दोहे ही कबीरांची रचना बहुतेकांना माहीत असते. पण कबीरांनी गौळणसदृश पदं लिहून त्यात कृष्णाची आळवणी करणाऱ्या गोपिकांची मानसिकता मांडली आहे. परमेश्वराची आराधना करणाऱ्या भक्ताची मानसिकता या रुपकातून त्याकडे पाहता येते.

सदगुरु कबीरांची वैखरी ही आध्यात्मिक गूढगुंजनपूरक शैली आणि लोकभाषेच्या आविष्कारामुळे जनमनावर राज्य करीत आहे. कबीरांचे दोहे जगविख्यात आहेत, तर त्यांचे पद हे लोकोत्तर असल्याने आजही गावोगावी गायले जातात. कबीरांची बहुतांश वैखरी ‘कबीर बिजक’ या पवित्र ग्रंथात आढळते. त्यात कबीरांची वैखरी रमैनी, शब्द, कहरा, चांचर, बेलि, हिण्डोला, वसंत, बिरहुलि, ज्ञान चौतिसा, विप्रमत्तिसी आणि साखी या प्रकरणातून आढळते. तर आदिग्रंथात शब्दांसोबत वार आणि थिंतीच्या काव्यस्वरूपात कबीरांची वैखरी आढळते. कबीरांच्या वाणीचा प्रभाव मराठमोळ्या जनमनावर भरपूर प्रमाणात आढळतो. मराठीसदृश असलेल्या कबीर गाथा पुस्तकात कबीर आणि कबीरपुत्र कमाल यांची वैखरी आढळते. त्यातील कबीरांची काही पदे गौळणी पदांना साजेशी आहेत. त्या विशेषत: कृष्ण परमात्म्यास समर्पित आहेत. या पदात त्यांनी श्याम, गोविंद, कन्हैया, हरि इत्यादी नावाने कृष्णलीलेचे गुणगान केले आहे. मात्र गौळणी पदांचा मथळा कोठेही आढळत नाही.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

आता संत कबीरांचे हे पद बघू या. या पदात कबीरांनी जणू स्वये वृंदावनाच्या गवळणीचा परिवेश धारण केला आहे. कृष्णाला दह्यचा नैवेद्य दाखवल्याविना गवळणींना चैन पडत नाही. त्यामुळे गवळणी कृष्णास विनवणी करीत आहेत. कबीर हे निर्गुणीया संत असल्याने वरपांगी गुणगान करणारे हे पद अंत:प्रेरणेने ओतप्रोत आहे. ते म्हणतात की, हे श्यामरुपी परमात्मा! आता तरी आमच्या भक्तिरूपी दह्यचा स्वीकार करा. आम्ही श्रद्धेच्या कोऱ्या करकरीत मडक्यात महत्प्रयासाने भक्तीचे दही साठवले आहे. त्याची तुम्ही आता तरी चव घ्या. या संसाररूपी वृंदावनातील गाईरूपी पवित्र जीव तुमचा पुकारा करीत आहेत. त्याची हाक आता तरी  ऐकून घ्या. नभोमंडळात गुरुजन हेलकावे घेत आहेत. आता तुम्ही त्यांना झुलवा. मात्र त्यांना झुलवून पार करण्यासाठी स्वत: झोके घ्या. कबीर म्हणतात की, हे भाई!  साधुजन तुमच्या भेटीस आतूर झाले आहेत. तेव्हा हे श्यामरूपी परमात्मा! तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्यात सामावून घ्या.

