sangad_01कोणत्याही सामाजिक कामाचा कणा म्हणजे त्या कामाला लाभलेला चांगला कार्यकर्ता. कार्यकर्त्यांचं हे महत्त्व जाणणारं सांगड संमेलन दरवर्षी घेतलं जातं. नुकत्याच नगरमध्ये झालेल्या आठव्या सांगड कार्यकर्ता संमेलनाचा वृत्तान्त-

नगरमधील स्नेहालय संस्थेच्या प्रांगणात नुकते आठवे सांगड कार्यकर्ता महासंमेलन पार पडले. १२५ अनुभवी कार्यकत्रे व ३७५ नवीन अशा ५०० कार्यकर्त्यांच्या सहभागाने अर्थकारण, पर्यावरण, मानवी हक्क, राजकारण, धर्मनिरपेक्षता या विषयावर चर्चा झाली. उद्घाटन, प्रकट मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप असे भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. आणि महाराष्ट्रातील ३७५ नव्या दमाचे कार्यकत्रे विविध सामाजिक प्रश्नांवर आपापल्या भागात ठोस कृती कार्यक्रम राबविण्याचा ठाम निश्चय करून सांगड संमेलन पुढे चालू ठेवण्याच्या तयारीसह परतले. अ गटाच्या १२५ कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांत सहा सत्रे झाली. ब गटाच्या ३७५ कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांत १२ सत्रे झाली. खुली सत्रे ही अ आणि ब या दोन्ही गटाशिवाय नागरिकांसाठी ही खुली होती. अभिनेते नंदू माधव यांच्या संकल्पनेतील आठवे सांगड संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आणि सांगडच्या टीमने परिश्रम घेतले.
रविवारी सकाळी दहा वाजता तिस्ता सेटलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोिवद पानसरे या विचारवंतांच्या हत्येचा निषेध करत व त्यांच्या हत्येचा तपास लावण्याची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करत या सांगड महासंमेलनाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. कॉर्पोरेट इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी या देशाची दोन शकले केली असल्याची घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून केली. सांगड संमेलन हा एक प्रयोग आहे. त्याला काही वेगळे रूप देता येईल का? त्यातून शासनावर दबाव टाकणारा एक गट तयार होईल का, याची चाचपणी या संमेलनातून करता येईल, अशी भूमिका संयोजक नंदू माधव यांनी मांडली.
अर्थकारण या विषयावर अनिल बोकील, अनंत फडके, देवीदास तुळजापूरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. उल्का महाजन, विजय दिवाण, अतुल देऊळगावकर व पोपटराव पवार यांनी ‘पर्यावरण’ या विषयावर आपली मते मांडली. देशातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडोर, मुंबई-बंगलोर कॉरीडोर व इतर कॉरीडोरबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेतील त्रुटी उल्का महाजन यांनी विशद केल्या. केवळ सरकारकडे नियोजनाचा दुष्काळ असल्याचे मत पोपटराव पवार यांनी मांडले.
सायंकाळच्या खुल्या सत्रात ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करण्याचे काम चळवळीच्या माध्यमातून केले जाते, तसेच चळवळी व आंदोलनाद्वारे सत्य बाहेर आणण्याचा जो प्रयत्न होतो, त्याबद्दल त्यांनी सामाधान व्यक्त केले.
रात्री नऊ वाजता अंनिस व लोकरंग मंच इस्लामपूरच्या कलावंतांनी ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ हे िरगणनाटय़ सादर केले. डफ, ढोलकी, संबळ, झांज हे पारंपरिक वाद्य व नांदी, अभंग, भारूड या लोककलाप्रकारांचा योग्य त्या ठिकाणी वापर करीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. नरेंद्र दाभोलकर कॉ. गोिवद पानसरे, सॉक्रेटिस, संत तुकाराम यांच्या कार्याचा आढावा घेत हे प्रबोधननाटय़ सादर केले. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा निषेध आणि या प्रकरणाचा शोध घेण्याचे आवाहन या िरगणनाटय़ाद्वारे केले. विजय पवार व योगेश कुऱ्हाडे दिग्दर्शित या िरगणनाटय़ात अजय भालकर, प्रा. योगेश कुरळे, सुयश तोष्णीवाल, अजय काळे, अवधूत कांबळे, इंद्रयणी पाटील, अरुण भोसले, जगन्नाथ नांगरे, विनय कांबळे, विजय नांगरे, प्रा. प्रमोद दुर्गा, सुनील जाधव, संजय बनसोडे या कार्यकर्त्यांनी विविध भूमिका साकारल्या.
