मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयामध्ये बसवलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या मशीनची सर्वत्र सकारात्मक चर्चा झाली. अशा प्रकारच्या मशीनचे अनुकरण विविध ऑफिस, ग्रामीण भागातील कॉलेज, मॉल्स, रेल्वे स्टेशन अशा सार्वजनिक ठिकाणीही व्हायला हवं.
‘हॅपी टू ब्लीड’ ही मोहीम आणि शनी मंदिराच्या चौथऱ्यावर चढलेली एक मुलगी या दोन्ही घटना पाठोपाठ घडल्यामुळे मासिक पाळीविषयी विविध ठिकाणी थेट बोललं गेलं. मासिक पाळीशी संबंधितच एक सकारात्मक बाब मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये नुकतीच दिसून आली. गेल्या महिन्यात या कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स मशीन बसवण्यात आलं. खरंतर अशा प्रकारचे मशीन याआधी ठिकठिकाणी बसवण्यात आलेले आहे. पण अलीकडे घडलेल्या पाळीसंबंधित घटनांमुळे मशीनची घटना अधोरेखित झाली. ज्याप्रमाणे ‘राइट टू पी’ या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी बाथरूम असण्याचं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्स मिळण्याची मशीन्सही असणं गरजेचं झालं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा प्रकारच्या मशीनची आवश्यकता आहे. तासनतास कामानिमित्त बाहेर असणाऱ्यांमध्ये आता महिलांचं प्रमाणही वाढत आहे. सुरक्षिततेच्या प्रश्नासह त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच ठिकठिकाणी नॅपकिन्सचे मशीन असणं अत्यंत गरजेचं आहे.
या कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलची जनरल सेकट्ररी श्रेया माथूर सांगते, ‘दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चं मशीन बसवण्याबाबत मी इंटरनेटवर वाचलं होतं. कॉलेजमधल्या मुलींना गरज असेल तेव्हा अशा प्रकारे नॅपकिन्स उपलब्ध करून देणारी ही संकल्पना मला आवडली. याविषयी मी कॉलेजमधील संबंधित विभागाला सांगितलं. आपल्याकडेही असं मशीन आणण्याबाबत सुचवलं. विभागातील सगळ्यांनाच ही संकल्पना पटली, आवडली. ऑक्टोबरच्या अखेरीस आम्ही या मशीनच्या खरेदीसाठी ईमेल केला. एचएलएलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तीनेक आठवडय़ांत मशीन आमच्या कॉलेजमध्ये आलंही.’ या मशीनला कमी कालावधीतच मुलींचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हे मशीन रोजच्या रोज रिफिल म्हणजे नॅपकिन्सच्या पॅकेट्सने भरावं लागत असल्याचं श्रेया सांगते.
या मशीनमध्ये एका वेळी एकूण २६ पॅकेट्स राहतात. दहा रुपये किंमत असलेल्या एका पॅकेटमध्ये तीन नॅपकिन्स असतात. मशीनमध्ये दहा रुपये टाकले की एक पॅकेट उपलब्ध होतं, म्हणजेच दहा रुपयाला तीन नॅपकिन्स एकाच वेळी मिळतात. दहा रुपये टाकण्याचेही तीन प्रकार आहेत. एक रुपयाचे दहा किंवा पाच रुपयांचे दोन किंवा दहा रुपयांचा एक अशी नाणी मशीनमध्ये स्वीकारली जातात. या मशीनची किंमत १८ हजार इतकी आहे. शिवाय कॉलेजने नॅपकिन्सचे ५ खोके पाच हजार रुपयांना विकत घेतले आहेत. एका खोक्यात १०८ पॅकेट्स असतात. म्हणजे मशीन विकत घेतानाच कॉलेजकडे एकूण ५४० पॅकेट्स होते. यापैकी एक खोका म्हणजे १०८ पॅकेट्स साधारण दोन आठवडय़ांतच संपल्याची माहिती कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलकडून मिळाली. मशीनमध्ये असलेले नॅपकिन्स एचएलएल या कंपनीच्याच हॅपी डेज या ब्रॅण्डचे आहेत. ‘नॅपकिन्सच्या मशीनबद्दल आम्ही आमच्या ‘सेंट झेविअर्स स्टुडंट कौन्सिल’ या फेसबुक lp69पेजवरून जाहीर केलं. त्याबाबतची माहितीही तिथेच पोस्ट केली. कॉलेजमधल्या अनेकींचा त्यावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मशीन प्रत्यक्षात बसवल्यानंतर मुलींचा प्रतिसाद अधिक चांगल्या प्रकारे दिसत होता. आताच्या काळात ही गरज झाली आहे. कॉलेजचं नाही तर ऑफिस, सार्वजनिक ठिकाणांतही अशा प्रकारची मशीन्स असायला हवी. कॉलेजमध्ये हे मशीन आल्यानंतर काहींनी आमच्याकडे मशीनबद्दल विचारपूस केली. त्यामुळे ठिकठिकाणी असे मशीन्स दिसतील अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही’, श्रेया माथुर सांगते.
