वाघा बॉर्डरवर रांगोळी काढायची संधी आम्हाला मिळाली.. एरवी मराठी, गुजराती, पंजाबी किंवा जातीजातीवरून चर्चा करणाऱ्या प्रत्येकाची तिथे ओळख होती भारतीय.. आवाज होता भारतीय.. धर्म होता भारतीय!

दर तीन वर्षांनी होणारा संस्कार भारतीचा कलासाधक संगम मेळावा या वर्षी २८ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान कुरुक्षेत्र, हरयाणा येथे पार पडला. त्यात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोड आठवणींची अनेक गाठोडी माझ्यापाशी जमा झाली! तसा माझा आणि संस्कार भारतीचा संबंध ‘ते रांगोळी कलाकार’ आणि ‘मी प्रेक्षक’ एवढाच! विविध ठिकाणी त्यांच्या कलाकारांनी आपली किमया दाखवत काढलेले सुंदर गालिचे अर्थात भव्य रांगोळ्या बघायला मला नेहमीच आवडतं; पण स्वत: मात्र कधीच आवडीने मी रांगोळी हातात धरली नाही की आपल्याला काही जमतंय का याकडेही विशेष लक्ष दिलं नाही. खरं तर मला रांगोळीचा तो चरचरीत स्पर्शही आवडत नाही. आता माझे पतीच पोर्ट्ेट रांगोळी कलाकार असल्याने त्यांच्या सामानाची आवराआवर करण्याच्या निमित्ताने जराशी सवय झाली आहे.. पण, तरीही ती जरा नाखुशीनेच झालेली सवय.

gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
Why Kiran mane shared angry post on facebook
“वर्चस्ववादी भेकड…”, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले…
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

मेळावा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रातील पोट्र्रेट रांगोळी कलाकार कुरुक्षेत्र येथे दाखल झाले. महाभारतातील घटनांवर आधारित २८ रांगोळ्या! जबाबदारी तशी मोठी होती. त्यात पोट्र्रेट रांगोळी हा विषयही तसा नवीन.. आधीच्या मेळाव्यांमध्ये न झालेला. सर्वाना अतिशय उत्साह होता. मला साहाय्यकाची जबाबदारी मिळाली. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत, मग दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत आम्ही रंग घासत होतो. रांगोळीचा चरचरीत स्पर्शनही न आवडणारी मी, ‘‘अजून कोणता रंग घासायचा आहे?’’ असं विचारत अगदी कार्पेट घासायलाही बसले. सर्व कलाकारांचा उत्साह, बरेच तास एकाच जागेवर बसून रांगोळीच्या मार्फत एकेक प्रसंग जिवंत करण्याची कला थक्क करणारी होती. कोणी कोंकण तर कोणी विदर्भ प्रांतातील.. त्यांची काम करायची पद्धतही वेगळी. पण, सर्वजण रांगोळी अधिक चांगली होण्यासाठी एकमेकांना मदत करत होते, उत्साह वाढवत होते. दोन दोन दिवस रांगोळीचा रंग हाताला आणि कपडय़ांना तसाच होता.. कलाकारांचे चेहरेही अधूनमधून रंगाने त्यांचं रूप खुलवत होते. त्यांच्या कष्टासाठी त्यांना मिळालेलं मेडलच जणू ते! हसतखेळत ते दोन दिवस गेले आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा दिवस आला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व कलाकारांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व देशभरातून सुमारे साडेतीन हजार कलाकार उपस्थित होते. आपली कला देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणार याचा आनंद काही औरच..! रांगोळी अजूनही महाराष्ट्र आणि आजूबाजूचे मोजके प्रदेश वगळता अनेक राज्यांत तसा नवीनच प्रकार आहे. कित्येकांनी ‘‘रांगोळी’ म्हणजे काय?’’, ‘‘कशापासून बनते?’’ इथपासून ‘‘यह रंगोली नही, आपने जमीनपर पेंटिंग किया है।’’ असे उद्गार थक्क होऊन काढले. गृहमंत्री राजनाथ सिंह, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, राजदत्त मायाळू.. किती नावं घ्यावी! सर्वाकडून प्रचंड कौतुकाचा वर्षांव होत होता. त्या सर्वामध्ये दोन चेहरे सतत हसत हसत, सोबत करणारे.. रोज, काम कुठवर आलं आहे ते पाहणारे, आमच्यासोबत जेवायला बसणारे, आम्हाला काही हवं-नको पाहणारे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत आणि त्यांच्या पत्नी भारती मॅडम! कांचन गडकरीही आम्हा मुलांसोबत महारांगोळी काढण्यासाठी हातात रंग घेऊन उभ्या होत्या. विविध क्षेत्रांतील मान्यवर संपूर्ण कार्यक्रमात लहान-मोठय़ा जबाबदाऱ्या मनापासून पार पडत होते आणि सर्वाशी हसतखेळत गप्पागोष्टी करत होते..

कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे १५० रांगोळी कलाकारांचे गट करण्यात आले. रांगोळीसाठी ‘भू अलंकरण’ असं सुंदर नाव या विभागाला देण्यात आलं आहे. कुरुक्षेत्रातील महत्त्वाच्या विविध ठिकाणी आम्हाला रांगोळी काढायची होती. ‘‘मला तर काहीच येत नाही! आता आली पंचाईत! मी तर फक्त चाळणीतून रंग घालू शकेन कदाचित!’’ असे विचार चालू असतानाच आम्ही रेल्वे स्टेशनवर रांगोळी काढण्यासाठी पोहोचलो. भराभर आखणी करण्यात आली. कलाकारांनी रांगोळीचं स्वरूप सर्वाना सांगितलं. माझ्या हातात चाळणी आणि रंग देण्यात आला. मी घाबरत घाबरत सुरुवात केली. ‘‘अरे, हे जमतंय की!’’ एरवी रंग, रांगोळी पाहून नाक मुरडणारी आपली बायको थेट मैदानात रंग घेऊन उतरलेली पाहून नवरा एकदम खूश झाला! आता बिंदू सोडायचे, तेही जमलं.. एखाद् दोन प्रकारची चिन्हं काढायचा प्रयत्न केला. जाडीभरडी.. कुठूनही माझ्यासारख्या नवशिक्याने काढली आहेत हे लक्षात आणून देणारी! मग, मलाच वाईट वाटलं. मी माझ्यामुळे रांगोळी खराब होऊ नये म्हणून जरा मागे झाले. ‘‘अरे नाही. येणार तुम्हाला.. करो तो।’’ आवाजाने मी चमकलेच! आमच्या गटात असलेल्या गुवाहटीहून आलेल्या कबिता दीदी मराठीमध्ये काही बोलल्या? संस्कार भारतीच्या कार्यक्रमामुळे एकदा त्या महाराष्ट्रात येऊन गेल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी मराठी कुटुंब राहतं. त्यामुळे त्यांनी आम्हाला, ‘‘गुवाहटीला या,’’ हे सांगतानाच, ‘‘बेसन, भाकरी करूंगी।’’ हेदेखील आवर्जून संगितलं.

‘परिणामकारक संवादकौशल्य’ हा विषय मी साठय़े महाविद्यालयात शिकवत असताना, आपल्याला एखादी भाषा येत नसेल तरीही आपण संवाद साधू शकतो, असं सांगायचे.. मी तेच आजवर पुस्तकात शिकले आणि क्वचित अनुभवही घेतला होता. पण, या मेळाव्यामध्ये सतत या गोष्टीची जाणीव झाली. हिंदी भाषिक मराठी नाटक पाहायला थांबत होते. आसामचे काही जण दाक्षिणत्य संगीतावर तल्लीन होऊन मान डोलवत होते. दक्षिणेकडून आलेले काही हिंदी आणि इंग्रजी तितकसं न येताही आवर्जून, रांगोळीबद्दल विचारत होते, सहज गप्पा मारण्यासाठी येत होते. हरयाणातील लोकांनी केलेला सांबार आणि रस्समचा दिव्य प्रयत्न गोड मानून चाखत होते. एकमेकांशी प्रेमानं वागणारी, आपुलकीनं चौकशी करणारी अनेक मंडळी तिथे होती..