अब दहि ले तू, अब दहि ले दधिया ले श्याम ॥धृ०॥

(कबीर गाथा, पद ५९)

कबीर आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत सांगतात, अरे कन्हैया! कसं सांगू तूला? मला तर मथुरेला जायचं आहे आणि तू मला भर रस्त्यावर अडवतो आहेस. ही कशी तुझी बळजबरी आहे. तू माझा सारा चक्का मक्का खाऊन फस्त केला आहेस. वर माझी घागरसुद्धा फोडून टाकलीस. सगळ्या गवळणी मिळून जाऊ आणि तुझे गाऱ्हाणे यशोदेस सांगू. त्या कंसापाशी तक्रार करू आणि तुम्हीच नंदाचे लाल असल्याचे आम्ही त्यांना सांगू. कबीर म्हणतात की, अगे जीवरूपी गौळणी! ऐक. तो बन्सीवाला परमात्मा मलासुद्धा अडवीत असतो. अगे, तुला जर  काही द्यायचे असेल तर त्याला यौवनाचे दान दे. अशी तक्रार करून तू त्याचा नाहक का अपमान करत आहेस? त्यायोगे तरुणपणातच परमात्म्यास आपले जीवन समर्पित केले पाहिजे.

कन्हैया क्या कहना तुजकू।
मुजे है जाना मथुरेकू॥धृ०॥

कहत कबीरा सुनो ग्वालन।
दे जोबन का दान॥

बन्सीवाला मुजे अडाता।
क्यो करती अपमान ॥

(कबीर गाथा, पद ६०)

कबीर आपल्या एका अनन्यसाधारण पदात म्हणतात की, हे भाई! त्या गोविंदरूपी परमात्म्याने माझी जीवनाची घागर फोडून टाकली आहे. जीवनाचा तर क्षणाचाही भरवसा नाही की केव्हा ही जीवरूपी पनिहारी हे देहरूपी वस्ती सोडून जाईल. एक घागर भरली. आता दुसरी पण भरायला आली आणि ती पुन्हा भरण्याची पाळी आली आहे. अर्थात पुनरपि जन्म घेण्याची बेला आली आहे. कबीर म्हणतात की, हे भाई! त्या गोविंदरूपी परमात्म्याची गती अत्यंत न्यारी आहे. तोच नेहमी घागर भरण्यापासून अर्थात आवागमनाच्या चक्रापासून वाचवू शकतो. तेव्हा त्याची तक्रार करण्यापेक्षा त्या गोविंदरूपी परमात्म्यास शरण जा.

येरी भाई मोरी गगरी फोरी॥धृ०॥
कहत कबीरा सुन भाई साधु।
गोविंद की गती न्यारी॥३॥
(कबीर गाथा, पद ६१)

‘कहत कबीरा’ या पदात विरहाचा आविष्कार करत म्हणतात की, हरीसंगे राहीन तर मी नक्कीच बैरागीण होईन. तेव्हा माझ्या हातात दंड आणि कमंडलू असेल आणि मी आपल्या कटीवर मृगाचे कातडे परिधान केलेले असेल. माझ्या मुखात रामाचे भजन आणि गळ्यात तुळशीच्या माळा असतील. त्याने माझी काया ही कथेप्रमाणे होईल. तेव्हा ही माझी काया योग धारण करेल. अशा प्रकारे माझे मन त्या श्यामसुंदरच्या विरहाच्या रसात सरोबार होईल. कबीर म्हणतात की, अशी ही विहंगम अवस्था जीवनाच्या अंतकाळी जीवाची होत असते. अत: हरिच्या मीलनाचे दु:ख त्या रामरूपी परमात्म्याशिवाय कोण बरे दूर करेल? तेव्हा हरिचा विरह सहन केल्याविना ही जीवरूपी गवळण कदापि पार होत नसते. त्यायोगे प्रभुनाम घेत राहा.