सोमवार १७ ऑगस्ट रोजी पहिल्या सत्रात ‘मानवी हक्क’ या विषयावर डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे भाषण झाले. ते म्हणतात, महिला व बालकांच्या हक्काबाबत भारतात व जगात सर्वोत्तम कायदे झाले आहेत. २०११ नंतरचा सुधारित बाल न्याय अधिनियम आणि निर्भयाच्या खुनानंतर एप्रिल २०१३ मधील महिला संरक्षणाचा केंद्रीय कायदा प्रत्यक्षात वस्तुस्थिती बदलू शकलेला नाही. समाजाच्या सक्रियते शिवाय अशा कायद्यांना अर्थच प्राप्त होत नाही. महिला व बालहक्काच्या प्रकरणात तक्रारदार आणि साक्षीदार मिळविणे आणि टिकविणे बालसेवी संस्थांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. अनतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा, बाल लिगक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बाल न्याय अधिनियम यांचा वापर करीत मागील १५ वर्षांत नगर जिल्हा बाल बाजारू लैंगिक शोषणमुक्त करण्यात स्नेहालयने कसे यश मिळविले याची सूत्रकथा डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी विशद केली. महिला व बालहक्काच्या रक्षणाची जागरूक नागरिकांच्या भूमिकेची मांडणी केली. अ‍ॅड.असिम सरोदे व देवेंद्र इंगळे यांनीही ‘मानवी हक्क’ या विषयावर मार्गदर्शन केले. वैचारिक परिपक्वता नसल्यामुळे समाजात अनेकदा अन्याय होतो. लोकभावना समजून न घेता कायदे करण्याची प्रक्रिया चुकीची आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध धर्मनिरपेक्षपणे आपण उभे ठाकले पाहिजे, तसेच समाजाप्रती मी जागरूक असले पाहिजे अशी भावना जर निर्माण झाली तर मानवी हक्क अबाधित राहण्यास मदत होईल असे सांगून या देशातील मानवी हक्क संरक्षण आयोग हा देखावा असल्याचे मत अ‍ॅड.असिम सरोदे यांनी व्यक्त केले.
‘राजकारण’ या विषयावरील चच्रेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. के. डी. शिंदे, सुभाष वारे आणि धनाजी गुरव हे वक्ते सहभागी झाले होते. आजचे राजकारण लोकांपासून दूर चालले असल्याचे मत चौधरी यांनी मांडले. जनआंदोलनाची संसदीय राजकारणात महत्त्वाची भूमिका असली तरी चळवळीद्वारे केलेले जनआंदोलन व समाजकारण एका बाजूला व प्रत्यक्ष निवडणुकीतील राजकारण दुसऱ्या बाजूला असते असे मत सुभाष वारे यांनी मांडले. या देशातील राजकारण स्वच्छ असावे असे वाटत असेल तर सज्जनांनी राजकारणात यावे, निवडणुकीला उभे राहावे व मतदानालाही बाहेर पडावे. घरात बसून राजकारणाला नुसती नाके मुरडल्याने काहीही साध्य होणार नाही असे मत अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी मांडले. माणसांची दु:खे काय आहेत अणि ती सोडविण्यासाठी कोणती कृती केली जाते यालाच मी राजकारण समजतो. लोकशाहीला हुकूमशाही हा पर्याय असूच शकत नाही त्यामुळे लोकशाहीमधल्या निवडणुका आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत व माणसांची मानसिकता विचारात घेऊन राजकारण केले पाहिजे असे मत धनाजी गुरव यांनी व्यक्त केले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर चर्चा झाली. त्यात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, प्रा. अविनाश डोळस व अन्वर राजन हे वक्ते सहभागी झाले होते. वैश्विक पातळीवर सुधारणा झाल्या नाही तर धर्मातील तिढे सुटणार नाहीत. कुठल्याही मुस्लीम कुटुंबात मुस्लीम धर्माविषयी धडे दिले जात असतील, मात्र जाणीवपूर्वक देशद्रोहाचे धडे कुठेही दिले जात नाहीत असा सूर या चच्रेतून निघाला. या देशातील शाळांचे विभाजनही आता जात-धर्मानुसार होत असल्यामुळे धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंका उपस्थित झाली.
