21 March 2019

News Flash

अरुपाचे रूप : सौंदर्यबंध

दोघेही कलावंत दोन भिन्न धर्मीय, दोन वेगळ्या शैली जपणारे पण दोघांचाही ध्यास मात्र एकच, तो म्हणजे अक्षरे.

सल्वा रसूल आणि अच्युत पालव यांनी अक्षरांकनाच्या माध्यमातून साकारलेली चित्रे पाहता येतील.

देशाच्या संदर्भात उल्लेख करताना ‘विविधतेमध्ये एकता’ असे सांगत आपण मिरवण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात आजूबाजूला असलेले वातावरण हे सध्या भिन्नतेमधून होणाऱ्या वादांना खतपाणीच घालणारे आहे. भिन्नतेची दरी वाढते आहे. अशा वेळेस कलाकारांनी काय करावे, या आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्याशी काही संबंध असतो का? त्यांनी मुळात आपली कला बाजूला ठेवून या संदर्भात काही करावे का? किंवा कलेचाच वापर ती दरी कमी करण्यासाठी करावा का? याबद्दलही मतभिन्नता असू शकते.  मात्र या आठवडय़ात ६ ते १२ फेब्रुवारी दरम्यान वरळीच्या नेहरू केंद्राच्या कलादालनात होणाऱ्या प्रदर्शनामध्ये दोन कलावंतांनी यासाठी केलेला अक्षरांचा श्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

दोघेही कलावंत दोन भिन्न धर्मीय, दोन वेगळ्या शैली जपणारे पण दोघांचाही ध्यास मात्र एकच, तो म्हणजे अक्षरे. त्यांनी दोन रेषा, त्याही भिन्न दिशेने विरुद्ध बाजूला येणाऱ्या (देवनागरी डावीकडून उजवीकडे तर उर्दू उजवीकडून डावीकडे) लिपी यांचा वापर करत दोन धर्म- तत्त्वज्ञानांमधील भिन्नता सांधण्याचा प्रयत्न अक्षरांच्या माध्यमातून केला आहे. या प्रदर्शनामध्ये सल्वा रसूल आणि अच्युत पालव यांनी अक्षरांकनाच्या माध्यमातून साकारलेली चित्रे पाहता येतील. सल्वाने ओम आणि अल्ला किंवा देव आणि अल्ला अशा संकल्पना घेऊन केलेले अक्षरांकन पाहता येते. तर पालव यांनी अग्नी, आकाश, पाणी, जमीन, हवा अशी पंचमहाभूते घेऊन त्यांचे मराठी व उर्दूमधील प्रतिशब्द घेऊन त्यांच्यातील समानतत्त्व अक्षरांकनाच्या माध्यमातून, रूपाकारातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रसूल यांची अक्षरचित्रे ही चित्राच्या दिशेने अधिक जाणारी आहेत. पालव यांचे इश्क, खुशबू, स्पर्श चांगले उतरले आहेत. स्पर्श या चित्रांतील अक्षरांना स्पर्शाचा हळुवार असा ‘फील’ आहे. तर ‘इश्क’मध्ये प्रेमाची गंमतही आहे. एकता म्हणजे उर्दूतील इत्तेहाद आणि िहदी व उर्दूमधील एकच अर्थ असलेले ‘हम’ म्हणजेच आपण; हे तर त्या शब्द आणि त्यांच्या गर्भितार्थातील एकतानता दाखविताना पुरेशा बोलक्या रूपाकारात प्रकटले आहे. संगीताला उर्दूमध्ये मौसिकी असा शब्दप्रयोग वापरतात; तोही त्याच्या गर्भितार्थासह उतरला आहे.

या अक्षरप्रयोगातील आणखी एक महत्त्वाची गंमत म्हणजे रसूल या सौंदर्यबंधाचा वापर करतात, त्यावेळेस त्यात इस्लामी प्रभाव अधिक दिसतो तर पालव भारतीय सौंदर्यशास्त्रीय प्रभावाखाली चित्रण करताना दिसतात. या प्रभावांचे वर्गीकरण आता भारतीय किंवा इस्लामी असे होत असले तरी आता भारतीय रूपाकारांमध्ये या दोन्हींचा झालेला अनोखा मिलाफच पाहायला मिळतो.

ही चित्रे म्हणजे केवळ भाषा व अक्षरांचा खेळ किंवा मीलन नव्हे तर त्यांचा अपेक्षित अर्थ किंवा गर्भितार्थ आणि सौंदर्यबंध यांचेही अनोखे मीलन ठरावे!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab

First Published on February 9, 2018 1:03 am

Web Title: salva rasool and achyut palav