‘वेंडिमॅन स्नॅकिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी एचएलएलला अशा प्रकारची मशीन्स पुरवते. ‘वेंडिमॅन स्नॅकिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’चे सेल्स एक्झिक्युटिव्ह इम्रान सौंडेकर (Soundekar) सांगतात, ‘एचएलएल या कंपनीला मशीन्स पुरवण्याचं काम करत आहोत. याआधी सॅनिटरी नॅपकिन्सची मशीन विविध ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत. मुंबईत विद्याधरणी कॉलेज, सिडनहॅम मॅनेजमेंट कॉलेज, एसआयएटी इंजिनीअरिंग कॉलेज, बीएमसीतील इ वॉर्ड, वरळीतील अ‍ॅक्सिस बँक, लोअर परेलमधील स्टार टीव्ही बिल्डिंग, बीकेसीमधील काही ऑफिसेस, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश सेक्रेटरिएट, त्रिवेंद्रम म्युनिसिपल कोऑपरेशन, नाशिकमधील गोखले कॉलेज अशा अनेक ठिकाणी नॅपकिन्सची मशीन्स आहेत. आताच्या महिला नोकरी करतात. अशा मशीन्सची उपलब्धतता असणं हे त्यांच्याच सोयीचं आहे. कॉलेज आणि ऑफिस यांसह थिएटर्स, मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही अशी मशीन्स असायला हवीत. मशीन बसवण्याबाबत आम्हाला ईमेल आल्यानंतर आम्ही दोन ते तीन आठवडय़ांत मशीन्स बसवतो. या मशीनची गरज लक्षात घेता लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.’ झेविअर्स कॉलेजनंतर या कंपनीकडे केसी, एचआर, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, अंजुमन इस्लाम, झुनझुनवाला अशा कॉलेजसह काही कॉर्पोरेट ऑफिसेसनेही मशीनबाबत चौकशी केली आहे.
मासिक पाळी या विषयावर आजही आपल्याकडे चारचौघात फारसं बोललं जात नाही. कुजबुजल्यासारखं बोललं जातं. पण, आता ही परिस्थिती बदलतेय. आजचं जगणं खूप जलदगतीने सुरू आहे. तासनतास बाहेर राहणाऱ्यांमध्ये आता मुलींचीही संख्या वाढतेय. त्यांच्या मासिक पाळीदरम्यान त्या सतर्क असतात. जेवढय़ा सतर्क त्या पाळीदरम्यान असतात तेवढय़ाच त्या पाळी येण्याआधीही असतात. पण, काही वेळा सॅनिटरी नॅपकिन्स बॅगेत किंवा पर्समध्ये घ्यायला विसरल्या आणि त्याच वेळी पाळी सुरू झाली तर ‘आता काय’ असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. शहरी भागातील मुलींना हा प्रश्न पडला तर तो मेडिकलमधून नॅपकिन्स घेऊन निकाली लावला जातो. पण, हेच आणि असंच ग्रामीण मुलींच्याबाबतीत होणं थोडं कठीण आहे.