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी कुरुक्षेत्राहून जवळ असणाऱ्या अमृतसर, हरिद्वार अशा ठिकाणी ज्यांना भेट द्यायची असेल त्यांच्यासाठी कमी दरात बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्याचा लाभ घेत आम्ही कोंकण प्रांतातून आलेल्या १५ रांगोळी कलाकारांनी गाडी बुक केली. ३१ ऑक्टोबरला सकाळी निघालो. अमृतसर, जालियनवाला बाग आणि मग वाघा बॉर्डर असा क्रम ठरला. वाघा बॉर्डरला जाऊन तो सोहळा पाहण्यासाठी सर्व अत्यंत उत्साहात होते. त्यातंच तिथे जाऊन रांगोळी काढायचा विचारही होता, पण परवानगी मिळणं, वेळेत सर्व करता येणं, अशी अनेक आव्हानं समोर होती. आम्ही अमृतसरसाठी निघालो. लुधियाना सोडतोय तोच थेट सीमेवरून विनायक वाघांना फोन आला. रांगोळी काढायची परवानगी मिळाली होती. केवळ वासुदेव कामत आणि संस्कार भारती यांच्यामुळे एका ऐतिहासिक प्रसंगात सहभागी होण्याचं भाग्य आम्हा सर्वाना लाभणार होतं. वेळ पाहता आम्ही प्रथम वाघा बॉर्डर अर्थात आपले त्या भागातील शेवटचे गाव ‘अटारी’ गाठण्याचं ठरवलं. दुपारी तीनच्या आसपास आम्ही अटारीला पोहोचलो असू. बस पार्क करून, रांगोळीची पोती घेऊन आम्ही आत जाण्यासाठी निघालो. वाटेत भेटणारे सायकल रिक्षाचालक, फेरीवाले, प्रवासी, सर्व जण आम्हाला एवढं सामान आत नेऊ देणार नाहीत, असं सांगत होते. तरीही आम्ही चालत आहोत, हे पाहून आम्हाला वेडय़ात काढत होते. पहिल्या दारावर आम्हाला अडवण्यात आलं. आम्ही परवानगी आधीच घेतली असल्याचं सांगितलं. थोडय़ा वेळाने त्यांनी आम्ही देत असलेली माहिती तपासली आणि आम्हाला आत सोडलं. आता दुसऱ्या दारावर पुन्हा थांबावं लागलं. एक फौजी स्वत: आम्हाला घ्यायला आले. प्रेमाने विचारपूस केली. आम्हाला बस घेऊन थेट आत जाता येईल असं सांगितलं.  एवढय़ा वर्षांत प्रथमच बस आत जाऊ शकते असं आमच्या ड्रायव्हरना समजलं. तेही बेहद्द खूश झाले. आमच्याकडे रांगोळी काढायला जेमतेम तास होता. आम्ही आत आलो. आपला ध्वज अभिमानाने आकाशात मुक्त लहरत होता. नकळत हात जोडले गेले. डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. समोरच दिसलं ते पाकिस्तानचं दार. इथून दहाव्या पावलावर वेगळा देश सुरू होतो. ‘वेगळा देश’!!! आपल्यातीलच एक भाग असा तुटून वेगळा व्हावा आणि त्याचा सल सतत बोचावा. न भरणारी जखम पुन्हा पुन्हा, गेली कित्येक र्वष भळाभळा रक्त ओकत असते. अनेक विचारांनी डोकं सुन्न झालं. मग लक्षात आलं.. ‘‘अरेच्चा! मी १२ वर्षांपूर्वी येऊन गेले तेव्हा इथे एवढं बांधकाम नव्हतं. काही भागात तर अजूनही काम चालू आहे. कसे राहत असतील जवान इथे! आणि आपण मात्र त्यांच्या जिवावर आरामात मजा करत असतो!’’

तेवढय़ात एका जवानाने आम्हाला रांगोळीची जागा दाखवली. वेळ सांगितली आणि आम्ही कामाला लागलो. बराच वेळ शांत असलेला तो परिसर आता हळूहळू प्रेक्षकांना आत सोडू लागल्यावर गजबजू लागला. आमची रांगोळी होईपर्यंत काही हजार लोक तिथे जमले. अनेकांना रांगोळीची उत्सुकता होती. ‘‘इतने सालों मे पहली बार यहा रंगोली बन रही है।’’ एका जवानकडून मिळालेली पहिली कौतुकाची पावती! ‘‘रंगोली दिवाली में बनाते है ना?’’ एका महिला फौजीने मला विचारलं. ‘‘जी हां। लेकिन हर रोज या हर शुभ अवसरपर भी बनाते है।’’ मी म्हणाले. खरंच, अशा ठिकाणी येऊन जवानांना मानाचा मुजरा करण्याचं भाग्य लाभणं याहून शुभ काय असेल!