सायंकाळी सहा वाजता ‘गुंज’ या संस्थेचे संस्थापक व मॅगसेसे पुरस्कार विजेते युवा सामाजिक कार्यकत्रे अंशू गुप्ता यांनी कार्यकर्त्यांशी मुक्तसंवाद साधला. ते म्हणाले प्रत्येकाने आपल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीकडे बारकाईने, गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्या देशातील समस्या वेगळ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाची वाट न बघता आपण काय करू शकतो याचा विचार व्हायला हवा. प्रसार माध्यमांनी सकारात्मक बाबींना ठळक प्रसिद्धी दिली पाहिजे. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पुढील काळात आपत्ती व्यवस्थापन व निवारण क्षेत्रातील कामाचा ताण वाढणार आहे. त्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्नेहालयाच्या ‘अंधाराशी दोन हात’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी अंशू गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. एल एॅण्ड टीचे सरव्यवस्थापक अरिवद पारगावकर, स्नेहालयचे विश्वस्त सुवालाल शिगवी, सांगडचे संयोजक नंदू माधव व स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
रात्री नऊ वाजता उपस्थित कार्यकर्त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ‘सांगडचे प्रतिरूप’ कार्यक्रम झाला. ब गटातील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी प्रीतम सुतार, शरद शिंदे, अमित शिंदे, हर्षदा लोंढे, भूषण पाटील, स्नेहल गायकवाड, गणेश चौधरी, संदीप बर्वे, गौतम कांबळे, अश्विनी सातव, संतोष गर्जे यांनी सांगड संमेलन इथे न थांबवता पुढे चालू राहावे, त्यातून गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरचे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण व्हावे. त्या माध्यमातून विविध सामाजिक समस्या सोडविण्याचा कृती कार्यक्रम राबवावा व सरकारच्या विरोधात एक दबावगट निर्माण व्हावा असा सूर निघाला.
त्यानंतर अ गटातील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी अ‍ॅड. असिम सरोदे, उल्का महाजन, धनाजी गुरव, सुरेश खोपडे यांनीही आपले विचार मांडले. सांगड संमेलन यापुढेही सुरू राहील. युवक कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेले सांगड संमेलन होईल. तसेच सांगडची वेबसाइट अपडेट केली जाईल. ई-मॅगझिनबाबतही विचार होईल व सांगड परिवाराची वीण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी नवीन कार्यकर्त्यांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारव्यात, असे आवाहन सांगडचे संयोजक नंदू माधव यांनी केले. शंभू पाटील यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. सांगड खांद्यावर घ्या, वास्तव समजून घ्या, स्वतची दृष्टी विकू नका, विविध आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार व्हा, लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करा, असे आवाहन यावेळी अ‍ॅड. असिम सरोदे, उल्का महाजन, सुरेश खोपडे, धनाजी गुरव यांनी यावेळी केले.
दुसऱ्या सत्रात वीणा जामकर यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची, तर अ‍ॅड. असिम सरोदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोिवद पानसरे, अण्णा हजारे यासारख्या विचारज्योतींचा हात धरून ठेवत मी यापुढेही धगधगत राहील, अशी ग्वाही सोनाली कुलकर्णीने दिली. तर खरी लोकशाही अस्तित्वात यायची असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ग्रामसभा अधिक बळकट झाल्या पाहिजेत. निवडणुकीत उमेदवारांनी वचननाम्यामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही, तर त्या लोकप्रतिनिधींना परत बोलाविण्याचा कायदा केला पाहिजे. गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. राजकारणात जायचे असेल तर देश आणि समाजाचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी आपल्या मुलाखतीतून मांडली.
ज्येष्ठ समाजसेविका अरुणा रॉय यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगड संमेलनाचा समारोप झाला. या देशाची राज्यघटना न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्य या चतु:सूत्रीवर आधारित आहे. त्यामुळे आपले हक्क, अधिकार, कर्तव्ये याबाबत जागरूक असले पाहिजे. राज्यघटनेने आपल्याला दिलेले सर्व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सत्तेचा लगाम आपल्या हातात पाहिजे. माहिती अधिकाराच्या कायद्याच्या माध्यमातून हा लगाम आपण आपल्या हाती ठेवून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. प्रश्न विचारण्याची िहमत आपल्यात असली पाहिजे. विज्ञान आणि तर्काचा उपयोग आपण योग्य रीतीने केला नाही तर आपले भवितव्य धोक्यात आहे असा इशारा त्यांनी या वेळी दिला. उल्का महाजन यांनी अरुणा रॉय यांचा परिचय व समारोप सत्राचे प्रास्ताविक केले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले.
भगवान राऊत – response.lokprabha@expressindia.com