ग्रामीण भागात बहुतांश मुली आजही सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी कपडेच वापरतात. याची अनेक कारणं आहेत. ग्रामीण भागात नॅपकिन्सची किंमत फार असते. त्यामुळे दर महिन्याला ते विकत घेणं परवडत नाही. नॅपकिन्स परवडत नसल्यामुळे कपडे वापरण्याकडे कल असतो. त्यामुळे पाळी येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत कपडे वापरण्याचाच चुकीचा समज पसरतो. हा समज इतक्यात तरी पुसला जाईल असं वाटत नाही. एकविसाव्या शतकाचे गोडवे गायिले जातात. चांगल्या बदलांबद्दल अनेकदा बोललं जातं. असं असलं तरी, काही गोष्टी आजही जुने विचार, समज यांमध्ये अडकलेल्या आहेत. यात नुकसान होतंय ते तरुण मुलींचं. तिथल्या तरुण मुली अगदी उच्चशिक्षित नसतील, पण बहुतांशी मुली आवश्यक शिक्षण घेताहेत. त्यामुळे शिक्षित असूनही, गोष्टी समजत असूनही त्या अमलात आणू शकत नाहीत. याचं कारण म्हणजे विशिष्ट गोष्टीप्रति असलेला कुटुंबाचा दृष्टिकोन. मासिक पाळीच्या वेळी नॅपकिन्सनेच खरा त्रास होतो, इन्फेक्शन होतं हा समज तिथल्या लोकांमध्ये दृढ आहे. तो पुसून टाकणं गरजेचं आहे. तिथल्या मुलींची नॅपकिन्स वापरण्याची इच्छा आहे, तयारीही आहे. पण, घरून हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याने त्या पुढचं पाऊल टाकायला कचरतात.
सोलापूरच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय या कॉलेजमधील तेजस्विनी जवंजाळ हाच मुद्दा मांडते. ती सांगते, ‘मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याची इच्छा असली तरी घरचे पूर्णत: पाठिंबा देतातच असं नाही. त्याविषयीच्या त्यांच्या काही गैरसमजुती आहेत. त्या दूर करायला हव्यात. दुसरं म्हणजे नॅपकिन्सची किंमत फार असते. ती सगळ्यांनाच परवडते असं नाही. त्यामुळे त्याचं मशीन आलं तर ते स्वस्तात उपलब्ध होऊ शकले. स्वस्त असल्यामुळे कदाचित कुटुंबीय विरोध करताना एक पाऊल मागे येतील. हळूहळू हा बदल होऊ शकतो. अशा प्रकारच्या मशीनबद्दल आणि नॅपकिन्स वापरण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन होणंही गरजेचं आहे. त्याविषयीच्या अज्ञानामुळे त्याकडे वळायला मुली घाबरतात.’ नॅपकिन्स वापरल्यामुळे साइड इफेक्ट्स होतात, त्रास होतो अशा समजुती आजही काहींच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. त्या पुसून टाकायला हव्यात.
तेजस्विनीने मांडलेला पैशांचा मुद्दा अतिशय रास्त आहे. ग्रामीण भागातील मुलींना अनेकदा पैशांमुळेही नॅपकिन्स वापरता येत नाहीत. शहरी मुली सहजतेने शंभराची नोट देऊन महिन्याभराची सोय करतात. पण, एका महिन्यात शंभर रुपये मासिक पाळीसाठी खर्च करणं सगळ्याच ग्रामीण मुलींना परवडतं असं नाही. म्हणूनच सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन्स उपलब्ध झाले तर कमी किमतीत जास्त नॅपकिन्स मिळू शकतात. हे तिथल्या मुलींसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे ग्रामीण भागातील कॉलेज, ऑफिस अशा ठिकाणच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यायला हवे. अशा प्रकारचं मशीन आल्यास ग्रामीण भागातील मुली त्याला प्रतिसाद द्यायला तयार असल्याचं स्पष्ट सांगतात. इथे दुसरा मुद्दा येतो तो ‘नॅपकिन्स हवेत’ असं थेट बोलण्याचा. नॅपकिन्स वापरण्याची सवय झाली तरी ते विकत घेताना मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन दुकानदाराला त्याविषयी सांगताना अनेकींना आजही संकोच वाटतो. अशा वेळी हे मशीन फायद्याचं ठरेल. अजूनही काही मेडिकलच्या दुकानांतून नॅपकिन्स विकत घेतल्यानंतर ते वर्तमानपत्रात किंवा काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देतात. