रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या कल्पनेतून साकारलेले एक आगळेवेगळे साहित्य संमेलन मुंबईत नुकतेच झाले. सगळ्या सुहृदांची उपस्थिती हे या संमेलनाचे वैशिष्टय़ होते.

रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी नुकतेच (२५ डिसेंबर २०१७) मुंबईत ‘असेही एक साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. दिवाळी अंकात सातत्याने लिहिणारी, पण प्रसिद्धीच्या फारशा झोतात नसलेली मंडळी हेरून त्यांना वैचारिक, सांगीतिक खास अशी मेजवानी अशी त्यांची कल्पना होती. अतिशय हृद्य असा हा कार्यक्रम म्हणजे एक स्नेहसंमेलनच होते. आणि मुळ्ये काकांच्या उत्साहामुळे ते तितक्याच आत्मीयतेने पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ‘ऋतुरंग’चे संपादक अरुण शेवते. त्यांनी सुरुवातीलाच मी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शनपर भाषण करणार नसून आयुष्यात आलेले मोठय़ा माणसांचे अनुभव सांगणार आहे, असे सांगून गुलजारांपासून सुरेखा पुणेकरांपर्यंत त्यांना आलेले अनुभव मनमोकळेपणाने उपस्थितांना सांगितले.

अरुण शेवते म्हणाले, गुलजार यांना स्वत:ची स्तुती ऐकायला अजिबात आवडत नाही. आपल्या प्रशंसेला सुरुवात होतेय, अशी शंका आली की तत्काळ ते थांबवतात. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलेय.’ गुलजारांबरोबरच त्यांनी तऱ्हेतऱ्हेच्या इतरही माणसांचे वर्णन करून जणू त्यांच्या मोठेपणाचे गुपित सांगितले!

माजी खासदार, संपादक भारतकुमार राऊत यांनी, तुम्ही तरुणांची भाषा समजून घेतलीत, तरच ते तुमचे लिखाण वाचतील. लिखाण सकस असेल तर त्याला वाचक मिळतोच. म्हणूनच आजही ‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचे पुस्तक दरवर्षी हजारोंच्या संख्येने विकले जाते. वाचक टिकवण्याची जबाबदारी लेखकांवर आहे, असे मत मांडले.

संमेलनात झी मराठीच्या दिवाळी अंकासाठी ‘झी’च्या टीमला, ‘ऋ तुरंग’चे संपादक आणि संमेलनाध्यक्ष अरुण शेवते यांना तसंच सृष्टी कुलकर्णी हिला अशा तिघांना ‘माझा पुरस्कार’ देण्यात आला. सृष्टी ही कॅन्सरसारख्या रोगावर मात करीत कणखरपणे उभी राहिलेली मुलगी. केवळ कॅन्सरग्रस्तांसाठीच नाही, तर सर्वसामान्य लोकांसाठीसुद्धा साक्षात प्रेरणा! नकारात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत प्रकाशाचा वेध घेणारी असामान्य शक्ती. ‘स्वत:ला आरशात बघताना मी आदरानेच बघायला हवे. माझ्या रोगाची पडछाया आयुष्यावर मी पडू देणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केलेली ही गुणी मुलगी. तिचा नुकताच ‘कॅलिडोस्कोप’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

‘माझा पुरस्कार’साठी ट्रॉफी बनवणारे विजय सोनावणे यांचे अशोक मुळ्ये म्हणजे मुळ्ये काका यांनी कौतुक केले. एकूणच हा मुळ्ये काकांचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा समारंभ होता. गजानन राऊत यांनी सजावटीचा भार पेलला होता.  प्रवेशद्वाराशी संमेलनाचे वातावरण उत्तमरीत्या तयार केले होते. त्याचे डिझाईन होते, योगेश लोळगे यांचे. बाळा अहिरेकर यांचे त्यात योगदान आहे. सर्वानीच घरच्या कार्यासारखा हातभार लावलेला. महेश मुंदडा, नरेंद्र हाटे या दानशूरांनी देखील या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले. सगळीच मायेची माणसे. मुळ्ये काकांनी ज्याचे त्याला श्रेय देण्यासाठी आभार प्रदर्शनाचा वेगळा वेळ ठेवला नव्हता. विषय निघेल तसतसे कौतुक ऐकायला मिळत होते.

दिवाळी अंकात लेखन करणाऱ्या लेखकांचे योगदान मान्य करावे आणि त्यांना असे निमंत्रित करावे ही अशोक मुळ्ये यांची कल्पनाच मुळात विलक्षण आहे. आताच्या अत्यंत व्यावहारिक आणि स्वार्थासाठी नाती जोडण्याच्या काळात, कोणी कोणासाठी केवळ जिव्हाळ्याने, आपलुकीने काही करावे हे स्वप्नवतच आहे!

शिवाय मुळ्ये काकांचा आविर्भाव, हा ‘बिचाऱ्या लेखकांना थोडा तरी उजेडाचा झोत दाखवू’, असा दयाबुद्धीचा नव्हता. कौतुक करण्याचा त्यांचा मानस स्पष्ट होता. हे अभिनेत्री अमृता सुभाष हिने कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मोजक्या आणि सुरेख शब्दात मांडले. तिने स्वत:साठी आलेला अनुभव कथन केला; की शाबासकीची थाप पाठीवर पडायला हवी, तेव्हा दखलही घेतली जात नाही असे होते, नेमके तेव्हा मुळ्ये काका पसंतीची पावती देतात.  तिने असे सुरुवातीलाच व्यक्त केल्याने कार्यक्रम कसा रंगतदार असेल आणि किती आपलेपणाचा अनुभव देणारा असेल याची कल्पना आली होती.

