14 December 2017

News Flash

पुढच्या पिढय़ांसाठी तरी..

सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांचे अत्यंत चलाखीने आज भक्तांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यां

संदेश भंडारे | Updated: August 11, 2017 9:34 PM

संदेश भंडारे

फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अ‍ॅप या समाजमाध्यमांवर सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मत व्यक्त केलं अथवा विनोद केला गेला तर आज तुम्ही देशद्रोही आहात असे पसरविले जाते. वेगळा विचार अथवा एखाद्या निर्णयाला विरोध केला तर त्या विधानावर तुटून पडणाऱ्यांची फौज निर्माण केली आहे. ते सर्व असे काही तुटून पडतात की तुम्ही पुन्हा वेगळा विचार करण्याचे धाडसच करणार नाही. आपला देश १९४७ साली स्वतंत्र होऊन आपण लोकशाही यंत्रणा स्वीकारली त्याला आज ७० वर्षे पूर्ण होत आहेत. विदेशी सत्ताधाऱ्यांपासून आपल्या पूर्वजांनी आपणाकरिता स्वातंत्र्य मिळविलं. आज स्वातंत्र्य या विषयावर पुन्हा एकदा विचार करायची वेळ आजच्या सत्ताधाऱ्यांमुळे आली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांचे अत्यंत चलाखीने आज भक्तांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यांचे असे म्हणणे असते की, पूर्वी विचारस्वातंत्र्याची गळचेपी केली जात नव्हती का? मग आत्ताच एवढा गहजब का?

पण इथे एक मुद्दा सर्वानी लक्षात घ्यावा की, पूर्वी कुणी असा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावेळचे सत्ताधारी किंवा त्यांचे प्रतिनिधी या स्वातंत्र्याच्या गळचेपीचे समर्थन करत नसत. आजचे सत्ताधारी व त्यांच्या भक्तांना अशा गळचेपीचे समर्थन करताना आपले काही चुकते असे वाटत नाही. आपल्याला सत्ता राबवण्याकरिताच बहुमत मिळाले आहे तेव्हा आम्ही काहीही करू शकतो असा त्यांचा दंभ आहे.

लोकशाहीमध्ये एक नागरिक म्हणून विचार करणे व तो व्यक्त करणे याचे स्वातंत्र्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिले आहे. या स्वातंत्र्याचा संकोच होऊ न देण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. बहुमताने निवडून आलेल्या सरकारने अल्पमतात असणाऱ्या नागरिकांच्या विचारांचा आदर करणे हे समृद्ध लोकशाहीचे लक्षण मानले जाते.

कवी, लेखक, कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, प्राध्यापक, पत्रकार, शाहीर, वैज्ञानिक अशा लोकशाहीवर सर्व निष्ठा असणाऱ्या नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज ऊठवून लोकशाही बळकट करण्यास हातभार लावला आहे.

विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य टिकविण्याची आज पूर्वी कधी नव्हती एवढी गरज आज निर्माण झाली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर लेखक -कलाकारांनी आपापले पुरस्कार परत करून त्यांचा निषेध नोंदविला तर त्याचा आदर न करता, त्या पुरस्कर्त्यांनी पुरस्काराची रक्कम परत केली का असा प्रश्न विचारून त्यांच्या कृतीची अवहेलना करण्यात आली. सत्ताधीश लोकशाहीचा संकोच करण्यामध्ये अडथळा आणू शकतील  अशा विद्यार्थी, फिल्ममेकर, लेखक, कवी, चित्रकार, शाहीर, पत्रकार यांना एक एक करून टाग्रेट केले जात आहे. त्यांना ट्रोलला सामोरे जावे लागत आहे. त्यातील काहींवर खोटय़ा केसेस दाखल करण्यात येत आहेत. त्यांना बदनाम करून त्यांची समाजात असलेली प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. खरे लेखक-कलाकार अशा दमनशाहीला कधीही भीक घालणार नाही हे ते विसरतात.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच केला जात असल्याच्या विरोधात अनेकजण ‘दाक्षिणायन’ च्या व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशात्रज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी यांच्या प्रयत्नांनी एकत्र आले. पुणे, कोल्हापूर, धारवाड अशी यात्रा काढण्यात आली. दांडी, मडगाव येथे अभिव्यक्ती अभियान झाले. मोठय़ा संख्येने लेखक कलाकार सहभागी झाले. गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, केरळ, जम्मू-काश्मीर, आसाम, आंध्र प्रदेश देशातील अशा विविध राज्यांतील कलाकारांनी तेथे स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल काळजी व्यक्त केली.

आपल्या मागच्या पिढीने ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात स्वातंत्र्य मिळविले. एक जबाबदार नागरिक म्हणून घटनेने दिलेले हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी फक्त लेखक, कलाकारांचीच नाही, तर आपल्या सर्वाची आहे असे मला वाटते. त्याकरिता सर्व नागरिकांना कृतिशील व्हावे लागणार आहे. आज आपण आपल्या दिवाणखान्यात, स्टुडिओत अथवा आपल्याच कोशात बसून, नुसतेच पाहात राहिलो तर येणारी पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.

संदेश भंडारे

First Published on August 11, 2017 9:34 pm

Web Title: sandesh bhandare special article on independence day 2017