हरी संग लागु बैरागन होउंगी॥धृ०॥
कहत कबीरा अंत की बारी।
राम बिना दु:ख कौन निवारी ॥
(क. गा. पद ६३)

कबीरांचे आध्यात्मिक चिंतन अत्यंत उच्च स्वरूपाचे असल्याचे दृष्टिपथास येते. ते एका पदात तर प्रत्यक्ष यशोदेला उपदेश करतात की, हे यशोदा माते! तो पूर्णबह्म सकळ अविनाशी परमात्मा तुमच्या गाई चरायला नेतो आहे. तू त्या परमात्म्याचे गुणगाण का करीत नाहीस? न जाणे तू कोणते पुण्य केलेस की यशोदा तू गोिवदरूपी परमात्म्यास खेळवीत आहे. तो कोटिक ब्रह्मांडाचा कर्ताधर्ता आहे. हे तू नाना जपतप इत्यादी करूनही कसे तुझ्या लक्षात येत नाही. शेषनाग ज्याचे सहस्त्र मुखाने निरंतर नाम घेऊनही त्याला त्याचा अंत सापडला नाही. शिव, सनकादिक आणि ब्रह्मादिकही त्याची निगम नेती-नेती म्हणून बखान करतात. असा तो गोविंदरूपी परमात्मा तर तुझ्या जवळच आहे.

कबीर म्हणतात की, सुंदर देहधारी व कमळाच्या पाकळीसारखे नयन असलेला राजस असा परमात्मा जेव्हा गाई घेऊन परत येतो, तेव्हाच यशोदा मातेला त्याचे खरे दर्शन घडते आणि ती त्याची वात्सल्याने आरती करते. यशोदेला तो जवळ असताना आपला असल्याचे जाणवते. तसे तुम्हीसुद्धा त्या गोविंदरूपी परमात्म्यास निकटवर्ती राखा.

जसोदा मैया काहे न मंगल गावे।
पूरन ब्रह्म सकल अविनासी।
सो तेरी धेनू चरावे॥ धृ.॥

सुंदर बदन कमल दल लोचन।
गौधन के संग आवे॥

मात जसोदा करत आरती।
कबीरा दरसन पावे॥
(कबीर गाथा. पद ६४)

एका पदात कबीरांनी गवळणींचा बाळकृष्णाप्रति वात्सल्यभाव दर्शवला आहे. त्यामुळेच त्यांना बाळकृष्णाची काळजी वाटत असते. कबीर म्हणतात की, असा तो गोविंद रुणझुणत येतो आणि तो हरिरूपी परमात्मा हाती लकुट घेऊन मुखाने सुमधुर मुरली वाजवतो.

अरे बाळा! जास्त लांब खेळायला जाऊ नकोस. अरे राजसा! तू सांज होताच घरी परत ये. अरे, कोणाच्या अंगणात तुळशीचं झाड आहे आणि कोणाच्या अंगणात तो बाळ खेळत असेल बरे! तर देवकीच्या अंगणात तुळशीचं झाड आहे आणि यशोदेच्या अंगणात तो जिवलग खेळत राहतो. मग काळजी तरी कसली. तो प्राणप्रिय देवकीचा छैय्या, बलरामाचा भैया आणि नंदरायजींचा कुंवर कन्हैया आहे. तो यमुना नदीच्या काठी गाई चरतो आणि गवळणीसोबत विहरतो. तो राजस कृष्णवर्णी देहाचा, मोर मुकुट मस्तकी धारण करणारा, पीतांबर परिधान करणारा आणि कानात कुंडल धारण करून येत असतो. कबीर म्हणतात की, जेव्हा यशोदा माता या जिवलगाची आरती करते, तेव्हा सूर, नर आणि मुनीजन त्याचे गुणगान करतात. मीपण त्या वेळी त्या भवनात थांबण्यास प्रयत्नरत असतो. कारण हाच प्राणप्रिय बाळ तिन्ही लोकांत व्याप्त आहे. कबीरांनी गोसमान परम पवित्र आणि कमळासमान निर्लेप अशा परमात्म्यास गोविंद तर समस्तांचे दु:ख व क्लेश हरत असलेल्या परमात्म्यास हरि म्हटले आहे. त्यामुळे हाच कबीरांचा निर्गुण ब्रह्म असल्याने ते त्याचे गुणगान करीत आहेत.

