उपचार करून वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडण्यात आले आहे. महाड परिसरातील सावित्री नदी आणि दासगाव खाडी परिसरात मगरींचा मुक्त संचार असतो. अनेकदा वाट चुकल्याने या मगरी लोकवस्तीत दाखल होतात. यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. तर कधी बोटींच्या वाहतुकीमुळे अथवा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्याने त्या जखमी होतात. या जखमी मगरींवर ‘सफर’ मध्ये उपचार केले जातात. महाड-पोलादपूर परिसरातील दुर्गम भागात मोर मोठय़ा प्रमाणात आढळतात. अनेकदा कुत्रे या मोरांवर शिकारीसाठी हल्ला करतात. अशा जखमी झालेल्या मोरांची शुश्रूषा सफर करते.

प्राणी उपचार केंद्र चालवतानाच कोकणातील पशुधन आणि त्यांच्या समस्या जैन दाम्पत्याच्या लक्षात आल्या. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा पशुधन सांभाळणे जिकिरीचे काम ठरते. अशा परिस्थितीत या गाई-बैल सोडून दिले जातात. अशा गाईंचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्णय ‘सफर’ने घेतला. यातून गाईंच्या शुश्रूषेसाठी ‘सावली गोशाला’ सुरू करण्यात आली. कधी जखमी झालेल्या, कधी बाळंतपणाला आलेल्या गाई गोशालेत दाखल होण्यास सुरुवात झाली. बघता बघता गोशालेतील गाईंची संख्या शंभरच्या वर गेली. मात्र एवढय़ा गाईंचे संगोपन करण्यात अडचणी येऊ  लागल्या. यातूनच गरजू शेतकऱ्यांना गाई संगोपनासाठी देण्याची संकल्पना समोर आली. गाय न विकण्याच्या हमीवर तसेच त्यांच्या योग्य संगोपनाच्या शपथपत्रावर, शेतकऱ्यांना मोफत गाई उपलब्ध करून देण्याचा उपक्रम ‘सफर’ने सुरू केला. यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ९८ गाई देण्यात आल्या. आजही ‘सफर’ च्या गोशाळेत जवळपास ४५ गाई वास्तव्याला आहेत. त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी संस्था आनंदाने पार पाडते.

अनेक अडचणींवर मात करीत आज ‘सफर’ने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. हा उपक्रम आता महाडकरांच्याही हृदयात बसला आहे. प्राण्यांवर प्रेम करणारे अनेक जण आज ‘सफर’शी जोडले गेले आहेत. गणराज आणि त्यांची पत्नी अर्चना यांनी सुरू केलेल्या ‘सफर’चे ते सहप्रवासी झाले आहे. प्राण्यांच्या उपचार आणि संगोपनाच्या कार्यात ते सक्रिय मदत करत आहेत. या प्रकल्पाला अनेक जण कुतूहलाने भेट देत आहेत. प्राण्यांच्या उपचार आणि संगोपनाचा खर्च उचलण्यासाठी आता लोक समोर येऊ  लागले आहेत. कुणी शेड बांधून देते आहे, कुणी औषधोपचाराचा खर्च उचलते आहे. जखमी झालेले प्राणी, पक्षी, जनावरे यांच्या मदतीसाठी संपर्क करू लागले आहेत. ‘सफर’च्या सुहाना सफरची ही सुरुवात आहे.

प्राणिमात्रावर प्रेम करा असे सांगणारी आपली संस्कृती आहे. आज मात्र माणूस प्राण्याच्या जिवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. कधी पैशाच्या हव्यासापायी तर कधी अंधश्रध्देपायी प्राणिमात्रांची शिकार केली जाते आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतो. याला प्राणीदेखील अपवाद नाहीत, याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे गणराज सांगतात.

‘सफर’मध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्राण्यांवर आम्ही आमच्या पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम करतो. त्यांच्या उपचारात आम्ही काहीच कमतरता राहू देत नाही. प्राण्यांनाही याची जाणीव असते. त्यांना प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा या भावना समजतात. त्यामुळेच कदाचित उपचार करताना जंगली श्वापद आम्हाला सहकार्य करतात, असा विश्वास गणराज यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन व्यक्त करतात.

‘सफर’ आणि गणराज यांच्या कामाला आज समाजमान्यता मिळाली आहे. यामुळे संस्था आणि संस्थाचालकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जैन यांना गुणवंत समाजसेवक पुरस्कार, कोकण अस्मिता पुरस्कार, भारत सरकारच्या गोरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच एका अपघातात एका कुत्रीचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहापाशी तिची पिल्ले व्याकुळतेने विव्हळताना दिसली. ती पिल्ले ‘सफर’ने दत्तक घेतली. कुत्रीच्या पिलांना या आघातातून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांना मातेचे प्रेम दिले. आज ही पिल्ले मोठी झाली आहेत, आनंदाने बागडत आहेत, हे पाहताना खूप समाधान वाटत असल्याचे जैन दाम्पत्य सांगते.

कोकणातील आसनपोईसारख्या छोटय़ा गावात प्राण्यांच्या संगोपनासाठी लोक पुढे येऊ  लागले आहेत, ही एक नक्कीच समाधानाची बाब आहे. पण राज्यातील कानाकोपऱ्यांत होणाऱ्या अपघातांमुळे आजही अनेक प्राण्यांचे जीव धोक्यात आहेत. ‘सफर’पासून  प्रेरणा घेऊन इतर भागांतील लोकही जर प्राण्यांच्या उपचारांसाठी समोर आले, तर निसर्गाचे संतुलन राखण्यास खऱ्या अर्थाने मदत होऊ  शकेल आणि काळाच्या ओघात नामशेष होणाऱ्या अनेक प्रजातींचे संवर्धन होऊ  शकेल.
हर्षद कशाळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safar center for injured animals
First published on: 08-01-2016 at 01:25 IST