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरांमध्येही काही ठिकाणी दिसून येते. असं करण्यापेक्षा मोकळेपणाने थेट त्याबाबत बोललं तर संकोच राहणार नाही. ‘नॅपकीन्स आम्हाला पिशवीत किंवा कागदात बांधून देऊ नका’ असं स्पष्टपणे केमिस्टला सांगणाऱ्या मुली दिसू लागल्या आहेत. ही परिस्थिती आता हळूहळू बदलताना दिसते.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे शिकणारी रसिका देशपांडे काहीसे वेगळे मुद्दे मांडते. ‘नॅपकिन्स वापरण्याबाबत मुलींच्या गैरसमुजती आता त्यांनीच काढून टाकल्या आहेत. नॅपकिन्स वापरणाऱ्या मुलींचं प्रमाण हळूहळू वाढतंय. त्यांना कामानिमित्त, नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर राहायचं असतं. अशा वेळी नॅपकिन्स वापरणं सोयीचं असतं, हे सर्व मुली जाणतात. सुरुवातीला त्यांच्या मनात भीती असायची. पण, आता गैरसमज दूर झाले आहेत. मशीनबाबतही काही समजुती असतील तर त्या दूर व्हायला हव्यात. त्या दूर झाल्या की अशा प्रकारच्या मशीनला ग्रामीण किंवा जिथे नॅपकिन्सविषयी सहसा मोकळेपणाने बोललं जात नाही अशा ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळू शकेल’, असं रसिका सांगते. स्वच्छतागृह असलेल्या प्रत्येक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनचे मशीन असायला हवं, अशी गरज रसिका व्यक्त करते.
पुण्याच्या डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथे शिकणारी कोमल डोईफोडे अशा मशीनचं समर्थन करते. ती सांगते, ‘आमचं मुलींचं कॉलेज असल्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सच्या मशीनचा फायदाच होतो. आमच्या कॉलेजमध्ये नॅपकिन्स मशीन आहे. एक रुपयाला एक पॅड मिळतं. प्रत्येक मजल्यावर दोन स्वच्छतागृहे असून प्रत्येकात एक मशीन आहे. एकूण चार मजले आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये एकूण आठ मशीन आहेत. मुलींची संख्या खूप असल्याने इतक्या मशीनची आम्हाला गरज असतेच. या मशीनचा खूप फायदा होतो. आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनी असल्यामुळे बरेच तास विविध प्रोजेक्ट्स, लेक्चर्स, अभ्यासात जातात. अशा भरपूर तासांच्या कामाच्या वेळी गरज भासल्यास या मशीनचा फायदाच होतो.’ आताच्या स्मार्ट जगात स्मार्ट स्वच्छतागृहेही असायला हवीत असंही तिचं म्हणणं आहे. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागांतही अशा प्रकारची मशीन असण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
मासिक पाळीविषयी चर्चा करणं, त्याविषयी स्पष्ट मत मांडणं, त्यासंबंधी गोष्टीला स्पष्टपणे विरोध करणं अशी पावलं उचलण्यात मुली फारसा वेळ लावत नाहीत. पण हे चित्र अजूनही सरसकट सगळीकडे बघायला मिळतंच असं नाही. हा बदल होणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात जगतोय, काही गोष्टी स्वीकारायला हव्यात, असं सहजपणे सगळेच बोलतात. त्याच वेळी मासिक पाळीसंबंधित गोष्टींमध्ये, विचारांमध्ये बदल करण्यात मात्र गती धीमी होते. महिलांच्या सुरक्षेप्रमाणेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचीच एक महत्त्वाची पायरी म्हणजे सॅनिटरी नॅपकीन्स. कमी पैशांमध्ये, हवं तेव्हा, हवे तितके नॅपकिन्स मिळणारे मशीन केवळ कॉलेजचं नाही तर ठिकठिकाणी असायला हवीत.
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com