पुरस्कार वितरण, मनोगत यानंतर सुरुवात झाली सांगीतिक मेजवानीला! सागर सावरकर, नीलिमा गोखले, झी सारेगमपमध्ये गाजलेली शाल्मली सुखटणर यांनी अतिशय तयारीने गाणी म्हटली. कार्यक्रमाचे निवेदन ही गाणारी मुलेच करत होती. एकमेकांचा परिचयसुद्धा त्यांनी करून दिला. त्यामुळे निवेदकाचा व्यावसायिक स्पर्श या कार्यक्रमाला नव्हता. मुळ्ये काकांनी फर्मावल्याप्रमाणे गाणी चालू होती. सागरला ‘जवानी दिवानी’ गावेसे वाटत होते, पण मुळ्ये काकांच्या लिस्टमध्ये ते नव्हते. हे गाणे मुळ्ये काकांना ‘सूट’ आहे, पण ते लिस्टमध्ये नाही, असे त्याने म्हणताच, कौतुकाने हास्याची लाट उसळली. मुळ्ये काकांच्या ७४ वर्षांच्या वयाच्या उत्साहाला तो सलाम होता. पण विचार केला तर, खरोखर या माणसामध्ये ही ऊर्जा येते कुठून? मुलखावेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्मी येते कशी? पुरेसा निधी हाताशी नसताना कार्यक्रम ठरवण्याचे धाडस होते तरी कसे? सारे विनामूल्य ठेवण्याचे औदार्य सुचते तरी कशाला? न मागता देणारे हात पुढे येतात कसे? सगळेच अजब! चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणारे.

सांगीतिक मेजवानीनंतर परिसंवाद होता, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची न्यूड चर्चा’ मुळ्ये काकांनी परिसंवादाचा विषय जाहीर करताना सांगितले, ‘न्यूड’ हे विशेषण लावल्याने खास आकर्षण वाटते ना? उत्सुकता वाटते ना? एकच हशा उसळला. एस. दुर्गासारखे सिनेमे शीर्षकामुळे उत्सुकता चाळवतात. हा उल्लेख न करताही संदर्भ सुजाण उपस्थितांना समजला. या परिसंवादाचे सूत्रसंचालक होते, रविप्रकाश कुलकर्णी.

मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते, राज्यशास्त्राचे अभ्यासक दीपक पवार यांनी अतिशय श्रवणीय आणि अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यास अनेक बाजू असतात, कित्येकदा विरोध जातीयतेमुळे होतो हेही त्यांनी सांगितले. एखाद्याने मत मांडले तर त्याचे आडनाव म्हणजे जात तपासली जाते. आणि त्या जातीचे प्रातिनिधिक मत समजले जाते. शिवाय तुझे आडनाव अमुक आहे, मग तू हे मांडता कामा नयेस हेसुद्धा बजावले जाते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपमुळे ही व्हच्र्युअल दरी वाढतेय असे त्यांनी नमूद केले.

शरद पोंक्षे यांनी आपल्याला लोकशाही झेपत नाही असे वक्तव्य केले. स्वातंत्र्यानंतर पहिली २१ वर्षे लष्करशाही राबवून सुजाण नागरिक घडवावे असे सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न होते, हे त्यांनी सांगितले.

हृषीकेश जोशींनी सांगितले, की विरोध हा कोणतेही पुस्तक न वाचता किंवा सिनेमा न बघताच केला जातो हे वाईट आहे. एकूणच अभिव्यक्ती आणि विरोध यातला प्रामाणिकपणा उरला नाही.

परिसंवादात सर्वाची मते एकसारखी असल्याने, एकांगीपणा आला होता. पण चर्चा इतकी प्रांजळ आणि दर्जेदार होती, की श्रोते भारावून ती ऐकत राहिले. एक वैचारिक आनंद मिळाल्याचे समाधान सर्वानाच वाटत होते. समारोप करताना मुळ्ये काकांनी मराठी भाषेबद्दल उज्ज्वल आशा व्यक्त केली.

‘अहो, मराठी मरणार नाही, दुडुदुडु चालणाऱ्या, रांगणाऱ्या, बाळाला तुम्ही मरणाच्या गोष्टी कशाला ऐकवता? उदंड आयुष्य लाभो म्हणा.’ असा सज्जड दम दिला. वर ‘मराठी मरेल म्हणणारे स्वर्गवासी झाले आणि त्यांचे मृत्युलेख मराठीतून छापले गेले, हे लक्षात घ्या. मराठी भाषा बाळसे कसे धरील, याचे प्रयत्न करा,’ असे सुनावले.

पूर्ण कार्यक्रमात मुळ्ये काकांचा उत्स्फूर्त वावर सर्वानाच अचंबित करणारा होता. अत्यंत भारावलेल्या मन:स्थितीत सुखद आठवण मनात ठेवून सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.
वसुंधरा घाणेकर – response.lokprabha@expressindia.com