रुनझुन रुनझुन गोविंद आवे।
हरि के हाथ लकुट
मुख मुरली बजावे॥ धृ.॥

देवकी के अंगना में
तुलसी को बिरवा।
जसोदा के अंगना में
खेले प्यारे ललना॥

जमुना के नीर तीरे
धेनु चरावे।
गौलन के संग बिहरत
आवे प्यारे ललना॥५॥

मोर मुकुट पीतांबर स्याह।
कानन कुंडल झलकत
आवे प्यारे ललना॥ ६॥

माता जसोदा करत आरती।
सुर नर मुनी
जस गावे प्यारे ललना॥७॥

कहत कबीरा मैं रोखना भवना।
तीनो लोक रमी
आये प्यारे ललना॥८॥
(क. गा. पद ६५)

हे नंदलाला! ही जीवरूपी गवळण या भवजळात दीनवाणी होऊन उभी आहे. हिंदुस्थानी लोकांप्रमाणे मी विनयाने तुझी विनवणी करत आहे. आता तरी माझ्यावर मेहरबानी करा आणि माझे कर्माचे कपडे मला परत करा. तुम्ही तर मथुरेची राखण करणारे आहात. तुम्ही गोपांचे पालनकर्ता आहात.

हे कन्हैया! तुम्ही सर्वाचे जीवनाच्या झाडावरचे आमचे कर्माचे वस्त्र चोरून नेल्यामुळेच सगळ्या जीवरूपी गवळणी तुम्हास चोर असल्याचे मानतात.  अरे कन्हैया! माझी नणंद मोठी कजाग आहे. ती छप्पन चुगल्या लावील. तेव्हा माझी चोळी मला परत दे. माझी सासू मोठी खाष्ट आहे. मी उशिरा गेले तर ती माझे डोक्याचे केस धरून माझा गाल लाल करेल. ती मला मारहाण करेल. त्यापेक्षा तू मला माझी चोळी लवकर दे बघू. माझा नवरा स्वत:ला मर्द म्हणवतो. तो शिपाई आहे. तो वेडपट मला बेदम मार देईल. मी जातीने ब्राह्मण आहे. माझे सोवळे अजून बाकी आहे. तेव्हा हे सारंगपाणी! तुम्ही आता तरी झाडावरून खाली उतरा. गवळण म्हणते की, मी आता काय करू? कपडय़ाच्या विना मी वेडय़ागत फिरू कां? अरे नंदलाला! असे माझे कपडय़ांचे हाल करू नकोस.

कबीर म्हणतात की, माझासुद्धा हाच विचार आहे. त्या प्रभूने आपले सर्वस्व हरण करण्यापूर्वी आपणच त्यास समर्पित व्हावे.

पानी बिच खडी दैन्यवानी।
बाता बोले हिंदुस्तानी।
अब करोजी मेहरबानी॥
मेरे नंदाजीके लाला।
तुम मथुरा राखन वाला।
तुम गोपी पालन वाला॥
देव मेरे कपडे॥ धृ.॥

सब कपडे लिये छिनकर।
ले गये झाड के उप्पर।
ग्वालन कहे कन्हैया चोर॥

ग्वालन कहेजी नंदलाल।
मत कर मेरे कपडे के हाल।
कबीरा कहे सुनो मेरा ख्याल॥
(कबीर गाथा. पद ५४)

कबीरांचे परम वैष्णव म्हणून भक्ती संप्रदायात अनन्यसाधारण स्थान आहे. ते मूळचे उत्तर भारतीय असल्याने त्यांना कृष्णाचे आकर्षण असणे साहजिक आहे. मात्र ते निर्गुणीया उपासक असल्याने त्यांनी सगुणापेक्षा निर्गुणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळेच त्यांना आपल्या या गौळणसदृश पदांद्वारे गवळणरूपी जीवात्म्यास त्या हरिरूपी परमात्म्यात समाविष्ट होण्यासाठी कार्यरत राहण्याचा बहुमूल्य संदेश दिला आहे.
संजय बर्वे – response.lokprabha@expressindia.com