‘‘है लिये हथियार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तय्यार हैं सीना लिये अपना इधर। खून से खेलेंगे होली गर वतन मुश्कील में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।’’ रामप्रसाद बिस्मिल यांच्या या पंक्ती रांगोळीमध्ये रेखाटताना सर्वामध्ये एक स्फुरण आलं होतं. दिवस-रात्र आपलं घरदार सोडून सर्व भारतीयांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सर्व जवानांना आणि ज्या मातृभूमीने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिलं, तिच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही ‘भू अलंकरण’ विभागाने ती जागा अलंकृत केली. संस्कार भारतीने असेच आपल्या देशाच्या सर्व सीमांवर आपली ‘भू अलंकरण’ मोहीम राबवावी आणि आपण अशा प्रत्येक वेळी तिथे उपस्थित असावं आणि नंतर तो सोहळा आपल्याला शब्दबद्ध करता यावा, अशी इच्छा मनात आली.

रांगोळी काढून झाली. अनेकांनी कौतुक केलं. आम्ही जागेवर जाऊन बसलो. परेड सुरू झाली तशी एकाएकी वातावरण बदललं. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी आसमंत निनादला. एरवी, मराठी, गुजराती, पंजाबी किंवा जातीजातीवरून चर्चा करणारे तिथे मात्र एकच होते.. प्रत्येकाची ओळख होती ‘भारतीय’, प्रत्येकाचा आवाज होता ‘भारतीय’, प्रत्येकाचा धर्म होता एकच.. ‘भारतीय’! अभिमानाने आणि उत्साहाने, चैतन्याने वातावरण सळसळत होते. हीच ऊर्जा, हीच भावना सतत  सर्वामध्ये राहिली, विविधतेत नेहमी खरंच एकता असली तर किती प्रश्न सहज सुटतील नाही? मग कोणाची बिशाद आपल्याकडे वाकडय़ा नजरेने पाहायची?

तिथे रोज एकदा आपलं आणि पाकिस्तानचं दार उघडून हस्तांदोलन करण्यात येतं. अशी दारं नेहमीसाठी खुली झाली तर! दिवाळीत आपण तिथे मिठाई वाटतो म्हणे.. असं नेहमी, बिनधास्त सर्वाना करता येईल असा दिवस कधी येईल? आपले झालेले आणि होऊ घातलेले सर्व तुकडे पुन्हा एकदा एकसंध झाले तर..! मन किती झेप घेईल.. किती विचार करेल.. त्याचा नेम नाही! संध्याकाळ झाली म्हणून ध्वज उतरवण्यात आले. एवढा वेळ आपल्याकडे निवांत बसलेला एक पक्षी त्या तिथल्या, त्यांच्या झाडावर जाऊन बसला.. दोन मिनिटांमध्ये पुन्हा आपल्या इथे आला.. असंच काहीसं तर चालू होतं मनात!

कार्यक्रम संपला. गर्दी ओसरली. अंधार पडायची वेळ होऊ लागली. आम्ही निघणार तेवढय़ात एक देखणे सरदारजी अर्थात फौजी आले. आमच्या कामाचं कौतुक केलं. कुठून आलात, कुठे जाणार सर्व विचारलं आणि म्हणाले, ‘दूर से आये हो, बहुत सुंदर कला का प्रदर्शन किया है। चाय पियेंगे?’ आम्ही थक्क होऊन एकमेकांकडे आ वासून बघत राहिलो. त्यांच्या मागोमाग नकळत पावलं त्यांच्या तंबूत शिरली. मी चहा पीत नाही. चव घेतली आहे पण, मला तो वासही आवडत नाही. अगदी मनापासून सांगते, त्यांनी बनवलेला चहा मात्र जगातील अप्रतिम पेय होतं. खूप सुंदर चव! त्यात त्यांचे अपार कष्ट, देशाभिमान, कर्तव्यनिष्ठा होती! ती चव आपल्या हाताला येणं थोडं कठीणच! आम्हाला अगदी आमच्या बसपर्यंत ते सोडायला आले. रांगोळीबद्दल आवर्जून चौकशीही केली. पोट्र्रेट रांगोळीचे फोटो पाहून थक्क झाले. त्यांना ‘जय हिंद’ म्हणून निरोप देताना डोळे पुन्हा पाणावले. आपले खूप जवळचे कोणी तरी आपण इथे दूरवर सोडून जात आहोत वाटलं! त्या सर्वाची मुद्रा मात्र शांत आणि प्रसन्न.. जणू आम्हाला मुक्यानेच आश्वस्त करत होती.. ‘निर्धास्त राहा.. आम्ही आहोत, तुमची काळजी घेण्यासाठी..!’
वैदेही शेवडे वैद्य – response.lokprabha@expressindia.com